सुगंधाचे आरोग्यासाठी वरदान

Smell
Smell

गंध हा पृथ्वी महाभूताचा गुण आहे. म्हणजेच कोणत्याही गंधाचे गमस्थान पृथ्वी महाभूतात असते. म्हणूनच जमिनीतून येणाऱ्या बहुतेक सर्व पाना-फुलांना, वनस्पतींना अगदी मुळांनासुद्धा कोणता ना कोणता गंध असतोच. गंध पृथ्वीतत्त्वाच्या आश्रयाने राहणारा असला तरी त्याचे वैशिष्ट्य हे की, तो अत्यंत सूक्ष्म, तरल असतो आणि त्यामुळे सर्वदूर पसरतो, इतकेच नाही तर व्यक्‍तीमधून सूक्ष्म तत्त्वांवर उदा. मन, इंद्रिये यावरही काम करू शकतो. मन शांत करण्यास, स्थिर करण्यास मदत करतो.

साधारणतः उपचार म्हटला की तो कुठल्या ना कुठल्या द्रव्याच्या मदतीने केला जातो. सुगंध हे द्रव्य नाही तर तो एक गुण आहे. मात्र, सुगंधाचे आरोग्यासाठी योगदान पूर्वापार चालत आलेले आहे. वेदांमध्येही वनस्पतींच्या ‘गंधा’बाबत ऋचा आलेली आहे. सध्याच्या आधुनिक जगातही ‘अरोमा थेरपी’ला महत्त्वाचे मानले जाते. 

गंध हा पृथ्वी महाभूताचा गुण आहे. म्हणजेच कोणत्याही गंधाचे उगमस्थान पृथ्वीमहाभूतात असते. म्हणूनच पहिला पाऊस पडला की आसमंतात मातीचा जो गंध पसरतो, तो अतुलनीय असतो. म्हणूनच जमिनीतून येणाऱ्या बहुतेक सर्व पाना-फुलांना, वनस्पतींना अगदी मुळांनासुद्धा कोणता ना कोणता गंध असतोच. गवताला वास नाही, असे जरी म्हटले तरी एखाद्या बागेत नुकतीच हिरवळ कापली असली तर त्या ठिकाणी वेगळाच गंध भरून राहिलेला असतो. गंध पृथ्वीतत्त्वाच्या आश्रयाने राहणारा असला तरी त्याचे वैशिष्ट्य हे की तो अत्यंत सूक्ष्म, तरल असतो आणि त्यामुळे सर्वदूर पसरतो, इतकेच नाही तर व्यक्‍तीमधून सूक्ष्मतत्त्वांवर उदा. मन, इंद्रिये यावरही काम करू शकतो.

सुखानुबन्धी सूक्ष्मश्‍च सुगन्धो रोचनो मृदुः ।
दुर्गन्धो विपरीतोऽस्माद्‌ हृल्लासारुचिकारकः ।।
....सुश्रुत सूत्रस्थान

सुगंध हा सूक्ष्म व मृदू गुणाचा असून, रुची व उत्साह निर्माण करणारा आहे. याउलट दुर्गंध अरुची, उद्वेग व मळमळ उत्पन्न करणारा आहे.
सुगंधाच्या पाठोपाठ येणारे प्रसन्नत्व, समाधान मनाला सुखावणारे आहे. भिरभिरणाऱ्या किंवा अस्वस्थ, बेचैन मनाला सुगंध सुखावतो, तसेच हा पृथ्वी महाभूताचा प्रतिनिधी असल्याने मन शांत करण्यास, स्थिर करण्यासही मदत करतो. आयुर्वेदातही जटामांसी, ज्येष्ठमधासारख्या सुगंधी वनस्पतींचा मन शांत होण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी वापर केला जातो.

वास-सहवास सुखावे
आहार किंवा औषधे, विशेषतः रसायन औषधे, मनापासून सेवन केली गेली, मनाला समाधान देऊ शकली तरच अंगी लागतात, शरीरात स्वीकारली जाऊन शुक्र व ओज वाढवण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच नुसत्या वासाने अन्न खायची इच्छा होईल अशा पद्धतीने स्वयंपाक केला जातो. कढीपत्ता, कोथिंबीर, आमसूल, केशर, वेलची अशी असंख्य द्रव्ये यासाठी स्वयंपाकघरात वापरली जातात. च्यवनप्राश, धात्री रसायनासारख्या रसायनांमध्येही वेलची, दालचिनी, केशर, लवंग, कस्तुरी वगैरे द्रव्यांचा प्रक्षेप (रसायन बनवून झाल्यानंतर वरून टाकलेली द्रव्ये) केला जातो. 
पित्तशमनासाठीही सुगंधाचा उपयोग केलेला दिसतो. 

मृदु-सुरभि-शीत हृद्यानां गन्धानां उपसेवा ।
शीतल, मृदू व मनाला प्रिय वाटणाऱ्या सुगंधांच्या सहवासात राहणे. 
    शिशिर-सुरभि-सलिलमज्जन - सुगंधित शीतल पाण्यात डुंबणे
    मालिका-कुन्द-मल्लिकादि - मोगरा, कुंदा, जुई वगैरे सुगंधी फुलांच्या माळा धारण करणे.
    चन्दन-प्रियंगु-कालीयक-मृणाल-कर्पूरसुगन्धिशीत स्वच्छवारिभिः अभिप्रोक्षणम्‌ - चंदन, प्रियंगु, वाळा, कमळ, कापूर वगैरे द्रव्यांनी सुगंधित असे थंड व स्वच्छ पाणी जमिनीवर व भिंतीवर शिंपडणे
अशा प्रकारे पित्तशमनासाठी शीत सुगंधाचा विविध मार्गांनी उपयोग करण्यास सुचविलेले दिसते; पण सर्वच सुगंध शीत नसतात. द्रव्यानुसार गंधाचे गुण आणि परिणाम बदलत जातात. जसे शीतल चंदनाचा गंध पित्तशमन करतो, गुलाब, मोगरा, वाळा या शीतद्रव्यांचा गंध उष्णता कमी करतो. जायफळाच्या दर्पाने गुंगी येऊ शकते, तर खऱ्या कस्तुरीचा गंध यौवनशक्‍ती उद्दीपित करणारा असतो. संस्कृतमध्ये मदयन्तिका असे नाव असलेल्या मेंदीचा गंध नावाप्रमाणेच मादक असतो. मोहाच्या फुलांचा गंध मनाला मोहवून आपले नाव सार्थ करतो. पांढऱ्या रंगाच्या केवड्याचा गंध केसांचा दुर्गंध घालवण्यासाठी वापरतात, तर सोनेरी रंगाचा केवडा मादक असतो. तीक्ष्ण गंधाची लसूण कफदोषाची दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी वापरतात, तर वेखंडाच्या उग्र वासामुळे त्याला उग्रगंधा असे पर्यायी नाव दिलेले आहे. आयुर्वेदात उपचारासाठीही गंधाचा वापर केलेला आहे. 

गंध गुणकारी
अतिप्रमाणात घाम येत असल्यास व विशेषतः घामाला दुर्गंध येत असल्यास तुरटी, चंदन व कापराचे बारीक चूर्ण अंघोळीनंतर अंगाला लावण्याने फायदा होतो. यातील तुरटीमुळे घाम यायचे कमी होते तर चंदन व कापराच्या सुगंधामुळे दुर्गंध नाहीसा होतो. मात्र, यासाठी कापूर शुद्ध हवा.

तापानंतर किंवा अंगात उष्णता वाढल्यास नाकात फोड येतो, तेव्हा मोगऱ्याच्या फुलांचा वास घेत राहिल्यास फोड आपोआप बरा होतो.

बाळ जन्मल्यावर त्याचे पहिले स्नान सर्वगंधउदकाने करावयास सांगितले आहे. दालचिनी, तमालपत्र, छोटी वेलची, नागकेशर, कापूर, कंकोळ, अगरु, शिलाजित व लवंग या नऊ द्रव्यांच्या समूहाला ‘सर्वगंध’ म्हणतात. ही द्रव्ये पाण्यासह उकळून बनवलेला सुगंधी काढा अंघोळीच्या पाण्यात मिसळले जाते. अशाच प्रकारे नंतरही बाळ मोठे होईपर्यंत सर्वगंधोदकाचे स्नान उत्तम होय.

गंधाचा उपयोग जंतुघ्न, कृमिनाशक म्हणूनही केला जातो. अथर्ववेदाच्या काळापासून याप्रकारचे प्रयोग केले जात असत.

कुसूला ये च कुक्षिलाः कटुभाः करुमास्त्रिभाः ।
तानोषधे त्वं गन्धेन विषूचिनान्‌ विनाशय ।।
....अथर्ववेद 

हे औषधी, तू आपल्या गंधाने कुसूल, कुक्षिल वगैरे जंतूंचा नाश कर. वेखंड, कापूर, कोष्ठकोळिंजन, ओवा, लसूण यासारखी उग्र, तीक्ष्ण गंध असलेली द्रव्ये यासाठी वापरली जात असत. जंतुसंसर्ग न व्हावा किंवा झालेला संसर्ग बरा व्हावा यासाठी अजूनही अशा द्रव्यांचा वापर केला जातो.

लहान बालकांचे अंथरूण, पांघरूण, आसन, कपडे मऊ, हलके, स्वच्छ व सुगंधित असावीत, असे चरकाचार्य सांगतात व त्यासाठी या सर्व गोष्टींना सुगंधी द्रव्यांची धुरी देण्यास सांगतात. 

लहान मुलांच्या हातात किंवा गळ्यात वेखंड बांधले जाते, यामागे वेखंडाच्या गंधाने जंतुसंसर्गास प्रतिबंध होणे अपेक्षित असते. - धान्यास कीड लागू नये म्हणून धान्यात वेखंड किंवा वाळलेली कडुनिंबाची पाने ठेवण्याचा प्रघात आहे. 

ओवा कफशामक व उष्ण गुणाचा असल्याने लहान मुलांना सर्दी झाली असता त्यांना ओव्याच्या पुरचुंडीचा वास दिला जातो. 

केशर हेही एक प्रभावी सुगंधी द्रव्य आहे. केशर त्याच्या गुणांनी व सुगंधाने शुक्रधातूची ताकद वाढवते. अनेक औषधांमध्ये सुगंधासाठी केशर, वेलचीसारखी सुवासिक द्रव्ये वापरली जातात.

विरेचनासाठी सामान्यतः पोटात काढा, गोळ्या वगैरे औषध दिले जाते. मात्र, चरकसंहितेत, नाजूक व कोमल प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी एक योग असा आहे की, ज्यात विरेचनीय द्रव्यांच्या भावना देऊन तीक्ष्ण केलेले सूक्ष्म चूर्ण सुगंधी हारावर शिंपडून तो हार व्यक्‍तीच्या गळ्यात घातला जातो. हाराच्या सुगंधाबरोबर हे विरेचनाचे सूक्ष्म चूर्ण शरीरात प्रवेशित झाले की त्याने जुलाब होतात. अशा प्रकारे आयुर्वेदाने सुगंधाचा वापर विरेचनासाठीही केलेला आहे.

लवंग, कंकोळ अशी सुगंधी द्रव्ये मुखशोधन म्हणजे तोंडाच्या शुद्धीसाठी वापरली जातात. याने दूषित कफाचा नाश होतो, श्वासाची दुर्गंधी नाहीशी होते.

अर्काची उपयुक्तता
आयुर्वेदात निरनिराळ्या द्रव्यांच्या, वनस्पती, फुला-फळांच्या अर्काची माहिती दिली आहे. अर्क काढण्याची पद्धत, अर्काचे गुण, त्याचा उपयोग करायची पद्धत असा प्रकारे विस्ताराने अर्काचा विषय समजावला आहे. त्यात अर्क सुगंधी असावा, हे आवर्जून सांगितले आहे.

कृत्वा सुगन्धं दुर्गन्धमर्कं पुष्पादिभिः सुधीः ।
गुणाय पश्‍चात्‌ सेवेत ह्यन्यथाऽपगुणो भवेत्‌ ।।
..निघण्टुरत्नाकर

अर्क सुगंधी असावा, दुर्गंधी अर्काला सुवासिक फुलांनी किंवा इतर कोणत्याही उपायांनी सुगंधित करावे व मगच तो वापरावा. अर्क सुगंधी असला तरच गुण येतो, दुर्गंधी अर्काने दोषच उत्पन्न होतात.

एखाद्या कडू वा तुरट रसाच्या द्रव्याचा अर्क काढला तरी तो सुगंधी होईल, रुचकर होईल यासाठी विविध उपाय सुचवले आहेत. त्यासाठी सुगंधी द्रव्यांची धुरी दिलेल्या मातीच्या कोऱ्या मडक्‍यात हे सर्व ठेवणे किंवा अर्कयंत्रावर केवडा, मोगरा, जाई, पारिजातक वगैरे सुगंधी द्रव्यांचे झाकण ठेवणे किंवा अर्क काढताना त्यात जायफळ, तालीसपत्र, कस्तुरी, नागकेशर वगैरे अष्टगंधाचे चूर्ण मिसळणे असे विविध उपाय सांगितले आहेत. यातील काही उदाहरणे याप्रमाणे- 

त्वगेलापत्रकैस्तुल्यैः त्रिसुगन्धमिति स्मृतम्‌ । 
तदर्को मुखदौर्गन्ध्यच्छेदनो मलभेदनः ।।
नागकेशरमेला च पत्रके च वरांगकम्‌ ।
जातुर्जातमिदं वर्ण्यं वकिृत्‌ च विषापहम्‌ ।।

दालचिनी, तमालपत्र व वेलची यांना ‘त्रिसुगंध’ म्हणतात व त्यापासून काढलेला सुगंधी अर्क मुखाची दुर्गंधी नष्ट करतो व मलावष्टंभावर उपयोगी पडतो. यातच नागकेशर मिसळून काढलेला सुगंधी अर्क त्वचेची कांती उजळवतो, अग्नीची ताकद वाढवतो व विषारांचा नाश करतो. 
आयुर्वेदात ‘सुगंधीगण’ सांगून त्याच्या अर्काची उपयुक्‍तता वर्णन केलेली आहे.

कर्पूरोमृगनाभिश्‍च कस्तूरीलतिका तथा ।
शटी कर्चूर एकीा सुगन्धोऽयं गणो मतः ।।
विधिनिष्कासितो अर्कस्तु रुच्यः पाचनदीपनः ।ै
मुखदौर्गन्ध्य हृनैत्र्यो लेपान्मेदः श्रमापहाः ।।

कापूर, कस्तुरी, चंदन, शिलाजित, देवदारु, पद्मकाष्ठ, वाळा, जटामांसी, कापूरकाचरी, कचोरा, केशर वगैरे द्रव्यांचा मिळून ‘सुगंधीगण’ होतो व याच्या अर्काने पचन सुधारते, भूक लागते, अन्नरुची उत्पन्न होते, मुख दुर्गंधीचा नाश होतो, डोळ्यांची शक्‍ती वाढते. हा अर्क अंगाला लावला असता मेद झडतो, थकवा नाहीसा होतो, वजन कमी करण्यासाठी बाष्पस्वेदन घेताना या अर्काचा वापर करता येईल.
सुगंधीगणाच्या अर्काप्रमाणे दुसरा अत्यंत सुगंधी अर्क आहे ‘पुष्पार्क’, म्हणजे निरनिराळ्या सुगंधी फुलांचा अर्क.

सेवन्ती शतपत्री च वासन्ती गुलदावरी ।
चमेली यूथिका चम्पा बकुलश्‍च कदम्बकम्‌ ।।
छादयेत्केतकीपत्रैर्ग्राह्योऽर्को गुरुमार्गतः ।

शेवंती, गुलाब, मधुमालती, चमेली, जुई, चाफा, बकुळ, कदंब ही फुले घेऊन त्यावर केवड्याच्या पानाचे झाकण ठेवून गुरूंनी सांगितलेल्या रीतीप्रमाणे अर्क काढतात, तो ‘पुष्पार्क’ होय. हा अर्क अत्यंत श्रेष्ठ सांगितला असून, याच्या नियमित सेवनाने पुंसत्व शक्‍ती वाढते, क्षयरोगाचा नाश होतो, असेही सांगितले आहे. 

गंधाचे सूक्ष्मपण
गंध हा सूक्ष्म असल्याने सुगंधी अर्कदेखील शरीरात सहज शोषला जातो व त्याचे परिणामही खोलवर होताना दिसतात. सुगंधी अर्क किंवा द्रव्यातील अंगभूत तेले निरनिराळ्या पद्धतीने वापरली जातात. सेवन केलेला अर्क किंवा तेल पचनसंस्थेमार्फत शरीरात काम करतो. शरीराला लावला असता त्वचेमार्फत शरीरावर काम करतो, वजन कमी करणे, घाम कमी करणे किंवा अंगाचा दुर्गंध घालवणे या कामी अर्क याप्रकारे वापरला जातो. डोके कफाने जड झाले असता, दुखत असता, सर्दी-खोकला झाला असता. ‘अमृतधारा’ म्हणजे ओवा, कापूर वगैरे सुगंधी व कफशामक द्रव्यांचा अर्क पाण्यात घालून वाफारा घेतला जातो. बाष्पस्वेदनामध्येही पाण्यात याप्रकारे अर्काचे थेंब टाकता येतात. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी, मरगळलेपण घालवण्यासाठी, मनाचा शीण दूर करण्यासाठी सुगंधाचा उपयोग होतो. 

अशा प्रकारे सुगंधी द्रव्यांचे अनेक उपयोग असतात मात्र ती किती मात्रेत, कशा पद्धतीने वापरायची हे वैद्यकशास्त्राने ठरवलेले असते. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम सुगंध तयार करता येत असला तरी, त्यांचा नैसर्गिक सुगंधाप्रमाणे उपयोग होऊ शकत नाही. कृत्रिम सुगंधामुळे थोडा वेळ जरी बरे वाटण्याचा आभास उत्पन्न करता आला तरी, त्याचे अणू नैसर्गिक सुगंधाप्रमाणे सूक्ष्म तत्त्वांपर्यंत पोचू शकत नाहीत. तेव्हा उपयोग व्हावा असे वाटत असेल तेव्हा नैसर्गिक सुगंधी द्रव्यांना पर्याय राहात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com