सूज

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 29 June 2018

वेगवेगळ्या आजारात शरीरावर सूज येते. पेशीबाहेर पाणी साचू लागले की सूज येते. सूज येण्यामागचे कारण शोधणे आवश्‍यक असते.

ज्या  भागावर सूज येते तेथे पेशींमधील जागेत पेशी बाह्य द्रव्य (extra cellular fluid) साचते. या भागावर बोट दाबले की तेथे छोटासा खड्डा पडतो. याचे कारण हे पेशी बाह्य जल एका जागेतून शेजारी सहज सरकते. या सहज होणाऱ्या हालचालीमुळे जेव्हा पेशी बाह्य जल शरीराच्या खालच्या भागात गुरुत्वाकर्षणाने जाते व तेथे साचून राहते. ‘खालच्या भागात’ या शब्दांना निदानाच्या दृष्टिकोनातून विशेष अर्थ नाही. रात्रभर आडवे पडल्यामुळे घोट्याजवळील भागावर सूज कमी होते याचा अर्थ व्याधी सुधारली आहे असा होत नाही. घोट्याजवळच्या भागातून ही सूज पाठीवर अथवा मांड्यांच्या अगर पोटऱ्यांच्या कडांना आलेली आढळेल. बिछान्यात उठून बसून पुढे वाकून बिछान्याच्या वर ठेवलेल्या टेबलावर कोपरे टेकून बराच वेळ बसणाऱ्या रुग्णाच्या कोपरा सभोवती सुजीचे वर्तुळ उमटलेले आढळू शकते. सर्व अंगावर सूज येते तेव्हा पेशी बाह्य जलात खूपच वाढ झालेली असते. 

सर्व अंगावर सूज येण्याचे कारण पेशी बाह्य द्रव्यात बरीच वाढ झालेली असते. मूत्रपिंडातील ‘ट्युन्युलस्‌’ या भागातून पाणी आणि सोडियम क्षार वाजवीपेक्षा जास्त शोषले जाण्याने असे घडते. ही क्रिया बरीच गुंतागुंतीची असते. अनेक घटकांपैकी ‘रेनिन अँजिओटेन्सिन ॲल्डोस्टेरॉन’ हे रेणू महत्त्वाचे कार्य करतात. केशवाहिन्यांच्या आतल्या पोकळीत असणारा रक्ताचा (बहुतांशी पाण्याचा) दाब आणि रक्तातील प्रथिनांचा ऑस्मॉटिक दाब एकमेकाविरुद्ध कार्य करीत असतो. जर केशवाहिन्यांच्या आत पाण्याचा दाब वाढला किंवा ऑस्मॉटिक प्रेशर कमी झाले तर अधिकाधिक पेशी बाह्य जल संपू लागते. केशवाहिन्यांच्या आतला रक्ताचा दाब वाढण्याचे प्रमुख कारण रक्ताच्या हृदयाकडे वाहण्याला अडथळा येणे हे होय. ऑस्मॉटिक दाब कमी होण्याचे प्रमुख कारण रक्तातील आल्बुझिन प्रथिनांचे प्रमाण कमी होणे हे होय. सामान्यपणे प्रौढ व्यक्तीच्या शरीरात पाच लिटर पेशी बाह्य जल जादा साचले तर सूज येऊ शकते. केशवाहिन्यातून किती सहजतेने पाणी पेशी बाह्य जलाकडे जाते हादेखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. हा मुद्दा एकाच ठिकाणी आलेल्या सुजेच्या बाबतीत दखलपात्र ठरतो. लसिका द्रव्याच्या वाहनातील अडथळ्यामुळेदेखील शरीरातील विशिष्ट भागावर सूज येते. बहुतेक वेळा अशा जागी दाब दिल्यास खड्डा पडलेला आढळून येत नाही. संपूर्ण शरीरात सूज येते तेव्हा बऱ्याच वेळा आतड्यावरीलआभ्रयात, फुफ्फुसावरील आभ्रयात व हृदयावरील आभ्रयात देखील पाणी साचते. 

गुरुत्वाकर्षणाचा पाणी साचणाऱ्या जागेवर मोठाच परिणाम होऊ शकतो. निरामय प्रकृती असणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा दीर्घकाळ बसून राहण्याने घोट्याजवळ थोडी फार सूज येऊ शकते. अशी घटना दीर्घकाळ विमानाने प्रवास करणाऱ्या व्यक्तीमध्ये आढळते. असा प्रकार लसिका द्रव्याच्या हालचालीत आलेल्या अटकावामुळे होत असावी. कारण लसिका द्रव्याची हालचाल जवळच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणाने होत असते. त्याच प्रमाणे नव्वद टक्के गर्भवती मातांच्या पायावर थोडी फार सूज राहते. हृदयविकारात, मूत्रपिंडांच्या विकारात किंवा यकृताच्या अकार्यक्षमतेत सूज येणे हे एक प्रमुख लक्षण आहे. 

हृदय विकारात गुरुत्वाकर्षणामुळे पावलांवर सूज येते. पडून राहणाऱ्या रुग्णाच्या कमरेच्या खालच्या भागावर अशी सूज साचते. हृदयाचे कार्य सक्षम नसणे अशा आजारातदेखील शरीराच्या खालच्या भागावर सूज येते. (सहसा घोट्यावर आणि पडून राहणाऱ्या रुग्णाच्या कमरेवर) मूत्रपिंडांना रक्ताचा पुरवठा कमी होतो व मूत्रपिंडांनाच ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन कमी झाल्याने आणि मूत्रपिंडातील ट्युब्युलमधून पाणी आणि सोडियम क्षार अधिकाधिक शोषला जाण्याने महत्त्वाचा परिणाम होतो. फुफ्फुसातील विकारामुळे झालेल्या ‘ॲसिडोसिस’मुळे पेशींच्या आतील द्रव्य पेशींच्या बाहेर जाते व सूज वाढते. अनेकदा दोन्ही पायांवर सूज सारखीच असते. परंतु काही रुग्णात डाव्या पावलावर उजव्या पावलापेक्षा जास्त सूज येते. याचे कारण डाव्या बाजूच्या नीलेवर उजव्या बाजूने जाणाऱ्या  धमनीचा दाब येतो. असे हृदयाच्या कार्यक्षमतेत कमी पडणे हे कारण जीवनसत्त्व  ‘बी वन’च्या कमतरतेमुळे झालेल्या ब्री- बेरी या आजारांत आणि मोठ्या प्रमाणात झालेला रक्तक्षयात (ॲनिमियात) होते. 

मूत्रपिंडांच्या आजारात स्ट्रेप्टोकॉकस या जीवाणूने झालेल्या ॲक्‍युट ग्लोमेरुलोनेफ्रायरिस या आजारात सर्व अंगावर सूज येते. नेफ्रॉटिक  सिंड्रोम या आजारात लघवीतून प्रथिनांचा निचरा मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी रक्तातील आल्ब्युमिनचे प्रमाण घटते. रक्तातील आल्ब्युमिनचे प्रमाण कमी झाल्याने सूक्ष्म रक्तवाहिनांच्या आत ऑस्मॉटिक प्रेशर उतरते व पाणी रक्तवाहिनांच्या बाहेर जाते. लघवीत २४ तासांत तीन ग्रॅम्स किंवा जास्त प्रोटिन्स जाऊ लागले अथवा  आल्ब्युमिन तीन ग्रॅमपेक्षा कमी झाले तर अशी स्थिती उद्‌भवते. सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून बरेच पाणी बाहेर पडल्याने रेनिन अँजिओटेन्सिन ॲल्डोस्टेरॉन ही संप्रेरके (हॉर्मोन्स) स्त्रवली जातात. या संप्रेरकामुळे पाणी आणि सोडियम क्षार शरीरात साचतो, सूज येते. लहान मुलात चेहऱ्यावर आणि पायांवर, तसेच बाह्य जननेंद्रियावर सूज येते. मूत्रपिंडाच्या आजाराने आलेली सूज आपोआपच नाहीशी होणे हे आजारात सुधारणा झाल्याचेच लक्षण असेल असे नाही. मूत्रपिंडातील दोष वाढल्याने ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी झाल्याने सुद्धा सूज जाऊ शकते. 

यकृताच्या आजारात आल्ब्युमिन हे प्रथिन बांधण्याची क्रिया संथावते. रक्तात तीन ग्रॅम्स प्रति शंभर मिलिलिटर्सपेक्षा कमी झाल्यास पावलांवर सूज दिसू लागते. यकृताच्या आजारात मूत्रपिंडांचा देखील आजार होऊ शकतो. मूत्रपिंडात नेफ्रॉरिक सिंड्रोमसारखे बदल होतात. लिव्हर सिऱ्होसिस आणि क्रॉनिक ॲक्‍टिव्ह हिपॅटायटिस या आजारात पायावर सूज आणि पोटात पाणी होण्याचा संभव मोठा असतो. 

प्रोटिन लुझिंग एंटरॉपथी या आजारात आतड्यातून मलाबरोबर प्रोटिन्सचा विसर्ग होत राहतो. परिणामी रक्तातील आल्बुमिनचे प्रमाण घटते, पायावर सूज येते. पोटात व छातीत पाणी साचू लागते. आतड्याच्या विविध प्रकारच्या आजारात असे आढळू शकते. 

सर्व अंगावर सूज येण्याचे एक नेहमी आढळणारे कारण म्हणजे आहारातील तृटी हे होय. विशेषतः आहारात प्रथिनांची कमतरता असणे हे कारण होय. क्वाशियारकॉर या विकारात लहान मुलाच्या आहारात प्रथिने कमी, पण कर्बोदके जास्त अशी स्थिती होते. अशा आजाराचे मूळ अनेकदा दारिद्य्रात असू शकते. ज्या भागात युद्ध चालू असते तेथेदेखील संतुलित आहाराचे महत्त्व पटले तरी तसा योग्य प्रथिनयुक्त आहार अव्यवहार्य ठरतो. सतत उलट्या येणे (उदाहरणार्थ हायटस हर्निया), सारखे जुलाब होणे, मूत्र मार्गाचा संसर्ग, क्षयरोग, पोटात जंत असणे, सतत अपचन होणे इत्यादी कारणांनी अयोग्य व अपुरा आहार ही वस्तुस्थिती होते. काही वेळा भ्रामक कल्पना संतुलित आहाराच्या आड येतात. मुलांच्या केसांचा रंग लालसर होतो. शुद्ध शाकाहाराचा आग्रहदेखील प्रथिनांचा अभाव करतो. काही स्त्रिया वजन कमी करण्याकरता लघवी होण्याची औषधे घेत राहतात. त्यांना चेहरा, हात, उरोज, मांड्या, पृष्ठभाग, पोटावर सूज येते. उंच डोंगरावर गेल्यावर काहींच्या चेहऱ्यावर, हातावर आणि घोट्यांवर सूज येते. काही मधुमेही रुग्णांना इन्सुलिन देण्यास सुरवात करताना एखादा आठवडा तात्पुरती सूज येणे शक्‍य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: h v sardesai article Swelling