आरोग्य आणि परिचारक

family doctor
family doctor

जागतिक परिचारक दिनानिमित्त विशेष लेख 

आरोग्यसेवेचा विचार करायचा तर त्यात औषधे, दवाखाने, रुग्णालये, सर्वांत महत्त्वाचे योगदान असणारे डॉक्‍टर यांचा समावेश होईल. परंतु रुग्ण आणि या सर्व गोष्टींमधला दुवा असतो तो म्हणजे परिचारक. उपचारांची योजना करणारे डॉक्‍टर असले तरी ती योजना यशस्वी करण्यामागे परिचारकाची भूमिका मोलाची असते. म्हणूनच आयुर्वेदात उपचारांचे चार आधारस्तंभ समजावले, त्यात "कुशल परिचारक' समाविष्ट केलेला आहे. 
भिषक्‌ द्रव्याण्युपस्थाता रोगी पादचतुष्टयम्‌ ।...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 

वैद्य, औषध, परिचारक व स्वतः रोगी हे चिकित्सेचे चार आधारस्तंभ होत. 
उपचारज्ञता दाक्ष्यमनुरागश्‍च भर्त्तरि । शौचं चेति चतुष्कोऽयं गुणः परिचरे जने ।।...चरक सूत्रस्थान 
उपचारज्ञता 

जो उपचार करायचा त्याची सविस्तर माहिती परिचारकाला असायला हवी, तसेच हे सर्व उपचार त्याने अनेक वेळा केलेले असावेत. आयुर्वेदामध्ये अभ्यंग, बाष्पस्वेदन, नेत्रबस्ती, कर्णपूरण, शिरोधारा वगैरे अनेक उपचार असतात. हे सर्व उपचार अत्यंत कुशलतेने व सहजतेने करता येतील असा परिचारक हवा. कोणत्या रुग्णासाठी कोणता उपचार करायचा, किती वेळ करायचा, कोणती द्रव्ये वापरायची या सगळ्या गोष्टी जरी वैद्याने ठरवल्या असल्या तरी प्रत्यक्ष उपचार करणाऱ्याला त्याची इत्थंभूत माहिती असणे अपेक्षित असते. 

दक्ष 
परिचारक दक्ष म्हणजे चौफेर लक्ष असणारा असावा. रुग्णावर प्रत्यक्ष काम करणारा परिचारक असल्याने उपचार करताना रुग्णाला त्रास तर होत नाही ना, उपचाराचा हवा तो परिणाम रुग्णावर दिसतो आहे ना याकडे परिचारकाचे बारीक लक्ष असायला हवे. बऱ्याचदा रुग्णाला स्वतःला स्वतःमध्ये होणारे चांगले-वाईट बदल जाणवत नाहीत किंवा तो सांगतोच असे नाही. असे बदल वैद्याला समजायला हवेत तसेच परिचारकालाही लक्षात यायला हवेत. एकंदर रुग्णाला त्रास होऊ नये व करावयाचा उपचार व्यवस्थित केला जावा यासाठी परिचारकाने दक्ष राहावे, तत्पर असावे. 

परिचारकाच्या अंगी कार्यतत्परता तर हवीच, पण त्या अगोदर नेमके काय करायचे हे कळण्यासाठी बुद्धिमत्ता असायला हवी. म्हणूनच परिचारक बुद्धिमान असायला हवा. अमुक उपचार कधी कसा करायचा हे वैद्याने सांगायचे असते, पण ते यथोक्‍त पद्धतीने करण्याचे काम परिचारकाचे असते. हे सर्व समजण्यासाठी, लक्षात ठेवून करण्यासाठी बुद्धिमत्तेची आवश्‍यकता असते 

अनुरागस्य भर्त्तरि 
या ठिकाणी भर्त्तरि हा शब्द वैद्य तसेच ज्याच्यावर उपचार करायचा ती व्यक्‍ती अशा दोन्ही अर्थांनी घ्यायला हवा, अनुराग म्हणजे प्रेम व आपलेपणा. परिचारकाला वैद्यांप्रती निष्ठा असायला हवी, वैद्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी सर्वतोपरी व योग्य प्रकारे करण्याची इच्छा असायला हवी. तसेच ज्या व्यक्‍तीवर उपचार करायचे त्याच्याविषयी अनुकंपा, आपलेपण असायला हवे. कारण उपचार शंभर टक्के प्रभावी व यशस्वी ठरण्यासाठी शास्त्रीय दृष्टीने जितका अचूक असायला हवा, तितकाच आपुलकीने व या उपचाराने बरे वाटेलच या भावनेने केलेला असावा लागतो. 

परिचारकाला रुग्णाबद्दल प्रेम असायला हवे. परिचारक हा रुग्णाच्या सोबत असतो, त्यामुळे रुग्णाला कधी काय हवे किंवा त्याला कशाने त्रास होईल हे त्याला सर्वांत प्रथम समजू शकते, मात्र यासाठी परिचारकाच्या मनात रुग्णाबद्दल आत्मीयता असायला हवी. रोगातून मुक्‍त होण्यासाठी रुग्णाला मन खंबीर ठेवणेही आवश्‍यक असते. अशा वेळेला औषधांच्या बरोबरीने परिचारकाची सकारात्मकता मोलाची ठरू शकते. रुग्ण व परिचारक यांच्यात जितका मोकळेपणा असेल, तितका रुग्ण स्वतःला होणारा त्रास सहजपणे सांगू शकतो व त्रास दूर होण्यासाठी परिचारक तत्परतेने योग्य पाऊल उचलू शकतो. असे दिसते की रोग बरा होण्यामागे योग्य औषधे व उपचार आवश्‍यक असतातच, पण रुग्ण बरा व्हावा, असा विचार करणारेही गरजेचे असतात. 

शौच 
वैद्याप्रमाणेच परिचारकानेही मनाने तसेच शरीराने शुद्ध व पवित्र असायला हवे. उपचार करण्यासाठी परिचारकाचा रुग्णाशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याने रुग्णाला आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून, तसेच रुग्णापासून स्वतःला संसर्ग होऊ नये म्हणून दोन्हीही बाजूंनी परिचारकाने स्वच्छता, शुद्धता पाळावी. यात नखे कापणे, केस नीट बांधणे, कपडे स्वच्छ धुतलेले असणे, उपचाराच्या अगोदर व नंतर हात स्वच्छ धुणे यांसारख्या गोष्टी तर येतातच, पण सूक्ष्म जीवजंतूंचा नाश व्हावा, दुष्ट शक्‍तींमुळे त्रास न व्हावा म्हणून धूप करणे, सकाळ-संध्याकाळ थोडी प्रार्थना करणे वगैरे उपायांचाही समावेश होऊ शकतो. अशुद्ध, अपवित्र शक्‍ती, अपवित्र विचार रुग्णापर्यंत पोचू नये हाही भाव "शौच' या शब्दामधून व्यक्‍त होतो. विशेषतः गंभीर व्याधी असताना विटाळ, दुष्ट शक्‍ती, अमंगल विचार रुग्णापर्यंत पोचणार नाही याची काळजी घेण्यासही आयुर्वेदात सुचविलेले आहे. परिचारकाने स्वतःच्या आचरणातून याही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. 

असावे गुण धात्रीचे 
आयुर्वेदात धात्री म्हणून एक संकल्पना मांडली आहे. बालकाचा आहार, त्यावर केले जाणारे उपचार, बालकाची एकंदर सर्व तऱ्हेची देखभाल करणारी धात्री कशी असावी, तिचे आचरण, व्यवहार कसा असावा याचे सविस्तर वर्णन ग्रंथात सापडते. धात्रीमध्ये असणारे जे सर्व गुण परिचारकामध्येही असावेत ते असे, 

- परिचारकाला कोणतेही व्यंग नसावे 
- त्याची किंवा तिची स्वतःची प्रकृती उत्तम व धडधाकट असावी 
- परिचारक वयाने फार तरुण वा फार वृद्ध नसावा. याचे कारण फार तरुण वयात परिपक्वता नसू शकते, तर फार वृद्धपणी शारीरिक, बौद्धिक ताकद कमी झालेली असू शकते. 
- परिचारकाला व्यक्‍तिगत चिंता नसावी, इतर कशात व्यग्रता नसावी. 
- त्याला किंवा तिला खाण्या-पिण्याची किंवा कसलीच हाव नसावी. 
- परिचारकाने स्वच्छ, शक्‍यतो शुभ्र कपडे घालावेत. 
- परिचारक वागणुकीने सभ्य व सुशील असावा, विश्वासार्ह असावा. 
- परिचारकाला कोणतेही काम करण्याची किळस नसावी. 
- परिचारक चंचल व अस्थिर मनाचा नसावा. 
- परिचारकाला कसलेही व्यसन नसावे. 
- परिचारक प्रसन्न व प्रेमळ व्यक्तिमत्त्व असावे. 
- परिचारक चित्रविचित्र कपडे घालणारा नसावा. 
- परिचारकाला अतिप्रमाणात झोपण्याची सवय नसावी. 
- परिचारक स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याच्यामध्ये हे सर्व गुण असणे अपेक्षित असतात. 

आरोग्य हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. यात वैद्याचा जेवढा सहभाग असतो तेवढेच परिचारकाचेही योगदान असते. परिचारक हा जणू वैद्याचा उजवा हात असतो की जो रुग्णावर प्रत्यक्ष काम करत असतो आणि म्हणूनच शास्त्राचे ज्ञान असणे, दक्षता, शुचिता हे गुण वैद्यात व परिचारकात सारखेच सांगितलेले आहेत. मात्र याखेरीज वैद्याप्रती निष्ठा असणे हा चौथा गुण परिचारकासाठी विशेष आहे व खूप महत्त्वाचाही आहे. रुग्णावर प्रत्यक्ष काम करण्याचे स्वातंत्र्य परिचारकाला असले तरी त्याने याचा गैरफायदा घेता कामा नये. वैद्याला ज्या प्रकारचा, जसा उपचार अपेक्षित आहे, तसाच उपचार परिचारकाकडून केला जायला हवा. 

आयुर्वेदामध्ये पंचकर्म चिकित्सा करत असताना पंचकर्म विशेषज्ञाची म्हणजे जो अभ्यंगादी उपचार करू शकेल अशा परिचारकाची आवश्‍यकता असते. पंचकर्म करताना नुसते अंगाला तेल लावणे किंवा केवळ पाहून पाहून अभ्यंगादी उपचार करणे योग्य नाही तर त्यासाठी व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण केलेला, शरीरशास्त्राची माहिती असणारा असा परिचारक असावा लागतो. 
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com