जागतिक मधुमेह दिन : जागरूक राहा अन् मधुमेह टाळा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

नियमित तपासणी आणि उपचार आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टरांचे मत
 

मुंबई ः मधुमेह रोगावर नियंत्रण ठेवणे सहजशक्‍य आहे. मधुमेहातून हृदयाशी संबंधित अन्य विकार आणि श्‍वास घेण्यात अडचण, थकवा, पायांवर सूज आदी तक्रारी उद्‌भवू शकतात. त्यामुळे मधुमेहींनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा तज्ज्ञ डॉक्‍टरांनी गुरुवारी (ता. १४) असलेल्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त दिला.

सध्या भारतात सात कोटी मधुमेही रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार २०३० वर्षापर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या १० कोटी झालेली असेल. अन्य विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीयांना मधुमेह १० वर्षे आधीच होतो. मधुमेह आणि हृदयविकार यांचाही संबंध असल्याचे डॉक्‍टरांचे अनुमान आहे. क्रॉनिक हार्ट फेल्युअरचा त्रास असलेल्या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांना टाईप टू मधुमेह असतो, असेही आकडेवारीतून दिसून येते.

इस्केमिक हृदयविकार आणि मधुमेह व हायपरटेन्शनसारख्या विकारांचे प्रमाण वाढीस लागल्याने हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, असे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ देव पहलाजानी यांनी सांगितले. मधुमेही रुग्णांनी स्वत:ची नियमित तपासणी करून घेणे अत्यावश्‍यक आहे. प्रगत उपचारांना जीवनशैलीतील बदलांची जोड मिळाल्यास रुग्णांची तब्येत सुधारू शकते. काही काळ उपचार घेतल्यानंतर लक्षणे दिसेनाशी होतात आणि रुग्ण उपचार सोडून देतात. मात्र, त्यामुळे विकार आणखी बळावू शकतो. त्यामुळे सतत उपचार घेत राहणे अत्यावश्‍यक आहे, असेही डॉक्‍टर सांगतात.

अशी लक्षणे असतील तर काळजी घ्या
मधुमेहाच्या रुग्णांना श्‍वास घेण्यात अडचण, सतत जाणवणारा थकवा व संथपणा, ग्लुकोजची अनियंत्रित पातळी आणि घोटे, पाय व पोटावर फुगवटा येणे आदी लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मधुमेहींनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेहींना दृष्टीदोषाचाही त्रास होऊ शकतो. मधुमेहींनी दर सहा महिन्यांनी डोळे तपासून घ्यावेत, असे बॉम्बे रुग्णालयातील नेत्रविकारतज्ज्ञ सर्जन अजय दुदानी 
यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to avoid diabetes