स्त्रियांनो, हृदय सांभाळा!

Heart
Heart

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या हृदयविकारांना महिला बळी पडण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. स्त्रियांनी स्वतःला, आपल्या हृदयाला सांभाळण्याची गरज आहे.

गेली काही वर्षे महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण नियमितपणे वाढत आहे. विशेषतः प्रजननक्षम वयात हे प्रमाण जास्त आहे आणि हीच धोक्‍याचा इशारा देणारी गोष्ट आहे. इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे, रजोनिवृत्तीची लक्षणे लवकर दिसू लागणे, मधुमेह, स्थूलपणा इत्यादी हृदयरोगाशी संबंधित परिणाम दिसू लागणे आदी गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. हृदयविकार हा महिलांशी फार संबंधित नसल्याचा अनेकांचा समज आहे. पण महिलांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कारण हे हृदयविकार आहे, हे किती जणांना माहीत आहे. 
पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार उशिरा होतो. पण त्याचे स्वरूप मात्र अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहितीच नसते गैरसमजांमुळे त्याचे निदान होण्यास विलंब होतो. पुरुषांमध्ये दिसणाऱ्या हृदयविकाराच्या लक्षणांपेक्षा महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात. उदा. महिलांच्या छातीत किंवा खांद्यांमध्ये वेदना होत नाहीत, पण त्यांचे जबडे दुखू शकतात. हे लक्षण थेट हृदयविकाराशी जोडलेले दिसत नाही. पण जबडे दुखत असतील तर हृदयाची तपासणीही करून घ्याच.

त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला धाप लागते किंवा थकवा येतो, तेव्हा त्याचा संबंध साध्या अशक्तपणाशी किंवा कामाचा दबाव वाढल्याशी जोडला जातो. पण ती मधुमेहाची सुरुवात असू शकते. किंवा हृदयविकाराचेही ते लक्षण असू शकते. महिलांमध्ये दिसणाऱ्या इतर काही लक्षणांचा संबंध हृदयविकाराशी असू शकेल हे लक्षात न घेता, त्यांचा संबंध बहुतेक वेळा पोटाच्या विकारांशी जोडला जातो. त्यात पोटदुखी, पित्त, मळमळणे इत्यादींचा समावेश आहे. यामुळे महिलांमधील हृदयविकाराचे निदान लवकर होणे कठीण होऊन बसते. 

करॉनरी मायक्रोव्हॅस्क्‍युलर डिसीज (हृदयातील सूक्ष्मरक्तवाहिन्यांचा आजार) हा महिलांमध्ये सामान्यपणे आढळून येतो. ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ किंवा ‘टाकोस्टुबो कार्डियोमायोपथी’ हे आजारही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हा ताणामुळे उद्‌भवलेला कार्डियोमायोपथीचा प्रकार आहे. यात हृदयातील मुख्य स्नायू विस्फारतात. महिला आराम करत असताना किंवा निद्रावस्थेतही ही स्थिती उद्‌भवू शकतात. बहुधा हृदयाला नुकसान झाल्यानंतर महिला हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. कारण ही लक्षणे बहुधा हृदयविकाराच्या झटक्‍याशी जोडली गेलेली नसतात आणि कदाचित महिलांनी त्या लक्षणांना फार महत्त्व दिलेले नसते. 

महिलांच्या निदान चाचण्यांमध्ये त्यांच्या हृदयातील बदल अचूकपणे दिसून न येण्याचीही शक्‍यता असते. त्याचप्रमाणे हृदयातील धमन्यांमध्ये झालेल्या गुठळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो, असा सर्वसाधारण समज आहे. असे असले तरी रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या नसतानाही हृदयविकार होऊ शकतो. महिलांच्या हृदयातील धमनी आकुंचित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रक्तवाहिनीचा पापुद्रा फाटू शकतो आणि परिणामी रक्तस्राव होऊन रक्ताची गुठळी होऊ शकते. महिलांच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या असू शकतातच, त्याचप्रमाणे या गुठळ्या हृदयाला रक्त पुरविणाऱ्या छोट्या रक्तवाहन्यांमध्येही असू शकतात. याला छोट्या रक्तवाहिन्यांचा हृदयविकार किंवा हृदयातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा आजार असेही म्हणतात. मानसिक तणावामुळेही हृदयविकाराचा झटका येण्यासारखी परिस्थिती उत्पन्न होते. 

रजोनिवृत्तीनंतर महिलांमधील हृदयविकाराच्या झटक्‍यांची शक्‍यता वाढते. रजोनिवृत्तीची प्रक्रिया साधारण ४५ ते ५० वयादरम्यान सुरू होते. या कालावधीत महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयविकारांमध्ये वाढ होते. एस्ट्रोजनेचा संबंध अधिक पातळीमध्ये हाय डेन्सिटी लपोप्रोटिन (एचडीएल किंवा उपकारक कोलेस्टरॉल) असण्याशी आहे. रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिक एस्ट्रोजेनचे लो डेन्सिटी लायपोप्रोटिन (एलडीएल किंवा अपायकारक कोलेस्टरॉल) स्रवल्यामुळे उपकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते आणि अपायकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढते. परिणामी, हृदयविकार होण्याची शक्‍यता असते. 

कोणत्याही आजारपणाच्या लक्षणांकडे व संकेतांकडे महिला दुर्लक्ष करतात. हा त्यांचा स्वभाव बनलेला दिसतो. घरातील इतरांसाठी जागरुक असणारी स्त्री स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करताना दिसते. त्याचप्रमाणे नियमित शारीरिक हालचालीकडेही महिला दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. घरकाम कितीही असले तरी ते शरीराला थकवणारे असतात, त्याला पूरक किंवा ताकद देणारे नसतात. पण हे लक्षात न घेतल्याने व्यायाम करण्याकडेही त्यांचा कल नसतो. त्याचप्रमाणे हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी नियमितपणे आरोग्यतपासणी करून घेणे आवश्‍यक असते हे महिलांना पटवून देणे कठीण असते. वय आणि लिंग यांचा भेदभाव न करता सर्वांमध्ये हृदयविकारांबद्दल जाणीवजागृती निर्माण करण्याची आता वेळ आली आहे. हृदयविकार टाळण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच प्रतिबंधक पावले उचलणे अणि जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com