Indian Culture for Health
Indian Culture for Health

आरोग्यासाठी भारतीय संस्कृती 

प्रत्येक देवतेचा संबंध शरीरातील रचना, शक्‍ती व क्रिया यांच्याशी जोडलेला असतो. किंबहुना त्या ठिकाणी असलेली भौतिक रचना, त्यात येणारी शक्‍ती आणि तिचे कार्य यांचा देवतेशी संबंध जोडला की शरीरातील विशिष्ट स्थानाची आठवण होते वा त्या ठिकाणी उत्तेजना मिळू शकते. जोपर्यंत संस्कृतीवर आधारित जीवन चालते तोपर्यंत संकटांचा सामना करणे सोपे असते. म्हणून संस्कृतीवर आधारित सणाच्या दिवशी कोणते अन्न खावे, कोठल्या सणाला कोणता वेळ द्यावा (सकाळचा, दुपारचा वा रात्रीचा) हे सगळे नक्की केलेले असते. आरोग्यासाठी आपल्या घराची, समाजाची जी काही संस्कृती आहे ती सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे. संस्कृती ही प्रवाही असावी असते. कारण एकूण काळ प्रवाही आहे. अशा वेळी संस्कृतीमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल होणे गरजेचे आहे. परंतु संस्कृतीचा मुख्य उद्देश सर्वंकष आरोग्य हा आहे हे न विसरता त्यात बदल केले तर ते फायद्याचे ठरतील. 
 

आरोग्य हे सर्वंकष, चौफेर असावे. अशा आरोग्याचा व्यक्‍तीला स्वतःला आनंद घेता येतोच. बरोबरीने समाजालाही आनंद वाटता येणे, समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करणे, व्यक्‍ती आयुष्य संपवून गेली तरी समाजामध्ये त्याच्या कर्माचे, त्याच्या जीवनपटाचे अस्तित्व मागे राहणे हे सुद्धा साध्य होते. मनुष्याच्या स्थूल शरीराच्या आरोग्याबरोबरच त्याच्या सूक्ष्म शरीराचे आरोग्यही उत्तम हवे. सूक्ष्म शरीराचे आरोग्य चांगले असल्यास ती व्यक्‍ती इतरांना, समाजाला मदत करते, समाजासाठी काही कार्य करते. सोम साधनेद्वारे चार अंगांचे आरोग्य कसे नीट ठेवता येईल याचा आपण विचार केला. 

जगाच्या पाठीवर संस्कृती ही अति प्राचीन आहे. अजूनही बऱ्याच व्यक्‍ती भारतीय संस्कृतीवर आधारित जीवन जगताना दिसतात. अशी ही अजरामर भारतीय संस्कृती. त्यात आरोग्याचा विचार केलेला आहेच. केवळ भौतिक उपभोग घेणे एवढेच जीवनाचे एकमेव ध्येय नसल्यामुळे भारतीय संस्कृतीत केवळ भौतिक शरीराच्या आरोग्याचाच नाही तर सर्वकष आरोग्याचा विचार केलेला दिसतो. एक गोष्ट निश्चित आहे की, संस्कृतीचा विचार करताना मनुष्य समूहाला इतरांच्या बरोबरीने व सुखाने जगता यावे म्हणून सांगितलेले जे धर्म आहेत त्यांच्याशी संस्कृतीचा संबंध जोडला जातो. परंतु खरा संबंध वैश्विक निसर्गधर्माशी जोडलेला असल्यामुळे संस्कृतीमुळे सर्व प्रकारचे आरोग्य मिळू शकते. भारतीय संस्कृतीत वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या देवतांशी जोडलेले दिसतात. कारण व्यायाम म्हटला की, हनुमंतरायांची आठवण येते, श्रीरामांची वा श्रीमद्‌भगवद्‌गीतेची शपथ घेतली जाते, होळीचा सण साजरा केला जाताना प्रह्लाद, हिरण्यकश्‍यपू यांची आठवण येते. या गोष्टींमध्ये असलेल्या धाग्यावर लक्ष ठेवावे लागते. ज्या गोष्टीत काही तथ्य असते ती गोष्ट टिकून राहाते. प्रत्येक देवतेचा संबंध शरीरातील रचना, शक्‍ती व क्रिया यांच्याशी जोडलेला असतो. किंबहुना त्या ठिकाणी असलेली भौतिक रचना, त्यात येणारी शक्‍ती आणि तिचे कार्य यांचा देवतेशी संबंध जोडला की शरीरातील विशिष्ट स्थानाची आठवण होते वा त्या ठिकाणी उत्तेजना मिळू शकते. श्रीरामांचा संबंध मेरुदंडाशी जोडलेला असतो. शरीरातील जाणीव संपूर्ण शरीरभर पोहोचविण्याचे काम मेरुदंडामार्फत होत असते, ही प्रत्यक्ष कृती असते. श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यामुळे किंवा श्रीरामांची पूजा करण्यामुळे प्रत्यक्ष श्रीरामांना काही लाभ होत नाही. लाभ होतो पूजा करणाऱ्याला, स्मरण करणाऱ्याला, मंत्र म्हणणाऱ्याला, स्तोत्र म्हणणाऱ्याला. हा लाभ शरीराच्या विशिष्ट रचनेसाठी मिळावा ही योजना केलेली असते. त्याची जोड संस्कृतीच्या वेगवेगळ्या कर्मासाठी नक्की केलेली असते. 

कोणी केव्हा उठावे, केव्हा झोपावे, तो जे काही काम करतो त्या कार्याला झेपेल, शोभेल, पचेल असे कोणते अन्न खावे, शेती ही केवळ पैसे मिळविण्यासाठीच नसून शेतीत उगवलेल्या अन्नापासून आरोग्य मिळेल अशी नीट शेती कशी करावी, स्त्री-पुरुष एकत्र राहात असताना त्यांच्यात कसे संबंध असावेत वगैरे अनेक अनेक गोष्टी संस्कृतीने सांगून ठेवल्या आहेत. जोपर्यंत संस्कृतीवर आधारित जीवन चालते तोपर्यंत संकटांचा सामना करणे सोपे असते. त्यामुळे संस्कृतीवर आधारित सणाच्या दिवशी कोणते अन्न खावे, कोठल्या सणाला कोणता वेळ द्यावा (सकाळचा, दुपारचा वा रात्रीचा) हे सगळे नक्की केलेले असते. 

मनुष्य हा संभाषणप्रिय आहे, संवादप्रिय आहे. दोन माणसे असली तरच संवाद, संभाषण होऊ शकते. स्त्री-पुरुष एकत्र आल्यावर त्यांच्यात एकत्व व एकरूपता होण्यासाठी आवश्‍यकता असते समाजाची. जोपर्यंत माणसाचे माणसाशी नाते जोडले जात नाही, जोपर्यंत एकमेकांशी बोलता येत नाही, एकमेकांवर प्रेम करता येत नाही तोपर्यंत संस्कृती वाढणार नाही किंवा तिचे संरक्षण होणार नाही. 

कुठल्या हवामानाला कुठल्या प्रकारची वस्त्रे परिधान करावीत हेही भारतीय संस्कृतीत सांगितलेले आहे. या सगळ्यांचा विचार करायचा झाला तर एक मोठा ग्रंथ होऊ शकतो. चांगले बालक जन्माला यावे यासाठी आई-वडिलांनी काय करावे ही गर्भसंस्कार संस्कृती. बालक जन्माला आल्यानंतर त्याचे नामकरण, अन्नप्राशन, त्याला ज्ञानामध्ये कसे उद्युक्‍त करावे, अनुभवाचे ज्ञान हेच शेवटी जीवनात कसे उपयोगाचे असते हे त्याच्या मनावर कसे ठसवावे, योग्य वेळी त्याने मैदानी खेळ खेळावे यासाठी त्याला कशी उत्तेजना द्यावी, ‘लवकर निजे, लवकर उठे, त्याला आरोग्य ऋद्धी सिद्धी भेटे’ वगैरेंचे मार्गदर्शन करून त्याचे आरोग्य व जीवन कसे फुलवावे याबद्दल बालकाला सतर्क करणे ही आहे भारतीय संस्कृती. 

अशा प्रकारे कुठले-कुठले विधी, ज्याला कर्मकांड म्हणता येईल, ज्यातील विज्ञान न कळल्यामुळे जे टाकावू झाले आहेत असा समज झालेला आहे, परंतु ज्यांचा जीवनासाठी-आरोग्यासाठी उपयोग होतो याचे अवलोकन करणे आज आवश्‍यक आहे. संस्कृतीच्या नावाखाली काहीतरी विचित्र पद्धती रूढ करणे, स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी काही करणे असेही होताना दिसते. उत्सवांमध्ये ढोल-ताशे वाजवणे वगैरे पारंपरिक पद्धतींबरोबरच ध्वनिमुद्रित संगीत मोठमोठ्याने लावण्याच्या नादात ध्वनिप्रदूषण वाढल्यामुळे सरतेशेवटी रात्री दहा नंतर संगीत लावता येणार नाही असे नियम करण्याची वेळ येते. असे करण्यापेक्षा जर उत्सवांमध्ये ज्ञानप्रबोधन करणे, नवीन लेखक, कवी, नकलाकार, नाट्य यांनी संधी देणे वगैरेंवर भर दिला तर ते संस्कृतीला हातभार लावणारे ठरू शकते. 

एकूण आरोग्यासाठी आपल्या घराची, समाजाची जी काही संस्कृती आहे ती सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे. संस्कृती ही प्रवाही असावी असते. कारण एकूण काळ प्रवाही आहे. अशा वेळी संस्कृतीमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल होणे गरजेचे आहे. परंतु संस्कृतीचा मुख्य उद्देश सर्वंकष आरोग्य हा आहे हे न विसरता त्यात बदल केले तर ते फायद्याचे ठरतील.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com