esakal | गुढीपाडवा 
sakal

बोलून बातमी शोधा

Gudhee Padwa

गुढीपाडवा 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

गुढीपाडवा उत्साहाने साजरा करताना त्यातील परंपरेच्या आरोग्य अर्थ जाणून घेतला आणि त्याला वापर करून घेतला तर येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धीने युक्‍त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल. चैत्र महिन्यात कडुनिंबाच्या ताज्या फुलांचा रस पिण्याने सर्व प्रकारचे रक्‍तदोष दूर होतात म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची व फुलांची चटणी खाण्याची परंपरा आहे. 
 

भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. निसर्गातही वृक्षवेलींना नवी पालवी फुटण्याचा हा काळ असतो. याला साजेशा पद्धतीनेच भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. बांबू, रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशांची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक व आरोग्याला पूरक गोष्टी वापरून गुढी उभारली जाते, गुढीची पूजा केली जाते, बत्ताशाचा प्रसाद सर्वांना वाटला जातो, कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते. असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी निश्चित करावी. म्हणूनच बहुधा भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवींचा समावेश केलेला असावा. आयुर्वेदात तर आहार षड्रसपूर्ण असावा हे अनेक वेळा सांगितलेले आहे. मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे सहाही रस योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी उत्तम असते बत्ताशाच्या माळेच्या रूपाने मधुर चवीपासून ते कडुनिंबाच्या रूपाने कडू-तुरट चवीपर्यंत सर्व रसांचे महत्त्व गुढीपाडव्याच्या निमित्ताने अधोरेखित होत असते. 


निरोगी, उत्साहपूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांत महत्त्वाची असते ती शरीरशक्‍ती. शरीरातील रक्‍तशर्करा, लोहकण, कॅल्शियम वगैरे गोष्टी जशा मोजता येतात तशी शरीरशक्‍ती मोजता येत नाही, मात्र शरीराचे सर्व व्यवहार नीट चालण्यासाठी पुरेशी शरीरशक्‍ती असणे आवश्‍यक असते. शरीरशक्‍तीसाठी सर्वोत्तम स्रोत म्हणजे मधुर रस, पर्यायाने शर्करासेवन. शर्करा म्हणजे उसापासून नैसर्गिक पद्धतीने बनविलेली शुद्ध साखर औषधात तसेच आहारातही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. खडीसाखर, बत्ताशाची साखरही श्रेष्ठ समजली जाते. साखरेतील मळी काढून टाकून बनविल्यामुळे बत्ताशाची साखर व खडीसाखर पचायला अधिक सोपी असते. 


कडुनिंबाच्या चटणीशिवाय गुढीपाडवा साजरा होत नाही. 
गुढीपाडवा येतो तो वसंत ऋतूच्या सुरुवातीला. थंडी संपून ऊन पडायला सुरुवात सुरुवात होणे म्हणजेच वसंत ऋतूचा प्रारंभ होणे. थंडीमध्ये शरीरात साठून राहिलेला कफदोष वसंतातील उष्णतेमुळे वितळण्यास सुरुवात होते. यामुळे सहसा सर्दी, खोकला, घशात कफ होणे या प्रकारचे त्रास होताना दिसतात. यावर कडुनिंब हे उत्तम औषध होय. 


कडुनिंबाचा वृक्ष आठ-दहा मीटर उंच असतो. याची पाने छोटी व मधल्या दांड्याच्या दोन्ही बाजूला जोडीजोडीने असतात. टोकाचे पान मध्यात असते. फुले लहान व पांढऱ्या रंगाची असतात. त्यांना मंद सुगंध असतो. फळ कच्चे असताना हिरवे व टणक असते, मात्र पिकले की पिवळे व मऊ बनते. फळाच्या आत एक बी असते. बीच्या आत मगज असतो. या मगजापासून तेल काढले जाते. कडुनिंबाची पाने हिवाळ्यात गळतात, वसंताची चाहूल लागली की कोवळी पालवी फुटते आणि वसंताच्या अखेरीपर्यंत झुपक्‍यांनी फुले येऊ लागतात. कडुनिंबाचे गुणधर्म भावप्रकाशात पुढीलप्रमाणे सांगितले आहेत, 
निम्बः शीतो लघुर्ग्राही कटुस्तिक्‍तोऽग्निवातकृत्‌ । 
अहृद्यः श्रमतृट्‌कास ज्वरारुचि कृमिप्रणुत्‌ ।। 

...भावप्रकाश 
कडुनिंब गुणाने लघू म्हणजे पचायला हलका, चवीने कडू व तुरट, विपाकाने तिखट असतो, मात्र वीर्याने शीतल असतो. मुख्यत्वे कफदोष व त्यामागोमाग पित्तदोषाचे शमन करतो, मात्र वात वाढवतो. कडुनिंब चवीमुळे नकोसा वाटला तरी अग्नीला प्रदीप्त करणारा असतो, योग्य प्रमाणात सेवन केल्यास श्रमामुळे झालेल्या अशक्‍ततेला भरून आणतो, तहान शमवतो, खोकला, ताप, अरुची (तोंडाला चव नसणे) व जंत या सर्व विकारात उपयुक्‍त असतो. 


गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने व कोवळी फुले, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, चिंच, गूळ, सैंधव, मिरी,ओवा, जिरे, हिंग व लिंबाचा रस हे घटकद्रव्य मिसळून चविष्ट चटणी बनवली जाते. ही चटणी दुपारच्या जेवणाच्या सुरुवातीला घेतली की त्यामुळे कफदोषाचे शमन तर होतेच पण तोंडाला चवही येते, अग्नी प्रदीप्त होतो. पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते, कफदोषाच्या पाठोपाठ पोटात जंत होण्याची प्रवृत्ती वाढत असते, तिलाही आळा बसतो, सर्दी, खोकला, ताप वगैरे विकारांनाही प्रतिबंध होतो. अपचन, पोट जड होणे, स्थूलता, मधुमेह यासारख्या तक्रारी असणाऱ्यांसाठी तर अशी चटणी पूर्ण वसंत ऋतूभर घेण्याजोगी असते. 


कडुनिंबाची पाने, फुले, साल, फळे या सर्वांचा औषधात वापर केला जातो. हवा शुद्ध ठेवण्यासाठी, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यासाठी, घरात तसेच ठिकठिकाणी धूप करण्यास सुचवला जातो. त्यासाठी कडुनिंबाची पाने वापरली जातात. 


जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाला असला तर कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने जखम अगोदर धुवून घेऊन नंतर कडुनिंबाची पाने मधासह वाटून तयार झालेला लगदा जखमेवर बसवून पाटा बांधून टाकला जातो. या प्रकारे काही दिवस रोज केल्याने हळूहळू जखम भरून येते. आग होणाऱ्या सूजेवर कडुनिंबाच्या पानांचा लेप करण्याने लगेच बरे वाटते.

स्नानाच्या पाण्यात याच्या पाल्याचा काढा मिसळल्याने त्वचारोग बरे होण्यास विशेषतः खाज कमी होण्यास मदत मिळते. गोवर, कांजिण्या वगैरे संसर्गजन्य रोगांमध्ये अंग पुसून घेण्यासाठी पानांचा काढा मिसळलेले पाणी वापरणे हितावह असते, तसेच या रोगात स्नानाच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकण्याची पद्धत असते. 


विषबाधेवर, विशेषतः सापाच्या विषावर कडुनिंबाचा पाला अतिशय प्रभावी असतो. कडुनिंबाची पाने चावून खाल्ली व तरीही कडू लागली नाही तर त्याचा अर्थ साप चावून विषबाधा झाली आहे अशा परीक्षा प्रचलित आहे व यावर पाल्याचा रस देण्याची पद्धत आहे. 


कडुनिंबाची फुले वाळवून तयार केलेले चूर्ण रोज रात्री गरम पाण्याबरोबर घेण्याने शौचास साफ होते व शक्‍ती वाढण्यास मदत होते. 
रसोनिम्बस्य मञ्जर्याः पीतश्‍चैत्रे हितावहः । 
हन्ति रक्‍तविकारांश्च वातपित्तं कफं तथा ।। 

चैत्र महिन्यात कडुनिंबाच्या ताज्या फुलांचा रस पिण्याने सर्व प्रकारचे रक्‍तदोष दूर होतात म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची व फुलांची चटणी खाण्याची परंपरा आहे. 


तापावर कडुनिंबाच्या सालीचा काढा घेण्याची पद्धत आहे. ताप येणे बंद झाले तरी नंतर चांगली भूक लागेपर्यंत व तापामुळे आलेली अशक्‍तता भरून येईपर्यंत असा काढा घेत राहणे हितावह असते. सालीच्या आतमध्ये असलेला गाभा सुगंधित व शीत गुणाचा असतो. दीर्घकालीन ताप, गोवर, कांजिण्या, कावीळ वगैरे कोणत्याही कारणाने शरीरात मुरलेली कडकी दूर करण्यासाठी गाभा उगाळून तयार केलेले गंध खडीसाखरेबरोबर घेतले जाते. बाळंतिणीला वाफारा देण्यासाठी सालीचा काढा वापरणे उत्तम असते. यामुळे वातशमन तर होतेच, पण जंतुसंसर्ग होण्यासही प्रतिबंध होतो. 


कडुनिंबाच्या फळामध्ये असणारी बी बारीक करून लावण्याने खरूज बरी होते. डोक्‍यामध्ये उवा, लिखा झाल्या असल्यासही बिया बारीक करून डोक्‍यावर बांधून ठेवल्याने उपयोग होतो. बियांपासून काढलेले तेल त्वचारोगांवर खूपच उपयुक्‍त असते. हे वरून लावण्याने खाज कमी होते, त्वचा पूर्ववत होण्यास मदत मिळते व रक्‍तदोषामुळे काळवंडलेली त्वचा किंवा डागही नष्ट होतात. 


हे सर्व उपयोग पाहिले तर वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुनिंबाला इतके महत्त्व का दिले आहे हे समजू शकते. 


गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या जेवणात श्रीखंड असतेच. उन्हाळ्यातील उष्णतेशी सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती चांगली टिकून राहावी यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले श्रीखंड हे रसायनाप्रमाणे उपयोगी ठरत असते. आयुर्वेदात श्रीखंडाला ‘रसाला शिखरिणी’ असे नाव दिलेले आहे. 
यामध्ये पाणी निथळून गेलेले दही म्हणजे चक्का, मध, तूप, साखर, दालचिनी, नागकेशर, वेलची, तमालपत्र, मिरे, सुंठ ही घटकद्रव्ये असतात. यांचे गुण याप्रमाणे, 
दही - कफवर्धक, पचायला जड, वातशामक, शरीराला स्निग्धता देणारे, पुष्टिकर 
मध - कफदोषशामक, पचायला हलके, आवाज सुधारणारे, प्रमाणापेक्षा अधिक असणाऱ्या मेदाला कमी करणारे, रुचकर, रुक्ष 
तूप - शक्‍तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढविणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक 
साखर - वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्‍ती वाढविणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी 
दालचिनी, नागकेशर, वेलची व तमालपत्र ही चार द्रव्ये मिळून ‘चातुर्जात’ गण तयार होतो. हा कफनाशक, रुचिवर्धक, आमपाचक असा असतो. 
मिरे व सुंठ - हे दोघेही चवीला तिखट, अग्निवर्धक, पाचक व कफनाशक असतात. 
हे गुण पाहिले असता लक्षात येते की दही जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे की त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. दह्यातील इतर गुण मात्र वृद्धिंगत होतात. 


थोडक्‍यात, गुढीपाडवा उत्साहाने साजरा केला, मुख्य म्हणजे त्यातील परंपरेच्या आरोग्य अर्थ जाणून घेतला आणि त्याला वापर करून घेतला तर येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धीने युक्‍त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.