कर्करोग

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Sunday, 3 February 2019

कर्करोगावर आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या समन्वयातून केलेल्या एकत्र उपचारांचा फायदा होताना दिसतो, ही गोष्ट निश्‍चित लक्षात घ्यायला लागेल. त्यामुळे या विषयात दोन्ही शाखांनी मिळून एकत्र संशोधन करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, एकूण कर्करोग हा रक्‍त, मांस दुष्टीचा विकार असल्यामुळे यात पंचकर्माची नितांत आवश्‍यकता आहे आणि शास्त्रशुद्ध पंचकर्मानंतर केलेले योग्य औषधोपचार बऱ्याच वेळा उत्तम उपयोगी पडतात असे निदर्शनास आलेले आहे.

समाजातील सर्व थरांत माहिती असणारा आधुनिक रोग म्हणजे कर्करोग असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना लागण होणारा, खूप संशोधन करूनही नेमके कारण, नेमके उपचार न समजणारा हा रोग!

चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने आपण आज कर्करोगाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. 

कर्करोग हा कोणत्याही वयात आणि शरीरात कोठेही होऊ शकतो. बहुधा सामान्य माणसाच्या मनात ‘गाठ’ म्हणजे कॅन्सर (कर्करोग) असे समीकरण असते. मात्र, प्रत्येक गाठ कॅन्सरचीच असेल असे नाही, तसेच प्रत्येक कॅन्सर गाठीच्या रूपानेच व्यक्‍त होईल असेही नाही. उदा. रक्‍ताच्या कर्करोगात गाठ नसते, तोंडातील कर्करोगात भरून न येणारी जखम असते वगैरे.

शरीरातील सर्व लहान-मोठ्या, स्थूल-सूक्ष्म स्तरावरील एकूण एक क्रिया वात-पित्त-कफ हे त्रिदोष करत असतात. शरीरातील अगणित पेशी आपापल्या स्वभावानुसार, कार्यानुसार योग्य वेळेला तयार होतात, वाढतात, आपले नियत कार्य पूर्ण झाल्यावर नष्ट पावून शरीराबाहेर फेकल्या जातात. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या तिन्ही क्रिया पेशीच्या सूक्ष्म स्तरावरही चोखपणे होत असतात. अर्थातच या सर्व क्रियांसाठी मुख्यत्वे वातदोष व बरोबरीने पित्त व कफदोष जबाबदार असतात. तसेच, नवीन पेशीला जन्म द्यायचा म्हणजे शुक्रधातूचा पर्यायाने जीवनशक्‍तीचा सहभाग लागतोच. जोवर ही सर्व तत्त्वे संतुलित असतात, तोवर आपापली कार्ये चोखपणे पार पाडत असतात; पण काही कारणांनी त्यात असंतुलन झाले की पेशींचे स्वरूप बदलते, कधी त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर गाठ तयार होते.

अर्बुदाची संप्राप्ती - 
गात्रप्रदेशे क्वचिदेव दोषाः सम्मूर्च्छिता मांसमसृक्‍प्रदूष्य ।
वृत्तं मृदु मन्दरुजं महान्तंअनल्पमूलं चिरवृद्धिपाकम्‌ ।।
कुर्वन्ति मांसोच्छ्रमनत्यगाधं तदर्बुदं शास्त्रविदो वदन्ति ।।
.....योगरत्नाकर 

कुपित झालेले वातादिक दोष शरीरात कुठेही मांस व रक्‍तधातूला दूषित करून गोल, कोमल, किंचित वेदना करणारा, मोठा, खोल मूळ असलेला व हळूहळू वाढणारा मांसाचा उठावा तयार करतात, त्याला ‘अर्बुद’ म्हणतात. अर्बुद हे सहसा पिकत नाही. अर्बुदाचे सहा प्रकार होत. वातज, पित्तज, कफज, रक्‍तज, मांसज व मेदज. यातील रक्‍तज व मांसज अर्बुद असाध्य असतात. 

रक्‍तज अर्बुद - दूषित झालेला दोष रक्‍ताला दुष्ट करून प्रथम सिरांचा संकोच करून रक्‍त पचवतो, नंतर मांसाचा पिंड उत्पन्न करून त्यातून रक्‍तस्राव करवतो, त्यामुळे रक्‍तक्षय व पांडू उत्पन्न होतो. हा असाध्य आहे.

मांसज अर्बुद - नेहमी मांस खाणाऱ्याच्या अंगावर आघात झाल्यानंतर दुष्ट झालेले मांस त्वचेच्या रंगासारखी, स्निग्ध, वेदना नसलेली, दगडासारखी कठीण, न हलणारी व पिकणारी सूज उत्पन्न करते, त्याला मांसार्बुद म्हणतात. हा मांसार्बुद असाध्य असतो.

बाकीच्या चार साध्य प्रकारांतही फार पसरणारे, मर्मस्थानी होणारे, स्रोतसात होणारे, न हलणारे व एकावर एक स्तराने वाढणारे अर्बुद असाध्य समजले जाते. अर्बुदावर चिकित्सा करताना सर्व अर्बुदे छेदून मुळापासून काढावी लागतात. अर्बुदाचे थोडे जरी मूळ शिल्लक राहिले तरी ते पुन्हा लवकरच वाढते. काढल्यावर त्यावर अग्नीने डाग देऊन समूळ नष्ट करावे, असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे.

आधुनिक काळातही शस्त्रक्रिया, रेडिएशननंतर केमोथेरपीसारख्या उपाययोजना केल्या जातात; मात्र त्यालाही मर्यादा असतात. तेव्हा कर्करोगावर उपचार करताना गाठ किंवा बिघडलेल्या पेशीला पूर्ववत करण्याबरोबरच मूळचे त्रिदोष असंतुलन, कमी झालेली जीवनशक्‍ती, वीर्य, ओज यांचाही विचार करणे आवश्‍यक आहे.

जगभर कर्करोगावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून आज कर्करोगाचे लवकर व अचूक निदान होणे शक्‍य झाले आहे. सध्या प्रचलित असणाऱ्या केमोथेरपी, रेडिएशन वगैरे उपचारातही वेळोवेळी बदल होत जाऊन त्यांचा रुग्णांवर फार तीव्र व गंभीर परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न केला गेला, शस्त्रक्रिया, ॲनेस्थेशिया यातही खूप सुधारणा झाली. या सगळ्यामुळे, तसेच वेळच्या वेळी आणि योग्य उपचारांमुळे कर्करोगातून सुटका होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी वाढली असली, तरी अजूनही कॅन्सर म्हटला की मनात शंकेची पाल चुकचुकतेच. 

कर्करोग हा इतक्‍या विविध प्रकारांनी, विविध स्वरूपांत प्रकट होत असतो, की कर्करोगाने ग्रस्त प्रत्येक व्यक्‍तीचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. प्रकृती, ताकद, मनाची उभारी याशिवाय रोगाची तीव्रता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे अमुक एक औषध एका रुग्णाला उपयोगी पडले, तरी दुसऱ्या व्यक्‍तीला उपयोगी पडेलच असे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात शुक्रधातू, ओजावर कार्य करून जीवनशक्‍ती वाढवणारी औषधे कोणत्याही प्रकारच्या कर्करोगात उपयोगी पडणारी असू शकतात. मात्र, एकंदर औषधयोजना प्रत्येक केसमध्ये निरनिराळी करावी लागते हे निश्‍चित!

कर्करोगावर आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या समन्वयातून केलेल्या एकत्र उपचारांचा फायदा होताना दिसतो, ही गोष्ट निश्‍चित लक्षात घ्यायला लागेल. त्यामुळे या विषयात दोन्ही शाखांनी मिळून एकत्र संशोधन करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, एकूण कर्करोग हा रक्‍त, मांस दुष्टीचा विकार असल्यामुळे यात पंचकर्माची नितांत आवश्‍यकता आहे आणि शास्त्रशुद्ध पंचकर्मानंतर केलेले योग्य औषधोपचार बऱ्याच वेळा उत्तम उपयोगी पडतात असे निदर्शनास आलेले आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

शरीरावर झालेले आघात आणि विशेषतः मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये मांसाहार हेही कर्करोग होण्याचे एक कारण ठरू शकते, त्यावरही संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. एकूणच मांसाहारी लोकांमध्ये मांसाबरोबर येणारे त्या त्या प्राण्याचे शारीरिक तसेच मानसिक गुण हे मनुष्याच्या गुणांबरोबर जुळतीलच असे नाही, त्यामुळे काहीतरी विचित्र गुणधर्माच्या पेशी तयार होत असाव्यात. तेव्हा या गोष्टीचाही विचार करावा लागेल.

रक्‍ताचा कर्करोग, तोंडातील कर्करोग किंवा त्वचेचा कर्करोग यासाठी रक्‍तदुष्टी निश्‍चितच कारणीभूत असते. त्यावर पंचकर्म आणि रक्‍तशुद्धी हे आयुर्वेदाने सांगितलेले इलाज करण्याने अधिक चांगला गुण येताना दिसतो. 

कर्करोगामध्ये धातुक्षय मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्व धातूंना संतुलित करणारी, विशेषतः वीर्यवर्धन करणारी आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढविणारी औषधे दिल्याने चांगला लाभ झालेला दिसतो.

कर्करोगाचा नावाप्रमाणे खेकड्याच्या चालीशी किंवा गुणधर्माशी संबंध आहे. त्याची वाकडी चाल आणि तो कुठल्या दिशेला जाणार याची अनिश्‍चिती, तसेच एखाद्या वस्तूला एकदा धरल्यानंतर तुकडा पडेपर्यंत पकडून ठेवण्याची प्रवृत्ती या सर्व गोष्टी कर्करोगाच्या गुणधर्माशी जुळतात. त्यामुळे कुठल्या मनप्रवृत्तीमुळे आणि मनावर कोणत्या प्रकारचे उपाय केल्यामुळे कॅन्सरवर उपयोग होऊ शकेल, या दृष्टीतूनही संशोधन होणे आवश्‍यक आहे.

आयुर्वेदिक विचारधारेप्रमाणे कर्करोगावर पुढील उपचार उपयोगी होत.

व्यवस्थित, शास्त्रशुद्ध पंचकर्माद्वारे पंचतत्त्वांची शुद्धी
  प्रकृतीनुरूप योग्य (दोष-संतुलन, वीर्यवृद्धी, तसेच रोगपरिहार करणारी) औषधयोजना.
  ध्यानधारणा, योग, स्वास्थ्यसंगीताचा रोजच्या जीवनात केलेला अंतर्भाव.
  आपापसांतील जुने मतभेद, मनातील शल्य घालवण्यासाठी केलेली सल्लामसलत.
  कुठल्यातरी छंदाची जोपासना.
  स्वतःच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीला उपयोगी पडेल अशा महत्त्वाच्या कार्यात गुंतणे.

या सर्व गोष्टींमुळे जीवनाचा, जगण्यातला रस वाढल्यामुळे झालेला उपयोग कर्करोगात महत्त्वाचे योगदान करत असतो. आहारात जडान्न, तळलेले पदार्थ, मांसाहार, अंडी वगैरे गोष्टी टाळणे; ताजे, प्रकृतीला अनुकूल असे सात्त्विक व हलके अन्न खाणे हे श्रेयस्कर. 

औषधांचा विचार करता शतावरी, अश्वगंधा, गुळवेल सत्त्व, प्रवाळपिष्टी, मोतीभस्म, हीरकभस्म, गोक्षुरादि गुग्गुळ वगैरे औषधांची वैद्यांच्या सल्ल्यानुसार, प्रकृती वगैरे विविध गोष्टींचा विचार करून योग्य उपाययोजना करता येते. स्तन-गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये योनीधावन, उत्तरबस्ती, औषधांनी सिद्ध तेलाचा योनिमार्गात ठेवला जाणारा पिचू, खालून घेतलेला औषधी धूप, विशिष्ट औषधी तेलाने स्तनाला केलेला मसाज वगैरे गोष्टी उपयोगी पडतात. गर्भाशय, स्तन, त्वचा, प्रोस्टेट यांसारख्या कर्करोगांवर नेहमीच्या उपचारांबरोबर आयुर्वेदिक उपचारांची जोड दिली तर चांगला गुण येऊ शकतो. 

थोडक्‍यात, योग्य उपचार व मनाची उभारी यालाच आजूबाजूच्या सर्व लोकांच्या सदिच्छा, आईवडील-गुरुजनांचे आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा यांची जोड मिळाल्यास कर्करोगासारखा दुर्धर विकारही आवाक्‍याबाहेर राहणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four February is a global cancer day