हृदयाच्या झडपांना सूज आलीय?

डॉ. बिपीनचंद्र भामरे
Monday, 1 July 2019

काही वेळा हृदयाच्या झडपांना सूज येते. याला एण्डोकार्डिटिस असे म्हटले जाते. याची कारणे कोणती? त्याचा प्रतिबंध कसा करायचा? 

काही वेळा हृदयाच्या झडपांना सूज येते. याला एण्डोकार्डिटिस असे म्हटले जाते. याची कारणे कोणती? त्याचा प्रतिबंध कसा करायचा? 

हृदयाच्या अस्तराच्या सर्वांत आतील स्तराला, तसेच हृदयातील झडपांना सूज येते. त्या अवस्थेला एण्डोकार्डिटिस असे म्हटले जाते. रुग्णाच्या शरीराच्या अन्य कोणत्या तरी भागातून जिवाणू अगर बुरशी हृदयात शिरले, तर हा आजार होतो. म्हणजे असे, की घशाला झालेला प्रादुर्भाव, दातांना झालेला प्रादुर्भाव किंवा मूत्रमार्गात झालेला प्रादुर्भाव यातून जिवाणू, बुरशी किंवा अन्य जंतू रक्तप्रवाहात मिसळतात. रक्तातून ते हृदयापर्यंत पोहोचतात. हृदयाच्या एखाद्या भागात शिरकाव करतात. त्यामुळे हा आजार होतो. याचे इन्फेक्‍टिव एण्डोकार्डिटिस (आयई), बॅक्‍टेरियल एण्डोकार्डिटिस (बीई), इन्फेक्‍शिअस एण्डोकार्डिटिस आणि फंगल एण्डोकार्डिटिस असे प्रकार आहेत. या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर यामुळे रुग्णाच्या हृदयाच्या झडपांची हानी होऊ शकते किंवा त्यांच्या कामात बिघाड होऊ शकतो आणि यातून प्राणघातक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने, एण्डोकार्डिअममधून एण्डोकार्डिटिस होतो आणि आयव्ही औषधे अतिप्रमाणात घेणाऱ्यांमध्ये हा प्रादुर्भाव सामान्यपणे स्ट्रेप्टोकोकल आणि स्टॅफिलोकोकल जिवाणूंमुळे होतो.

लक्षणे
एखाद्याला एण्डोकार्डिटिस अचानक होतो किंवा हळूहळू होत जातो. तो कोणत्या प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो, यावर हे अवलंबून आहे. त्याचप्रमाणे रुग्णाला कोणते सुप्त हृदयविकार आहेत, यावरही हे अवलंबून आहे. काहीजणांना आधीपासूनच हृदयाचे स्नायू आकुंचन पावण्याचा किंवा झडपांतून रक्तगळतीचा विकार अगदी सौम्य किंवा मध्यम स्वरूपात असतो. त्यांना एण्डोकार्डिटिस होण्याची शक्‍यता अधिक असते. याची लक्षणे अशी-
  ताप येणे
  थंडी भरणे
  थकवा येणे
  रात्रीच्या वेळी घाम येणे
  श्वास घेण्यात अडचण येणे
  स्नायू व सांधे दुखणे
  श्वास घेताना छाती दुखणे
  पावले-पाय किंवा पोटाला सूज येणे
शिवाय ही लक्षणेही व्यक्तीनुरूप बदलतात. केवळ एवढेच नाही, तर 
  कोणत्याही ठोस कारणाशिवाय वजन कमी होणे
  लघवीतून रक्त जाणे
  प्लीहांमध्ये नरमपणा जाणवणे 
  ऑस्लर्स नोड्‌स (यामध्ये हातापायाच्या बोटांच्या त्वचेखाली लाल, रंगाचे मऊसर डाग दिसतात)
ही लक्षणेही जाणवतात. ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्‍टरांना दाखवा.

कारणे
  हुळहुळ्या त्वचेसारख्या एखाद्या प्रादुर्भाव झालेल्या भागातून जिवाणू पसरू शकतात. याशिवाय हिरड्यांचे विकार, लैंगिक संबंधांतून वहन झालेला प्रादुर्भाव किंवा इनफ्लेमेटरी बॉवेल डिसिजसारख्या आतड्यांच्या विकारामुळे जिवाणू रुग्णाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
  टॅटूइंग किंवा बॉडी पिअर्सिंगसाठी वापरलेल्या सुयांमार्फत एण्डाकार्डिटिसला कारणीभूत ठरणारे जिवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
  दूषित सुया व सिरिंजेसमुळेही हा विकार होऊ शकतो. हेरॉइन किंवा कोकेनसारखे बेकायदा अमली पदार्थ घेण्यासाठी इंट्राव्हेन्युअस अर्थात आयव्ही वापरणाऱ्यांना याचा अधिक धोका असतो. अशा प्रकारचे अमली पदार्थ घेणाऱ्यांना सहसा स्वच्छ, न वापरलेल्या सुया किंवा सिरिंजेस उपलब्ध होत नाहीत.
  काही दंतवैद्यकीय प्रक्रियांमध्ये हिरड्यांना छेद दिला जातो. यामुळे जिवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.

उपचार
एण्डोकार्डिटिसवरील उपचार रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती, प्रादुर्भावाची तीव्रता, हृदयातील झडपांना झालेली जखम आदी घटकांवर अवलंबून असतात. हृदयरोगतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्‍यक असते. निदान निश्‍चित करण्यासाठी टू एकोकार्डिओग्राफी, ब्लड कल्चर चाचणी अशा चाचण्या कराव्या लागतात. बहुतेकदा रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागते. एण्डोकार्डिटिसच्या रुग्णांना प्रतिजैवके दिली जातात. ही प्रतिजैवके इंट्राव्हेनस मार्गाने अर्थात ड्रिपद्वारे दिली जातात. प्रतिजैवक उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णांना घरी सोडल्यानंतरही त्यांना न चुकता प्रतिजैवके घ्यावी लागतात. याशिवाय रुग्णाला डॉक्‍टरांकडे नियमित फॉलो-अपसाठी जावे लागते आणि रोगमुक्तीच्या प्रक्रियेबद्दल सजग राहावे लागते. त्यामुळे पूर्वपदावर येण्यासाठी रुग्णाने डॉक्‍टरांच्या सल्ल्याचे कसून पालन करावे. डॉक्‍टरांना कल्पना न देता स्वत:हून औषधे घेणे किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

एवढेच नाही, तर एण्डोकार्डिटिसमुळे हृदयाचे नुकसान झालेले असेल, तर रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी करून एण्डोकार्डिटिसमुळे झडपेत झालेला बिघाड दुरुस्त करावा लागतो. हृदयाच्या झडपेचे ती पुरेशी घट्ट बंद होणार नाही इतके नुकसान झाले असेल व त्यामुळे रक्ताचा प्रवाह उलट्या दिशेने जात असेल, तर शस्त्रक्रियेखेरीज पर्याय उरत नाही. एखाद्याला सातत्याने प्रादुर्भाव होत असेल आणि तो प्रतिजैवक किंवा बुरशीनाशक औषधांना प्रतिसाद देत नसेल किंवा जिवाणू आणि पेशींचा मोठा गुंता तयार झाला असेल किंवा हृदयाच्या झडपेला लागून काही वाढ (व्हेजिटेशन) झाली असेल, तरीही शस्त्रक्रिया आवश्‍यक ठरते. थोडक्‍यात, हृदयाला झालेली हानी दुरुस्त करण्यासाठी किंवा नुकसान झालेल्या हृदयाच्या झडपा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय ठरतो.

इन्फेक्‍टिव एण्डोकार्डिटिसचे एकंदर निदान तो कोणत्या प्रकारच्या जिवाणूंमुळे झाला आहे, हृदयाच्या कोणत्या झडपांना प्रादुर्भाव झाला आहे, शरीराची प्रतिजैवकांप्रती असलेली संवेदनशीलता आणि रुग्ण प्रतिजैवकांना देत असलेला प्रतिसाद यांवर अवलंबून आहे. 

प्रतिबंधात्मक उपाय
एण्डोकार्डिटिसच्या खुणा व लक्षणांची माहिती असणे आवश्‍यक आहे. या आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित तुमच्या डॉक्‍टरांना दाखवा. विशेषत: न उतरणारा ताप, तापामुळे पुन्हापुन्हा दवाखान्यात दाखल व्हावे लागणे, कारणाशिवाय थकवा येणे, त्वचेला झालेला प्रादुर्भाव, बऱ्या न होणाऱ्या उघड्या जखमा किंवा छेद, त्वचेला प्रादुर्भाव ओढवण्याचा धोका असलेल्या बॉडी पीअर्सिंग किंवा टॅटू काढण्यासारख्या बाबी टाळा. आयव्हीद्वारे औषधे अतिप्रमाणात घेऊ नका. यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा उजव्या झडपेचा एण्डोकार्डिटिस होऊ शकतो. हा बहुतेकदा बुरशीमुळे झालेला असू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heart swelling Sickness Healthcare