अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) पंचकर्मातील बस्तीचे महत्त्व

अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) पंचकर्मातील बस्तीचे महत्त्व

बस्ती जरी आतड्यात पोचत असली तरी तिचे कार्य फक्‍त आतड्यापुरते मर्यादित नसते किंवा पोट साफ होण्यापुरते सीमित नसते, तर योग्य प्रकारे दिलेली बस्ती संपूर्ण शरीरावर काम करत असते. बस्ती योग्य तऱ्हेने योजली तर कोणताही रोग दूर करू शकते. बस्ती हा उपचार आरोग्य टिकविण्यासाठी व रोग बरा होण्यासाठी सर्वतोपरी उपयुक्‍त असतो.

मागच्या आठवड्यात आपण सर्व उपसस्त्रांमध्ये जळू सर्वांत महत्त्वाची असते हे पाहिले. आता या पुढचा विषय पाहू या. 

बस्तिः तन्त्राणाम्‌ - सर्व कर्मांमध्ये बस्ती हा उपचार अग्रणी असतो. 

आयुर्वेदात नेत्रबस्ती, शिरोबस्ती, जानुबस्ती वगैरे निरनिराळ्या प्रकारच्या बस्ती सांगितलेल्या असल्या तरी या ठिकाणी बस्ती म्हणजे गुदद्वारातून आतड्यात घेतली जाणारी ‘एनिमा बस्ती’ अपेक्षित आहे. 

बस्ती जरी आतड्यात पोचत असली तरी तिचे कार्य फक्‍त आतड्यापुरते मर्यादित नसते किंवा पोट साफ होण्यापुरते सीमित नसते तर योग्य प्रकारे दिलेली बस्ती संपूर्ण शरीरावर काम करत असते. बस्तीच्या मार्फत विविध तऱ्हेची कार्ये घडू शकतात. उदा. शरीरशुद्धी होऊ शकते, शरीरातील त्रिदोष संतुलित होऊ शकतात, मेदधातूसारखा एखादा धातू अवाजवी प्रमाणात वाढला असला तर त्याला बाहेर काढता येते, धातूंचे पोषण करता येते, शुक्रदोष दूर करता येतात, तारुण्य टिकविण्यासाठी, रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी प्रयत्न करता येतात वगैरे. बस्ती योग्य तऱ्हेने योजली तर कोणताही रोग दूर करू शकते असे चरकाचार्यांनी सांगितले आहे. बस्तीची उपयुक्‍तता पुढील सूत्रांवरून स्पष्ट होते,

बस्तिर्वयस्थापयिता सुखायुर्बलाग्निर्मेधा स्वरवर्णकृत्‌ च ।
सर्वार्थकारी शिशुवृद्धयूनां निरत्ययः सर्वगदापहाश्‍च ।।
विट्‌श्लेष्मपित्तानिलमूत्रकर्षी दार्ढ्यावहः शुक्रबलप्रदश्‍च ।
विश्वग्‌स्थितं दोषचयं निरस्य सर्वान्‌ विकारान्‌ शमयेत्‌ निरुहः ।।
...चरकसंहिता

 बस्ती धातूंचे पोषण करते व म्हातारपण येण्यास प्रतिबंध करते. 
 आयुष्य वाढवते व ते निरोगी असेल याची खात्री देते. 
 आवाज, अग्नी, मेधा यांचे वर्धन करते. 
 बालक तसेच वृद्ध व्यक्‍तींना सहजपण देता येते. 
 युक्‍तिपूर्वक योजल्यास सर्व प्रकारचे रोग बरे करू शकते.
 मल, कफ, पित्त, वात, मूत्र यांची शुद्धी करते. 
 शरीराला दृढ करते. 
 शुक्रधातूचे पोषण करते, ताकद वाढवते. 

 विशेषतः निरुह बस्ती (म्हणजे काढ्याची बस्ती) संपूर्ण शरीरात कोठेही दोष साठून राहिले असतील तर ते शरीराबाहेर काढण्यास सक्षम असते. 

काश्‍यपसंहितेत सुद्धा बस्ती लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठीही अमृतासमान गुणकारी असते असे सांगितले आहे.  

वात, पित्त व कफ या त्रिदोषांमध्ये सर्वांत महत्त्वाचा असतो वात. कारण हलनचलनाची क्षमता फक्‍त वातातच असते. सृष्टीची आणि शरीराची एकमेकांशी तुलना करताना वाताची वाऱ्याशी, सूर्याची पित्ताशी व चंद्राची कफाशी तुलना केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण सृष्टीत अनुभव घेतो की या तिघांपैकी जसा वाराच विद्‌ध्वंसाचे कारण असतो, तसे शरीरातही वातदोषच बिघाडाचे मुख्य कारण असतो. जोपर्यंत वाततत्त्व संतुलित आहे तोपर्यंत पित्त व कफसुद्धा आपापली कामे व्यवस्थित करत असतात. मात्र बिघडलेल्या वाताला थांबवण्याचे सामर्थ्य फक्‍त बस्तीत असते. या संबंधात सुश्रुत संहितेत सुंदर रूपक दिलेले आहे,

पवनाविद्ध तोयस्य वेलावेगमिबोधये ।
...सुश्रुत चिकित्सा

वाऱ्यामुळे समुद्रात आलेले वादळ केवळ समुद्राच्या लाटाच सहन करू शकतात, त्याप्रमाणे शरीरातील वातदोषाचा प्रकोप फक्‍त बस्ती उपचाराच्या मदतीनेच आटोक्‍यात आणता येऊ शकतो. 

बस्ती दिली जाते गुदामार्फत आतड्यांमधे, मग ती संपूर्ण शरीरावर काम कसे करू शकते हे समजावण्यासाठी सुद्धा उदाहरण दिले आहे की, ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे मूळ छेदले तर त्याच्या फांद्या, पाने, फुले, फळे, अंकुर सर्वच नष्ट होते, त्याप्रमाणे वाताचे मूळ स्थान असणाऱ्या पक्वाशयात बस्तीचा प्रवेश होत असल्याने बस्ती संपूर्ण शरीरावर काम करू शकते. अनुवासन बस्तीच्या मदतीने संपूर्ण शरीराचे पोषण कशा प्रकारे होऊ शकते हे समजावण्यासाठीसुद्धा हेच उदाहरण दिले जाते. 

मूले निषिक्‍तो हि यथा द्रुमः स्यात्‌ नीलच्छदः कोमलपल्लवाग्रः । 
काले महान्‌ पुष्पफलप्रदश्‍च तथा नरः स्याद्‌ अनुवासनेन ।।
...चरक सिद्धस्थान

मुळाला योग्य ते पोषण, खत, पाणी वगैरे मिळाले तर ज्याप्रमाणे संपूर्ण वृक्ष पल्लवित होतो, त्याला क्रमाने फुले, फळे येतात त्याप्रमाणे अनुवासन बस्तीमुळे संपूर्ण शरीराचे पोषण होते, शरीराचे बल, वीर्य वाढण्यास मदत मिळते व अपत्यप्राप्तीचे सामर्थ्य येते. 
थोडक्‍यात बस्ती हा उपचार आरोग्य टिकविण्यासाठी व रोग बरा होण्यासाठी सर्वतोपरी उपयुक्‍त होय.

अग्र्यसंग्रहातील यापुढच्या विषयाची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com