...परि वेदना जाणवे

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 5 January 2018

अनेक प्रकारच्या वारंवार केलेल्या तपासण्यात शारीरिक दोष सापडत नाही, मात्र वेदना होतातच. या वेदनांमागचे कारण तरी काय असते? मानसिक संघर्षाचे रूपांतर शारीरिक त्रासात होणे किंवा वेदना हे खिन्नतेचे रुप असणे संभवते. या दोन्ही प्रकारच्या वेदनांचा उगम आणि अनुभव शारीरिक कार्यकारिणातून होत नाही. वेदनेचा उगम शारीरिक व्याधीतून होत असो किंवा ‘मानसिक’ प्रक्रियातून होवो. त्या त्रासापासून त्या रुग्णाला मुक्त केलेच पाहिजे. 

वैद्यकीय सल्ला घेण्याकरता डॉक्‍टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी बऱ्याच किंवा बहुसंख्य व्यक्तींना वेदनेपासून मुक्तता हवी असते. वेदनेचे मूळ शारीरिक आजारात असू शकते; तसेच ते मनाच्या कार्यातील बिघाडातदेखील असू शकते. मनाचा शरीरावर होत असणारा परिणाम अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला आहे. अनेक रुग्णांत वारंवार विविध प्रकारच्या तपासण्या करूनदेखील वेदनांचे कारण सापडत नाही. ओटीपोटी आणि खालची कंबर येथे दुखण्याची तक्रार करणाऱ्या स्त्रियांपैकी पन्नास टक्के स्त्रियांत लॅपरॉस्कोपीच्या तपासणीत दोष आढळत नाही. त्याचप्रमाणे दीर्घकाळ डोकेदुखी असणाऱ्या अनेक रुग्णांत, चेहऱ्यावर वेदना होणाऱ्या बहुसंख्य व्यक्तींमध्ये किंवा पाठ/कंबर दुखणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्याही तपासण्यांत अनेकदा दोष आढळत नाही. अशा दुखण्याबद्दल सध्या वैद्यकीय विचारवंतांमध्ये दोन कारणांचा विचार प्रामुख्याने केला जातो. पहिला विचार म्हणजे मानसिक संघर्षाचे रूपांतर शारीरिक त्रासात होणे याला ‘कन्व्हर्जन’ म्हटले जाते. आणि दुसरा विचार म्हणजे होणारी वेदना ही खिन्नतेचे (डिप्रेशन) रूप आहे. या दोन्ही प्रकारच्या वेदनांचा उगम आणि अनुभव शारीरिक कार्यकारिणातून होत नाही. कन्व्हर्जन (रूपांतर) प्रकारच्या वेदनेचे एक उदाहरण पाहूया. एखाद्या लहान बालिकेला अप्रिय लैंगिक अनुभवातून जावे लागले तर पौगंडावस्थेपासून त्या मुलीच्या ओटीपोटात दुखू लागते; पण अनेक प्रकारच्या वारंवार केलेल्या तपासण्यात शारीरिक दोष सापडत नाही. लहान वयात घडून गेलेला प्रसंग एव्हाना विसरला गेला असतो; परंतु त्या घटनेची सुप्त मनातील अप्रिय स्मृती मात्र शारीरिक त्रासाचे रूप धारण करते. जेव्हा खिन्नता हे कारण असते तेव्हा वेदनेची निश्‍चित जागा सांगता येत नाही आणि रुग्णाला ‘उत्साह कमी,’ ‘सारखे थकल्यासारखे वाटते,’ ‘झोप पुरी झाल्याचे समाधान मिळत नाही,’ ‘कशाचाही आनंद वाटत नाही’ या तऱ्हेच्याही तक्रारी असतात.

प्रगत राष्ट्रांत, विशेषतः अमेरिका आणि फ्रान्स येथे अशा विकारांवर अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत. वेदनेचे मूळ काढून टाकण्याकरता विविध प्रकारचे उपचार वापरले जातात. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ आणि ऑक्‍युपॅशनल थिअरपिस्ट यांचा समावेश विशेषकरून असतो. औषधांमध्ये ट्रायसायक्‍लिक प्रकाराच्या औषधांचा फायदा होतो.

येथे ‘मानसिक’ या शब्दाबद्दल थोडे स्पष्टीकरण इष्ट आहे. ‘मानसिक’ या शब्दाचा अर्थ ‘काल्पनिक’ असा साधारणपणे घेतला जातो. तो अर्थ येथे अभिप्रेत नाही. ‘मानसिक’ या शब्दाचा दुसरा अर्थ मनाच्या कार्यकारणीत झालेल्या दोषामुळे निर्माण झालेला आजार हा आहे. मन हे मेंदूच्या विशिष्ट कार्यकारिणी पद्धतीला दिलेले नाव आहे. मेंदूत अनेक प्रकारची कामे चालू असतात. त्यातल्या काही कार्यांच्या समुच्चयाला मन म्हणतात.

संवेदना, परिचय, स्मृती, भावना, समस्येची जाणीव, विचार, उत्तर काढण्याचा प्रयत्न, निर्णय आणि कार्यवाही अशा नऊ अंगांचे ‘मन’ बनते. घरातील कोणत्याही पायरीवर दोष झाला, तरी विकृती निर्माण होते. या विकृतीला मनाच्या कार्यकरणीत निर्माण झालेल्या दोषाचा परिणाम म्हणून मानसिक असे म्हटले जाते. ही मनाची कार्यकरणी मेंदूच्या विविध भागातील कार्यावरच अवलंबून असते. तथापि पूर्वापारपासून चालू असणाऱ्या प्रथेप्रमाणे या दोषांनादेखील मानसिक म्हटले जाते. या शब्दांमुळे रुग्णाचा गैरसमज होणे शक्‍य असते. रुग्णाला खरोखरीच त्रास होत असतो. आणि तो त्रास मानसिक आहे, असे डॉक्‍टरांनी म्हटले तर ते रुग्णाला पटत नाही. यासाठी हे शब्द जपून वापरावे लागतात आणि त्यांचा खरा अर्थ आधीच समजावून सांगणे इष्ट ठरते.

बऱ्याच वेळा मनात निर्माण झालेल्या प्रतिक्रियांमुळे रुग्णाला शारीरिक वेदना होऊ शकतात. उदाहरणार्थ मानसिक तणावाचा एक परिणाम शारीरिक स्नायू आकुंचित होण्याकडे होतो. हृदयात कोणताही दोष नसला तरी फासळ्यांमधील स्नायू आकुंचित राहण्याने छातीत तीव्र वेदना येऊ शकतात. खिन्नतेमुळे पोटात कळा आल्याप्रमाणे वेदना येतात. शिओफ्रेनिया या मानसिक विकारात वेदना येत असण्याचा भ्रम रुग्णाला होतो. शिवाय ज्यांना कोणताही शारीरिक आजार नसताना आपल्याला आजार आहे, असे भासवणाऱ्या व्यक्तींमध्ये शरीरात वेदना होत असल्याचे सांगणे ही एक नेहमीची घटना आहे!

आपल्या शरीरातील ज्ञानतंतूंच्या शिरा यामुळे होणारे आजार व वेदना यांचाही गंभीरपणे विचार करणे आवश्‍यक असते. काळजीपूर्वक तपासणीनंतर हा फरक लक्षात येतो. दुखण्याची जागा व वेदनेचा प्रकार यांच्या वर्णनावरून हे कळू शकते. उदाहरणार्थ दीर्घकाळ आणि अनिर्बंध मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या तळपायांची आग होते. रुग्णाशी, कुटुंबीयांशी आणि संबंधितांशी संभाषण करून व रुग्णाला तपासून अल्कॉहॉलिक पेरिपटल न्युरोपथीची लक्षणे सापडू शकतात.

खिन्नता किंवा डिप्रेशन हे वैद्यकीय हे वैद्यकीय मदतीच्या गरजेचे एक प्रमुख कारण असते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अपेक्षेप्रमाणे न होणे हे मनाची प्रसन्नता ढळण्याचे महत्त्वाचे कारण असते. बहुतेक वेळा अशा अ-प्रसन्नतेचे कारण तात्पुरतेच असते; परंतु ते कारण कायम स्वरूपाचे आहे, अशी कल्पना माणसाने करून घेतली तर खिन्नतेचे बीज रोवले जाते. खिन्नतेची प्रमुख लक्षणे म्हणजे - १) भविष्यात सुधारणेच्या शक्‍यता नसल्याची भावना, २) मनात आनंदाचा अभाव, ३) सतत थकवा, ४) चेहऱ्यावर व शरीराच्या स्थितीवरून, आवाजावरून, उत्साहाचा अभाव दिसणे. कौटुंबिक घटक आणि मित्रपरिवार यांच्याबरोबर संभाषण केल्यास रुग्णाच्या या भावनेचा अंदाज येतो. आपल्या मनातील भावनांचे वर्णन करणे अनेकांना कठीण जाते. अशी माणसे वैवाहिक जीवनासंबंधी, कामाबद्दल आणि एकूण जीवनातील अडचणींबद्दल तक्रारी सांगत असतात. त्यांना विविध शारीरिक दुखणी असल्याची तक्रार ते डोके दुखणे, कंबर अखडणे, वजन घटणे, मलावरोध होणे, शरीर-संबंधाची इच्छा कमी होणे, भूक न लागणे किंवा थकवा येणे अशा तक्रारी अनेकांच्या असतात.

शारीरिक व्याधींच्या अभावात वेदना जाणवण्याचे दुसरे कारण म्हणजे ‘कन्व्हर्जन डिसॉर्डर’. या आजाराच्या प्रकाराला पूर्वी ‘हिस्टेरिया’ या नावाने संबोधित असत. ‘हिस्टेरिया’ हा शब्द वैद्यकीय लिखाणातून जवळजवळ वगळलेला आहे. आजाराचे दृश्‍य रूप कसे असावे याबद्दल रुग्णाच्या मनात एक प्रतिमा असते. या प्रतिमेनुसार रुग्णाला शारीरिक त्रास होतात. शरीररचना किंवा शरीरक्रिया यांच्या शास्त्रशुद्ध बिघाडानंतर होणाऱ्या त्रासाप्रमाणे ही रुग्णाच्या मनातील प्रतिमा नसते. त्यामुळे शास्त्रशुद्ध विकाराने होऊ शकणाऱ्या भागात किंवा प्रकारात रुग्णाच्या आजाराचे वर्णन बसत नाही. रुग्णाला तपासताना आणि रुग्णाच्या तक्रारी ऐकताना ही तफावत सहज लक्षात येते. शिवाय, आपल्या आजारपणाचे होणारे फायदे या ‘कन्व्हर्जन’ आजारात कळून येतात, शिवाय रुग्ण आपल्या वेदनेचे वर्णन करताना रुग्णाच्या चेहऱ्यावर रुग्णाला वेदना होत असल्याचे चिन्ह तर दिसत नाहीच. उलटपक्षी रुग्णाला आपल्या वेदनेचे वर्णन करताना ‘समाधान’ किंवा ‘आनंद’ होत असल्याचे दिसते!

वेदनेचा उगम शारीरिक व्याधीतून होत असो किंवा ‘मानसिक’ प्रक्रियातून होवो. त्या त्रासापासून त्या रुग्णाला मुक्त केलेच पाहिजे. तशी गरज वाटली तर एखादा अनुभवी व तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञाची मदत अवश्‍य घ्यावी; पण रुग्णाची अवहेलना करू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: h-v-sardesai article