या देहीचे, त्या देही...

Heart-Transplantation
Heart-Transplantation

गेल्या काही वर्षांत अवयवदानाच्या चळवळीने मूळ धरले आहे. हृदय, यकृत, मूत्रपिंड, त्वचा अशा अनेक अवयवघटकांचे दान केले जाते. यातील हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया किचकट, गुंतागुंतीची आणि अत्यंत कमी वेळात पार पाडावी लागते. त्यासाठी प्रचंड यंत्रणा राबवावी लागते, तसेच नातेवाइकांची संमती, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समाजसेवी, तज्ज्ञ डॉक्‍टर असतील तर ही प्रक्रिया झटपट होते. सामान्य व्यक्तीलाही हा मार्ग कसा अवलंबता येतो, याविषयी...

हृदय प्रत्यारोपण म्हणजेच ‘हार्ट ट्रान्स्प्लांटेशन’ हा विषय गेले वर्ष-दोन वर्षे चर्चेमध्ये आहे. ज्या व्यक्तीचे हृदय कुठल्याही कारणामुळे जर पूर्णपणे निकामी झालेले असेल, त्या व्यक्तीची आयुर्मर्यादा दोन वर्षांपेक्षा कमी आहे, असा डॉक्‍टरांचा अंदाज असेल, अशा व्यक्तीला नवीन, सशक्त, निरोगी हृदय बसवणे यास हृदय प्रत्यारोपण किंवा ‘हार्ट ट्रान्स्प्लांटेशन’ म्हणतात.

ज्या व्यक्तीच्या शरीरात हृदय बसवले जाते, अशा व्यक्तीला ‘रेसिपियंट’ म्हटलं जातं आणि ज्या व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढून घेतलं जातं, अशा व्यक्तींना ‘डोनर’ म्हटलं जातं. डोनर व्यक्ती ही मेंदू मृत (ब्रेन डेड) असते. वाहनांच्या अपघातामुळे मेंदूला मार बसून मेंदू निकामी झालेला आहे, परंतु हृदय शाबूत आहे आणि अजूनही काम करत आहे, अशी व्यक्ती ‘आयसीयू’मध्ये व्हेन्टिलेटरवर असते. अशा व्यक्तीचे निरोगी हृदय प्रत्यारोपणासाठी वापरले जाते. 

आपल्या घरातील एखादी प्रिय व्यक्ती जी तरुण आहे आणि ‘आयसीयू’मध्ये ब्रेन डेड झालेली आहे, अशा व्यक्तीचे हृदयदान करण्याचा निर्णय घेणं, हे त्या कुटुंबाला खूप अवघड असतं. पण जर 

समाजामध्ये याबद्दलची जागृती वाढली आणि जे जरा दूरचे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत, ज्यांची भावनिक गुंतवणूक या ‘ब्रेन डेड’ व्यक्तीमध्ये थोडीशी कमी, अशांनी सारासार विचार करून या कुटुंबाला अवयव दानासाठी उद्युक्त करणे फार महत्त्वाचे ठरते. यामध्ये कायद्याची बाजू समजून सांगण्यापासून ते दानासाठी नातेवाइकांची सहमती घेण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा असतो आणि सर्व रुग्णालयांमध्ये अशी मंडळी उत्तम कामगिरी करत असतात.

झटपट निर्णय महत्त्वाचा
‘रेसिपियंट’ व्यक्ती ही मृत्यूच्या छायेतच वावरत असते. मोठे खर्च, परत परत वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागणे, यामुळे ती त्रस्त असते. मृत्यू अटळ आहे, ही भावना घेऊन जगणं ही अतिशय दुर्दैवी आणि अवघड गोष्ट असते. अशा व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची संजीवनी दिल्यास त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. 

रेसिपियंट व्यक्ती ही सर्व प्रकारच्या चाचण्या करून प्रत्यारोपणासाठी सज्ज झाल्यावर घरामध्ये ‘फोन कॉल’कडे डोळे लावून बसलेली असते. एखाद्या ‘आयसीयू’मध्ये ब्रेन डेड व्यक्ती आहे आणि तिचे हृदय चांगले आहे, हे जेव्हा विभागीय प्रत्यारोपण कमिटीला (झेडटीसीसी) कळते, त्या वेळेला कुठल्या रुग्णालयामध्ये पुढचा योग्य रेसिपियंट आहे, त्या रुग्णालयाला ही माहिती कळविली जाते. या रुग्णालयाचे शल्यविशारद आणि त्यांचे पथक दाता असलेल्या रुग्णालयामध्ये पोचते. अशा दाता व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून, त्याचे हृदय काढून ‘प्रिझर्व्हेटिव्हज’मध्ये आणि बर्फामध्ये ठेवून, रेसिपियंट असलेल्या रुग्णालयामध्ये आणले जाते. दरम्यानच्या काळात, रेसिपियंट व्यक्तीला रुग्णालयामध्ये आणून शस्त्रक्रियेसाठी तयार ठेवलेले असते. हे नवीन हृदय रेसिपियंटचे निकामी झालेले हृदय काढून तिथे बसवले जाते. हा अद्‌भुत चमत्कार आहे, की नवीन जागी ते बसवताच आणि त्याच्यातून रक्तप्रवाह सुरू होताच, हे नवीन हृदय धडधडायला लागते. त्या रेसिपियंटला नवीन आयुष्य मिळते. 

पाचशेवर हृदय प्रत्यारोपण
या सर्व प्रक्रियेला फक्त चारच तासांचा अवधी असतो, त्यामुळे अचूक निर्णय, संबंधित यंत्रणा आणि पथकातील प्रत्येकाची जलद हालचाल, समन्वय, आर्थिक व्यवस्था, ग्रीन कॉरिडॉर, विमान किंवा रस्त्याद्वारे ते आणणे या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात. भारतामध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये पाचशेहून अधिक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्यातील महाराष्ट्रामध्ये १०३ आणि पुण्यामध्ये गेल्या एका वर्षांमध्ये तेरा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. गरजू रेसिपियंटची संख्या ही लाखामध्ये आहे आणि मिळणाऱ्या हृदयांची संख्या बोटावरती मोजण्याइतकी आहे. ही तफावत हळूहळू दूर व्हायला हवी.

हृदय प्रत्यारोपणासाठी येणारा खर्च सुमारे वीस-पंचवीस लाख रुपयांपर्यंत असतो. हा खर्चाचा आकडा ऐकूनच त्याबद्दल एक नकारात्मक वातावरण तयार होते. तथापि, सरकारच्या काही योजना, सेवाभावी संस्था आणि काही देणग्यांनी बऱ्यांपैकी पैसे उभे राहू शकतात. त्यासाठी याकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती योग्य कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन, योग्य ते मार्गदर्शन आणि नाव नोंदणी करतात. एव्हरेस्टवरील मोहिमेकरिता एका व्यक्तीला जवळ जवळ तीस लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे एखाद्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्तीला नवीन हृदय बसविण्यासाठी हा खर्च अवाजवी आहे का? वेगाने बदलत्या राहणीमानामध्ये एक नवीन वन बीएचके फ्लॅट २५-३० लाखांचा असू शकतो, तर नवीन हृदय आणि नवीन जीवनासाठी असलेली किंमत ही योग्य आहे की नाही, याचा विचार करायला हरकत नाही. 

कोणत्याही प्रकारच्या अवयव दानाबद्दल समाज प्रबोधन होण्याची खूप गरज आहे. ‘ब्रेन डेड’ हा शब्द ऐकल्याबरोबर संबंधित व्यक्तींनी जबाबदारीने निर्णय घेण्याची गरज असते. अवयवदान सर्वांत महान दान म्हटलं जातं आणि हे करून आपली प्रिय व्यक्ती कोणाच्या तरी उपयोगी आली, आपल्या प्रिय व्यक्तीचे हृदय कोणाच्या तरी शरीरात धडधडतंय, ही भावना अलौकिक असू शकते. याचा सारासार विचार झाला तर अवयव दानाचे प्रमाण यापुढे वाढत जाईल, याची खात्री वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com