तापातील चाचण्या

डॉ. हरीश सरोदे
Friday, 26 April 2019

अलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि सामान्यतः कोणकोणत्या असतात या तपासण्या? 

कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या घटकांमुळे माणसाला ताप येतो. तापामध्ये कोणत्या तपासण्या कराव्यात आणि कोणत्या मुदतीत कराव्या, याचे काही निकष प्रमाणित केलेले आहेत. त्यानुसार या तपासण्या असतात. सामान्यतः प्रत्येक तापात हिमोग्राम आणि युरीन रुटीन या तपासण्या कराव्या लागतात. त्यांचे महत्त्व पाहू. 

अलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि सामान्यतः कोणकोणत्या असतात या तपासण्या? 

कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या घटकांमुळे माणसाला ताप येतो. तापामध्ये कोणत्या तपासण्या कराव्यात आणि कोणत्या मुदतीत कराव्या, याचे काही निकष प्रमाणित केलेले आहेत. त्यानुसार या तपासण्या असतात. सामान्यतः प्रत्येक तापात हिमोग्राम आणि युरीन रुटीन या तपासण्या कराव्या लागतात. त्यांचे महत्त्व पाहू. 

हिमोग्राम - (यालाच सीबीसी असेही म्हटले जाते.) यामध्ये तुमच्या शरीरात काय उलथापालथ चालली आहे, याचा एक ढोबळ अंदाज बांधता येतो.

हिमोग्राममध्ये पांढऱ्या पेशींची संख्या वाढली आहे, की सामान्य पातळीपेक्षा कमी आहे? पांढऱ्या पेशींमधील उपप्रकारातील न्यूट्रोफिल, लिंफोसाइट, इओसिनोफील इत्यादी पेशींचे प्रमाण सामान्य आहे की जास्त आहे?

प्लेटलेटची संख्या कमी आहे का?
यावरून निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची दिशा मिळते. उदाहरणार्थ लघवीतील जंतुसंसर्ग, फुफ्फुसातील अथवा शरीरात इतर कुठे उत्पन्न झालेल्या जिवाणू (बॅक्‍टेरियल) प्रकारच्या संसर्गात पांढऱ्या पेशींची संख्या वाढलेली दिसते. उपप्रकारांपैकी न्यूट्रोफिल पेशींची संख्यादेखील वाढलेली असते, तर प्लेटलेटचे प्रमाण सामान्य अथवा वाढलेले आढळते. याच्या उलट विषाणूजन्य (व्हायरल) आजारांमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या सामान्यतः पातळीखाली जाते. या पाहणीवरून उपचार करणाऱ्या धन्वंतरींना ढोबळ वर्गीकरण करता येते. याशिवाय विषाणूजन्य आजारांमध्ये प्लेटलेट्‌ची संख्या कमी व्हायला सुरवात होते. डेंगी, मलेरिया, चिकुन गुनिया, स्वाइन फ्लू या आजारांमध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट कमी होतात, तसेच लिंफोसाईट्‌स जास्त असे आढळते. आणि नेमक्‍या याच समान निरीक्षणांमुळे नेमके निदान करण्यासाठी पुढील तपासण्या आवश्‍यक ठरतात.

युरीन रुटीन - या तपासणीत पॅथॉलॉजिस्ट लघवीत पांढऱ्या पेशी आहेत का, यावर जो अहवाल देतो तो बऱ्याचदा तापाचे कारण स्पष्ट करतो. लघवीत पांढऱ्या पेशी (पस सेल्स) असल्यास मूत्रमार्गाचा अथवा मूत्राशयाचा अथवा प्रोस्टेट ग्रंथीचा जंतुसंसर्ग तापाचे कारण असतो. 

पेरिफेरल स्मियर तपासणी - रक्तामध्ये हिवतापाचे (मलेरियाचे) जंतू एका विशिष्ट पातळीपर्यंत पोचले की ते विशिष्ट स्टेनिंग करून मायक्रोस्कोपखाली दिसतात. मलेरियाचे निदान तापाचे कारण दर्शवते. 

रॅपिड मलेरिया टेस्ट (आरएमटी ) - ज्यावेळी मलेरियाचे जंतू कमी प्रमाणात असतात त्या वेळी ते डोळ्यांना दिसत नाहीत अथवा कमी संख्येमुळे त्याचे निदान हुकू शकते. हे टाळण्यासाठी सदर चाचणी करतात. सदर चाचणीत मलेरियाच्या जंतूंचे प्रोटिन कवच (अँटीजेन ) आहे की नाही, हे समजते. शिवाय तो कोणत्या प्रकारचा आहे, हेदेखील कळते. 

डेंगीची तपासणी - गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र डेंगीच्या तापाने धुमाकूळ माजविला आहे. एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या चाव्यानंतर या रोगाचा विषाणू रक्तात प्रवेश करतो. त्या वेळेस लगेचच त्याच दिवशी अथवा एक-दोन दिवसांत खूप ताप येणे, थकल्यासारखे मलूल वाटणे, हातपाय दुखणे, अशी लक्षणे दिसू लागतात. कधीकधी रुग्णाला नुसतीच कणकण जाणवते.

आजाराच्या सुरवातीच्या या कालावधीत एनएन एक अँटीजन ही तपासणी करावी. तापाच्या पहिल्या दिवसापासून, तर सहा दिवसांपर्यंत त्याचे निष्कर्ष निदान करण्यासाठी उपयोगी असतात. त्यानंतर हे अँटीजन कमी होते अथवा नाहीसे होते. दरम्यानच्या काळात या अँटीजन विरुद्ध शरीर अँटिबॉडीज तयार करते. तापाच्या सातव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत या अँटिबॉडीज रक्तात आढळतात. या अँटिबॉडीजचे IgG आणि IgM असे दोन प्रकार असतात. पैकी IgM या आत्ताचा संसर्ग निश्‍चित करतात, तर IgG या पूर्वी होऊन गेलेला अथवा अलीकडेच होऊन गेलेला संसर्ग दर्शवितात. NS१ आणि IgM एकाच वेळी दिसू शकतात आणि त्यांनी सध्याच्या तापाचे कारण डेंगी आहे, हे स्पष्ट होते. अर्थात, दुसऱ्या वेळी डेंगीचा संसर्ग झाल्यास IgG आधी दिसतात (ज्या जुन्या संसर्गाच्या असतात) आणि त्यानंतर IgM दिसतात, त्या सध्याच्या संसर्गामुळे आढळतात. या सर्व क्रमामुळे कोणती चाचणी कधी केली, तर योग्य ठरेल हे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरानीच ठरवायला हवे असते. 

सामान्यतः डेंगी तापाच्या चौथ्या दिवसापासून चेहेऱ्यावर आणि अंगावरदेखील बारीक लाल रंगाचे पुरळ दिसते. खूप थकवा, डोके दुखणे, ताप परत परत येणे असे होते. डेंगीमध्ये इतर काही चाचण्यांचे अहवाल रुग्णाची अवस्था कशी आहे, यासाठी केल्या जातात. 

अ)  हिमोग्राम आणि प्लेटलेट काउंट - पांढऱ्या पेशींची आणि प्लेटलेट्‌ची संख्या कमी होत जाते. सामान्यतः सातव्या दिवशी हे दोन्ही घटक पूर्वपदाकडे परतताना दिसतात. 

ब )  लिव्हर फंक्‍शन चाचणी : डेंगीमध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीपासून SGPT आणि SGOT हे घटक वाढतात. बिलिरुबिन देखील थोडेसे वाढू शकते. अल्बुमिनचे प्रमाण कमी होऊन प्रोटिन आणि अल्बुमिनचे गुणोत्तर बिघडते. 

या चाचण्यांमुळे रुग्ण सुधारतो आहे की बिघडतो आहे, हे ठरवता येते. डेंगीवर ठोस औषध नसल्याने रुग्णाला आराम, गर्दीपासून दूर, ताजा आहार आणि पाण्याचे आणि क्षाराचे प्रमाण योग्य राखणे, हीच उपाययोजना असते. म्हणूनच निदान झाले तरी या विविध चाचण्या परत करत त्याला मॉनिटर करावे लागते.  यामध्ये प्लेटलेट्‌ची संख्या, इतर सखोल तपासण्या बाजूला ठेवून बघत राहाणे हेदेखील डॉक्‍टर करू शकतात. तथापि, प्लेटलेट कमी आल्या तरी त्या डोळ्यांना स्मियरवरती कशा दिसतात, हा विशेष प्रावीण्याचा भाग आहे. विषाणूजन्य आजारांमध्ये प्लेटलेट आकाराने मोठ्या होतात, ज्या मशीनवर मोजता येत नाहीत. सदर बाबीला मेगाप्लेटलेट असे म्हटले जाते आणि तसा उल्लेख प्लेटलेट्‌ची संख्या अजमावतांना अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणूनच मुळात या चाचण्या अर्हतायुक्त अनुभवी पॅथॉलॉजिस्टने केलेल्या असणे रुग्ण आणि तपासणारे डॉक्‍टर यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. 

चिकुन गुनिया - डासामुळे होणारा हा आणखीन एक त्रासदायक आजार असून, त्याची लक्षणे डेंगीसारखीच असतात. अर्थात, यात आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे शरीराचे सांधे विलक्षण दुखतात आणि आखडतात.  या आजारासाठी चिकुन गुनिया अँटीबॉडीज चाचणी उपलब्ध आहे. अर्थात, बरेचदा याचे निष्कर्ष दोन ते तीन आठवड्यांनंतर मार्गदर्शक ठरतात, त्यामुळे त्याला इतर तापांपासून वेगळं करताना इतर चाचण्या बघाव्या लागतात. 

स्वाइन फ्लू - अलीकडे हादेखील मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार परतला असून, त्याचे जास्त रुग्ण पुणे आणि मुंबई अशा गर्दीच्या शहरात सापडतात. यामध्ये रुग्णाला घशात दुखून जोरदार ताप येणे, अंग दुखणे, थकवा येणे, अशी लक्षणे दिसतात. यामध्ये घशातील स्त्राव घेऊन त्यावर PCR  चाचणी करून निदान केले जाते. तथापि, सरकारी धोरणानुसार याची चाचणी ठराविक ठिकाणीच केली जाते आणि त्याचे निश्‍चित निदान करण्यापेक्षा त्यावर प्रभावी असलेले टॅमी फ्लू औषध देण्याकडे यंत्रणांचा कल आहे. 

परंतु, हिमोग्राम या चाचणीत याही रुग्णांमध्ये डेंगीसारखीच निरीक्षणे दिसतात. 

टायफॉईड (विषमज्वर) - हा आजार दूषित अन्न अथवा पाणी ग्रहण केल्यामुळे होतो. सालमोनेला या जंतूमुळे हा आजार होतो. याचे निदान करताना तापाच्या एक ते सात दिवसांपर्यंत ब्लड कल्चर तपासणी करतात. सदर चाचणीला लागणारा वेळ आणि खर्च लक्षात घेता विडाल चाचणी केली जाते. तथापि, ही चाचणी तापाच्या सातव्या दिवसापासून पुढे निष्कर्ष योग्य रीतीने दाखविते. याशिवाय टायफी रॅपिड चाचणीदेखील उपलब्ध असून, त्याचे निष्कर्ष तिसऱ्या दिवशीपासून योग्य ठरू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flu Test Health Care