esakal | गाउट होईल आउट
sakal

बोलून बातमी शोधा

Gout

गाउट होईल आउट

sakal_logo
By
डॉ. आरती दिनकर

रक्तात युरिक एसिड वाढले की सांधे वेदनामय होतात. या गाउटने आपण आउट होण्याऐवजी वेळीच उपचार करून गाउटलाच आउट करता येऊ शकते. 
 
साधारण बेचाळीस वर्षीय रुग्ण उजवा पाय जमिनीवर न टेकता एका पायाने लंगडी घालतच माझ्या क्लिनिकमध्ये आला. बघितले तर त्यांना अत्यंत वेदना होत होत्या हे लगेच लक्षात आले. पायावर सूज व त्या जागेवरची त्वचा लाल झाली होती. पायाच्या अंगठ्याच्या वर जास्तच दुखत होते, त्यांच्या सांध्याजवळील शिरा मोठ्या झालेल्या होत्या. सांध्यावर जेथे सूज आली होती तेथे दाबले असता खड्डा पडला. त्यांनी याआधी अनेक वेदनाशामक गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे तात्पुरता गुण येऊन बरे वाटायचे; अशी दोन-अडीच वर्षे काढली. आता रोगाचे स्वरूप जुनाट झाल्यामुळे जास्तच त्रास होऊ लागला तेव्हा कुणीतरी सांगितले, त्यानुसार ते आज आले होते. ते विचारत होते, ‘‘डॉक्टर, मला बरे वाटेल ना? मी खूप वैतागलो आहे.’’ मी म्हटले, ‘‘तुम्ही औषधे योग्य वेळेत, योग्य मात्रेत घेतलीत व सांगितलेली पथ्ये पाळली तर लवकर गुण येण्यास काहीच हरकत नाही.’’ मी त्यांना काही महत्त्वाचे व जुजबी प्रश्न विचारले. त्यांनी त्यांची रिपोर्टची फाईलही बरोबर आणली होती. ती मी बघितली, त्यांना गाउट म्हणजेच वातरक्त किंवा संधी रोग झाला होता. 
गाउटच्या लक्षणांवर होमिओपॅथीचे नेमके औषध दिले. काही दिवसांतच त्यांना औषधाचा परिणाम जाणवला व त्यांना बरे वाटले. मला त्यांनी आवर्जून भेटून सांगितले 


रुग्णाच्या रक्तात युरिक एसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे रुग्णाला लहान सांध्यात तीव्र वेदना होतात, तोच ‘गाउट’ किंवा ‘संधीरोग’ होय. याची लक्षणे म्हणजे लहान सांध्यांमध्ये म्हणजे बोटाच्या सांध्यांमध्ये सूज, असह्य वेदना व लालसरपणा येतो. यात बऱ्याचदा ताप असतो. तापाचा चढ-उतार बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येतो. काही वेळेस गाउटचे दुखणे मोठ्या सांध्यामध्येही दिसून येते; लहान सांधे म्हणजेच बोटांचे सांधे व इतर सांध्यांना मोठे सांधे म्हणता येईल. गाउटचे दुखणे सांध्यात अचानक सुरू होते आणि रात्रीतून वाढते, याचा परिणाम पायाच्या अंगठ्यावरच्या सांध्यावर जास्त प्रमाणात होतो. या आजारात हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक एसिडचे खडे तयार होतात, त्यामुळे या वेदना होतात. पायाची बोटे, हाताची बोटे, हाताचे ढोपरे, गुडघे येथे असह्य वेदना होऊन तेथील भाग गरम होऊन सुजतो. त्वचा लाल होते. या लक्षणाबरोबर अनेकदा थंडी असते, पण काही रुग्णांना तापाबरोबर सांधे दुखतात, तर काहींचे फक्त सांधे दुखतात. त्या ठिकाणी गरम लागते, तेथे सूज आलेली असते. त्या सांध्याजवळील शिरा मोठ्या झालेल्या असतात. सूज आलेल्या ठिकाणी दाबले असता, खड्डा पडतो. सुई टोचल्याप्रमाणे, फाडल्याप्रमाणे वेदना होतात. रुग्णाला ताप उतरत असताना घाम येतो, मूत्रातून मूत्राम्ल खूप प्रमाणात येते. सांधे वाकडे तिकडे किंवा ताठ होतात, सांध्यातील सूज कमी व्हायला लागली की तेथे खाज येते. अशा वेळी रुग्ण कोणतीही हालचाल करू शकत नाही. हा आनुवंशिक आजार आहे. हा आजार जुनाट झाल्यास याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. गाउट या आजारावर औषधे घेताना पथ्य पाळणेही गरजेचे आहे. 

गाउट होण्याची कारणे अनेक आहेत. अतिपौष्टिक अन्न खाणारे व त्यामानाने शारीरिक श्रम कमी करणारे, बऱ्याचदा अंगाने स्थूल असणारे अशांना गाउट झालेला दिसून येतो. तसेच थंडीपासून शरीराचे रक्षण करता न आल्यानेही हा आजार होऊ शकतो. तसेच बहुतेक स्त्रियांना बाळंतपणानंतर किंवा मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीच्या वेळी गाउट झालेला आढळून येतो, शिवाय अति प्रमाणात मद्यपान करणारे चाळीस किंवा त्यावरील वयाच्या पुरुषांना या आजाराने गाठलेले दिसून येते. 

गाउटमध्ये रोगाचे मूळ कारण शोधले जाते, त्यानुसारच योग्य औषध योजना करता येते. रुग्णाच्या रक्तात युरिक एसिडचे वाढलेले प्रमाण हे या आजाराचे मुख्य कारण दिसते. औषधांनी रुग्णाच्या रक्तातील युरिक एसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रुग्णाच्या तीव्र वेदना कमी होऊन त्याला गुण येतो. सांध्यावरील सूज, लालीही कमी होते. मुख्य म्हणजे रुग्णाच्या असह्य वेदना कमी होतात. मात्र यासाठी रुग्णाने काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. 

काय खाऊ नये? 
- मशरूम, मासे, मांस, मटण, खूप तिखट मसालेदार पदार्थ, तसेच चिकन, अल्कोहोल (मद्यपान), साखर, मिठाया, बेकरीचे पदार्थ, शीतपेये, आइस्क्रीम टाळावे. मीठ कमी खावे. आंबट पदार्थ शरीरावर प्रतिकूल परिणाम करतात. त्यामुळे गाउटची लक्षणे वाढीस लागतात व मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नाही. 

काय खावे? 
संपूर्ण धान्य, कडधान्य, भाज्या, फळे, सफरचंद, काकडी, डाळी, दूध जरुरीपुरते रोजच्या आहारात असावे. कारण मांसल भागाचे पोषण होणे गरजेचे आहे. अडीच ते तीन लिटर पाणी रोज जरूर प्यावे. व्यायाम करावा. 

गाउट या आजारावर लक्षणांचा पूर्ण अभ्यास करूनच औषधे योजना करावी लागते. 
(१) अैकोनाईट- नुकत्याच उद्भवलेल्या गाउटच्या वेदना, तसेच लहान सांध्यावरील सूज. ताप व लघवीचा रंग गर्द पिवळा होतो, त्यावर उपयुक्त. 
(२) ब्रायोनिया- रुग्णाला शौचास साफ नसते, सांधे सुजतात, हालचालीने वेदना व कळा वाढतात, विश्रांती घेतल्याने बरे वाटते. 
(३) कोलोफायलम- असह्य वेदनेमुळे सांधे थरथर कापतात, मुख्यत्वे करून बोटांचे सांधे, तळव्यांचे सांधे, घोट्याचे सांधे यात तीव्र वेदना होतात, सांध्यात टोचल्याप्रमाणे वेदना होतात, वेदना स्थलांतर करणाऱ्या असतात. 
(४) कॉस्टिकम- सांधे ताठ होतात, स्नायू व शिरा आखडतात. सूज व वेदनांमुळे सांधे गरम लागतात, अंगठा व बोटे यांच्या लहान सांध्यात खूप दुखते. 
(५) कॉलचीकम- वेदना असह्य व फाडल्यासारख्या असतात, हाता-पायाच्या लहान-लहान सांध्यात दुखते, वेदना एका सांध्यातून दुसऱ्या सांध्यात जातात. 
(६) नाईट्रमूर- जुनाट किंवा नवीन उद्भवलेल्या गाउटवर या औषधाचा चांगला उपयोग होतो. लघवीतून युरिक एसिड जात असते, लघवीचा रंग लाल व लघवीतून विटकरीसारखे कण जात असतात. गाउटमुळे हृदयावर परिणाम झाला असेल तर या औषधाचा चांगला उपयोग होतो