आर्द्रता मैत्रीण दम्याची

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 July 2019

पावसाळी जड हवेत श्‍वास घेणे काहींना अवघड होते. फुफ्फुसांचा संकोच झाल्याने पूर्ण क्षमतेने श्‍वास घेता येत नाही. असा दमा रुग्णाबरोबर उपचार करणाऱ्या वैद्यांनाही  ‘दम’वतो.

पावसाळी जड हवेत श्‍वास घेणे काहींना अवघड होते. फुफ्फुसांचा संकोच झाल्याने पूर्ण क्षमतेने श्‍वास घेता येत नाही. असा दमा रुग्णाबरोबर उपचार करणाऱ्या वैद्यांनाही  ‘दम’वतो.

शरीर हे पंचमहाभूतांचेच बनलेले आहे व त्याची पुष्टीपण पंचमहाभूतांच्या मदतीनेच होते. पृथ्वी आणि जल ही त्यातील महत्त्वाची दोन तत्त्वे; कारण मनुष्यदेहात या दोन तत्त्वांचे आधिक्‍य आहे. जागेचे भाव दिवसेंदिवस आकाशाला पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सर्वसामान्य माणसाला जागा व अन्न या दोन्ही गोष्टी आवाक्‍यापलीकडच्या झालेल्या आहेत. पाण्याची दुर्मीळता तर सर्वांच्याच परिचयाची आहे. प्रत्येक सहा महिन्याला इंधनाच्या आणि सिलिंडरच्या किमती वाढतच राहतात व विजेचे वाढीव दर देण्याची तयारी असली, तरी मुळात वीज खंडित पद्धतीने व काही ठिकाणी कमी दाबाने मिळते. म्हणजेच अग्नितत्त्व उपलब्ध करून घेण्यासाठी डोळ्यापुढे चमकणाऱ्या काजव्यांवरच अवलंबून राहावे लागते. आकाशतत्त्व तर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचेच! खाली मान घालून काम करत राहावे किंवा जुलूम सहन करत राहावा, या सवयीमुळे वर आकाशाकडे साधे पाहणेही अनेकांना जमत नाही आणि आता राहता राहिले एकच तत्त्व आणि ते म्हणजे वायूतत्त्व. त्यातही वायूतत्त्वात प्रदूषणाची भर पडल्यानंतर काही लोक ऑक्‍सिजन बारमध्ये जाऊन शुद्ध हवा विकत घेण्याचा प्रयत्न करतात किंवा शहराबाहेर सुंदरशा, टुमदार खेडेगावात राहून किंवा शुद्ध हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊन चांगल्या वायूतत्त्वाची प्राप्ती करून घेतात. 

आपण श्वास घेतो तेव्हा वायुतत्त्वाबरोबर प्राणतत्त्व, जीवनतत्त्व शरीरामध्ये प्रवेश करते, शरीरात व्याप्त होते आणि त्यावर शरीर चालते. मात्र जर पर्यावरणातील अशुद्धीमुळे वायुतत्त्वही अशुद्ध असेल, तर त्यामुळे प्राणाला अडथळा येणारच. मात्र अडथळा येण्यामागे तेवढे एकच कारण असू शकत नाही. पर्यावरण जरी शुद्ध असले तरी प्राणशक्‍तीचे शरीरात आकर्षण व्हावे, यासाठी प्राणायामाची मोठी आवश्‍यकता असते. 

पावसाळ्यात हवेत असणारी आर्द्रता हवा जड करत असल्याने अशी हवा फुप्फुसांमध्ये घेणे असेही अवघडच असते. म्हणून दमेकऱ्यांना पावसाच्या दिवसांत अनेक त्रास होताना दिसतात. फुप्फुसांचा संकोच झाला, तर त्याचाही श्वसनाला त्रास होणे स्वाभाविक असते; म्हणून दमेकरी रुग्णांना थंडीच्या दिवसातही त्रास होतो. एकूणच हवा शुद्ध ठेवणे, पर्यावरण शुद्ध ठेवणे याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. 

श्वासासंबंधीच्या सर्व विकारांमध्ये, दम्यामध्येसुद्धा प्राणायामाचे महत्त्व सर्वांत अधिक दिसून येते. प्राणायामाचे दोन फायदे असतात. एक तर प्राणशक्‍तीचे आवाहन होते, प्राणशक्‍तीचे आकर्षण होते आणि बरोबरीने शरीरातील अग्नितत्त्वाचेही संतुलन होते. दमा बरा करण्यासाठी या अग्नितत्त्वाचेही योगदान मोठे असते. योग आणि प्राणायाम करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागत असला, थोडे कष्ट घ्यावे लागत असले तरी दमेकरी व्यक्‍तीने ते अवश्‍य घ्यावेत; म्हणजे औषधांच्या बरोबरीने या गोष्टी करण्याने रोग बरा होण्याची शक्‍यता वाढेल, निदान दम्याचा त्रास तरी होणार नाही.

परमेश्वर ही एक सार्वभौमिक सत्ता आहे आणि साहजिकच आपल्या मानवी सरकारचे जेथे काही चालत नाही तेथे परमेश्वरी इच्छा बलीयसी ठरते. एकुलती एक विनामूल्य मिळालेली, हवीहवीशी वाटणारी हवा व प्राणशक्‍ती कधी कधी परमेश्वरी इच्छेने मिळू शकत नाही. प्राणवायूचा आणि हवेचा बाहेर भरपूर पुरवठा असला तरी आत, फुफ्फुसात श्वास पोहोचू शकत नाही. या परिस्थितीला केवळ नशीबच म्हणजे पर्यायाने परमेश्वरच जबाबदार आहे, असे म्हणून समजूत करून घ्यावी लागते. श्वास आत घेता न येणे याला जेव्हा श्वसनसंस्था जबाबदार असते, तेव्हा त्याला ‘दमा’ म्हणावे का, असा विचार करावा लागतो. काही बारीकसारीक कारणे, जसे नको त्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी गार पाण्याने स्नान किंवा तिखट, आंबट पदार्थ खाणे किंवा आईस्क्रिम खाणे ही दमा होण्यास कारणीभूत असली तरी हे एक केवळ निमित्त असू शकते. एकूण ही परमेश्वराची म्हणजेच निसर्गाची खफामर्जीच आहे. त्यामुळेच दम्याचा संबंध आनुवंशिकतेशी जोडला जातो व दमा हा विकार जवळजवळ कष्टसाध्य वा असाध्य रोगात मोडला जातो.

रासायनिक तीव्र औषधांचा उदा. स्टिरॉइडसारख्या औषधांचा उपयोग करावा तर बरेच वेळा दमा दबून राहिला तरी त्वचाविकार किंवा मूत्रविकार उद्‌भवू शकतात. आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे दम्याविषयी सखोल विचार करून चांगली व सोपी औषधे आणि उपाययोजना सुचवलेल्या आहेत. बऱ्याच मर्यादेत इतर त्रास किंवा विपरीत परिणाम टाळून दम्यावर उपचार करता येतो. घराण्यात अनेकांना दम्याचा त्रास झाला असल्यास किंवा होत असल्यास सुरवातीपासूनच काळजी घ्यावी. आईवडिलांपैकी कोणालाही किंवा त्यांच्या घराण्यात पूर्वी कोणाला दम्याचा त्रास झालेला असल्यास, जन्माला येणाऱ्या लहान मुलांना रोगाचा प्रादुर्भाव होईपर्यंत न थांबता आधीच उपाययोजना करावी. दमेकऱ्यांनी प्रत्येक वेळेस अटॅक येईपर्यंत न थांबता किंवा ज्या विशिष्ट ऋतूमध्ये त्रास वाढतो, तोपर्यंत न थांबता पंचकर्मादी उपचार करवून, प्राणायाम व योग यांचा नेहमी अभ्यास ठेवून सितोपलादी चूर्ण, त्रिभुवनकीर्ती, श्वासकुठार, बृहतश्वासचिंतामणी किंवा प्राणायाम योग यापैकी काही औषधांचा, उपायांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार वापर करावा.

या रोगाला ‘दमा’ असे म्हणतात; कारण तो रोग्यालाच नाही तर वैद्यालाही ‘दम’वतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humidity asthma