esakal | #FamilyDoctor रक्तदाब मोजावा!
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor रक्तदाब मोजावा!

रक्तदाब कसा मोजावा? त्याची एक विशिष्ट पद्धत असते. रक्तदाब मोजतानाही मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. ती किरकोळ गोष्ट नाही. सवयीने रक्तदाब मोजताना काही गोष्टींकडे दर वेळेस लक्ष जाईलच असे नाही.

#FamilyDoctor रक्तदाब मोजावा!

sakal_logo
By
डॉ. ह. वि. सरदेसाई

प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक वेळी रक्तदाब मोजणे अपेक्षित असते. रक्तदाब मोजताना काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. या गोष्टींकडे दर वेळेस लक्ष जातेच याची खात्री देता येत नाही. पुढील मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे.

प्रथम रुग्णाच्या उजव्या आंगठ्याच्या मुळाशी असणाऱ्या रेडियल धमनीची स्पंदने चाचपडून (पालपेटरी मेथड) रक्तदाब मोजणे. नंतर, या पद्धतीने सापडलेल्या (सिस्टॉलिक) रक्तदाबापेक्षा किमान तीस मिलिमीटर्स मर्क्‍युरी जास्त कफमधून दाब वाढवणे. नंतर प्रेशर कमी करावयास लागावे. कमी करण्याची गती दर सेकंदाला दोन ते तीन मिलिमीटर्स मर्क्‍युरी इतक्‍या हळू वेगाने केली पाहिजे. डॉक्‍टरांच्या डोळ्यांची पातळी व मर्क्‍युरीच्या वरच्या टोकाची पातळी सारखीच असणे आवश्‍यक असते. तसे न केल्यास चुकीचा आकडा धरला जातो. फार झपाट्याने मर्क्‍युरीची पातळी उतरवली तर चुकीने जास्त वरचा आकडा येतो. त्याचप्रमाणे, रक्तदाब पुन्हा मोजावयाचा झाला तर मर्क्‍युरी पूर्णपणे उतरवणे आवश्‍यक असते. मर्क्‍युरीची पातळी नेमकी कोठे आहे हे समजण्यात अडचण येते. तेव्हा जवळच्या ‘सम’ आकड्याला धरावे. रुग्णाचा रक्तदाब जास्त आहे, हे रक्तदाब पाहणाऱ्याच्या मनात प्रथमपासूनच असते, तर रुग्णाचा रक्तदगाब जास्त आहेच असे मानण्याचा डॉक्‍टरांचा कल होतो.

रुग्णाचा हात सरळ असावा. त्याकरिता छातीच्या पुढे असणाऱ्या स्टर्नम (पुरस्थी) हाडाच्या मध्यावर हाताला टेकू द्यावा. रुग्ण बसलेला (किंवा उभा) असताना हात सरळ खाली असताना मोजलेल्या रक्तदाबात दहा मिलिमीटर्स मर्क्‍युरीने जास्त मोजले जाते. रक्तदाब मोजताना डायास्टॉलिक प्रेशर कोणत्या आकड्याला मानावे याबद्दल मतभेद असू शकतो. काही आवाज अस्पष्ट होऊ लागतात. तो बिंदू डायास्टॉलिक प्रेशर मानतात. हा बिंदू आवाज पूर्ण थांबतो त्या बिंदूपेक्षा पाच ते दहा मिलिमीटर्स मर्क्‍युरीने जास्त वर असतो. संपूर्ण आवाज थांबतो, तेव्हाची म्हणजे ही फेज पाचची जागा अधिक योग्य मानली जाते. शिवाय दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी रक्तदाब मोजला तर दोघांच्या तपासण्यांत फरक पडण्याची शक्‍यता कमी, यामुळे हा बिंदू स्वीकारणे इष्ट मानले जाऊ लागले आहे.

ब्लड प्रेशर मोजण्याकरता वापरण्यात येणाऱ्या आयुधाला स्पिग्मोमॅनोमीटर म्हणतात. ॲनेटॉईड स्पिग्मोमॅनोमीटर्सचे तपासणी (मर्क्‍युरी नसणारी आयुधे) हळूहळू कालांतराने योग्य रीडिंग्स दाखवत नाहीत. याकरिता ही स्प्रिंगक्‍ट चालणारी (ॲनेरॉईड) यंत्रे आधूनमधून कंपनीत नेऊन योग्य करून घ्यावी लागतात. पारा असणारी आयुधे वापरताना संपूर्ण दाब सोडल्यावर, ‘शून्य’ (०) दाखवत नसल्यास चुकीचे रिडिंग येते. रक्तदाब मोजताना पाण्याची नळी बरोबर उभी असलीच पाहिजे. ती तशी उभी नसली तर रक्तदाब जास्त असल्याचे रिडिंग येईल. हाताभोवती पट्टा गुंडाळतात त्यांत एक रबराची पिशवी असते. ती पुरेशा लांबीची असल्यास (आखूड असल्यास) रक्तदाब वास्तविक असेल त्यापेक्षा जास्त असल्याचे दिसेल. कारण दंडामधील रोहिणीवर पूर्णपणे दाब दिला जात नाही. दंडाच्या परिघाच्या किमान ऐंशी टक्के भागावर ही पिशवी आली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तींना पस्तीस सेंटिमीटर लांबीची रबराची बॅग योग्य असते. ज्यांचे दंड आकाराने मोठे असतात. (मोठे स्नायू अगर मेद-वृद्धी) त्यांना बेचाळीस सेंटिमीटर लांबीची बॅग वापरणे योग्य असते. रबरी बॅगची रुंदी कमी असल्यासदेखील ब्लड प्रेशर जास्त असल्याचे रिडिंग येते. दंडाच्या परिघाच्या चाळीस टक्के रबराच्या बॅगची रुंदी असावी.

रक्‍तदाब मोजण्याच्या वेळी रुग्ण चिंतातूर असला, नुकताच धावपळ किंवा व्यायाम करून आलेला असला, सिगारेट ओढल्यानंतर लगेच दाब मोजला, हवेत गारठा जाणवत असला किंवा रुग्णास कोठेही वेदना होत असली, तर रक्तदाब वाढलेला असतो. डॉक्‍टरांनी मोजलेले पहिले रीडिंग नंतरच्या रीडिंगच्या तुलनेने जास्त असते. दुसऱ्या वेळेला घेतलेले रिडिंग अनेकदा बरेच कमी असू शकते. जर पहिले रीडिंग जास्त वाटले तर तपासणीच्या शेवटी परत एकदा पाहावे. रक्तदाब पाहण्यापूर्वी आता आपण काय करणार आहोत हे रुग्णाला समजावून सांगितले तर ही चूक टळते. रुग्णाला आराम वाटेल अशी परिस्थिती असावी आणि रुग्ण तपासण्यासाठी बिछान्यावर पडल्यावर दोन ते तीन मिनिटांनंतर रक्तदाब मोजावा. रुग्णाचा रक्तदाब जास्त आहे हे एका तपासणीवरून ठरविणे अयोग्य असते. किमान तीन किंवा जास्त वेळा तपासण्याखेरीज रक्तदाब जास्त आहे, असा निर्णय  घेणे अप्रस्तुत आहे. या नियमाला अपवाद असतात. डोळ्यांतील नेत्रपटलात गंभीर बदल झाले असले, हृदयाचा (विशेष डाव्या व्हेंट्रिकलचा) आकार वाढला असला, मूत्रपिंडाचे कार्य बिघडले असले तर पहिले रीडिंगदेखील महत्त्वाचे ठरते. काही व्यक्ती आता आपला रक्तदाब मोजणार आहेत. या कल्पनेनेच इतके हादरतात, की त्यांचा या कल्पनेनेच रक्तदाब वाढतो. अमेरिकेत आणि अनेक ठिकाणी (भारतात रुग्णालयात) रुग्णाला तपासताना डॉक्‍टर थोडा मोठा पांढरा कोट घालतात. त्यावरून अशा वाढणाऱ्या रक्तदाबाला ‘पांढऱ्या कोटाने वाढलेला रक्तदाब’ असे म्हणतात. अशा रुग्णात डोळ्यांत, कार्डिओग्रॅम अथवा एको-कार्डिग्रॅममध्ये कोणताही दोष आढळत नाही. असे रुग्ण वैद्यकीय परीक्षेच्या वेळी ताण-तणावात असतात. अशा रुग्णांचा दाब इलेक्‍ट्रॉनिक डिजिटल मशिनवर त्यांच्या घरी मोजावयास सांगणे इष्ट ठरते.

रुग्णाचा दाब पहिल्या प्रथम मोजण्याच्या वेळी दोन्ही हातांवर मोजावा. दोन्ही हातांतील रक्तदान अगदी सारखा नसतो. सामान्यपणे डाव्या हातात उजव्या हातापेक्षा रक्तदाब दहा ते पंधरा मिलिमीटर्स जास्त असतो. यापेक्षा जास्त फरक आढळल्यास त्याचे कारण शोधणे जरूर पडते. काही आजारात पायांतदेखील रक्तदाब मोजलो जातो. त्यासाठी रुग्णाला त्याच्या पोटावर पडावे (पालथे) लागते. अशी तपासणी करण्याची डॉक्‍टरांना चांगली माहिती व अनुभव असणे इष्ट असते. दंडाला जी रबराची पिशवी बांधतात, तिची लांबी मांडीच्या परीघाला कमी पडते. या कफ्‌भोवती बॅंडेज बांधावे लागते. रक्तदाब कमी करण्याची औषधे रुग्ण देत असेल, तर ती औषधे घेण्यापूर्वी रक्तदाब मोजणे इष्ट असते. जागतिक आरोग्य संघटनेने रक्तदाबासंबंधी पुढील मार्गदर्शन केलेले आहे. सर्वसाधारण १४०/९० किंवा कमी. रक्तदाब वाढलेला आहे ः १६०/९५ किंवा जास्त, काठावर ‘१४०-१५९/९०-९४. काहींचे केवळ सिस्टॉलिक किंवा केवळ डायास्टॉलिक ब्लडप्रेशर वाढलेले सापडते. याप्रमाणे एकाच प्रकारचा रक्तदाब वाढलेला आढळला तरी रुधिराभिसरण किंवा हृदय यावर अपाय होणे संभवते. त्यामुळे उपाय करावा व कोणती औषधे वापरावीत, हे इतर धोकादायक घटक आहेत किंवा असे यावर ठरवावे लागते.