esakal | उच्च ध्येयाचे लक्ष्य ‘गुढी’ 
sakal

बोलून बातमी शोधा

The goal of the higher goal `Gudhee`

उच्च ध्येयाचे लक्ष्य ‘गुढी’ 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

माणसाने कायम ताठ मानेने जगावे, वर पाहावे, चारीही पुरुषार्थांची उपासना करावी यादृष्टीने नवसंवत्सराची-गुढीपाडव्याची योजना केलेली आहे. आज संकल्प केला व संस्कारांची सुरुवात केली तर या शार्वरी संवत्सरातील अंधाराची काय बिशाद आहे की त्याचा मानवतेस त्रास होईल? एकदा का अंतर्ज्योत प्रकटली की सर्व अंधारांचा, शत्रूंचा, रोगांचा नाश होतो. भारतीय संस्कृतीचे महत्त्व ओळखून त्यानुसार आचरण ठेवले की सर्व संकटांचा नाश होईल, हेही वर्ष आनंदात जाईल, आपण प्रगतीच्या मार्गावर येऊ. 
 

 सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष आरोग्यमय, समृद्धी, ऐश्वर्य व आत्मसमाधान देणारे आणि तेज वाढविणारे असो हीच प्रार्थना. 


संवत्सर असा शब्द भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. सम म्हणजे नेहमीप्रमाणे आणि वत्सर म्हणजे वर्ष म्हणजेच नवीन वर्षाचा हा सण नेहमीच येणारा आहे. विश्व एक मोठे वर्तुळ आहे. वर्तुळाला सुरुवात नसते व त्याला शेवटही नसतो. त्यामुळे जेथे आपण सुरुवात असे समजलो ते संपूर्ण वर्तुळ पूर्ण करून पुन्हा नवीन वर्तुळाची सुरुवात म्हणून त्याला संवत्सर म्हणत असावेत. विश्व हे वाढते राहणारे आहे आणि या विश्वात असलेल्या सर्व वैश्विक घडामोडी हा त्यातील शक्‍तींच्या आकुंचन प्रसरणावर कमी अधिकपणावर किंवा ग्रह-ताऱ्यांच्या फिरण्यावर-प्रकाशावर-त्यांच्यातून निघणाऱ्या विविध तरंगांवर अवलंबून असतात. 


कालमानाच्या होणाऱ्या बदलामुळे या वर्षीच्या गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या संवत्सराचे नाव आहे ‘शार्वरी संवत्सर’. शार्वरी संवत्सर याचा अर्थ अंधारे वर्ष असा होतो, कारण शार्वरी शब्दाचा अर्थ आहे रात्र आणि रात्र अंधारी असते. रात्री सूर्यप्रकाश मिळत नाही, तर फक्‍त चंद्राकडून येणारा प्रकाश, तोही तिथीनुसार कमी जास्त प्रमाणात मिळतो. सूर्यप्रकाश कमी आला की रोगराई वाढते. हे सर्व भारतीय संस्कृतीत समजावलेले आहे. या वर्षीची सुरुवात संकटांनी होते आहे असे दिसते आहे. हे संकट का आले याचा विचार करायलाही वेळ नाही, पण या संकटाचा सामना कसा करावा याचा विचार मात्र करावा लागेल. तसे पाहिले तर आज मनुष्यमात्र सर्व जगतामध्ये येणाऱ्या संकटाच्या चाहुलीवर लक्ष ठेवून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झालेला आहे. केवळ शारीरिक अनारोग्य किंवा एखादे भौतिक संकट समोर येणे म्हणजेच संकट नव्हे. मनस्वास्थ्य बिघडणे, आत्मशांती हरवणे तसेच इतर अनेक गोष्टींचा समावेश संकटात असतो. गेल्या काही वर्षांत मनुष्याला आरोग्याची जाणीव झालेली दिसते, त्यादृष्टीने अनेक ठिकाणी व्यायामशाळा निघालेल्या दिसतात, प्रत्येक जण ताकद वाढेल असे चांगले अन्न खाण्याच्या प्रयत्नात आहे असे आपण पाहतो. अन्नाने शरीर तयार होते म्हणून शरीर व चैतन्य यांना एकत्र धारण करण्यासाठी उपचार हा प्रथम वैयक्‍तिक धर्म. शारीरिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्नात असताना मानसिक स्वास्थ्यासाठी लागणाऱ्या श्रद्धेची जोपासना करणे, आत्मशांतीसाठी त्याग करणे, गरजूंना मदत करणे, इतरांना सामावून घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेले आहे. सुखी जीवनाच्या शोधात असताना या गोष्टींचाही विचार करावा असे वाटते. 


हे संवत्सर रात्रीसारखे काळे वर्ष आहे, असे म्हणताना वेगळी अशी भीती वाटण्याचे कारण नाही. भीतीवर मात करण्यासाठी धैर्य, श्रद्धा, भक्‍ती मिळविणे आवश्‍यक आहे. मनुष्य नुसते जगण्यासाठी जन्माला आलेला नसतो, तर त्याचा जन्म उत्कर्ष साधण्यासाठी असतो. उत्कर्ष नेहमी ऊर्ध्वगामी असतो. गुढी उभारणे व नवीन वर्षाची ध्येये-धोरणे ठरवून उत्कर्षाकडे जाण्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठीचा उत्सव-उपचार करण्याने नवीन वर्षांची सुरुवात होते. 


आयुर्वेदात हाडे व सांगाडा मजबूत ठेवण्यासाठी वंशलोचन (बांबूच्या पोकळीत सापडणारे द्रव्य) योजलेले आहे. बांबूसारखा नुसता कडकपणा शरीराला असणे चांगले नाही. कडकपणाच्या बरोबरीने सौंदर्य, कोमलता व आकर्षकता असणेही आवश्‍यक असते. म्हणून निसर्गाने मज्जा, मांस, मेद या तीन धातूंची योजना केलेली आहे. माणसाची त्वचा तेजःपुंज, तुकतुकीत, वेगवेगळ्या रंगांची असते. त्याचे प्रतीक म्हणून बांबूभोवती रेशमी वस्त्र गुंडाळलेले असते. बांबूच्या टोकावर ठेवलेला घट आत्मसमाधान, आनंद, आत्मशांती जेथे घेता येते अशा मस्तकाचे प्रतीक असतो. व्यक्‍तिमत्व आदरणीय असावे म्हणून त्याला माळा (साखरेची फुले व गाठी) घातलेल्या असतात. माळा नुसते कर्तृत्व दाखविणारी आहे असे नव्हे, तर माणसाच्या वागणुकीतील प्रेम, गोडवा या माळेने सूचित केलेला असतो. यातून मनुष्य प्रतिकाची एक गुढी तयार होते. गुढी उंच असून आकाशाकडे झेपावी या उद्देशाने घराच्या उंच भागावर बांधलेली असते, किंवा गुढी मिरवणुकीत नाचवत घेऊन जाण्याची पद्धत असते. असे करताना रेशमी वस्त्राचा ध्वज फडफडत राहतो, जणू चारी दिशेला माणसाच्या कर्तृत्वाचा सुगंध पसरत असतो. मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पूर्वीच्या विचारवंतांनी, विशेषतः भारतीय संस्कृतीने गुढी उभारण्याची योजना केली. त्यामध्ये त्याला स्वतःच्या आरोग्यवान भौतिक शरीराची रचना समजावली व तसे शरीर ठेवण्यासाठी प्रेरणा दिली. 


असे नेहमी म्हटले जाते की, भारतीय संस्कृती हा पूर्णतया एक उपचार आहे. त्या उपचाराने मनुष्याला आयुष्यात, आरोग्य, ऐश्वर्य, आत्मसमाधान, तेज प्राप्त व्हावे अशी योजना आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत चतुर्विध पुरुषार्थाची कल्पना केलेली आहे. 


भारतीय संस्कृतीतील सणवार हे उपचार आहेत, परंतु आज बहुतांशी सणवार खाण्या-पिण्यात अडकलेले दिसत आहेत. गुढीपाडवा म्हटला की श्रीखंड, होळी म्हटली की पुरणपोळी खाऊन सण साजरे केले जातात असे दिसते. परंतु त्या त्या सणाच्या संस्काराची प्रेरणा घेऊन मनाचे, आजूबाजूला असणारी झाडे-झुडपे, पशू-पक्षी, आपल्या भोवताली असलेली पंचतत्त्वे यांचे उदात्तीकरण व्हावे व आपल्याला या सर्वांच्या बरोबरीने राहता यावे अशी योजना सणांमागे असते. सर्वांनी सुखासमाधानाने राहायचे असते. कुणाचा द्वेष न करणे, एकमेकांचा आदर करणे, अपराध वा चुका झाल्या असतील तर क्षमा करणे, ज्याच्याजवळ जे नाही त्याला त्याचे दान देणे असे वागण्याने समाधान मिळू शकते व यातून मिळालेले समाधान अवर्णनीय असते. असे समाधान मिळणे हे एक आरोग्याचे लक्षण आहे. असे समाधान मिळण्याची योजना भारतीय संस्कृतीत केलेली असते. 


माणसाने कायम ताठ मानेने जगावे, वर पाहावे, चारीही पुरुषार्थांची उपासना करावी यादृष्टीने नवसंवत्सराची-गुढीपाडव्याची योजना केलेली आहे. आज संकल्प केला व संस्कारांची सुरुवात केली तर या शार्वरी संवत्सरातील अंधाराची काय बिशाद आहे की त्याचा मानवतेस त्रास होईल? एकदा का अंतर्ज्योत प्रकटली की सर्व अंधारांचा, शत्रूंचा, रोगांचा नाश होतो. 


भारतीय संस्कृतीचे महत्त्व ओळखून त्यानुसार आचरण ठेवले की सर्व संकटांचा नाश होईल, हेही वर्ष आनंदात जाईल, आपण प्रगतीच्या मार्गावर येऊ. भारतीय संस्कृती महान आहे असे नुसते म्हणत राहायचे नसते तर त्यानुसार आचरण ठेवले तर त्याचा अनुभव येऊन जीवनाचा विकास साधता येईल, आनंद घेता येईल.