आहारविधिविधान 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 31 March 2017

जेवताना मन प्रसन्न असावे. जेवणाकडे लक्ष न देता गप्पा गोष्टी करण्यात मन गुंतले तर त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. आहार काय असावा याच्याइतकेच आहार कसा सेवन करावा, हे समजून घेणे गरजेचे असते. 

"पथ्य पाळले तर औषधाची गरजच काय? आणि पथ्य पाळले नाही तर औषध घेऊन फायदा तरी काय?' अशा अर्थाचे एक सुभाषित आहे आणि ते योग्यच आहे. आहार हा निरोगी राहण्यास आणि रोग झाला तरी पुन्हा आरोग्य मिळविण्यास महत्त्वाचे कारण असतो. आहार काय असावा याच्याइतकेच आहार कसा सेवन करावा हे समजून घेणे गरजेचे असते आणि यासाठी आयुर्वेदात आहारविधिविधान समजावलेले आहे. 

मागच्या वेळी आपण आहार ताजा-गरम असावा, योग्य प्रमाणात स्निग्धांशाने युक्‍त असावा, योग्य प्रमाणात सेवन करावा, अगोदर खाल्लेले अन्न पचल्यानंतरच पुन्हा खावा हे मुद्दे पाहिले, आता या पुढील मुद्द्यांचा अभ्यास करूया. 

वीर्याविरुद्धम्‌ अश्नीयात्‌ - म्हणजे जो आहार वीर्याने परस्परांशी विरुद्ध नाही तोच सेवन करावा. आहार किंवा जेवण हे अनेक पदार्थांनी मिळून बनलेले असते, तसेच एका पदार्थातही अनेक द्रव्ये एकत्र केलेली असतात. हा संयोग एकमेकांना पूरक असला तर त्यातून आहाराचा गुणोत्कर्ष होतो. मात्र एकमेकांना प्रतिकूल, एकमेकाच्या विरुद्ध गोष्टी एकत्र करून पदार्थ बनवला किंवा जेवणाचा बेत आखला तर त्यातून अनारोग्याला आमंत्रण मिळू शकते. उदा. दूध व फळे एकत्र करून खाणे, मीठ किंवा आंबटपणा असणाऱ्या पदार्थात दूध मिसळलेले असणे, दही व बासुंदी एकाच जेवणात योजणे वगैरे विरुद्ध आहाराची काही उदाहरणे होत. विरुद्ध आहार हा रक्‍तात दोष उत्पन्न करून विविध त्वचारोग उत्पन्न करतो, शक्‍तीचा ऱ्हास करवतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

इष्टे देशे इष्ट सर्वोपकरणं चाश्नीयात्‌ - म्हणजे अनुकूल ठिकाणी, अनकूल साम्रगीचा वापर करून जेवण करावे. 
इष्टे हि देशे भुञ्जानो नानिष्टदेशजैर्मनोविघातकरर्भावैर्मनोविघातं प्राप्नोति, यथैवेष्टैः सर्वोपकरणैः, तस्मादिष्टे देशे सर्वोपकरणं चाश्नीयात्‌ । ....चरकसंहिता विमानस्थान 

मनाला अप्रिय अशा ठिकाणी जेवण केले, तर त्यामुळे मन त्रस्त होऊन मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात. तसेच ताट, वाटी, पाणी प्यायचे फुलपात्र वगैरे गोष्टी मनाजोग्या, स्वच्छ, शुद्ध नसल्या तर त्यामुळेही मनात घृणा उत्पन्न होऊन मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून आपल्या भारतीय परंपरेत ताटाभोवती छान रांगोळी असावी, जेवण करतो त्या ठिकाणी दिवा तेवत असावा, जेवणापूर्वी जागी नीट झाडून, पुसून स्वच्छ केलेली असावी, प्रार्थना करून मन प्रसन्न झालेले असावे वगैरे गोष्टी सांभाळल्या जात असत. रस्त्याच्या कडेला उभे राहून, स्वच्छतेची खात्री नसणाऱ्या बशीमध्ये खाण्याने पोट भरले तरी बरोबरीने कळत नकळत मानसिक उद्वेग आणि त्यातून मानसिक रोगांना आमंत्रण मिळू शकते. 

नातिद्रुतम्‌ अश्नीयात्‌ - घाईघाईने जेवू नये. 
अतिद्रुतं हि भुञ्जानस्योत्स्नेहनमदसादनं भोजनस्याप्रतिष्ठानं च, भोज्यदोषसाद्‌गुण्योपलब्धिश्‍च न नियता तस्मात्‌ नातिद्रुतम्‌ अश्नीयात्‌ । ....चरकसंहिता विमानस्थान 

घाईघाईने जेवण्याने अन्न शरीरात प्रवेशित झाल्यावर आपल्या मार्गाने सरळ प्रवास करत नाही. कधी ठसका लागतो, कधी अन्न पोटात योग्य काळासाठी न राहता लवकर खाली सरकते. घाईघाईने खाल्लेले अन्न पोटात गेल्यावर प्रमाणापेक्षा अधिक शिथिल, सैल होऊन राहते, त्यामुळे त्याचे पचन सुखासुखी होऊ शकत नाही. 

नातिविलम्बितमश्नीयात्‌ - फार रेंगाळत, हळूहळू जेवू नये. 
अतिविलम्बितं हि भुञ्जानो न तृप्तिमधिगच्छति बहुभुङ्‌क्‍ते शीतीभवत्याहारजातं विषमं च पच्यते तस्मान्नातिविलम्बितमश्नीयात्‌ । ....चरकसंहिता विमानस्थान 

रेंगाळत जेवण्याने पोट भरलेले समजत नाही, यामुळे अधिक प्रमाणात खाल्ले जाते. तसेच अन्न थंड होऊन गेल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. 

अजल्पन्‌ अहसन्‌ तन्मना भुञ्जीत्‌ - बडबड न करता, हास्यविनोद न करता मन लावून जेवावे. जेवताना मन प्रसन्न असावे. जेवणाकडे लक्ष न देता गप्पा गोष्टी करण्यात मन गुंतले तर त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. जेवताना मन त्रस्त होईल असे संभाषण करणे, टीव्ही पाहत जेवणे हे सर्व पचनामध्ये अडथळा आणणारे मुद्दे होत. 

आत्मानम्‌ अभिसमीक्ष्य भुञ्जीत्‌ - आपली प्रकृती, आपला जीव समजून घेऊन त्यासाठी काय अनुकूल आहे, काय प्रतिकूल आहे हे लक्षात घेऊन मगच जेवण करावे. 

अशा प्रकारे आहारविधीमधील दहा मुद्दे लक्षात घेऊन जेवण केले तर आरोग्याचे रक्षण होईल यात शंका नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: food