आनंद स्वतःवर हसण्याचा!

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 3 May 2019

चेहरा हसरा असणे, आनंदात राहणे खूप महत्त्वाचे आहे. ज्ञान देणाऱ्याचे जेवढे महत्त्व वाटत नाही, तेवढे महत्त्व हसविणाऱ्याचे वाटते; परंतु जीवनात ज्ञानाचा खूप फायदा असतो. जीवनात हसणे हे ज्ञानातून व चिंतनातूनच आलेले असावे. सर्वांत चांगले हसणे म्हणजे स्वतःवर हसणे. कारणाशिवाय हसणे, व्यायामाच्या नावावर खोटे खोटे जोरजोराने हसणे हे सर्व ठीक असले तरी हसण्याचा खरा फायदा स्वतःवर हसण्यानेच मिळू शकतो.

प्रत्येकाला जीवनात करमणूक हवी असते. हसण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सर्व प्रकारेच मानसिक ताण, दुःख हसण्याने कमी होतातच, तसेच हसण्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची तयारी होते. त्यामुळे लोकांची करमणूक करणाऱ्यांना जनमानसात सर्वाधिक लोकमान्यता मिळते, त्यांना भरपूर पैसेही मिळतात. सध्या ‘स्टॅंड अप कॉमेडी’ म्हणजे उभे राहून लोकांना काही गोष्टी सांगून हसविणे हा प्रकार लोकप्रिय होत आहे. यात काही लोकांनी आणलेला अश्‍लील भाग सोडला तरी चांगल्या विनोदाने हसविणारेही अनेक आहेत. यासाठी बरेच वेळा शारीरिक व्यंग किंवा शरीराची विशिष्ट ठेवण यांचीही मदत घेतलेली दिसते. एखादा चकणा मनुष्य आपल्यासमोर विशिष्ट पद्धतीने अभिनय करतो, किंवा संवादाची फेक करतो त्यामुळेही लोकांची निखळ करमणूक होते. 

एक गोष्ट खरी, की जीवनात हसणे मोलाचे आहे. वर्षातील केवळ एक दिवस जागतिक हास्य दिन म्हणून साजरा न करता वर्षामागून वर्षे हसण्याने आनंदात जावीत. ‘आमच्या येथे २४ गुणिले ७ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस अमुक तमुक मिळेल’ असे म्हटले जाते, तसे २४ गुणिले ७ गुणिले ३६५ हसत राहणे महत्त्वाचे आहे. चेहरा हसरा असणे, आनंदात राहणे खूप महत्त्वाचे आहे. ज्ञान देणाऱ्याचे जेवढे महत्त्व वाटत नाही, तेवढे महत्त्व हसविणाऱ्याचे वाटते; परंतु जीवनात ज्ञानाचा खूप फायदा असतो. जीवनात हसणे हे ज्ञानातून व चिंतनातूनच आलेले असावे.

सर्वांत चांगले हसणे म्हणजे स्वतःवर हसणे. कारणाशिवाय हसणे, व्यायामाच्या नावावर खोटे खोटे जोरजोराने हसणे हे सर्व ठीक असले तरी हसण्याचा खरा फायदा स्वतःवर हसण्यानेच मिळू शकतो. 

नुकत्याच निवडणुका झाल्या. यावर्षी निवडणुकीत हसविण्याचे प्रसंग निवडणुकीचा प्रत्येक उमेदवार सादर करत होता. निवडणुकांदरम्यान कोण कधी काय बोलेल, याला सुमार नसतो; परंतु जनतेने हे सर्व बोलणे हसण्यावारीच नेलेले असते. आपण ज्याला मत देतो तो उमेदवार निवडून आला वा न आला तरी आपल्याला आपले जीवन आनंदात व हसतच जगावे लागते. 

हसण्याने स्नायूंचे चलनवलन, श्वासोच्छ्वास आणि प्राणाची उत्तम गती आणि शरीरातील संप्रेरकांचे फायदेशीर संस्रवन होते. अगदीच दिवसभर हसत-खिदळत बसले नाही तरी काही ना काही कारणाने अधून मधून हसत राहावे हे बरे! हसण्याने शरीराचे, मनाचे व आत्म्याचे आरोग्य चांगले राहते हे निश्‍चित. हसताना पोटात कळा येतील, डोळ्यात पाणी येईल आणि फळीवरच्या दोन-तीन वस्तू थरथरून खाली पडतील असे राक्षसी गडगडाटासहित दोन-चार मजली हास्य असायलाच पाहिजे असे नाही; पण अर्थात नुसती किंचित ओष्ठरेखा लांब झाली किंवा त्याचबरोबर थोडासा उच्छ्वास बाहेर पडल्याचा आवाज आला असे हसणेही बरे नव्हे. अशा हसण्याचा हसणाऱ्याला किंवा समोरच्याला कोणालाच उपयोग होत नाही. आचार्य अत्रे किंवा  पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले किंवा केलेले विनोद पुन्हा पुन्हा आठवून हसता येते. तसेच लॉरेल हार्डी, चार्ली चॅप्लिन, जॉनी वॉकर व दादा कोंडके यांची नावे केवळ हास्य कलाकार म्हणून प्रसिद्ध न होता समाजातील मानसिक ताण कमी करणारे म्हणूनच जास्त महत्त्वाचे ठरतील. कुठल्याच गोष्टीला थोडा विनोद हवाच. अर्थात फार खालच्या पातळीवरचा विनोद बऱ्याच वेळा हसावे की रडावे, अशा संभ्रमात टाकतो. रस्त्यावर केळीची साल टाकून कुणी पडल्यावर हसता येईल म्हणून खिडकीत बसून वाट पाहण्यासारखा हा प्रकार असावा. शेवटी हे नक्की की साध्या साध्या गोष्टींवर किंवा रोजच्या जीवनावर हसण्याएवढी ताकद नाही, विनोद करण्याएवढा आवाका नाही आणि मग दुसऱ्याला फसवून त्यावर हसावे एवढेच शिल्लक राहते. काही माणसे हसत-खेळत म्हणजेच प्रत्येक गोष्ट सोप्या पद्धतीने करून इतरांना बरोबर घेऊन कामाचा आनंद मिळवतात. त्यातही हसवणारी माणसे आजूबाजूला नसली किंवा आपल्याला हसायची संधी मिळाली नाही की अन्नही पचत नाही व शांत झोपही लागत नाही; पण निखळ हसण्यासाठी आणि त्या हसण्याचा मेंदूला निळ्याशार आकाशातील चकाकणाऱ्या चांदण्यांचा अनुभव व शक्‍ती मिळवून देण्यासाठी आपण स्वतःचा मान-अपमान किंवा बऱ्याच वेळा विनोदातून दाखवलेली आपल्या स्वभावाची किंवा चुकीची घटना हसत स्वीकारता आली पाहिजे. थोडक्‍यात काय तर, आपल्याला स्वतःवरच आणि स्वतः फसले तरी हसता आले पाहिजे. स्वतः फसल्यानंतर किंवा बंद दाराच्या स्वच्छ काचेतून जाण्याचा प्रयत्न करताना डोके आपटून कपाळावर टेंगूळ आल्यावर स्वतःच्याच बेसावधपणावर आणि इतकी चांगली काच बनवून कसे फसवले? हे म्हणणाऱ्या त्या कारखानदारावर स्वतःच खळखळून हसण्यासाठी धाडस व भाग्य दोन्हीही लागते. फसल्यानंतर आपण जर स्वतःवर हसण्यास शिकलो तर आपले बहुतेक मानसिक ताण व त्यातून येणारे सर्व रोग कमी होऊन जातील.

माणसाजवळ शक्‍तीचा एक थेंबही उरला नाही की दुःख होऊ लागते व डोळ्यांतून पाण्याचे थेंब वाहू लागतात. रडण्यासाठी शक्‍ती लागत नाही म्हणजे शक्‍ती नसली की रडू येते; पण हसण्यासाठी खूप शक्‍ती लागते. शारीरिक व मानसिक व आत्मिक शक्‍ती भरपूर मिळवत राहिले की कुठल्याही कारणाशिवाय शून्यात पाहूनही हसता येते म्हणजे वेडाने नव्हे बरं का, तर आनंदातिशयाने, लहान निष्पाप मुले जशी पाळण्यात एकटीच हसत असतात तसे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happiness to laugh