कर्करोग

कर्करोग

काही वेळा असा प्रश्न विचारला जातो की आयुर्वेदात कर्करोग व एड्‌स या आधुनिक रोगांचा उल्लेख आहे का व त्यांच्यावर काही इलाज सुचवलेले आहेत का? नुसते नाव देण्याने रोग कळतो असे नाही, पण नावामुळे रोग कसा असू शकेल याची कल्पना येते. 

कर्करोग हे नाव खूप समर्पक दिलेले आहे. म्हणजेच खेकड्याच्या स्वभावाप्रमाणे या रोगाचाही स्वभाव आहे. आयुर्वेदिकदृष्ट्या विचार करता रोग संप्राप्ती कशी होते, वात-पित्त-कफाचे व सप्तधातूंचे असंतुलन कसे झाले याचा विचार करून रोगाची लक्षणे, रोगाचे स्थान यांचाही विचार करून उपाययोजना केली जाते. कॅन्सर हा रोग फार झटपट वाढतो, उपयोगी द्रव्यांचा ऱ्हास व नाश करून नको असलेली द्रव्ये वाढत राहतात. कॅन्सरचा उद्‌भव झाला असता क्षयरोगाच्या लक्षणांशी साधर्म्य दिसू शकेल आणि हलके हलके ओजक्षयाची पण लक्षणे दिसतील. कॅन्सरवर इलाज करताना

वरील गोष्टी पण ध्यानात घ्याव्या लागतील. म्हणजेच कॅन्सर किंवा एड्‌स अशी नावे जरी आयुर्वेदात प्रत्यक्ष दिलेली नसली तरी एकूण रोग संप्राप्ती पाहून इलाज केला जातो. बऱ्याच वेळा शरीरात कोठेही गाठ दिसली की कॅन्सर नसल्याची खात्री करून घ्यावी लागते.

कर्करोगाचा विचार करताना ‘क’ आणि ‘अर्क’ अशा दोन शब्दांचे अर्थ विचारात घ्यावे लागतील, ‘क’ म्हणजे केस, काम, अग्नी, वायू, कडक गाठ, मन व यम. अर्क या शब्दाचे अर्थ आहेत अचानक कडकणारी वीज, अग्नी, स्फटिकाप्रमाणे कडक असणारा दगड, अन्न. तेव्हा या दोन शब्दांना एकत्र केल्यानंतर कर्करोग हा काय रोग आहे, कशाशी संबंधित आहे याची कल्पना येऊ शकते. शरीरातील पित्त व वात यांच्या दोषातून हा रोग निश्‍चितच प्रभावी होतो व तो शरीरातील हॉर्मोनल संस्थेला म्हणजेच शरीरातील अग्नीला असंतुलित करतो. या रोगामुळे मृत्यूची देवता यमाचा अचानक प्रकोप होऊ शकतो. 

कार्य ज्या प्रेरणेने चालते त्या प्रज्ञेतील असंतुलन म्हणजे प्रज्ञापराध असे लक्षात घेतले, तर बऱ्याचशा अंशी मानसिक असंतुलनातून, मानसिक असमाधानातून, मानसिक व्यभिचारातून, संशयातून हा विकार होऊ शकतो असेही लक्षात येते. 

या रोगाची व्याप्ती म्हटली तर कडक गाठ, अनेक केसांचा तयार झालेला एक गुंता, अर्बुद या स्वरूपात असते. वीज जशी कुठे तयार झाली व कुठे पडली हे कळत नाही तसे या रोगाची उत्पत्ती व व्याप्ती लक्षात येऊ शकत नाही, तो कुठे उडी घेईल हे सांगता येत नाही. 

आकाशातील बारा राशींपैकी चौथ्या राशीला कर्क रास म्हटले जाते. कर्क या शब्दाचा अर्थ खेकडा असाही आहे. जसा वायू कोठून कुठे फिरेल हे सांगता येत नाही तशीच खेकड्याची चाल असते. त्याच्या शरीरात खूप सारा शुष्क भाग असतो. तसे पाहताना तीक्ष्ण हा अग्नीचा गुणही खेकड्याजवळ असतो. माणसाचे मन जसे निमिषमात्रात कुठे फिरेल हे सांगता येत नाही तसा कर्क राशीचा मनाशी संबंध दाखविलेला असतो. कर्क राशीची देवता चंद्र आहे असे समजले जाते म्हणजेच चंद्रासारखी शीतलता, चंद्राचे रसधातूवर असलेले प्रभुत्व लक्षात घेतले तर कर्करोगात एकूण रसधातूची व मनाची काळजी घेणे आवश्‍यक आहे हे लक्षात येते. चंद्रामुळे निर्माण होणारे वात्सल्य, प्रेम किंवा वनस्पतीत असलेला रस (अर्क-सॅप) अशी कल्पना केली तर आपल्या असे लक्षात येईल की या रोगाला बरे करण्यासाठी मनावर प्रयोग करता येतील. मनाने एखादी गोष्ट स्वीकारली तर कर्करोगासारख्या रोगात ताबडतोब बदल होतात हे सर्वमान्य आहे. पण कर्करोग झाल्यानंतर मनावर उपचार करण्यापेक्षा मनाला पहिल्यापासूनच भलत्या मार्गाला जाऊ न देणे आणि मनाचे स्वाभाविक गुण म्हणजे मनाच्या देवतेचे गुण वाढविणे आवश्‍यक आहे हे लक्षात येण्यासारखे आहे. 

मुख्य म्हणजे शरीरातील अग्नी संतुलित ठेवण्यासाठी त्याच्यापूर्वीचा रस धातू व पृथ्वीतत्त्वाचा कफ यांच्यावर व वात-पित्तावर नियंत्रण ठेवणे गरजेचे दिसते. याचा विचार करून केलेल्या योजना यशस्वी झालेल्या दिसतात. यासाठी बऱ्याच संशोधनाची आवश्‍यकता आहे. परंतु अशा प्रकारच्या संशोधनासाठी मदत करण्यासाठी सरकारच नव्हे तर कुठलीच संस्था पुढे येताना दिसत नाही. हा सर्व विषय जणू काही अंधश्रद्धेचा व देवाशी  जोडलेला आहे अशा समजातून यासाठी मदत मिळताना दिसत नाही. परंतु कर्करोगावर इलाज शोधायचा असेल तर अशा दृष्टिकोनातूनच संशोधन करावे लागेल. माणसाचे मन जेवढे भ्रष्टाचार व व्यभिचारापासून दूर असेल, जेवढे ते शांत असेल, जेवढे वात्सल्याने भरले जाईल तेवढे या रोगाशी लढाई करणे सोपे होईल.

कॅन्सर या रोगात आकाशतत्त्व म्हणजेच मन व वातदोष कारणीभूत असतात तेव्हा या दोन्हींवर काम करणारे नादतत्त्व व स्वास्थ्यसंगीत यांचा नक्कीच उपयोग होईल. यातील कार्यकारणभाव समजण्यासारखा आहे व संशोधनास खूप वाव आहे. कॅन्सरचे निदान रक्‍ततपासणी, क्ष-किरण तपासणी, बायॉप्सी व इतर लक्षणांवरून होऊ शकते. म्हणजेच कॅन्सर झाल्यानंतरच त्याची पूर्ण माहिती मिळू शकते. परंतु हा सर्व पेशींमधील बदल का व कशामुळे झाला याचे कारण अजून पूर्ण समजलेले नाही. कॅन्सरचे कारण, त्याचे मूळ व प्रत्यक्ष रोगच समजून येत नाही, तेव्हा त्यावरील इलाज कशा रीतीने काम करणार अशी शंका न घेता जरी बादरायण संबंध वाटला तरी मंत्र, संगीत किंवा तत्सम श्रद्धेवर आधारित इलाज पद्धतीवरही संशोधन करता येईल.

आयुर्वेद शास्त्राने ‘कायाकल्प‘ म्हणजेच शरीरपेशी पुन्हा सजीव करणे, म्हातारपणी पुन्हा तारुण्य प्रदान करणे, याचा विधी सांगितलेला आहे. अर्थात त्यापैकी व्यवस्थित, शास्त्रोक्‍त पंचकर्म व काही मर्यादेत रसायनविधी सध्या होऊ शकतो. पूर्ण विधी व गूढरसायनकल्प सध्या वापरात नाही. पण या अंगाने विचार करून संशोधन होऊ शकेल.

श्रीपतंजली मुनींपासून श्रीसमर्थ रामदास स्वामींपर्यंत व आजतागायत सर्वांनीच मनास बदलण्यासाठी अनेक मार्ग सुचवले आहेत. मनाचा ‘कर्क रोग’ शरीरात उतरला की मन व शरीर या दोघांवर इलाज करणे महाकर्मकठीण काम होऊन बसते. म्हणून सर्व इलाज पद्धतींनी एकत्रितपणे कार्यरत व संशोधनप्रवण राहिले तरच कॅन्सरसारख्या रोगावर विजय मिळवता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com