आतड्याची माया

आतड्याची माया

आपले आतडे आठ मीटर्स लांब असते. इतर अवयवांची, उदाहरणार्थ प्लीहा, यकृत, फुफ्फुसे इत्यादींची, आपल्याला क्वचितच जाणीव होते. आतड्याची जाणीव केव्हा ना केव्हातरी प्रत्येकाला होतेच. पोटात गडगडण्याचे आवाज येतात, कळ येऊन पोट दुखते, कधी जुलाब होतात, तर कधी शौच्याला होत नाही (मलावरोध होतो). आपली आतडी अन्नाचे पचन करतात हे सर्वविद्‌ आहे. आपण ज्या स्वरूपात अन्न घेतो (विशेषतः न शिजवलेले अन्न ः कोशिंबिरी, फळे, धारोष्ण दूध) ते जसेच्या तसे आपल्या शरीरात गेले, तर अपायकारक ठरू शकते. आतड्यात अन्नघटकांचे रूपांतर रक्ताच्या घटकांत केले जाते? हे रक्तातील घटक आपल्या शरीरातील ‘एक कोटी कोटी’ पेशींना अन्नघटकांचा पुरवठा करतात. स्नायूंना आकुंचन - प्रसरणासाठी ऊर्जा पुरवतात. आहारातील स्निग्ध पदार्थांचे रूपांतर

मेदाम्ले आणि ग्लिसरॉलमध्ये करतात. प्रथिनांतील अमायनो-आम्ले सुटी (मोकळी) करता. आहारातील कर्बोदकांचे रूपांतर ग्लुकोज या शर्करेच्या रेणूत करतात. मेदाम्ले, ग्लिसरॉल, अमायनो आम्ले आणि ग्लुकोज या स्वरूपात अन्न शोषले जाते. आहारातील सेल्यूलोज वजा करता बाकी सर्व अन्नाचे विघटन लहान आतड्यात होते, याला पचन म्हणतात. आपण शौच्यावाटे जो मल बाहेर विसर्जित करतो त्यातला अर्धा मृत जीवाणूंनी बनतो आणि बाकीच्यातील बराच भाग आतड्यांतून स्रवलेल्या पदार्थाचा असतो. राहिलेला भाग अन्नातील शोषला न जाणारा निर्माल्याचा असतो. आतड्याच्या सुरवातीच्या पंचवीस सेंटिमीटरला ड्युओडिनल म्हणतात. लॅटिन शब्द ड्युओडेनि याचा अथा ‘बारा’ आहे. ड्युओडिनम्‌ हे नाव देण्याचे कारण या भागाची लांबी शेजारी-शेजारी ठेवलेल्या बारा बोटांच्या जाडी एवढी असते. त्या नंतरच्या अडीच मीटर्स भागाला जजुनम म्हणतात. लॅटिन शब्द जेजीनम म्हणजे ‘रिकामे’. हा भाग अन्नाने भरलेल्या जठर व ड्युओडिअम  नंतर येतो, तो सामान्यतः रिकामा असतो. याचा व्यास साधारण चार सेंटिमीटर असतो. त्यानंतर किंचित लहान व्यासाचा चार मीटर लांबीचा इलियम नावाचा लहान आतड्याचा शेवटचा भाग येतो. सगळ्यात शेवटी दोन मीटर लांबीचे मोठे आतडे असते. जठरातील हायड्रोक्‍लोरिक ॲसिडमुळे आतड्याचा वरचा भाग बहुतांशी निर्जंतुक असतो. परंतु खालच्या भागात कोटी-कोटी पन्नास प्रकारचे जीवाणू असतात.

अन्नाचे पचन मुखाच्या पोकळीत आणि जठरांतच सुरू होते. दातांमुळे अन्नाचे पीठ होते आणि जठरात ते घुसळले जाते. तेथून ते लहान आतड्यात खिरीसारख्या पातळसर पदार्थाच्या रूपात एका झडपेतून प्रवेश करते. आपण एकदम पाणी प्यायलो तर ते दहा मिनिटांत शरीरात जाते, पण भाकरी-भाज्या, मांसाहार यातले अन्नघटक शरीरात जाण्याकरिता साडेतीन-चार तास लागतात. जठरातील पाचक रसात खूप आम्ल असते. हे आम्लयुक्त अन्न मोठ्या प्रमाणात लहान आतड्यात शिरले, तर लहान आतड्याच्या अस्तराला इजा होते आणि आतड्यातून स्रावली जाणारी पाचक द्रव्ये अकार्यक्षम होतात. हे आम्ल आपल्या आतड्यात कार्यक्षमतेने हाताळले जाते. ड्युओडिनममधून सीक्रेटिन नावाचा एक रेणू स्रवला जातो. तो आपल्या आतड्याच्या रक्तवाहिन्यात तत्काळ जातो. या सीक्रेटिनमुळे स्वादुपिंडातील अल्कलाइन पाचक रस स्रवला जातो. साधारणपणे एक लिटर एवढा हा स्राव दिवसभरात ड्युओडिनमध्ये जातो. या अल्कलाइन स्रावामुळे ॲसिड नामशेष होते. हे ॲसिड नामशेष न झाल्यास ड्युओडिनमच्या अस्तराला जखमा होतात. स्वादुपिंडातून स्रावलेल्या पाचक रसामुळे प्रथिनांचे अमायनो ॲसिडमध्ये, स्निग्ध पदार्थांचे फॅंटी ॲसिड्‌समध्ये आणि कर्बोदकांचे ग्लुकोजच्या रेणूत विघटन होते. दिवसभरात आपल्या आतड्यात विविध प्रवाही पदार्थ येत असतात. दिवसभरात दोन लिटर लाळ स्रवली जात असते. जठराच्या अस्तरातून तीन लिटर पाचक रस स्रवले जात असतात. यकृताकडून पित्त येत असते. लहान आतड्याच्या अस्तरात असंख्य ग्रंथी असतात. त्यातून दिवसभरात आणखी दोन लिटर पाचक रस आतड्यात स्रवले जातात. लाळेमुळे अन्नाचे घास ओलसर होतात, त्यामुळे गिळण्याची क्रिया सुलभ होते आणि लाळेतील टायलिन विकरामुळे स्टार्चचे पचन होण्यास सुरवात होते. जठरातील स्रावामुळे अन्नाबरोबर येणारे जीवाणू मारले जातात. प्रथिनांचे लांबच्या लांब रेणू जोडले जातात. आणि दूध गोठवले जाते. यकृताकडून येणाऱ्या पित्तरसातील विकरांमुळे मेदाच्या मोठ्या गोळ्याचे रूपांतर लहान लहान थेंबात केले जाते. या सूक्ष्म मेदाच्या थेंबाचे विघटन स्वादुपिंडातून स्रवल्या जाणाऱ्या पाचक रसातील विकारांना करता येते. आतड्यांचे अस्तर एखाद्या मखमली कापडासारखे दिसते. सूक्ष्मदर्शकाचा वापर करून तपासल्यास या अस्तरात खाचखळगे आणि उंचवटे असल्याचे समजते. हे अस्तर इस्त्री केलेल्या कापडासारखे सपाट असते तर शोषण करावयास जेमतेम दोन चौरस मीटर्स इतका पृष्ठभाग मिळाला असता. या उंच-सखल पृष्ठभागांमुळे पचलेल्या अन्नाच्या द्रवरूपी पदार्थाचे शोषण करण्यास पंचवीस चौरस मीटर्स इतका पृष्ठभाग उपलब्ध होतो. आतड्याच्या अस्तरावर बोटांसारखे अतिसूक्ष्म प्रक्षपणे (पुढे आलेले भाग) असतात. त्यांना व्हिलाय (एकवचन ः व्हिलस) म्हणतात. आतड्यातील पचलेले द्रवरूप अन्न या व्हिलाय उचलतात. आणि अधिराभिसरणातर्फे सर्व शरीरभर पोचवतात. प्रथिने आणि कर्बोदके रक्तवाहिन्यांतून रक्ताबरोबर जातात. मेदाम्ले व मेदघटक लसिका वाहिन्यांतून जातात. 

आतड्याच्या संपूर्ण अस्तरात स्नायू असतात. त्यातले काही आतड्याच्या लहान-लहान भागांना झोके देतात. या हालचालींमुळे पाचक रस आणि अन्नघटक एकमेकांच्या अगदी जवळ येतात. अशा हिंदोलयामान हालचाली दर मिनिटाला दहा ते पंधरा वेळा होतात. इतर काही स्नायूंमुळे आतड्यात लाटा निर्माण होतात. या प्रमाणे आतड्यात काही ना काही हालचाली चोवीस तास चालू राहतात. आपण अन्न घेतल्यावर लहान आतड्यात तीन ते आठ तासांत ते पचते. त्यातील शरीराला आवश्‍यक ते अन्नघटक शोषून उरलेल्या पातळ स्वरूपातील मळ हळूहळू पण सतत मोठ्या आतड्यात सोडला जातो. साधारण चोवीस तासांत पंधराशे मिलिलिटर (पातळ) मळ दिवसभरात मोठ्या आतड्यात जातो. यातले पाणी संथ गतीने शोषून अखेर साडेतीनशे ते पाचशे ग्रॅम बांधलेला मळ विसर्जनासाठी तयार केला जातो. लहान आतड्यातील सर्वच्या सर्व प्रवाही द्रव्य बाहेर गेले, तर रोज आठ लिटर द्रव पदार्थांना शरीर मुकेल आणि थोड्याच वेळात आपण एखाद्या कोरड्या इजिप्शयन ममीसारखे होऊ! विसर्जनापूर्वी बहुतेक पाणी मोठ्या आतड्यात शोषले गेलेले असते. ही पाणी शोषण्याची क्रिया बारा ते चोवीस तास इतकी संथपणे चालते. मानसिक तणाव, विविध औषधे, अनेक जीवाणू व विषाणू मळ पुढे ढकलण्याची क्रिया जलद करू शकतात. अशा जलद पुढे जाण्याने पुरेसे पाणी शोषले जात नाही. परिणामी, व्यक्तीला जुलाब होतो. एखाद्या वेळी मानसिक चिंतेमुळे, अयोग्य आहारामुळे हालचाल संथावते. परिणाम अवरोध होतो. जुलाब झाले तर शरीराला अधिक पाणी पुरवणे आवश्‍यक असते. म्हणून सलाईन द्यावे लागते. पोटात गुर्र गुर्र आवाज येतो, तेव्हा आतड्यांतील हवेचे बुडबुडे इकडून तिकडे सरकत असतात. बहुतेक वेळा ही हवा त्या व्यक्तीने गिळलेली असते. शिवाय मोठ्या आतड्यातील विषाणू मळातील रेणूवर परिणाम करतात व मिथेन आणि हायड्रोजन हे वायू तयार होतात. या वायूंचा कोणताही वास अथवा दुर्गंधी नसते. असा वात सरताना आवाज येतो व ओशाळल्यासारखे होते. टेट्रासायक्‍लिन प्रतिजैविकांच्या वापराने या वायूची निर्मिती कमी होते किंवा थांबते. वारंवार वात सरण्यावर सरकण्यास हा प्रभावी उपचार असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com