आरोग्यदायी तुळशी

आरोग्यदायी तुळशी

तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळशी अनेक कार्य करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे "सूक्ष्म‘गुण. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) असली की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.

बाग असो किंवा छोटीशी बाल्कनी असो; तुळशीचे झाड नाही असे घर भारतात शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक घरात तुळशी मुलीच्या हक्काने राहते आणि घरामध्ये दर वर्षी विवाह प्रसंग तिच्यामुळेच होऊ शकतो. तुळशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व का आहे, याचे उत्तर आयुर्वेदात व आरोग्यशास्त्रात सापडते. 


तुळशीच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. रामतुळशी व कृष्णतुळशी हे दोन प्रकार सर्वांच्या परिचयाचे असतीलच; पण पास्ता, पिझ्झा वगैरे खाद्यपदार्थांवर बेसिल म्हणून वापरली जाणारी पानेसुद्धा एका प्रकारच्या तुळशीचीच असतात. कापरासारखा वास असणारी तुळशी कर्पूरतुळशी म्हणून ओळखली जाते. याशिवाय लिंबासारखा वास असणारीही एक जात असते. सर्व प्रकारच्या तुळशींना एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो. त्यामुळे सुगंधी तेल काढण्यासाठीही तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 


तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळशी अनेक कार्य करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे "सूक्ष्म‘गुण. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) असली की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो. 


थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील, तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो. 


लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन म्हणजे अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो. 


तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष, चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळशी उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे कमी होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुतल्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते. 


शरीरात कुठेही जडपणा, जखडलेपण जाणवत असेल, तर त्यावर तुळशी उपयोगी पडते. डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्‍यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो. सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते. 

 
पचनसंस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात. अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते.

तुळशीचे कार्य चरकसंहितेमध्ये पुढीलप्रमाणे समजावलेली आहेत - 
हिक्का कासविषश्वास-पार्श्वशूलनिनाशनः । पित्तकृत्‌ कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा ।।...चरक सूत्रस्थान
उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्‍त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळशी दुर्गंधाची नाश करण्यास सक्षम असते. 

 
तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसपास रोगसंक्रमक जीवजंतूंचे प्रमाण निश्‍चित कमी असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढत असावी. तसेच जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो, असा समज आहे. तुळशीची पाने, मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते. 


आयुर्वेदिक औषधे बनविताना तुळशीच्या पंचांगांचा म्हणजे पाने, फुले, बिया, देठ, मूळ या सर्वांचा वापर केला जातो. घरच्या घरी मात्र सहसा तुळशीची पाने वापरली जातात. तुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत, पानांचा चहा करण्याची पद्धत, तुळशीच्या बीपासून खीर बनविण्याची पद्धत आपण पाहणार आहोत, जेणेकरून आवश्‍यकतेनुसार लगेच तुळशी वापरणे शक्‍य होईल. 


तुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत - साधारण चमचाभर रस हवा असला तर 10-15 पाने घ्यावीत, पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत व सुती कापडाने पाणी टिपून कोरडी करावीत. खलबत्त्यामध्ये पाने टाकून त्यांची चटणी होईपर्यंत नीट कुटावीत. स्वच्छ सुती कापडावर ही कुटलेली चटणी ठेवून त्याची पुरचुंडी करून पिळावी व तुळशीच्या रसाचे थेंब गोळा करावेत. रस काढल्यावर तो शक्‍य तितक्‍या लवकर वापरणे चांगले. रस शिळा झाला, तर त्यातील औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. सुती कापडातून पिळून रस काढताना कापडालाच बराचसा रस लागून वाया जाऊ शकतो, त्यामुळे थोडासा रस काढायचा असल्यास कुटलेला गोळा डाव्या हाताच्या तळव्याच्या मध्यावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून रस काढता येतो. 


तुळशीचा रस मधाबरोबर किंवा साखरेबरोबर घेतला जातो. मधामुळे तुळशीतील कफसंतुलनाचा गुण अधिक वाढतो; तर साखरेमुळे उष्णता, तीक्ष्णता कमी होण्यास मदत मिळते. 


तुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा - एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा. 

 
तुळशीच्या बियांचा फालुदा - तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या, लघवी साफ होण्यास मदत करणाऱ्या व पौष्टिक असतात. या बिया पाण्यात 25-30 मिनिटे भिजवून ठेवल्या तर फुलतात व गुळगुळीत बनतात. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शरद ऋतूत; तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तुळशीच्या बिया दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर घेणे उत्तम असते. तुळशीच्या बियांना तकमारिया असेही म्हटले जाते. चमचाभर तुळशीच्या बिया थोड्याशा पाण्यास भिजत घालाव्यात. साधारण 30 मिनिटांनी फुलतात. कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या दुधात चमचाभर साखर किंवा शतावरी कल्प, आवडत असल्यास अर्धा चमचा रोझ सीरप, भिजवलेल्या तुळशीच्या बिया टाकून एकत्र करून नीट हलवून प्यावे. 


तुळशीचे सीरप - तुळशीच्या पानांचा रस काढावा. रसाच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. पाण्याचा अंश उडून गेला की सीरप तयार झाले, असे समजून भरून ठेवावे. लहान मुलांना देण्यासाठी तसेच बारा महिने तुळशी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी हे सीरप उत्तम होय.
दमा, खोकला, घशामध्ये सतत कफाचा चिकटपणा जाणवणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, जंत होणे वगैरे त्रासांमध्ये हे सीरप अर्धा ते एक चमचा इतक्‍या प्रमाणात घेता येते.

 
तुळशीचे बाह्य उपयोग
- त्वचारोगात, विशेषतः खाज येणाऱ्या त्वचारोगात तुळशीच्या पानांचा रस लावण्याचा उपयोग होतो.
- तुळशीची पाने वाफवून त्यांचा छातीवर लेप केल्यास कफयुक्‍त खोकला कमी होतो.
- विंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.
- टॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप लावल्याने बरे वाटते.
- सायनस, सर्दी, डोके जड होणे वगैरे तक्रारींवर तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्याचा फायदा होतो.
- तुळशीच्या सान्निध्यात सकाळ-संध्याकाळ काही वेळ बसण्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होण्यास मदत मिळते.

डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com