esakal | जागतिक महिला दिन - स्त्री संतुलनाचे महत्त्व 
sakal

बोलून बातमी शोधा

The importance of female balance

जागतिक महिला दिन - स्त्री संतुलनाचे महत्त्व 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

भारतीय संस्कृतीत तर स्त्रीला घरात साक्षात लक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. घर सांभाळणे, उपजीविकेसाठी काम करणे, पाहुणे असोत, नातेवाईक असोत, मित्रमंडळी असोत या सर्वांचा मान राखणे, त्यांची काळजी घेणे, घराला घरपण देणे हे सर्व ‘स्त्री’च करू जाणे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पेलायची असेल तर स्त्रीला तिचे ‘स्त्री’त्व जपायला हवे. कारण स्त्री संतुलनावरच स्त्रीची शक्‍ती, आरोग्य, उत्साह, सौंदर्य, स्वभावातील मृदुता या सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्वचेच्या सुकुमारतेपासून ते आकर्षक बांध्यापर्यंत सर्व काही स्त्री-संतुलनाशी निगडित असते. 
 

 आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्री शिक्षण, स्त्री प्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य हे विषय विविध माध्यमांतून जनमानसात बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो. आज एकविसाव्या शतकातील स्त्री कुठेही मागे राहणारी नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत तर स्त्रीला घरात साक्षात लक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. घर सांभाळणे, उपजीविकेसाठी काम करणे, पाहुणे असोत, नातेवाईक असोत, मित्रमंडळी असोत या सर्वांचा मान राखणे, त्यांची काळजी घेणे, घराला घरपण देणे हे सर्व ‘स्त्री’च करू जाणे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पेलायची असेल तर स्त्रीला तिचे ‘स्त्री’त्व जपायला हवे. कारण स्त्री संतुलनावरच स्त्रीची शक्‍ती, आरोग्य, उत्साह, सौंदर्य, स्वभावातील मृदुता या सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्वचेच्या सुकुमारतेपासून ते आकर्षक बांध्यापर्यंत सर्व काही स्त्री-संतुलनाशी निगडित असते. म्हणूनच आयुर्वेदात स्त्री संतुलनासाठी, स्त्री आरोग्यासाठी अष्टांगांपैकी एक संपूर्ण अंग-शाखा समर्पित केलेली आढळते. स्त्री संतुलन नीट सांभाळले तर तिला कुठला रोग होणारच नाही, पण काही त्रास होत असला तर तो बरा करण्यासाठी स्त्री संतुलनाकडे लक्ष द्यावेच लागते. 

स्वास्थ्यसंगीत ऐका 
स्त्रीच्या शरीरात रसधातूला सर्वाधिक महत्त्व असते. रसधातूचा उपधातू म्हणजे गर्भाशयातून दर महिन्याला स्रवणारे ‘रज’ होय. शिवाय, रसधातू हा गर्भारपणात गर्भाचे पोषण करणारा मुख्य धातू असतो. त्वचेची सतेजता, आकर्षक शरीरबांधा हा सुद्धा रसधातूवरच अवलंबून असतो. रसधातूचा आणि मनाचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्यामुळे स्त्री संतुलनासाठी मनाचे योगदानही महत्त्वाचे असते. म्हणूनच मनाच्या माध्यमातून स्त्री संतुलनासाठी उत्तम मदत करता येते. ‘स्त्री संतुलन’ स्वास्थ्यसंगीत हे या दृष्टीने जणू वरदानच होय. विशिष्ट वेदमंत्र, विशेषतः सामवेद आणि ऋग्वेदातील ऋचा, विशिष्ट रागात संगीतबद्ध केलेल्या रचना, वीणावादन या सर्वांचा अंतर्भाव असलेली ‘स्त्री संतुलन’ संगीतरचना ही एकंदर स्त्रीसंतुलनासाठी व स्त्रियांच्या विशिष्ट शारीरक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी उपयुक्‍त सिद्ध झालेली आहे. 
रोज एकदा याप्रकारे हे संगीत ऐकण्याचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो. स्त्री संतुलनासाठी अजून एक अतिशय प्रभावी व सोपा उपाय म्हणजे स्त्री गुप्तांगाला तेल लावणे. ते अधिक वेळ राहून आत गर्भाशयापर्यंत पोहोचण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापसावर दहा-बारा थेंब या प्रमाणात तेल घेऊन गुप्तांगाच्या ठिकाणी ठेवता येते. यामुळे मूत्रवहसंस्था, गर्भाशय, पर्यायाने संपूर्ण प्रजननसंस्थेचे आरोग्य उत्तम पाहते. पाळी सुरू झाल्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत व त्यानंतरही या प्रकारे तेल वापरता येते. यामुळे गुप्तांगाच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणे, त्यामुळे त्या ठिकाणी वेदना होणे, वयापरत्वे किंवा बाळंतपणानंतर शिथिलता जाणवणे, वारंवार जंतुसंसर्ग होणे, अंगावरून पांढरे जाणे वगैरे स्त्रीविशिष्ट तक्रारींना दूर ठेवता येते, तसेच त्यावर उपचारही करता येतो. काही दिवस असे तेल नियमित वापरले की शरीरातील अतिरिक्‍त उष्णताही कमी होते, झोप शांत लागते, अकारण चिडचिड कमी होते असाही अनेक स्त्रियांचा अनुभव असतो. धातक्‍यादी तेल किंवा फेमिसॅन तेल, मधुरं घृत हे या दृष्टीने उत्तम होत. 


योनीभागी विशेष औषधी द्रव्यांची धुरी घेणे हा सुद्धा स्त्री संतुलनाच्या दृष्टीने उत्तम उपचार होय. बाळंतपणानंतर अशी धुरी घेण्याची आपल्याकडे परंपराही असते. मात्र एरवी सुद्धा आठवड्यातून एक-दोन वेळा मुलींनी-स्त्रियांनी अशी धुरी घेणे स्त्री संतुलनाला पूरक ठरते. ‘धूप’ हे लहानातील लहान स्रोतसात पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम असते, त्यात वावडिंग, हळद, दारुहळद वगैरे विशिष्ट द्रव्यांनी युक्‍त संतुलन शक्‍ती धुपाची धुरी घेणे हे जंतुसंसर्ग मुळापासून बरा करणारे, पुन्हा पुन्हा होण्यास प्रतिबंध करणारे असते. अंगावरून पांढरे पाणी जात असले तर त्यासाठीही ही धुरी उपयुक्‍त असते. 

स्तनांची घ्या काळजी 
स्त्री व पुरुष यांच्यातील मुख्य फरक सांगताना आयुर्वेदशास्त्र म्हणते की, पुरुषांपेक्षा स्त्रीच्या शरीरात तीन आशय (अवयव) अधिक असतात. ही आशये म्हणजे एक गर्भाशय व दोन स्तन्याशय. म्हणूनच स्त्री संतुलनासाठी गर्भाशयाच्या बरोबरीने स्तनांची काळजी घेणेही हितावह असते. आयुर्वेदात या दृष्टीने काही विशेष लेप सुचवले आहेत. दाडिमाद्य तेल किंवा संतुलन सुहृद तेल स्तनांवर हलक्‍या हाताने जिरवणे हे सुद्धा स्तनांचे आरोग्य आणि दृढता टिकून राहण्यास मदत करणारे असते. सध्या बऱ्याच तरुण मुलींना पाळी येण्यापूर्वी स्तन जड होणे, दुखणे किंवा छोट्या गाठी जाणवणे यासारखे त्रास होतात, त्यावरही हे तेल उपयोगी पडते. 

स्त्री संतुलनासाठी स्त्रीशरीरातील रसधातू संपन्न राहणे आवश्‍यक असते. यादृष्टीने कोरफड, शतावरी, अनंतमूळ यासारख्या वनस्पती उत्तम असतात. गर्भाशयाच्या आरोग्यासाठी अशोक, देवदार वगैरे वनस्पती उत्तम असतात. दर महिन्याला होणाऱ्या रजस्रावामुळे स्त्रीला नैसर्गिक लोहतत्त्व तसेच कॅल्शियमचा पुरवठा होत राहणे आवश्‍यक असते. यादृष्टीने निरोगी स्त्रीने सुद्धा दुधातून शतावरी कल्प किंवा शतानंत कल्प घेणे, सॅनरोझसारखे रसायन घेणे, फेमिनाईन बॅलन्ससारखे आसव घेणे उत्तम गुणकारी ठरताना दिसते. यामुळे सहसा स्त्रीरोग दूर राहतात, पण काही कारणाने पाळीत बिघाड होत असला, अंगावरून पांढरे जात असले, मूत्रमार्गात वारंवार जंतुसंसर्ग होत असला तर तातडीने वैद्यांचे मार्गदर्शन घेणे उत्तम होय. 
योगासने, योग्य मार्गदर्शनाखाली शिकलेला प्राणायाम, भस्रिका वगैरे श्वसनक्रिया यांचे सुद्धा स्त्री संतुलनासाठी मोठे योगदान असते. नियमित ॐकार म्हणणे हे सुद्धा स्त्री संतुलनासाठी, मन-बुद्धी वगैरे सूक्ष्मतत्त्वांवर सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी साहायक असते. स्त्री संतुलनासाठी थोड्या वेळात, सहजपणे करता येतील आणि तरीही प्रभावी ठरतील अशा काही क्रिया याप्रमाणे होत. 

संतुलन क्रिया फुलपाखरू 
१. सुखासनात बसावे. 
२. एक एक करून दोन्ही पाय चित्रात दाखविल्याप्रमाणे जमतील तेवढे शिवणीजवळ आणावेत. या वेळी हात गुडघ्यावर ठेवले तरी चालतात. 
३. या स्थितीत साधारण 30 सेकंद संथ श्वासोच्छ्वास केल्यानंतर श्वास सोडत सोडत पाय शरीराच्या समोर सरळ करावेत. हळूहळू सवय होईल तसतशी ही वेळ एक ते दीड मिनिटांपर्यंत वाढवावी. 
४. संथ गतीने गुडघे व पाय फुलपाखराच्या पंखाप्रमाणे शक्‍य तेवढे वर खाली करावेत. गुडघे खाली नेताना श्वास सोडावा व वर नेताना श्वास आत घ्यावा. पाय वर खाली करताना झटका देऊ नये किंवा घाई करू नये. 
ही क्रिया साधारणपणे एक ते दीड मिनिटे करावी. जसजसा सराव होईल तसतशी ही क्रिया सहजतेने होईल आणि गुडघे पूर्णतः जमिनीला टेकवणे शक्‍य होईल. 
या क्रियेने नितंब संधीच्या परिसरातील स्नायूंचे आकुंचन प्रसारण सहजतेने व्हायला मदत मिळते. मांड्या, नितंबातील, तसेच पायातील स्नायूंची शक्‍ती वाढते. गर्भाशयाची शक्‍ती वाढते, स्त्री संतुलनाला मदत मिळते. 

समर्पण (सरेंडर) 
या क्रियेमुळे आपल्यातील समर्पण वृत्ती वाढते आणि ती करत असताना वाकणे, ताण देणे (स्ट्रेचिंग), पोटावर हलका दाब आल्यामुळे वायू सरण्यास मदत मिळणे आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्याचे संतुलन होणे या सर्वांचा फायदा होतो. या क्रियेच्या नियमित सरावामुळे नितंब प्रदेशातील लवचिकता वाढते, पाठ व मानेवर योग्य प्रमाणात ताण आल्याने मेरुदंडाची लवचिकता वाढते. सर्व्हायकल प्लेस्कस सक्रिय होते. डोळे, श्वसनसंस्था आणि मेंदू यांच्या कार्यात सुधारणा होते. स्पॉंडिलायटिस, कंबरदुखीसारखे त्रास होऊ नयेत यासाठी ही क्रिया उपयुक्‍त असते. 
१. वज्रासनात बसावे. दोन्ही हात नमस्तेच्या स्थितीत जोडून छातीसमोर ठेवावेत व श्वास पूर्णपणे आत घ्यावा. 
२. हात जोडलेल्या स्थितीतच ठेवून शरीरासमोर सरळ करावेत. यावेळी बोटे समोरच्या दिशेला व अंगठे वरच्या दिशेला असावेत. नजर अंगठ्यावर केंद्रित असावी. पुढच्या तिन्ही कृती करताना नजर अंगठ्यावर स्थिर असावी. 
३. दोन्ही हात नमस्तेच्या स्थितीत व कोपरातून ताठ असतानाच खाली आणावेत 
४. थोडेसे पुढे झुकून बोटांची टोके दोन्ही गुडघ्यांच्या मधे जमिनीवर टेकवावीत. यावेळी पाठीचा कणा सरळ असावा. 
५. नजर अंगठ्याच्या अग्रावर स्थिर ठेवत, श्वास हळूहळू सोडत असताना हात जमिनीवर समोरच्या बाजूने पुढे सरकवावेत. हे करताना किंचितसा दाब द्यावा. शरीर शक्‍य तितके पुढे ताणले जाईल, छाती मांड्यावर टेकेल अशा स्थितीत यावे. यावेळी नितंब टाचांना टेकलेलेच राहतील आणि हात कोपरातून सरळ असतील याकडे लक्ष ठेवावे. 
६. श्वास पूर्ण सोडल्यावर दोन्ही हातांमध्ये थोडे अंतर घेऊन तळहात जमिनीवर टेकवावेत. त्याच वेळी डोके सुद्धा जमिनीवर टेकवावे. श्वास पूर्णपणे सोडलेल्या स्थितीत असेच क्षण-दोन क्षणासाठी राहावे. 
७. आता डोके वर उचलून नजर पुन्हा अंगठ्याच्या अग्रावर ठेवून, श्वास आत घेत घेत, हातांचे तळवे पुन्हा जोडलेल्या स्थितीत आणून जमिनीलगत ठेवत जवळ घ्यावेत. यावेळी पाठ व हात कोपरातून सरळ असावेत. 
८. पूर्ववत ताठ स्थितीत बसावे, दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत छातीजवळ आणून श्वास सोडावा. 
९. श्वास घेऊन पुढचे आवर्तन सुरू करावे. 
सूचना - शारीरिक अक्षमतेमुळे वज्रासनात बसणे अवघड असले तर सुखासनात बसून किंवा खुर्चीत बसून गुडघ्याच्या रेषेत टेबल ठेवूनही हे आसन करता येते. 
पोटाचा आकार वाढलेला असल्याने वज्रासनाच्या स्थितीत पूर्णपणे पुढे वाकणे शक्‍य नसले तर दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवता येते. 

शलभासन 
या आसनाच्या अभ्यासाने पाठीचे, पोटाचे व कंबरेचे स्नायू बळकट होतात, पचनक्रिया सुधारते. पोट कमी होते. स्थूलता कमी होते. मासिक पाळीसंबंधीच्या तक्रारी कमी होतात. 
१. पोटावर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांशी जुळलेले असावेत. 
२. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांखाली ठेवावेत. हाताचे तळवे आकाशाकडे असावेत. हनुवटी जमिनीला टेकलेली असावी. 
३. श्वास घेत घेत, कंबर व नितंबाच्या स्नायूंचे आकुंचन करून दोन्ही पाय शक्‍य तेवढे वर उचलावे. हनुवटी जमिनीला टेकलेली राहील याकडे लक्ष द्यावे. या स्थितीत, आपल्या क्षमतेनुसार श्वासाची तीन ते पाच आवर्तने करावी. 
४. हळू हळू पाय खाली आणावेत. 
या आसनाची तीन ते पाच आवर्तने करावीत 
सूचना - हे आसन एकदम करणे जमत नसल्यास, प्रथम काही दिवस एका पायाने करावे. 

ज्योतिध्यान 
घरच्या घरी प्रत्येकाला सहजतेने करता येईल अशी उपासना म्हणजे ज्योतिध्यान. ज्योतिध्यान करण्यासाठी तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून तो हातभर लांबीवर व डोळ्यांच्या समतल असा ठेवायचा असतो आणि एकाग्रचित्ताने त्या ज्योतीकडे एकटक बघायचा प्रयत्न करायचा असतो. सरावाने हळूहळू तेजःपुंज ज्योतीकडे पापणी व लवता सलग काही वेळ बघणे शक्‍य होते. डोळ्यांनी ज्योत एकटक पाहिल्यानंतर डोळे बंद केले तरी तिचे प्रतिबिंब भ्रूमध्याच्या आत काही वेळासाठी दिसू लागते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अग्नितत्त्वाला उत्तेजना मिळते, शरीरातील संप्रेरकांचे काम सुधारते आणि पूर्वी उल्लेख केल्यानुसार शारीरिक, मानसिक, भावनिक, प्राणिक स्तरांवर सकारात्मक परिणाम मिळतात.