मुक्ती भूतकाळाच्या बंधनातून (लेखांक 1)

Free from the bonds of the past
Free from the bonds of the past

आयुष्यात पुढे होणारे रोग आधीच सांगता येतील, एवढे विज्ञान प्रगत झाले आहे. पण पुढे अमुक तमुक मोठा रोग येणार आहे असे कळल्यास चिंता वाटून रोग कदाचित दहा वर्षे आधीच यायची शक्‍यता नाकारता येत नाही. तर दुसऱ्या बाजूने, पुढे रोग होणार नाही, असे कळल्यास वागण्यावर निर्बंध न राहिल्यामुळे रोग होऊ शकेल. आपली प्रकृती कशी असेल, आपल्या नशिबात काय वाढून ठेवलेले आहे, मला इतरांचा फायदा किंवा त्यांच्यापासून त्रास कसा होणार, मी कसे कर्म करणार या तीन गोष्टी मिळून आपले भविष्य ठरत असते. 

पृथ्वीतत्त्वामुळे जीवन रुजते व उमलते जलतत्त्वामुळे. संपूर्ण शरीरातील पृथ्वीतत्त्व मेरुदंडाच्या तळाशी एकत्र व एकाग्र झालेला असते. त्याचा उत्सव श्री गणेशदेवतेच्या माध्यमातून होतो व नंतर त्यातील शक्‍तीचे विसर्जन जलात केले जाते. मेंदू हा पृथ्वीतत्त्वातील पूर्ण शुद्धतेपासून बनलेला असतो व तो जलतत्त्वामध्ये (सोमरस - सेरेब्रो स्पायनल फ्लुईडमध्ये) संपूर्णतः बुडालेला असतो. प्रतिवर्षी नवीन उपासनेद्वारे तयार झालेली शुद्ध कल्याणकारी संकल्पना अनंत चतुर्दशीच्या दिवशी जलात विसर्जित होऊन साठविली जाते. चेतासंस्थेला अनंत सर्पाची उपमा दिलेली दिसते. त्याच्या खालच्या शेपटीसारख्या टोकापासून वर सहस्रफणा असलेल्या मस्तकात हे सर्व घडते. यासाठी केले जाते अनंत चतुर्दशीचे व्रत. पुढील जीवनात येणारा भविष्यकाळ चांगला जावा ही इच्छा पूर्ण व्हावी, तसेच भूतकाळच्या बंधनातून सुटण्यासाठीचा यानंतरचा काळ म्हणजे पितृपक्ष अर्थात पूर्वजांच्या आठवणी ठेवून त्यांचे आभार व्यक्‍त करण्याचे पंधरा दिवस. 

 

प्रत्येक व्यक्‍तीलाच नव्हे, तर प्रत्येक प्राणीमात्राला भविष्याची काळजी असते. ही काळजी कशाची? तर अन्न, वस्त्र, निवारा यांची, अन्न मिळेल की नाही, कुठे मिळेल, कसे मिळेल, स्वस्तात कसे मिळेल याची प्रत्येकाला काळजी असते. वस्त्र हे शरीर संरक्षणासाठी असते तसेच ते मुख्यतः सामाजिक शिष्टाचार म्हणून असते. 
 

मला समाजाशी किती जोडून घेता येईल, मला समाज किती स्वीकारेल, मी समाजाला किती स्वीकारेन, माझी प्रतिष्ठा इतरांना समजेल का, अशा अनेक प्रकारची चिंता मनुष्याला सतावत असतात. झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणतात, त्यानुसार आपल्याकडे किती पैसे आहेत याची आपल्याला एक वेळ चिंता नसते, पण आपल्याकडे किती पैसे आहेत असे इतरांना कळून त्यांनी आपल्याला भिकारी म्हणू नये किंवा खूप पैसे आहेत म्हणून कोणी चोरायला येऊ नये याची चिंता असते. अशा प्रकारे प्राणीमात्रांना, मुख्यतः व्यक्‍तीला उद्या, परवा काय होईल याची चिंता असते. "असे व्हावे' अशी प्रत्येकाची अपेक्षा असते व ते होईल की नाही याची चिंता असते. यातून मग शरीराच्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे, या तपासण्या आधुनिक वैद्यकानुसार केल्या तरी आयुर्वेदाचे सिद्धांत वेगळे असतात, असे समजल्यामुळे आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडे जाऊन तपासण्या करून घेणे, आपल्या आयुष्यात बाहेरच्या विश्वाशी व समाजाशी येणारा संबंध, नोकरी, प्रतिष्ठा यासाठी ज्योतिष्याकडे जाऊन विचारणे वगैरे अनेक मार्ग निवडले जातात. 
 

तिसरी मूलभूत गरज असते निवारा. आपण ज्या घरात राहणार ते घर वास्तूनुसार आहे का, त्यात राहण्याने सुख मिळेल का, घर मध्यवस्तीत आहे का, घरात राहण्याऱ्यांच्या हिशोबाने पुरेसे मोठे घर आहे का, असे अनेक प्रश्न निवारा या मुद्द्याला धरून येतात. एवढे मात्र खरे की शयनकक्ष मोठा असला, त्यातील पलंग मोठे असले तरी झोप येईल की नाही हे शंका असतेच. याचे उत्तर कोणाकडेच नसते. 
 

आपल्याला हव्या त्या गोष्टी आज आपल्याजवळ नसल्या तरी उद्या मिळतील अशी आशा असते, तेव्हा मी किती जगणार हे सर्वांना जाणून घ्यावेसे वाटते. मृत्यू कधी आहे हे सांगता येत नाही. असे ऐकिवात आहे की आयुष्यात पुढे होणारे रोग आधीच सांगता येतील. पण पुढे अमुक तमुक मोठा रोग येणार आहे असे कळल्यास चिंता वाटून रोग कदाचित दहा वर्षे आधीच यायची शक्‍यता नाकारता येत नाही. तर दुसऱ्या बाजूने, पुढे रोग होणार नाही असे कळल्यास वागण्यावर निर्बंध न राहिल्यामुळे रोग होऊ शकेल. 
 

एकूण काय तर, आपली प्रकृती कशी असेल, आपल्या नशिबात काय वाढून ठेवलेले आहे, मला इतरांचा फायदा किंवा त्यांच्यापासून त्रास कसा होणार, मी कसे कर्म करणार या तीन गोष्टी मिळून आपले भविष्य ठरत असते. 
 

आपल्याला शरीर आपल्या आई-वडिलांकडून मिळालेले असते. आई-वडिलांचे शरीर त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेले असते. असे दिसते की एखाद्या मुलाला आईकडून एक्‍झिमा आलेला असू असतो, तर दुसऱ्या मुलाला वडिलांकडून दुखणे आलेले असू शकते. दुखणी जर आई-वडिलांकडून येत असतील तर याचा अर्थ असा की आई-वडिलांच्या शरीरात असणाऱ्या संकल्पना (प्रोग्रॅम्स) डीएन्‌एमार्फत मुलांमध्ये येऊ शकतात. शरीर अन्नाने बदलत राहिले तरी मूळचे शरीर पूर्णतः नष्ट होत नाही. त्यामुळे 15-20 टक्के शरीर आपल्या आई-वडिलांच्या शरीरानुसार, आपल्या वंशात असलेल्या डीएन्‌एनुसार असते. हा नियम जर शारीरिक दुखण्यांसाठी लागू होत असेल तर तोच नियम निवाऱ्यासाठी किंवा वस्त्रासाठी (सामाजिक प्रतिष्ठेसाठी) किंवा एकूण घरा-दारातील साधनसामुग्रीलाही लागू होत नसेल का? त्यामुळे बऱ्याच गोष्टी आई-वडिलांकडून आलेल्या असल्या तरी प्रत्येक व्यक्‍ती वेगळी असते. हा वेगळेपणा तिचा स्वतःचा म्हणून जो स्वभाव असतो त्यातून आलेला असतो. उदा. मुळात पाण्याला रंग नसतो. पाण्यात चमचाभर लाल रंग टाकला तर पाणी हलके गुलाबी होते, लाल होत नाही. तसे कुठलाही जीव स्वतःचा जो स्वभाव असतो तो सोडत नाही. एका दांपत्याला असणारी चार अपत्ये वेगवेगळी असतात. यात काही मुले तर काही मुली असतात हा एक भाग, पण दुसरा भाग म्हणजे प्रत्येक मुलाचा चेहरामोहरा वेगळा असतो, स्वभाव वेगळा असतो, रंग वेगळे असतात, उंची वेगळी असते. हे सर्व कशामुळे होते? याला दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे जीव जन्माला येताना त्याच्या संकल्पनेनुसार त्याने देह धारण केलेला असतो. दुसरे म्हणजे ऋतुमानाचा, देशकालाचा, वातावरणाचा तसेच कौटुंबिक परिस्थितीचा प्रत्येकाच्या व्यक्‍तिमत्त्वावर फरक पडू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com