पवित्रगंध तुळशी व आमलकी रसायन 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 8 November 2019

 तुळशी तिच्या नुसत्या असण्यानेसुद्धा खूप मदत करत असते. रोगसंक्रामक जीवजंतूंना थोपवण्याचे काम करण्यासाठी जणू तुळशी दारात लावण्याची पद्धत असावी. तर, आवळ्याच्या झाडाखाली श्रीविष्णूंचा वास असतो, असे भारतीय संस्कृतीत समजले जाते. 

 तुळशी तिच्या नुसत्या असण्यानेसुद्धा खूप मदत करत असते. रोगसंक्रामक जीवजंतूंना थोपवण्याचे काम करण्यासाठी जणू तुळशी दारात लावण्याची पद्धत असावी. तर, आवळ्याच्या झाडाखाली श्रीविष्णूंचा वास असतो, असे भारतीय संस्कृतीत समजले जाते. 

पर्यावरण, निसर्ग यांचे महत्त्व आज सर्वांना कळून चुकलेले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे म्हणून आज सर्व स्तरांवर युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसतात. आयुर्वेद व भारतीय संस्कृतीने मात्र हजारो वर्षांपूर्वीच अशा योजना करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून पिढ्यान्‌ पिढ्या पर्यावरणाचा, निसर्गाचा समृद्ध वारसा आपसूकच जतन केला जाईल. याचेच एक उदाहरण म्हणजे तुळशीविवाह आणि आवळीपूजन. तुळशीचे झाड घराघरांत असते. तुळशी छोटी असल्याने कुंडीतही लावता येते. तुळशीवृंदावन तर खास तुळशी लावण्यासाठीच बनविलेले असते. आवळ्याचे मात्र मोठे झाड असते, त्यामुळे आवळा बागेत जमिनीवर लावला जातो. 

तुळशी तिच्या नुसत्या असण्यानेसुद्धा खूप मदत करत असते. रोगसंक्रामक जीवजंतूंना थोपवण्याचे काम करण्यासाठी जणू तुळशी दारात लावण्याची पद्धत असावी. 

तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीची पाने, मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते. 

आयुर्वेदिक औषधे बनविताना तुळशीच्या पंचांगांचा म्हणजे पाने, फुले, बिया, देठ, मूळ या सर्वांचा वापर केला जातो. घरच्या घरी मात्र सहसा तुळशीची पाने वापरली जातात. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळशी अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली, की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) असली, की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो. 

- थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील, तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो. 

- लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन म्हणजे अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो. 

- तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळशी उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते. 

- शरीरात कुठेही जडपण, जखडलेपण जाणवत असेल, तर त्यावर तुळशी उपयोगी पडते. डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्‍यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो. सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल, तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते. 

- पचन संस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात, अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते. 

आवळ्याचे महत्त्व 
आवळ्याच्या झाडाखाली श्रीविष्णूंचा वास असतो, असे भारतीय संस्कृतीत समजले जाते. 

आवळा रसायन गुणाचा आणि तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ समजला जात असल्याने बहुतेक सर्व रसायनांमध्ये असतोच. च्यवनप्राश, ब्राह्मरसायन, आमलकावलेह, धात्री रसायन वगैरे रसायनांमध्ये आवळा हाच मुख्य घटक असतो. 

- पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे पाव चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते. 

- डोळ्यांची आग होत असल्यास पाच-सहा तास पाण्यात भिजवलेली आवळकाठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याचा फायदा होतो. 

- पोटात, छातीत, घशात पित्तामुळे जळजळत असेल, तर पाव चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात अर्धा चमचा साखर व एक चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते. 

- नाकातून रक्‍त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्‍त येणे थांबते. 

- आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताजे आवळे मिळणाऱ्या दिवसांत रोज एका आवळ्याचा रस, त्यात खडीसाखर व जिऱ्याची पूड टाकून तयार केलेले मिश्रण घ्यावे. याने फार चांगला गुण येतो. 

- आवळा, गोखरू आणि गुळवेल यांचे समभाग चूर्ण तूप-साखरेसह घेण्याने धातुवृद्धी होते, शक्‍ती वाढते. थकवा दूर होण्यास मदत मिळते. आवळ्याचा ताजा रस व तूप यांचे मिश्रण घेण्याने वीर्यवृद्धी होते. 

- आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्याच रसाच्या अनेक भावना देऊन तयार झालेले चूर्ण, साखर, मध व तूप यांचे मिश्रण सेवन केल्यास वय वाढले तरी म्हातारपणामुळे होणारे त्रास होत नाहीत, असे सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले आहे. तारुण्य टिकून राहण्याच्या दृष्टीने जी अभ्यंग तेले सांगितलेली आहेत, त्यांत आवळा असतोच. 

- आवळ्याचे चूर्ण उटण्याप्रमाणे वापरण्याने त्वचा स्वच्छ तर होतेच; पण सुरकुत्या पडत नाहीत, कांती उत्तम राहते, काळसरपणा दूर होतो. त्वचेवर खरूज होते, त्यावर आवळकाठी जाळून तयार झालेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो. 

- आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून तीन दिवस घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून जाणे थांबते. आवळ्याच्या बिया (बियांचे कडक कवच फोडल्यावर निघणाऱ्या आतील छोट्या बिया) मात्र मदकारक असल्याने त्यांची मात्रा वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले. 

- अंगावरून पांढरे जात असताना आवळा व हळद यांच्या काढ्याने योनीभाग धुण्याचा उपयोग होतो. 

- पित्त वाढल्यामुळे पाळीच्या दिवसांत अतिरक्‍तस्राव होत असल्यास आवळ्याच्या रसात खडीसाखर टाकून घेण्याचा उपयोग होतो. 

- योनीच्या ठिकाणी जळत असल्यासही आवळ्याचा रस साखर टाकून घेण्याचा उपयोग होतो. 

- एक किंवा दोन ताज्या आवळ्याचा रस, पाव चमचा हळद पूड, अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेणे प्रमेहामध्ये हितकर असते. यामुळे लघवी साफ होण्यासही मदत मिळते. 

- शीतल वीर्यामुळे आवळा तापातही हितकर असतो. विशेषतः पित्तामुळे आलेल्या तापात आवळ्याच्या काढ्यात साखर व मध टाकून घेण्याने बरे वाटते. 

- जीर्ण ज्वरामध्ये म्हणजे अंगात मुरलेल्या तापावर आवळ्याने सिद्ध केलेले तूप घेण्याचा उपयोग होतो. 

असा करा मोरावळा 
कार्तिक, मार्गशीर्ष वगैरे महिन्यांमध्ये ताजा आवळा सहज उपलब्ध असतो. वर्षभर वापरता यावा यासाठी आवळ्याचा मोरावळा करून ठेवण्याची पद्धत आहे. मोरावळा अनेक प्रकारांनी करता येतो; मात्र त्यातल्या त्यात सोपी व सर्वांना जमेल अशी पद्धत याप्रमाणे होय. 

ताजे आवळे स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. त्यांना टोचणीच्या साहाय्याने बीपर्यंत टोचावे. उकळत्या पाण्यात टाकून थोडे शिजवावेत. बाहेर काढून सुती कापडाने पुसून कोरडे करावेत. साखर किंवा खडीसाखरेच्या चार तारी पाकात आवळे बुडवून ठेवावेत. असा हा मोरावळा वर्षभर खाता येतो आणि दोन-तीन वर्षेदेखील चांगला टिकतो. 

आवळ्याच्या पाचक, रुचिवर्धक वड्यासुद्धा करून ठेवता येतात. आवळे उकडून त्यांचा गर वाटून घ्यावा. त्यात जिरे, मिरे, धणे, सुंठ, दालचिनी, सैंधव यांचे चूर्ण मिसळावे. याच्या वड्या करून उन्हात वाळवाव्यात. जेवणाच्या आधी अशी वडी खाण्याने भूक लागते, रुची वाढते, तसेच अन्न पचण्यासही मदत मिळते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holy odor basil article written by Dr Shree Balaji Tambe