मुक्‍ती भूतकाळाच्या बंधनातून (लेखांक २) 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 September 2019

गुणसूत्रांवर असलेल्या संकल्पना बदलणे, या गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोत्सवाचा उद्देश. गुणसूत्रांवर असलेल्या डीएनएपासून आएन‌ए तयार होत असतात. आएनए‌मार्फत आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. आपल्या शरीरात असलेल्या चेतनेच्या जाळ्याला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे सर्पच पुढे अनंतकाळपर्यंत जीवन चालू ठेवणार असतात. गुणसूत्रांवर केलेल्या संस्कारांचा फायदा आपल्याला पुढे कायम मिळणार असतो. 

गुणसूत्रांवर असलेल्या संकल्पना बदलणे, या गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोत्सवाचा उद्देश. गुणसूत्रांवर असलेल्या डीएनएपासून आएन‌ए तयार होत असतात. आएनए‌मार्फत आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. आपल्या शरीरात असलेल्या चेतनेच्या जाळ्याला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे सर्पच पुढे अनंतकाळपर्यंत जीवन चालू ठेवणार असतात. गुणसूत्रांवर केलेल्या संस्कारांचा फायदा आपल्याला पुढे कायम मिळणार असतो. 

मनुष्याच्या व्यक्‍तिमत्त्‍वाची विविध अंगे लक्षात घेतली तर भविष्यातील यशापयशासाठी जीवनशैली व कर्म-प्रयत्न ठरविता येतील. 

अपत्यावर पालकांच्या गुणसूत्रांचा परिणाम साधारण १५-२० टक्के असतो, तसेच २५-३० टक्के परिणाम जिवाने आपल्याबरोबर आणलेल्या वेगळेपणाचा असतो. उरलेले ५०-५५ टक्के जीव वागतो कसा, कर्म कसे करतो यावर ठरत असतात. एखादा जीव समाजाचे ऐकत नसेल, वडिलधाऱ्यांचे ऐकत नसेल, गुरुजनांचे ऐकत नसेल, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या स्वकीयांचे व कुटुंबीयांचेही ऐकत नसेल, स्वतःचाच हेका चालवत असेल, मला एकट्यालाच अक्कल आहे असे समजून त्यानुसार कर्म करत असेल तर येणाऱ्या परिणामांची जबाबदारी त्याच्यावरच असते. आपल्याला आपले आयुष्य सुधारावयाचे असेल, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे वाटत असेल तर आपल्याला वागणे सुधारणे आवश्‍यक आहे. परंतु बऱ्याच वेळा मिळालेला सल्ला पाण्यासारखा पातळ होतो. मी उद्यापासून लवकर उठणार असे कोणी ठरवतो, परंतु सकाळी जाग आल्यावर घडाळ्यात नऊ वाजलेले पाहून ‘बापरे, एवढा उशीर कसा झाला’ असे म्हणून उद्यापासून लवकर उठण्याचा निर्णय पुन्हा केला जातो. परंतु ठरविल्यानुसार वागायची सवय न लावलेली असल्याने तसे घडत नाही. 
 

आपले अस्तित्व ज्या द्रव्यावर अवलंबून आहे त्यावर प्रक्रिया करून आपल्या गुणसूत्रांवर संस्कार केल्यास आपले जीवन बदलू शकते. उदा. आई-वडिलांकडून एखाद्याला दमा आलेला असला तरी पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसात दम्याचा सुरू झाला नसला तरी औषध घेण्यास सुरवात करणे, विशिष्ट वयानंतर रसायने घेणे सुरू करणे, रात्रीच्या वेळी थंड गोष्टी खाणे टाळणे, रात्रीच्या वेळी ऊबदार कपडे घालून स्वतःचे संरक्षण करणे वगैरे गोष्टी आचरणात आणल्या तर आई-वडिलांकडून आलेल्या गुणसूत्रांचा प्रभाव टाळता येणे शक्‍य असते. अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या बाबतीत गुणसूत्रांकडून आपल्याला लाभही करून घेता येतो किंवा त्यामुळे होणारे अपाय टाळता येऊ शकतात. 
 

जन्माला आलेला जीव जीवनात दुःख का भोगतो आहे, कदाचित त्याने पूर्वीच्या जन्मात इतरांच्या सुखाची काळजी घेतली नसल्याने असे होत असेल, याचे समावलोकन करून निदान या जन्मात तरी चांगली कर्मे करण्यास सुरुवात करता येऊ शकते. अशी चांगली कर्मे करण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रेम, श्रद्धा, भक्‍ती या गोष्टी विचारात घेऊन जीवाने आपली वागणूक बदलली तर गुणसूत्रांमध्ये बदल होऊ शकतात. (डीएनएमध्ये बदल होत नसून कर्मगतीसाठी आवश्‍यक असणारा बदल आएनएमार्फत होतो.) ज्ञानाची महती अगाध आहे. आपली शास्त्रे कोणी पैसे मिळविण्यासाठी पेटंट वगैरे घेऊन केलेली नाहीत; तर परंपरेने मनुष्यजातीच्या कल्याणासाठी अनेकांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून लावलेले शोध संकलित करून ही शास्त्रे तयार झालेली आहेत. असे वागावे, असे करावे अशा अनेक गोष्टी या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. या शास्त्रांचा उपयोग करून घेतला, त्यातील ज्ञानाचा आदर केला तर समाजाशी असलेले संबंध सुधारू शकतात. 
 

या सर्वांचा विचार करून काही नियम बांधून दिले आहेत, जीवनाची रूपरेषा आखून दिली आहे. यात महत्त्वाचा आहे पितृपक्षाचा पंधरवडा. मुळात आपल्याला शरीरावर परिणाम करायचा झाला तर तो सहजपणे होईल असे नाही. जसे आपण एखाद्या व्यक्‍तीवर रागावलेले असू पण त्या व्यक्‍तीला थप्पड मारता येत नसल्याने तीच थप्पड दारावर मारून दार जोरात ढकलून राग व्यक्‍त केला जातो. तसे एक प्रतिकृती तयार करून त्यावर काम करून आडवळणाने किंवा एका वेगळ्या मार्गाने परिणाम मिळविता येतात. या दृष्टीने पार्थिव गणेशाची स्थापना करून गणेशोत्सवाचे आयोजन करून मूलाधारातील गणपतीला नमन केले जाते. घर बांधायचे असले तर आधी पाया खोदावाच लागतो तशाच प्रकारे आपल्याला गुणसूत्रांवर काम करायचे असेल तर प्रथम श्री गणपतीला नमन करण्याचा गणेशोत्सव साजरा करावाच लागतो. आपले शरीर मुळात पंचतत्त्वांचे तयार झालेले आहे. पृथ्वीतत्त्व हे आपल्यासाठी सर्वप्रथम आहे. म्हणून गणेशोत्सवातील श्री गणेशाची मूर्ती पार्थिव असते. ही आहे मूलाधाराची देवता. 
 

नंतर येते जलतत्त्व. मुख्यतः पृथ्वीतत्त्व व जलतत्त्व या दोन तत्त्वांनी शरीर बांधलेले आहे. मानवी शरीरात जलतत्त्व ७० टक्के असते. पृथ्वीतत्त्व व जलतत्त्वांच्या आधारे राहतो अग्नी. शरीराच्या पोकळ्या हे आकाशतत्त्व. आणि या पोकळ्यांमधून होणारे चलनवलन हे वायुतत्त्व. या पोकळ्यांमधील पृथ्वीतत्त्व असे आहे की जे आपल्याला समजू शकते, दिसू शकते, त्याच्यावर प्रयोग करता येऊ शकतात. म्हणून गणेशमूर्ती साध्या नदीतील मातीपासून बनविलेली असते. ही माती नदीतील पाण्यामुळे शुद्ध झालेली असते, त्यामुळे या मातीवर संस्कार होऊ शकतात. त्यामुळे मातीचा गणपती करून त्याच्यावर संस्कार केले जातात, उत्सव साजरा करून त्याची प्राणशक्‍ती वाढवली जाते. या दहा दिवसांत जे संस्कार गणेशांच्या मूर्तीवर केले जातात ते जणू आपल्या शरीरावर व्हावेत या दृष्टीने पूजा योजलेल्या असतात. ज्ञानाची प्रतिष्ठा कळावी, या दृष्टीने कार्यक्रम आयोजित केले जातात. चांगल्या गोष्टींचे चिंतन व्हावे या दृष्टीने प्रवचने आयोजित केली जातात. मनावरचा ताण हलका व्हावा या दृष्टीने मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. षड्‍रसांपैकी मुख्य असलेले मधुर रसयुक्‍त मोदक नैवेद्य म्हणून केले जातात. ‘मुद्‌’ म्हणजे आनंद व ‘क’ म्हणजे देणारा म्हणजे आनंद देणारा तो मोदक. यानंतर गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाते. पृथ्वीतत्त्व व त्याबरोबर असलेले जलतत्त्व अशा जड तत्त्वांचे विसर्जन होते. श्री गणेश या सूक्ष्म तत्त्वाचे व त्यावर झालेल्या संस्कार लहरींचे विसर्जन होत नाही. ज्या पाण्यात अनेक गणपतींचे विसर्जन केले आहे असे पाणी नंतर यथावकाश बाष्परूपाने संपूर्ण विश्वात पसरते. हेच पाणी पुढे संस्कारयुक्‍त होऊन पुन्हा पावसाच्या रूपाने आपल्याला परत मिळते व आपल्यावर परिणाम होतात. या सर्वांचा फायदा मिळावा या दृष्टीने अनंतचतुर्दशीची-गणेशोत्सवाची योजना केलेली दिसते. गुणसूत्रांवर असलेल्या संकल्पना बदलणे, या गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोस्तवाचा उद्देश. गुणसूत्रांवर असलेल्या डीएनएपासून आएन‌ए तयार होत असतात. आएन‌एमार्फत आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. अशी आहे गणेशोत्सवाची - अनंतचतुर्दशीची योजना. आपल्या शरीरात असलेल्या चेतनेच्या जाळ्याला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे सर्पच पुढे अनंतकाळपर्यंत जीवन चालू ठेवणार असतात. गुणसूत्रांवर केलेल्या संस्कारांचा फायदा आपल्याला पुढे कायम मिळणार असतो. 
 

अनंतचतुर्दशीपर्यंत संस्कारित झालेल्या या गुणसूत्रांप्रमाणेच आपल्या पूर्वजांकडून आलेल्या गुणसूत्रांवर संस्कार करण्यासाठी, त्यांना शुद्ध करण्यासाठी केलेली आहे पितृपक्षाची योजना. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free from the bonds of the past (2) article written by Dr Shree Balaji Tambe