पोटात गोळा उठणे गुल्मरोग पथ्यापथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 13 October 2017

काही कारणाशिवाय पोटात काही तरी आहे, ते गोल गोल फिरते आहे किंवा कमी जास्ती होते आहे असे जाणवत राहते, बरोबरीने वेदना असतात, तेव्हा त्याला ‘गुल्मरोग’ असे म्हणतात. गुल्मरोग वाताशिवाय नसतो, त्यामुळे यावर वातशामक आणि अग्निदीपन करणाऱ्या अन्नाची व औषधांची योजना करणे गरजेचे असते

परीक्षेच्या आधी किंवा अचानक कशाचा तरी ताण आला तर पोटात गोळा येतो, हे आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेले असते. ताण गेला किंवा परीक्षा सुरू झाली की, हा गोळा निघून जातो. पण जेव्हा काही कारणाशिवाय पोटात काही तरी आहे, ते गोल गोल फिरते आहे किंवा कमी जास्ती होते आहे असे जाणवत राहते, बरोबरीने वेदना असतात, तेव्हा त्याला ‘गुल्मरोग’ असे म्हणतात. गुल्मरोग वाताशिवाय नसतो, त्यामुळे यावर वातशामक आणि अग्निदीपन करणाऱ्या अन्नाची व औषधांची योजना करणे गरजेचे असते.

पेया वातहरैः सिद्धा कौलत्था धान्वना रसाः ।
खडाः पञ्चमूलाश्‍च गुल्मिनां भोजने हिताः ।।
....भैषज्य रत्नावली

वातनाशक अशा दशमूळ वगैरे औषधांपासून बनविलेली पेज, कुळथाचे सूप, रुक्ष प्रदेशातील प्राण्यांच्या मांसापासून बनविलेला मांसरस (सूप), तसेच बृहत्पंचमूळ (अग्निमंथ, काश्‍मरी, पाटला, बेल, श्‍योनाक) यांच्यापासून बनविलेले खड यूष हे गुल्मरोगात हितकर असते. 

दशमूळ पेज बनविण्यासाठी दशमूळाच्या ६४ पट पाणी घेऊन ते निम्मे शिल्लक राहीपर्यंत उकळायचे असते व गाळून घ्यायचे असते. तांदळाच्या १४ पट हे पाणी घेऊन त्यात तांदूळ शिजवायचे असतात. तांदूळ नीट शिजल्यावर गाळून घेतले की पेज तयार होते. खडयूष बनविण्यासाठी बृहत्पंचमूळाचे वरील पद्धतीने पाणी बनवून घ्यायचे असते व दह्यामध्ये मिसळून यथाविधी ताक बनवायचे असते. या ताकात कवठ, चांगेरी, मिरी, जिरे, चित्रक या गोष्टी मिसळून ते निम्मे होईपर्यंत उष्णता द्यायची असते.  मग त्यात मीठ मिसळले की खडयूष तयार होते. 

गुल्मरोगावर लसणाने संस्कारित केलेले दूध सुद्धा औषधाप्रमाणे हितकर असते. 

साधयेत्‌ शुद्धशुष्कस्य लशुनस्य चतुष्पलम्‌ ।
क्षीरोदकेऽष्टदुणिते क्षीरशेषश्‍च पाययेत्‌ ।।
....भैषज्य रत्नावली

वरचे साल काढलेल्या लसणाच्या पाकळ्या प्रथम वाळवून घ्याव्यात. नीट वाळल्या की त्यात आठपट पाणी आणि आठपट दूध घालून मंद आचेवर उकळण्यास ठेवावे. फक्‍त दूध शिल्लक राहिले की गाळून घ्यावे. हे ‘लशूनक्षीर - लसूण संस्कारित दूध’ थोड्या प्रमाणात म्हणजे दहा किंवा वीस मिलीलीटर एवढ्या मात्रेत घेण्याने गुल्मरोग, सायटिका, सूज, ढेकर येणे वगैरे रोग नष्ट होतात. 

गुल्मरोगावर ताक सुद्धा पथ्यकर असते.
यवानीचूर्णितं तक्रं बिडेन लवणीकृतम्‌ ।
पिबेत्‌ सन्दीपनं वातमूत्रवर्चोऽनुलोमनम्‌ ।।
....भैषज्य रत्नावली

ताकामध्ये ओव्याचे चूर्ण आणि बिड लवण (एक विशिष्ट प्रकारचे मीठ) टाकून घेण्याने अग्नी प्रदीप्त होतो, वात सरतो, पोट साफ होण्यासही मदत मिळते. 

गुल्मरोगावर आंबट चवीची द्रव्ये पथ्यकर असतात. कारण त्यामुळे वातदोष तर शांत होतोच, बरोबरीने अग्नीचे संदीपनही होते. 

कोलदाडिमघर्माम्बुसुरामण्ड अम्लकांजिकैः ।
शूलानाहहरी पेया बीजपूररसेन वा ।।
....चरक चिकित्सास्थान

बोराचा रस, डाळिंबाचा रस, गरम पाणी, सुरा नावाच्या मद्यावरचा पातळ द्रवभाग, आंबट कांजी, तसेच महाळुंगाच्या रसाने युक्‍त पेज या गोष्टी गुल्मरोगात पथ्यकर असतात. औषध घेण्यासाठी अनुपान म्हणून किंवा अधेमधे पिण्यासाठी या गोष्टी योजता येतात. 

गुल्मरोगात पित्ताचा अनुबंध असला तर वेदनेबरोबर दाह असतो. यामध्ये पुढील आहारद्रव्ये हितकर असतात, 

शालयो जांगलं मांसं गव्याजे पयसी घृतम्‌ ।
खर्जूरामलकं द्राक्षां दाडिमं सपरुषकम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

साठेसाळीचे तांदूळ, गाईचे दूध, तूप, खारीक, आवळा, द्राक्षा, डाळिंब, फालसा, जांगल प्राणी म्हणजे रुक्ष हवामानाच्या प्रदेशातील प्राण्यांच्या मांसाचे सूप यांचा आहारात वारंवार समावेश करावा.

गुल्मरोगामध्ये पुढील अन्नपदार्थांची योजना पथ्यकर असते. 

 जुन्या तांदळाचा भात (भांड्यात शिजविलेला) आणि मुगाचे किंवा कुळथाचे सूप

सुकविलेल्या मुळ्याचे सूप
बेल, वायवर्णा, करंज यांच्या कोवळ्या पानांची भाजी
महाळुंगाचा रस
डाळिंबाचा रस
पातळ, लोणी काढून टाकलेले ताक
सुंठ, पिंपळी, ओवा, हिंग, यवक्षार हे मसाल्याचे पदार्थ

गुल्मरोगात पथ्य 
जुने तांदूळ, लाल तांदूळ, शेवगा, पडवळ, मूग, कुळीथ, डाळिंब, आवळा, संत्री, महाळुंग, लिंबू, कोकम, मुळा, लसूण, आले, हळद, सुंठ, हिंग, काळी मिरी, बडीशेप, ओवा, गाईचे किंवा बकरीचे दूध, ताक वगैरे.

गुल्मरोगात अपथ्य  
मासे, वाळवलेल्या भाज्या, कडधान्ये, पचायला जड व मलावष्टंभ करणारे पदार्थ, मका, बाजरी, सातू वगैरे रुक्ष अन्ने, अळू, अंबाडी, सिताफळ, फणस वगैरे गोड फळे, रताळी, साबुदाणा, शिळे पदार्थ, दुधापासून तयार केलेल्या मिठाया, चीज, पनीर वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gum disease pathology