आरोग्याचा निर्देशांक : रक्तदाब 

डॉ. विनायक हिंगणे 
Friday, 20 December 2019

शेअरच्या निर्देशांकाकडे जर दुर्लक्ष केले तर जसा तोटा होऊ शकतो, तसेच आरोग्याच्या निर्देशांकाकडे दुर्लक्ष केले तर आरोग्याला धोका होऊ शकतो. रक्तदाब हा असाच आरोग्याचा एक निर्देशांक आहे. रक्तदाब जास्त असणे काळजीचे असतेच; पण अचानक रक्तदाब कमी होणे, हेही चिंतेचे असते. मात्र, काही जणांमध्ये नैसर्गिकरीत्याच रक्तदाब कमी असू शकतो, हेही विसरता कामा नये. 

शेअरच्या निर्देशांकाकडे जर दुर्लक्ष केले तर जसा तोटा होऊ शकतो, तसेच आरोग्याच्या निर्देशांकाकडे दुर्लक्ष केले तर आरोग्याला धोका होऊ शकतो. रक्तदाब हा असाच आरोग्याचा एक निर्देशांक आहे. रक्तदाब जास्त असणे काळजीचे असतेच; पण अचानक रक्तदाब कमी होणे, हेही चिंतेचे असते. मात्र, काही जणांमध्ये नैसर्गिकरीत्याच रक्तदाब कमी असू शकतो, हेही विसरता कामा नये. 

उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हे शब्द आज जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे झाले आहेत. अगदी नेहमीच्या संवादातही ‘अहो, कशाला स्वतःचा बीपी वाढवून घेता? शांत व्हा,’ असे आपल्याला ऐकायला मिळते. पण, ‘रक्तदाब म्हणजे नेमके काय?’ आणि ‘रक्तदाबाचा आरोग्याशी काय संबंध असतो?’ याविषयी बऱ्याच जणांना फारशी माहिती नसते. रक्तदाबाविषयी बरेच गैरसमज रूढ आहेत. ‘रक्तदाब’ ही संकल्पना आपण समजून घेतली, तर आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी खूप मदत होऊ शकते. 

शेअर बाजारात तज्ज्ञ असलेला माझा एक मित्र मला शेअर बाजाराविषयी माहिती सांगत होता. कुठल्याही कंपनीचे शेअर घेण्याआधी आपल्याला त्या कंपनीच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागते. कंपनीचा आलेख कसा चढतो आणि कसा उतरतो यातून आपल्याला अंदाज येतो. मार्केटवरसुद्धा थोडे लक्ष ठेवावे लागते. आपण गाफील राहिलो, तर मोठा तोटा होऊ शकतो. माझ्या या मित्राने सतर्क राहून शेअर्समध्ये बऱ्यापैकी नफा कमावला होता. पण, दुर्दैवाची गोष्ट अशी की तो नेमका आरोग्याच्या बाबतीत गाफील राहिला. एक दिवस अचानक तो अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आल्यामुळे रुग्णालयात भरती झाला. त्याचा रक्तदाब खूप वाढला होता. हृदयाचा आलेख आणि इको यामध्येसुद्धा बऱ्याच दिवसांपासून रक्तदाब वाढलेला असल्याची चिन्हे दिसत होती. रक्तदाब खूप काळासाठी वाढलेला असल्यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवरसुद्धा परिणाम झाला होता. आरोग्याचा महत्त्वाचा निर्देशांक असलेल्या रक्तदाबाकडे त्याचे दुर्लक्ष झाले होते. त्याने कधीही आपला रक्तदाब मोजून बघितला नव्हता. माझ्या मित्राने रक्तदाब नियमित मोजला असता तर वरीलपैकी बरेचशे त्रास टाळता आले असते. शेअरच्या निर्देशांकाकडे जर दुर्लक्ष केले तर जसा तोटा होऊ शकतो, तसेच आरोग्याच्या निर्देशांकाकडे दुर्लक्ष केले तर आरोग्याला धोका होऊ शकतो. रक्तदाब हा असाच आरोग्याचा एक निर्देशांक आहे. आज आपल्या समाजासमोर जीवनशैलीशी निगडित आजारांचा मोठा धोका आहे. हे आजार कुठलेही लक्षण न दाखवता सुरू होतात. म्हणजेच आपल्याला काहीही त्रास न होता, काहीही न दुखता हे आजार सुरू होतात. लक्षणे दिसायला लागली, की बऱ्याचदा गंभीर त्रास झालेला असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांचे आजार, हे असे आजार आहेत की सुरुवातीच्या काळात आपल्याला त्याची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्रास असो किंवा नसो, रक्तशर्करा (म्हणजेच ब्लड शुगर) आणि रक्तदाब (म्हणजेच ब्लड प्रेशर) हे नियमित तपासून बघणे खूप महत्त्वाचे ठरते. 

शेअर घेतल्यावरसुद्धा जसे आपण मार्केट आणि कंपनीच्या निर्देशांकाकडे लक्ष ठेवतो तसेच ब्लड प्रेशरवर नियमित लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे आहे. 

रक्तदाब म्हणजे काय? 
आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. आपले हृदय पंपासारखे काम करून या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पाठवत असते. हृदयामधून हे रक्त धमन्यांमध्ये म्हणजेच ‘आर्ट्री’मध्ये जाते. धमनीमधून हे रक्त वेगवेगळ्या अवयवांपर्यंत जाते. या अवयवांमध्ये ‘कॅपिलरी’ नावाच्या बारीक रक्तवाहिन्या असतात. या कॅपिलरीमधून अवयवांच्या पेशी रक्तातील घटक शोषून घेतात. नंतर रक्त शिरा म्हणजेच व्हेनद्वारे हृदयापर्यंत परत येते. ज्या पद्धतीने एखादा मोटार पंप विहिरीतील पाणी उपसून ते इच्छित ठिकाणी पाठवतो त्या पद्धतीने आपले हृदय शरीरामध्ये रक्त पाठवत असते. हृदयाच्या या कामामुळे आपल्या शरीरातील सर्व कामे सुरळीत चालतात. 

मोटार पंप पाणी उपसत असताना पाण्याच्या पाइपमध्ये दाब निर्माण होतो. जर पाइपला चिरा गेला तर आपल्याला त्यातून पाण्याची चिरकांडी उडताना दिसते. यामुळे आपल्याला कळते, की पाइपमधून एका विशिष्ट दाबाने पाणी वाहत आहे. अशाच प्रकारे आपल्या धमनीमधून रक्त वाहत असताना ते एका विशिष्ट दाबाने वाहत असते. त्यालाच आपण रक्तदाब म्हणतो. आपल्या शरीरात रक्ताभिसरण सुरू राहण्यासाठी आणि परिणामी आपल्या शरीराचे कार्य सुरू राहण्यासाठी रक्तदाब आवश्यक असतो. 

आपले हृदय ठोक्या-ठोक्यामध्ये रक्त पंप करीत असते. हृदयाचा ठोका पडतो (म्हणजेच हृदय आकुंचन पावते) तेव्हा धमनीत ‘बीपी’ जास्त असते, याला ‘सिस्टॉलिक बीपी’ म्हणतात. हृदय प्रसरण पावते तेव्हा धमनीत रक्‍तदाब थोडा कमी असतो, याला ‘डायस्टोलिक बीपी’ म्हणतात. रक्तदाब लिहिताना आपण सिस्टॉलिक बीपी वर आणि डायस्टोलिक बीपी खाली लिहितो. उदा 120/80 mmHg . म्हणजे सिस्टॉलिक बीपी 120 आहे आणि डायस्टोलिक बीपी 80 आहे. हे मोजमाप आधी पारा म्हणजेच मर्क्युरीच्या यंत्रांनी घ्यायचे म्हणून मोजमापासमोर mmHG हे एकक लिहिलेले असते. 

नेहमीच नसतो समान 
रक्तदाब हा नेहमी समान असत नाही. रक्तदाब हा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीनुसार बदलतो. आपण आराम करताना किंवा झोपलेले असताना आपला रक्तदाब कमी असतो. तसेच, आपण उत्तेजित झालो किंवा शारीरिक कष्ट झाले तर त्या वेळी रक्तदाब वाढतो. हा सामान्य शरीरप्रक्रियेचा भाग आहे. हे असे का घडते ते आपण बघू. 

रक्तदाब किती आहे, हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरते. 
आपल्या हृदयाची पंप करण्याची क्षमता किती आहे? 
आपल्या रक्तवाहिन्या किती लवचिक आहेत? 
आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण किती आहे? 
आपल्या शरीरामध्ये कुठल्या अवयवांना किती रक्ताची गरज आहे? 
शरीरातील हार्मोन्स व रसायनांची स्थिती कशी आहे? 

या सगळ्या घटकांवरून आपला रक्तदाब ठरत असतो. आपले शरीर हे एक सामान्य रक्तदाब ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. आपल्या शरीरातील काही अवयवांना जास्त रक्ताची गरज असते किंवा आपले रक्ताभिसरण वाढण्याची गरज असते त्या वेळेस हृदय जास्त प्रमाणात रक्त पंप करते. अशा वेळेस कधी कधी रक्‍तदाब वाढू शकतो. आपल्या शरीरामधील हार्मोन्स आपल्या रक्तवाहिन्याची लवचिकतासुद्धा ठरवतात व परिणामी रक्तदाब ठरवतात. तणावाच्या परिस्थितीत जे हार्मोन्स आणि रसायने शरीरात तयार होतात ते रक्तदाब वाढवून आपल्याला तणावाशी लढायला मदत करतात. 

रक्तदाब आपल्या शारीरिक हालचालींनुसार व आराम करण्याच्या स्थितीनुसार बदलत असतो. आपण झोपलेलो असू किंवा आराम करीत असू, तर आपला रक्तदाब कमी असेल, तेच आपण धावत असू, शारीरिक कष्ट करीत असू किंवा आपण भावनिक आवेगात असू, तर आपला रक्तदाब वाढलेला असतो. आपल्याला दुखत असेल, वेदना होत असतील किंवा मानसिक तणाव असेल तरीही रक्तदाब वाढलेला दिसू शकतो. आपला रक्तदाब आपल्या दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो. हा सगळा सामान्य प्रक्रियेचा भाग आहे. म्हणून रक्तदाब आपण आरामशीर असताना (रिलॅक्स असताना) मोजण्याचा प्रयत्न करतो. 

रक्तदाब वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत असल्यामुळे जास्त वेळा रक्तदाब मोजल्यास जास्त चांगली माहिती आपल्याला मिळते. उच्च रक्तदाबाचे निदान करतानासुद्धा आपल्याला दोन-तीन वेळा तपासून रक्तदाबाचा अंदाज घ्यावा लागतो. फक्त एका वाढलेल्या आकड्यावरून आपण निदान करीत नाही. याशिवाय चौवीस तास रक्तदाब मोजणारे यंत्रसुद्धा असते. त्यात आपण दिवसभर रुग्णाचे ‘बीपी’ कसे आहे, हे बघून निदान करतो. यामध्ये उच्च रक्तदाबाचे जास्त अचूक निदान होते. काही लोकांचा रक्तदाब डॉक्टरांच्या समोर वाढलेला असतो. पण, इतरवेळी मोजल्यास सामान्य असतो, याला ‘व्हाइट कोट हायपरटेन्शन’ म्हणतात. 

रक्तदाब कसा मोजायचा?  
आपण डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आपला रक्तदाब मोजून घेऊ शकतो. डॉक्टरांकडे असलेली यंत्रे बऱ्यापैकी अचूक रक्तदाब सांगतात. बाजारात उपलब्ध असलेली इलेक्ट्रॉनिक बीपी मशिन अगदी अचूक नसली, तरी चांगल्या प्रकारे बीपी मोजू शकतात. डॉक्टरांकडील यंत्रांशी आपले यंत्र पडताळून बघता येते. शिवाय आपले बीपी वाढते आहे की कमी होते आहे, याचा ‘ट्रेंड’सुद्धा आपल्याला बघता येतो. पण, जिथे शंका वाटली, तिथे डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.( उदा. एखाद्या इलेक्ट्रॉनिक मशिनवर रक्तदाब वाढलेला आला तर आपण तो डॉक्टरांकडून तपासून घेऊ शकतो.) 

रक्तदाबाचे निदान करण्यासाठी रक्तदाब हा आराम करण्याच्या स्थितीमध्ये मोजायला हवा. डॉक्टरांकडे गेल्यावर सगळ्यांचे बीपी सारख्याच पद्धतीने मोजता यावे म्हणून काही दंडक असतात. आपण यानुसार बीपी तपासून निदान पक्के करत असतो. डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर तुम्ही खुर्चीमध्ये बसून आरामाच्या स्थितीमध्ये असायला हवे. डॉक्टर तुमच्या उजव्या हातामध्ये बीपी तपासतात. बीपी मोजण्यासाठी योग्य आकाराचा बीपीचा पट्टा असायला हवा. आपण धूम्रपान किंवा उत्तेजक (कॅफिन असलेले, चहा-कॉफी इत्यादी) पेय घ्यायला नको. असे सगळे केल्याने आरामाच्या स्थितीमध्ये बीपी मोजता येते. आपल्या दोन्ही हातांमध्ये बीपी थोडे फार वेगळे असू शकते. शिवाय आपल्या पायांमध्ये मोजल्याससुद्धा बीपी वेगळे असते. एकसूत्रता असावी म्हणून उच्च रक्तदाबाचे निदान करताना उजव्या हाताच्या दंडामध्ये बीपी तपासत असतो. 

आपला रक्तदाब अगदी बिनचूक पद्धतीने मोजायचा असेल तर आपल्याला धमनीमध्ये एक सुई टाकून रक्ताचा दाब किती आहे, हे मोजता येते. पण, हा उपाय त्रासदायक आणि गैरसोयीचा आहे. आयसीयूमध्ये किंवा ऑपरेशनच्या वेळी जेव्हा आपल्याला दर मिनिटाला दर सेकंदाला रक्तदाब कसा आहे, याकडे जेव्हा लक्ष द्यावे लागते तेव्हा रुग्णाच्या धमनीमध्ये सुई टाकून असा रक्तदाब मोजतात. याला ‘इंट्राआर्टेरीअल बीपी’ म्हणतात. 

सामान्य रक्तदाब किती असतो? 
रक्तदाब जर १२०/८० mmHgपेक्षा कमी असेल तर त्याला आपण सामान्य समजतो. जर रक्तदाब यापेक्षा जास्त पण 140/90 mmHg पेक्षा कमी असेल तर त्याला ‘प्री-हायपरटेन्शन’ (उच्च रक्तदाबाची पहिली पायरी) म्हणतात. जर रक्तदाब 140/90 mmHgपेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. आपल्याला जर सतत 140/90 एवढे किंवा जास्त बीपी दिसत असेल तर डॉक्टर उच्च रक्तदाबाचे निदान करतात. जर बीपी खूप जास्त वाढलेले असेल (उदा 180/110 mmHg) तर डॉक्टर लगेच औषधोपचार सुरू करू शकतात. उच्च रक्तदाबाचे निदान करताना आणि उपचार सुरू करताना डॉक्टर इतर काही घटकसुद्धा ध्यानात घेतात (उदा. आपल्याला हृदयविकार किंवा स्ट्रोकचा किती धोका आहे, मूत्रपिंड किंवा नेत्रपटल यांना त्रास होण्याचा किती धोका आहे, आपले इतर आजार, रक्तशर्करा, कॉलेस्तेरोल, ईसीजी, इकोकाडिर्ओग्राफी इत्यादी). जर आपल्याला हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या इतर आजारांचा धोका जास्त असेल तर उपचार लवकर सुरू करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीसाठी सामान्य असलेले बीपी हे वेगळे असू शकते. त्यामुळे व्यक्तीला इतर काय त्रास आहेत व रक्तदाबामुळे काही त्रास होतोय का, हे बघून आपल्याला उपचार करावे लागतात. 
लहान मुलांमध्ये सामान्य रक्तदाब वयानुसार बदलतो. वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे सामान्य रक्तदाब वेगवेगळे असतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब होऊ शकतात. हे वेगवेगळ्या आजारांमुळे होऊ शकते. बालरोगतज्ज्ञ आपल्याला याबाबतीत मदत करू शकतात. 

कमी रक्तदाब 
जर बीपी ९०/६० पेक्षा कमी असेल तर त्याला रक्तदाब कमी आहे, असे म्हणता येते. काही व्यक्तींना रुटीन तपासणीत असा रक्तदाब असल्याचे लक्षात येते. त्यांचा रक्तदाब नेहमीच असा असतो व त्यांना कुठलाही त्रास नसतो. अशा वेळी हे बीपीसुद्धा सामान्य समजतो. काही व्यक्तीचा रक्तदाब नैसर्गिकरीत्या असा कमी राहतो. अशा व्यक्तीचे हृदयाचे आरोग्यसुद्धा सामान्य असते. 

याउलट काही लोकांचा रक्तदाब आजारांमुळे कमी होऊ शकतो. डी-हायड्रेशन किंवा शरीरातील पाणी कमी होणे, उलट्या जुलाब, जीवाणू – विषाणू इत्यादींचा संसर्ग, रक्तस्राव जास्त प्रमाणात होणे, अशा सगळ्या कारणांमुळे बीपी कमी होऊ शकते. हृदयविकार व हृदयाच्या आजारांमुळेसुद्धा रक्तदाब कमी होऊ शकतो. रक्तदाबाची औषधे तसेच इतर काही औषधे ह्यामुळेसुद्धा बीपी कमी होऊ शकते. 

रक्तदाब कमी होण्याची लक्षणे 
रक्तदाब कमी झाल्यामुळे डोळ्यांपुढे अंधारी येणे, गरगरल्यासारखे वाटणे, चक्कर येणे, अशक्त वाटणे इत्यादी त्रास होऊ शकतात. आपण बीपी मोजल्यावर ते कमी भरते. बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या रक्तदाबापेक्षा खूप कमी रक्तदाब होतो. अशा वेळी आपण डॉक्टरांना त्वरित भेटावे. आपण आजारी पडल्यावर जर अशी लक्षणे दिसली तर त्वरित वैद्यकीय सल्ल्याची-उपचाराची गरज असते. 
काही वेळी उभे असलेल्या स्थितीतसुद्धा रुग्णाचे बीपी तपासण्यात येते. अशा स्थितीत बीपी खूप कमी झाले तर त्याला ‘पोस्चरल हायपोटेन्शन’ म्हणतात. याचीसुद्धा अनेक कारणे असू शकतात. योग्य कारण ओळखून त्यानुसार आपल्याला उपचार करता येतात. 
ज्यांचे बीपी सामान्यतः कमी असते आणि त्यांना चक्कर, अंधारी येत असेल तर त्यांनीसुद्धा आपल्याला काही वैद्यकीय त्रास आहे का, हे तपासून बघावे. 

कमी रक्तदाबाचे उपाय 
जर रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी असेल, आपल्याला कुठलाही त्रास होत नसेल आणि आपल्याला काही आजार नसेल तर त्याला उपचाराची गरज पडत नाही. 
इतर वेळी रक्तदाब कमी होणे हे आजारांचे लक्षण ठरते. मुळात काय आजार आहे ते तपासून बघावे लागते. यासाठी काही तपासण्यासुद्धा कराव्या लागतात. इतर लक्षणे, त्रास आणि शारीरिक तपासणी करून डॉक्टर काय आजार आहे हे बघतात. मूळ आजाराचा उपचार केल्यावर बीपी सामान्य होण्यात मदत होते. भरपूर पाणी आणि पेये प्यायल्याने शरीरातील पाणी भरून निघण्यास मदत होते. काही वेळा शिरेतून सलाईन देऊन हे केले जाते. रक्तस्राव खूप झाला असल्यास रक्त द्यावे लागते. त्याशिवाय इतर आजारांचे विशेष उपचार करून रक्तदाब सामान्य करता येतो. ज्यांच्या औषधांमुळे रक्तदाब कमी होतो, त्यांच्या औषधात बदल केला जातो. 

सामान्य रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीचा रक्तदाब अचानक कमी होणे, हे काळजीचे असते. कुठल्याही आजारात अचानक बीपी कमी झाले तर तेसुद्धा धोक्याचे लक्षण असते. अशा वेळी आपण अधिक काळजी आणि योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

 
 
रक्तदाब कमी होतोय? 
अलीकडे तरुण मुलांमध्ये रक्तदाब कमी असल्याचे आढळत आहे. ताणतणाव व जीवनशैली हे त्यामागचे कारण असते, असे आढळले आहे. यात दोन प्रकार आहेत. अचानक काही काळाकरता रक्तदाब कमी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचे कारण शोधून उपाय योजा. दुसऱ्या प्रकारात, रक्तदाब सतत कमीच दिसत असतो. याबाबत काही दिवस वेळेसह नोंदी ठेवून डॉक्टरांची भेट घ्या. रक्तदाब नैसर्गिकरीत्याच कमी असेल तर तशी डॉक्टरांकडून खात्री करून घ्या. मात्र आपल्या जीवनशैलीमुळेही रक्तदाब कमी होऊन सतत तसाच दिसू शकतो. तसे असल्यासही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. त्याचबरोबर काही गोष्टी आवर्जून करा. 
- अवेळी झोपणे टाळा 
- अवेळी खाणे टाळा 
- दुपारी झोपणे टाळा 

अवेळी खाण्याचा, अवेळी झोप घेण्याचा, दुपारी झोपण्याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो. त्यामुळे रक्तदाब कमी होतो. अशांनी जशी जीवनशैली बदलावी, तसेच आणखीही काही गोष्टी लक्षात घ्याव्यात - 
- नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालावेत, व्यायाम करावा 
- भरपूर पाणी प्यावे 
- फळे व भाज्या भरपूर खाव्यात 
- जंकफूड, फास्ट फूड टाळावे 
याखेरीज काही अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ (वृद्धवैद्याधार) सांगतात, त्याप्रमाणे - 
- लिंबू-मीठ-साखर घालून रोज एक ग्लास सरबत प्यावे 
- रोज तुळशीची पंधरा-सोळा पाने खावीत 
- रोज एक टोमॅटो व लसणाची एक पाकळी खावी 
- टोमॅटो सॉस टाळावे 
- पंधरा-वीस मनुके रात्रभर भिजवून सकाळी खावेत. ते पाणीही प्यावे. 
- सात-आठ बदाम रात्रभर भिजवून सकाळी साले काढून खावेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Index: Blood pressure article written by Dr Vinayak Hingane