Music for good sleep: शांत झोपेसाठी संगीत मदत करते!

Good music is always good for health
Good music is always good for health

लहान बाळांना झोपविण्यासाठी आपल्याकडे अंगाई गीत म्हटले जाते. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. मोठ्या माणसांनादेखील हा झोपण्यापूर्वी संगीत ऐकण्याचा उपाय लागू होतो का? झोप या विषयावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या प्रश्नाला उत्तर होकारार्थी दिले आहे. झोपण्यापूर्वी संगीत ऐकले, तर मोठ्या माणसांनाही चांगली व जास्त काळ निद्रा येते, असे संशोधनातून पुढे आले आहे. 
 
झोपेच्या विविध समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार जडण्याची शक्यता जास्त असते. सुदैवाने चांगल्या झोपेसाठी इतर उपचारांवरोबरच संगीत उपचार पध्दतीलाही शास्त्रीय आधार मिळालेला आहे. या पध्दतीने झोपेच्या समस्यांवर मात करता येते, हे सिध्द झाले आहे.

काही संगीतकार तंत्रज्ञांच्या सहाय्याने चांगली, स्वस्थ झोप मिळण्यासाठीचे विशेष संगीत, गाणी निर्माण करीत आहेत. मार्कोनी युनियन यांनी असेच एक ‘वेटलेस’ हे गाणे ‘ब्रिटिश अकॅडमी ऑफ साऊंड थेरपी’ यांच्याबरोबर निर्माण केले. हे गाणे ऐकल्याने सर्वात जास्त आराम मिळतो, हे झोप विषयातील तज्ज्ञांनी मान्य केले आहे.

त्याचबरोबर ‘क्लेअर डी ल्यून’, ‘कॅन्झोनेत्ता सुल-अरिया’, ‘एरिक सटाय जिम्नोपेडी नं. 1’, ‘गुस्ताव होल्स्ट-व्हीनस’, ‘शोपिन नॉक्चर्न ऑप 9 नं. 2’, ‘बिथोव्हन-मूनलाईट सोनाटा’ आणि ‘जे. एस. बाश’ या गाण्यांनी आपले सामर्थ्य वेळोवेळी दाखवून दिले आहे व शांत झोप, निवांत मन यासाठी आपली उपयुक्तता सिध्द केलेली आहे.

स्लीप थेरपिस्ट असलेल्या डॉ. प्रीती देवनानी सांगतात की, संगीतामुळे आपल्या शरीरात काही निश्चित स्वरुपाचे बदल होतात. त्यांच्यामुळे आपण निवांतपणा अनुभवतो व शांत झोपू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक अवस्थेवर संगीत परिणाम करते.

त्याची परिणती म्हणजे आपला रक्तदाब, हृदयाचे ठोके यांची गती कमी होऊ लागते. तसेच ‘एन्डोजेनस ओपिऑईडस’ व ‘ऑक्सीटोसिन’ यांसारखे हार्मोन्स जास्त निर्माण होऊन आपल्या मनावरील ताण व वेदना कमी होतात. चांगली झोप न लागण्यास हेच तणाव कारणीभूत असतात. 
 
रॉक, पॉप, जॅझ, शास्त्रीय, ब्लूज... कोणते संगीत यासाठी ऐकावे?
मिनिटाला साठ ठोके या गतीने चालणारे कोणतेही संगीत झोप येण्यास उपयुक्त असते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. माणसाच्या भावना चाळवणारे, जास्त गतीचे किंवा इलेक्ट्रिक गिटार, ड्रम्स अशी मोठ्या आवाजाची वाद्ये असणारे संगीत झोपण्यापूर्वी टाळावे. शास्त्रीय आणि धीम्या गतीचे जॅझ संगीत ऐकावे. तसेच...

  • सागराच्या लाटा व पाऊस यांचा आवाज ऐकवणारे संगीत

  • तणाव व काळज्या घालवणारा आवाज ज्यामध्ये आहे, अशी ऑडिओ पुस्तके

  • ध्यान-धारणा करतेवेळी ऐकावयाचे संगीत, ओम स्मरण, बुध्दांचे स्मरण हे संगीत झोपण्यापूर्वी ऐकावे.

सध्या ‘स्लीपरेडिओ डॉट कॉम’, ‘अॅम्बियन्टस्लीपिंगपिल डॉट कॉम’, ‘दिगस्टर डॉट एफएम स्लॅश स्लीप’ तसेच ‘स्पॉटिफाय डॉट कॉम’ या वेबसाईटस असे हलके संगीत ऐकवतात. त्यांचे संगीत ऐकून झोपेसाठी फार आराधना करावी लागत नाही.

‘डाऊनलोड’ करून अथवा थेट वेबसाईटवरून हे संगीत ऐकता येते. शास्त्रीय संगीतात रस नसलेल्यांसाठी ‘स्पॉटिफाय’वरील ‘टॉप-20 स्लीप प्ले-लिस्ट’ उपलब्ध असते. ‘थिंकिंग आऊट लाऊड’ आणि ‘आय सी फायर’ या एड शीरान यांच्या रचना, ‘टेक मी टू चर्च’ हे होझियर यांचे गीत, सॅम स्मिथ यांच्या ‘स्टे विथ मी’ व ‘आय अॅम नॉट द ओन्ली वन’ या रचना, त्याचप्रमाणे, एली गोल्डींग यांच्या ‘लेट हर गो बाय पॅसेंज’र आणि ‘लव्ह मी लाईक यू डू’ ही गीते या ‘प्ले-लिस्ट’मध्ये असतात.     

एकुणात, झोपेची औषधे घेण्यापेक्षा शांत संगीत ऐकणे हा केव्हाही चांगला पर्याय ठरू शकतो. हा केवळ कमी खर्चाचा उपाय नाही, तर कोणतेही ‘साईड इफेक्ट’ नसलेला उपचार आहे. म्हणून, आपली ‘स्लीप-प्लेलिस्ट’ बनवा आणि लहान बाळांप्रमाणे गुडूप झोपून जा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com