esakal | गंधोपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Flower

फुलापासून मिळणारा खरा आनंद फुलांच्या सुवासातच लपलेला असतो. आरोग्य देण्याची ताकदही फुलांच्या सुगंधातच दडलेली असते. पाणी तबकात भरून त्यात सुगंधी फुले टाकून ठेवली तर हवेत पाण्याच्या वाफेबरोबर फुलांचा सुगंधही पसरू शकतो. निर्गुडी, गवती चहा, लव्हेंडर अशा विविध प्रकारच्या वनस्पती टाकून मिळविलेल्या वाफेपासूनही खूप फायदा होऊ शकतो.

गंधोपचार

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

फुलापासून मिळणारा खरा आनंद फुलांच्या सुवासातच लपलेला असतो. आरोग्य देण्याची ताकदही फुलांच्या सुगंधातच दडलेली असते. पाणी तबकात भरून त्यात सुगंधी फुले टाकून ठेवली तर हवेत पाण्याच्या वाफेबरोबर फुलांचा सुगंधही पसरू शकतो. निर्गुडी, गवती चहा, लव्हेंडर अशा विविध प्रकारच्या वनस्पती टाकून मिळविलेल्या वाफेपासूनही खूप फायदा होऊ शकतो. विशिष्ट सुगंधामुळे छाती भरून श्वास घेण्याची प्रवृत्ती वाढल्याने रोगपरिहाराला सुरवात होते. वनस्पतीत असणारे औषधी गुणधर्म हे त्यांचे अत्यंत सूक्ष्म कण सुगंध मार्गाने शरीरात प्रवेश करत असल्याने त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो. निसर्गातील सुगंधाचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घ्यायला हवा.

भारतीय परंपरेत प्रार्थना, पूजा, हवन अशा सर्व काम्य वा आध्यात्मिक प्रक्रियांच्या सुरवातीला धूप-दीप स्थापन करण्याची पद्धत आहे. या वेळी म्हणण्यात येणारा श्‍लोक असा, 
वनस्पतिरसोद्‌भूतो गन्धाढ्यो गन्धः उत्तमः।
आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्‌।।
वनस्पतीच्या रसापासून उत्पन्न झालेला, सर्व सुगंधी पदार्थांत श्रेष्ठ, उत्तम सुगंध असणारा व सर्व देवांना आवश्‍यक असणारी शक्‍ती पोचविणारा हा धूप देवांनी स्वीकारावा (वनस्पती किंवा धातू हे स्थूल स्वरूप, गंध वा अत्तर हे सूक्ष्म स्वरूप आणि त्यांचा सुगंध किंवा सुगंधित धूप-धूर हे अति अति सूक्ष्म वायवीय स्वरूप).

पहिल्या पावसाच्या वेळी तापलेल्या मातीवर आकाशातून आलेल्या जलाचे प्रोक्षण झाल्याझाल्या पृथ्वीच्या जडकणातील काही कणांचे अतिसूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होते व अप्रतिम सुगंध सर्वदूर पसरतो. तसेही पाहता पृथ्वीतत्त्वाचा भाव सुगंध हाच आहे. जेथे एखाद्या ठिकाणी सुगंध वा दुर्गंध असेल त्या ठिकाणी त्या द्रव्याचे अतिसूक्ष्म कण वातावरणात असतात, जे नाकातोंडावाटे किंवा त्वचेमार्फत शरीरात प्रवेश करतात. 

अत्तर कापसावर शिंपडून तो कापूस टांगून ठेवल्यास वातावरणात सुगंधी द्रव्याचे कण पसरवत राहतो, यामुळे वातावरण सुगंधित तर होतेच, बरोबरीने शुद्धही होते, हा अनुभव आपल्याला असतो. पाण्यामध्ये अत्तराचे दोन थेंब टाकून पाणी गरम केल्यास अत्तराचे पार्थिव कण अतिसूक्ष्म कणांच्या रूपात वातावरणात पसरतात हाही अनुभव आपल्याला असतो (रासायनिक पर्फ्युम्स पाण्यात टाकून त्याचे सूक्ष्म कण वातावरणात पसरल्यास आरोग्याला फायदा होईल असे नाही).

एक गोष्ट निश्‍चित आहे, की घरात वा विशेष प्रसंग असताना फुलदाणीत चार फुले ठेवून वातावरण आनंदी करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. याचाच अर्थ फुलांमुळे मानसिक नैराश्‍य दूर होते, वातावरणातील कोंदटपणा वा दुर्गंध दूर होतो व आरोग्यरक्षणाचे काम सुरू होते. सध्या फुलांचा रंग या एकाच गोष्टीकडे लक्ष दिलेले दिसते व त्यामुळे फुलांचे देठ कडक व मोठे करून फुले नजरेत भरवण्याची क्‍लृप्ती केलेली दिसते, कारण त्यांना सुगंध नसल्याने फुलांकडे लक्ष जाणे शक्‍य नसते. आकार व रंग या दोनच गुणांवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना केल्या जातात, त्या आवडतात व त्यांच्यामुळे शोभा आल्यासारखीही वाटते; पण ती फुले कागदापासून वा प्लॅस्टिकपासून बनविलेली नाहीत, ही शंका निरसन करून घ्यावी लागते. किंबहुना अशा रीतीने बिनवासाची फुले वापरली जाऊ लागल्यानेच कुणाला तरी प्लॅस्टिकची फुले बनविण्याची प्रेरणा मिळाली असावी.

फुलापासून मिळणारा खरा आनंद फुलांच्या सुवासातच लपलेला असतो. आरोग्य देण्याची ताकदही फुलांच्या सुगंधातच दडलेली असते. खरे पाहता लतामंडपातील जाई-जुईच्या सुगंधात न्हाऊन फुललेली अनेक प्रेमप्रकरणे आपल्या वाचनात असतील. बाख नावाच्या एका शास्त्रज्ञाने फुलांचे अर्क काढून त्यापासून काही औषधे तयार केली. बाख रेमिडीज्‌ या नावाने ती प्रसिद्धही होती. अशी औषधे वापरून असलेले आरोग्य टिकविणे एवढाच हेतू अभिप्रेत होता. 

भारतीय अतिप्राचीन काळापासून अनेक प्रकारची अत्तरे वापरलेली दिसतात, मग ती कापसाचा फाया करून कानात ठेवण्यासाठी असोत, हातावर चोळण्यासाठी असोत वा अन्नयोगात वापरलेली असोत. अत्तर हे फुलांपासून शुद्ध चंदन तेलावर बनविलेले असावे. कुठले अत्तर कुठल्या रोगावर, कुठल्या भावनेवर उपयोगी पडेल, याविषयी खूप अभ्यास झालेला आहे. मनाच्या चित्तवृत्ती प्रक्षोभित होणार नाहीत व जेथे कोणालाही संदेश मिळू शकत नाही अशा अंधाऱ्या खोलीत विशिष्ट सुगंधामध्ये व्यक्‍तीला बसविल्यावर त्याच्या एकूणच मानसिक धारणेत व रोगात बदल होतो हे सिद्ध करून तशा प्रकारची उपचारपद्धती मी स्वतः अनेक वर्षे रोग्यांसाठी उपलब्ध करून दिलेली होती. वेगवेगळी सुगंधित लाकडे जाळून वा झाडापासून निघणारे गुग्गुळ, गोंद वगैरे जाळून येणाऱ्या सुगंधित धुरापासून जंतूंपासून संरक्षण तर मिळतेच; पण मनुष्याला उपयुक्‍त पडणाऱ्या शक्‍ती आकर्षित होतात. हे सर्व तंत्रज्ञान भारतातच विकसित झालेले दिसते. पाणी तबकात भरून त्यात सुगंधी फुले टाकून ठेवली तर हवेत पसरणाऱ्या पाण्याच्या वाफेबरोबर फुलांचा सुगंधही पसरू शकतो आणि त्याचा आरोग्यासाठी उपयोग होऊ शकतो; तसेच छोट्या दिव्यावर ठेवलेल्या एका छोट्या भांड्यात पाणी व अत्तराचे चार थेंब टाकले आणि खालून दिव्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होण्याची योजना केली तर खोलीभर वास पसरून फायदा होऊ शकतो. मसाज करण्यापूर्वी स्वेदन करण्यासाठी जी वाफ वापरायची ती वाफ ज्या पाण्यापासून तयार होते त्या पाण्यात सुगंध मिसळवले तर अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. निर्गुडी, गवती चहा, लव्हेंडर अशा विविध प्रकारच्या वनस्पती टाकून मिळविलेल्या वाफेपासूनही खूप फायदा होऊ शकतो.

विशिष्ट सुगंधामुळे छाती भरून श्वास घेण्याची प्रवृत्ती वाढल्याने रोगपरिहाराला सुरवात होते. वनस्पतीत असणारे औषधी गुणधर्म हे त्यांचे अत्यंत सूक्ष्म कण सुगंध मार्गाने शरीरात प्रवेश करत असल्याने त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो.  

दुर्गंध आला की आपण फक्‍त नाक मुरडतो असे नव्हे, तर अशावेळी मनुष्याची श्वास घ्यायची क्षमता कमी होते, फार वेळ दुर्गंध येत असला तर दुर्गंधाबरोबर जंतू तर शरीरात प्रवेश करतातच, बरोबरीने श्वास आत घेण्याची क्रिया कमी झाल्याने शरीर चांगल्या हवेपासून वंचित राहून शरीराला प्राणवायूची पूर्तता कमी प्रमाणात झाल्याने रोग उद्भवू शकतात.  

औषधयोजनेत फुलांचा समावेश करता येतो. एक गोष्ट मात्र खरी, की ही एक पूरक उपचारपद्धती असून, ती काही मर्यादेतच वापरता येते. त्याचे अतिस्तोम करून नुसत्या सुगंधउपचारपद्धतीवर अवलंबून राहण्याने रोग बळावून तोटा होऊ शकतो. 

एक गोष्ट नक्की की पृथ्वीवर राहणारे आपण सर्व पृथ्वीवर प्रेम करणारे आहोत, गंध हा पृथ्वीतत्त्वाचा गुण आहे व प्रत्येक व्यक्‍तीला विशिष्ट वास आवडतात. अन्नाची रुची त्याच्या सुगंधामुळे वृद्धिंगत होते. निसर्गातील सुगंधांचा वापर योग्य तऱ्हेने करून घेतला तर मुळात रोग होणार नाहीत व झाले तर लवकर बरे करता येतील.

loading image