शक्तिध्वज

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 April 2019

ऊर्जेचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. या दिवशी बांबूच्या टोकावर ठेवलेला घडा पाहताना आपली ऊर्जा मस्तकाकडे न्यायची आहे हे लक्षात घेतलेले असते.   

सृष्टीचे गूढ उकलताना भारतीय ऋषिमुनींनी ज्या गोष्टी जाणवल्या त्या सर्वांना समजाव्यात, केवळ समजाव्यात असे नाही तर आचरणात राहाव्यात म्हणून संस्कृती व सणवार यांची योजना केली. वर्षाच्या पहिल्या दिवशी येणारा चित्रा नक्षत्रावरचा हा चैत्र महिन्यातील सण. ऊर्जेचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. या दिवशी बांबूच्या टोकावर ठेवलेला घडा पाहताना आपली ऊर्जा मस्तकाकडे न्यायची आहे हे लक्षात घेतलेले असते.   

ऊर्जेची उत्क्रांती व सतत होणारे प्रसरण हे साध्य व्हावे म्हणून जणू परमेश्‍वराने हा सर्व विश्‍वाचा व्याप मांडला. एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे सृष्टीला नटविण्याचे काम वसंत ऋतू करतो. प्राणशक्‍ती व एकूणच सर्व ऊर्जा विकसित होईल तेव्हा चेहऱ्यावर हास्य फुलले नाही तरच नवल. आकाशात रंगाची उधळण, झाडांचे वेगवेगळे हिरवे रंग आणि असंख्य फुलांच्या रंगाच्या अनेक छटा पाहायला मिळतात. मुळात रंग सात. हे सात रंग ऊर्जेच्या गुणांवर उत्पन्न झाले. परंतु या साताचे सातशे नव्हे तर सात हजार प्रकार सर्व क्षेत्रांत अनुभवाला येतात. 

सृष्टीचे गूढ उकलताना भारतीय ऋषिमुनींनी ज्या गोष्टी जाणवल्या त्या सर्वांना समजाव्यात, केवळ समजाव्यात असे नाही तर आचरणात राहाव्यात म्हणून संस्कृती व सणवार यांची योजना केली. वर्षाच्या पहिल्या दिवशी येणारा चित्रा नक्षत्रावरचा हा चैत्र महिन्यातील सण. ऊर्जेचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. पुढे येणाऱ्या रामनवमीचा उत्सव याच दिवशी सुरू व्हावा हा केवळ योगायोग नव्हे. कोदंडधारी राम असे म्हटले जाते. कोदंड म्हणजे मेरुकडे जाणारी ऊर्जा, जी संपूर्ण जीवनाला चेतना व जाणीव देते. ती रामस्वरूप असते. ही ऊर्जा  मेरुदंडातून सुषुम्नेच्या अग्रापर्यंत मस्तकाकडे धाव घेते, तिला मदत करण्याचा गुढीपाडव्याचा हा उत्सव. 

या दिवशी बांबूच्या टोकावर ठेवलेला घडा पाहताना आपली ऊर्जा मस्तकाकडे न्यायची आहे हे लक्षात घेतलेले असते. या वसंत ऋतूत कफप्रकोप होण्याची म्हणजेच जडाकडे, भौतिकत्वाकडे आकर्षण वाढण्याची शक्‍यता असते. या आकर्षणाचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी योजना केलेला गुढीपाडव्याचा हा सण व त्यानंतर सुरू होणारे गुढीपाडव्याचे नवरात्र. शरीरातील सर्व विषबाधा निघून जावी आणि कफाचा प्रकोप होत असताना वात-पित्त शांत राहावेत यासाठी या दिवशी कडुनिंबाच्या चटणीची योजना केलेली असते. या दिवसासाठी कडुनिंबाच्या चटणीची योजना ही आरोग्याचा विचार करणाऱ्या ऋषिमुनींनी मानवाला दिलेली भेट. या दिवशी ‘रसालाशिखरिणी’ या पक्वान्नाची योजना करण्याचा उल्लेख आहे. रसाला व श्रीखंड यात भरपूर फरक असतो. श्रीखंडाचा आंबटपणा संतुलित केला नसल्यास म्हणजेच श्रीखंड आयुर्वेदीय पद्धतीनुसार बनविलेले नसल्यास सांधेदुखी, कफ वाढणे असे त्रास काही व्यक्‍तींना होण्याची शक्‍यता असते. परंतु जर श्रीखंड आयुर्वेदीय पद्धतीनुसार बनवले (रसालाशिखरिणी) तर असा त्रास होण्याची शक्‍यता नसते. रसाला-शिखरिणी हे नावही किती समर्पक आहे. ज्यामुळे ऊर्जा शिखरापर्यंत पोचवली जाते ते शिखरिणी. वात-पित्तशामक, रुचिवर्धक, धातुवर्धक, अशा अनेक गुणांनी संपन्न असलेले हे पक्वान्न ज्यांनी या सणासाठी सुचवले त्यांच्या संशोधनाचे व अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

एकूणच वेदवाङ्‌मय व भारतीय संस्कृती, भारतीय सणवार यांच्या योजना पाहून बुद्धी अचंबित पावते. एकमेकांना या सणाची आठवण देऊन, एकमेकांचे अभिनंदन करून मेरुदंडाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी प्रयत्न करायचा असा निर्णय करून दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबरीने संगीत वगैरेंची योजना करून जीवन उल्हसित होईल, ऊर्जा ऊर्ध्वगामी होईल याकडेही लक्ष देणे आवश्‍यक वाटते. एकूणच हा सर्व सणांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेला सण.  

गुढीपाडव्याचा हा सण ही एक आयुर्वेदिक परंपरा आहे, आध्यात्मिक परंपरा आहे की सामाजिक आनंद देणारे एक साधन आहे हे ठरविणे अवघड आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gudi Padwa as the symbol of energy