आरोग्यशेती आणि आरोग्य 

आरोग्यशेती आणि आरोग्य 

‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ असे म्हटलेले आहे म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला अन्नाची गरज असते. हे अन्न उत्तम गुणवत्तेचे, उत्तम वीर्यशक्‍तीचे असण्यासाठी एकूणच वृक्षसंवर्धन, बागबगीचे, शेती यांचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्‍यक असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने व अनुभवावर आधारित अशा प्रकारे शेती केली तरच मनुष्याला चांगले अन्न मिळून आरोग्य टिकून राहते. उत्तम शेतीसाठी उत्तम मदतनिसाचीही आवश्‍यकता असते. शेवटी नांगर ओढायचा असला तर दोन व्यक्‍ती असणे आवश्‍यक असते. म्हणून मनुष्याने विचारपूर्वक बैलाला शेतीत उपयोगाला आणले. बैलाबरोबर गाय आलीच. गायीचे अनेक उपयोग असतात. बैल असणे हे शेतीला पूरक ठरत असल्यामुळे बैलाबरोबरच गाईची देखभाल करणे ओघानेच येते.  

दुधासाठी तर गाईचा उपयोग होतोच, पण शेण व गोमूत्र हे दोन्हीही शेतीसाठी अत्यंत पूरक असतात. शेणखताऐवजी इतर खतांचा उपयोग केल्यामुळे शेतजमिनींचे काय नुकसान झालेले आहे याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. झाडाचा पालापाचोळा, शेण यापासून तयार झालेले खत हे सेंद्रिय शेतीसाठी उपयोगाला येते. खतासाठी गोमूत्र आवश्‍यक असतेच, पण त्याहूनही गोमूत्राचा मोठा उपयोग आहे, कीटकनाशन. झाडांवर, पिकांवर कीड, अळ्या, माशा यांचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांचे, पिकांचे अतोनात नुकसान होत असते. यासाठी गोमूत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. शेती करायची म्हटली तर जमीन असणे आवश्‍यक असते, तसेच शेतकऱ्याला जमिनीची माहिती असणेही तितकेच आवश्‍यक असते. याचबरोबर गाय-बैल शेतीसाठी पूरक असतात. शेती करायची म्हटली तर पाण्याची सोय आहे की नाही हेही पाहावे लागते, पण हा विषय वेगळा आहे. 

सेंद्रिय शेतीला दिवसेंदिवस जास्ती महत्त्व येत आहे. कारण आज प्रत्येक शेती, मग ती भातशेती असो, कुठल्यातरी धान्याची शेती असो, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल फवारण्या करण्याची गरज भासू लागली आहे. शेतीसाठी घातलेल्या खतांमुळे जमिनीची प्रत बदलत जाते. अशा वेळी रोपावर केमिकल फवारण्या केल्या नाहीत तर उत्पन्नावर परिणाम होतो. आंबा, काजू वगैरे बहुवर्षीय झाडांवरही मोहोर यावा, आलेला मोहोर टिकावा, फळाचा आकार मोठा व्हावा यासाठी फवारण्या कराव्या लागतात. याऐवजी सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर या गोष्टी टाळता येऊ शकतात. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना शेणाबरोबर गोमूत्राचे महत्त्व मोठे आहे. 

सध्या ‘ए २’ गाईचे म्हणजे देशी गाईचे महत्त्व लोकांना समजू लागलेले आहे. जी गाय बाहेर उन्हात फिरते, बाहेर कुरणात चरते, जी एका ठिकाणी बांधून ठेवलेली नसते, जिला शिंग व वाशिंड आहे, जिला मानसिकदृष्ट्या त्रास होईल अशी शेतकऱ्याकडून वागणूक मिळत नाही, जी स्वच्छ ठेवलेली असेल, विशेषतः जिच्या आचळांची स्वच्छता उत्तम प्रकारे ठेवलेली असेल, ज्या गाईचे मल-मूत्र गोळा करण्याची नीट व्यवस्था केलेली असेल, अशा गाईचे दूध व गोमूत्र वापरण्यास उत्तम असते. 

गोठ्यातील गाईंचे मल-मूत्र नीट गोळा करून त्याचा व्यवस्थित विनियोग करणे आवश्‍यक असते. गोबर गॅस तयार करण्यासाठी शेणाचा उपयोग केला तर शेतकऱ्याच्या घरात दिवा पेटू शकतो, त्याचा शेतावरचा पाण्याचा पंप चालू शकतो, शेणाच्या गवऱ्या करून त्याचा इंधन म्हणूनही वापर करता येतो. अशा प्रकारे गाईचे महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर तिचे मूत्र व शेण यांचेही खूप महत्त्व आहे. 

सध्याच्या आधुनिक काळात मनुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरलेले असताना त्यावर उपचार करताना सेवन केले जाणारे अन्न शुद्ध असणेही महत्त्वाचे आहे हे लक्षात आले, आणि पर्यायाने गोमूत्र व शेण वापरून केलेल्या शेतीचे महत्त्व खूप वाढले. 

गोमूत्राचे अनेक उपयोग आहेत. गोमूत्राचा अर्क करता येतो. फुलांमधून तेल काढून घेऊन त्यापासून अत्तर बनविले जाते तसे गोमूत्र उकळून त्याचा क्षार करता येतो. हा अर्क व क्षार औषध म्हणून वापरता येतो. सध्या एकंदरच मनुष्याचा मानसिक ताण वाढल्यामुळे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या  सवयींमुळे मूत्ररोगांचे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच मधुमेही व्यक्‍तींनाही मूत्ररोगाचा त्रास होऊ शकतो. या सर्व प्रकारच्या मूत्ररोगांवर गोमूत्राचा उत्तम उपयोग होतो असे सांगितलेले आहे. याचा वेगळा विचार आपण औषधीकरणात किंवा मुखपृष्ठ कथेमध्ये केलेलाच आहे. 

ताजे गोमूत्र घेण्याचाही खूप उपयोग होऊ शकतो. साधारणतः पाच-सहा चमचे गोमूत्र सुती कापडातून सात वेळा गाळून घेऊन, त्यात तेवढेच पाणी घालून रोज नियमित घेण्याने फक्‍त शारीरिक लाभ होतात असे नाही, तर व्हायरल इन्फेक्‍शनपासून संरक्षण मिळते. गोमूत्रात कुठल्याही प्रकारे पांढरट कण नसावेत, गोमूत्र गढूळ-धुरकट नसावे, त्यात इतर जड कण नसावेत, ते लाल रंगाचे नसावे. भटक्‍या गाई कागद, विष्ठा वगैरे खातात, अशा गाईचे गोमूत्र सेवन करू नये. पाळीव गाय, जिचा आहार आपल्याला माहीत असतो, जिला प्रेमाने वागवले जाते अशा गाईच्या गोमूत्राचा वापर करावा असे शास्त्रांत सांगितलेले आहे.  

गोमूत्र हे मूत्र असल्यामुळे त्याची एक प्रकारची शिसारी येते, ते दूर ठेवावे असे वाटते. प्रत्येक प्राण्याच्या मूत्राचे, दुधाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. माणसाच्या मूत्राचेही वेगळे गुणधर्म असतात. काही लोक स्व-मूत्र प्राशन करतात, हा विषय ज्याला आवडेल, जमेल, रुचेल त्याने करायला हरकत नाही. परंतु गोमूत्र सेवन करण्याची प्रथा अनादी काळापासून चालत आलेली आहे. वर्षातून एकदा, दोनदा किंवा अधून मधून केव्हातरी पंचगव्यप्राशन करून शरीरशुद्धी करावी. मोठ्या रोगांना आवरायचे असेल, मानसिक बाधा दूर करायच्या असतील तेव्हा पंचगव्य किंवा साधे गोमूत्र घेण्याने फायदा होतो. मानसिक अस्वस्थता असता, मनाचे रोग झाले असता गोमूत्राचा उपयोग होतो, हे अनेकांना आलेल्या अनुभवावरून कळू शकते. असा उपचार करताना पाहण्याचा योग आला तर गोमूत्र अंगावर टाकल्यावर रुग्णाची प्रतिक्रिया पाहून गोमूत्राचा परिणाम जहाल होत असावा, रोग निघून जात असावा, मानसिकता बदलत असावी हे लक्षात येते.

एकूणच, सध्या असा काळ आलेला आहे की प्रत्येकाने व्यक्‍तिगत किंवा समुदायाने जी शेती करावी, ती सेंद्रिय असावी, शेतीवर गाय-बैल अवश्‍य असावेत. यंत्रांचा उपयोग करूनही शेती होऊ शकते, परंतु शेती छोटी असल्यास गाय-बैल असणे अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी खूप मोठी जमीन सपाट असेल तेथे यंत्रांची मदत घेऊन शेती करणे सोपे जाते, परवडते. परंतु लहान शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बैलांची मदत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. गाय बैलांचा गोठा ठेवून त्यातून गोदुग्धाचा फायदा करून घेतानाच गोमूत्राचाही मोठा फायदा झालेला दिसतो. योग्य गोमूत्राचा वापर करून मनुष्य आपले आरोग्य व ऐश्वर्य नक्की वाढवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com