संगणक वापरता? दुखी ठेवा दूर!

Industrial-Physiotherapy
Industrial-Physiotherapy

संगणक आपल्या कार्यालयीन कामकाजात महत्त्वाचे स्थान पटकावून बसला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबरच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना आठ-दहा तास संगणकाचा वापर करावा लागतो. सलग किती वेळ बसावे? कसे बसावे? संगणक कुठे असावा? कळफलक कुठे असावा? हात कुठे, मान कशी असावी? हे समजून घेतले तर तरुण वयात उद्भवणारी पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी दूर ठेवणे शक्य होईल.

संगणक हा आपल्या जीवनातला महत्त्वपूर्ण घटक झाला आहे. एकविसाव्या शतकात आपण प्रगतीचे उच्च शिखर गाठले आहे. डिजिटल भारत या संकल्पनेला कॉम्प्युटर आणि इंटरनेटने पूर्णपणे जोडले सुद्धा आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) पूर्वी जी काही कामे प्रत्यक्ष करावी लागत होती, उदा. टपाल लिहिणे, बँकेचे पासबुक भरणे, प्रॉपर्टी टॅक्स भरणे आदी, आता संगणकावर होतात. सध्या तर शाळेमध्ये सुद्धा शिकवताना संगणकाचा वापर करतात. याच बरोबर माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) हे नावीन्यपूर्ण क्षेत्र सुरू झाले आहे ज्यामुळे आपण प्रगतिपथावर सुवर्ण भविष्याकडे झेप घेत आहोत.

परंतु या तंत्रज्ञान आणि प्रगतीचा आपल्या आरोग्यावर सुद्धा तितकाच फरक पडत आहे. एकीकडे या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आहे. आज एम.आर.आय., रक्त तपासण्या, सोनोग्राफी आदी बऱ्याच चाचण्या संगणकामुळे सोप्या झाल्या आहेत. बरीच वैद्यकीय उपकरणेसुद्धा डिजिटल तंत्रज्ञानावर चालतात. शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक्सचा वापर केला जात आहे. पण याच तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होत आहे. आजच्या काळात जवळजवळ सर्वांनाच मणक्यांचे आजार, पाठ आणि कंबरदुखी, हातापायात मुंग्या येणे, डोकेदुखी, व्हर्टिगो (चक्कर येणे), हातांची बोटे दुखणे आदी विविध त्रास होत आहेत.  आणि दुर्दैव म्हणजे हे सर्व त्रास संगणकाच्या आणि तितक्याच प्रमाणात भ्रमणध्वनीच्या (मोबाईल फोन) अतिवापरामुळे होत आहेत.

संगणकाचा वापर हा जितका आजच्या आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तितकाच तो त्रासदायकदेखील आहे. या त्रासाचे प्रमुख कारण म्हणजे संगणकाचा सातत्याने केला जाणारा वापर. रोजचे आठ-दहा तास संगणकासमोर बसून स्नायूंना प्रचंड थकवा येतो. आपण फार फार तर दीड-दोन तास एका ठिकाणी बसू शकतो. परंतु यापेक्षा जास्त वेळ बसल्यास शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. एका संशोधनाप्रमाणे एका जागेवर तासभर बसून राहिल्याने आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम हा एक सिगारेट ओढल्यावर होणाऱ्या दुष्परिणामाएवढा असतो. यावरून संगणकासमोर आठ-दहा तास बसल्याने किती त्रास होईल याची कल्पना करावी.

दुसरे कारण आहे बसण्याची पद्धती. संगणकासमोर बसताना योग्य खुर्चीची निवड सुद्धा महत्त्वाची आहे. आजकाल बाजारात ‘इर्गोनोमिक’ नावाखाली भरपूर खुर्च्यांचे प्रकार मिळतात. त्यातले काही खरेच चांगले असतात तर काही केवळ देखावे असतात. खरे सांगावे तर सर्वांत उत्कृष्ट खुर्ची कोणतीच नाही. कारण अगदी सोन्याची खुर्ची जरी वापरली तरी त्यावर सतत बसून मणक्यांचे आजार होणारच. म्हणून एका जागेवर सतत बसून राहू नये. किंबहुना, दर तासातासांनी उठून दहा-वीस सेकंद तरी एखादी फेरी मारावी.   

चांगली खुर्ची निवडताना तिचा बसण्याचा आणि टेकण्याचा भाग नरम पण घट्ट असावा. तसेच बसण्याचा भाग पुढील बाजूनी गोलाकार असावा (वाटर फोल इफेक्ट). पाठीमागील भाग मणक्याला आधार देणारा असावा, खास करून कमरेला आधार देणारा. बसताना नेहमी पाठीचा आधार घ्यावा आणि ताठ बसावे. बऱ्याच वेळी थकव्यामुळे अयोग्य प्रकारे बसणे होते आणि त्यातून कंबरदुखी सुरू होते. अनेकदा आपण मानेचा आधार असणारी खुर्ची घेतो. पण साधारणतः संगणकावर काम करताना मान टेकवण्याची वेळ येत नाही. हात ठेवण्याची जागा (हेड रेस्ट) सरळ किवा खोलगट असावे, गोलाकार असू नयेत. यामुळे हाताच्या पूर्ण भागाला आधार मिळतो आणि एकाच जागेवर जोर येत नाही. खुर्ची वर-खाली करता यावी आणि तिला चाके असवीत. खुर्चीची उंची आपल्या पायांच्या (गुडघ्यापासून घोट्यापर्यंत) लांबीनुसार ठेवावी.       

कळफलक (की-बोर्ड) आपल्या कोपराच्या उंचीवर असावा. की-बोर्डच्या उंचीमुळे जर पावले जमिनीवर टेकत नसतील तर पायाखाली छोटे स्टूल घ्यावे. मॉनिटर (स्क्रीन) ची उंची आपल्या डोळ्यांच्या पातळीवर असावी आणि डोळ्यांपासून एक फूट दूर असावी. गरज भासल्यास डोळ्यांच्या पातळीपेक्षा वीस अंश खाली स्क्रीन चालेल. त्यापेक्षा खाली असल्यास मानेवर जोर वाढून मानेचा त्रास उद्भवू शकतो. शक्यतो पी.सी.चा वापर लॅपटॉपपेक्षा बरा. पी.सी.ची उंची आणि कळफलकाची उंची बदलता येते. लॅपटॉपवर असे बदल करता येत नाहीत. जर लॅपटॉप वापरावा लागत असेल तर स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवावा आणि बाह्य की-बोर्ड वापरावा. माउसचा वापर गरजेपुरताच करावा. सतत माउस वापरल्याने बोटांना त्रास होऊ शकतो. तसेच कळफलकाच्या अतिवापरामुळे बोटांना त्रास उद्भवतो. बरीच मंडळी की-बोर्ड वर सगळा राग काढतात आणि त्याला तबला समजून बडवतात. पण यामुळे आपल्याच हातांच्या- बोटांच्या नाजूक सांध्यांची झीज होते आणि त्यामध्ये संधिवातासारखा त्रास होऊ शकतो.

 संगणक  ठेवण्यासाठीचे टेबल आपल्या दृष्टिक्षेपात असावे. संगणक कोपऱ्यात ठेवल्यास पायांच्या हालचालीला अडचण होते आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. आपल्या कामाचे ठिकाण (वर्क स्टेशन) शक्यतो व्यवस्थित ठेवावे. सतत लागणाऱ्या वस्तू आपल्या हाताच्या त्रिज्येच्या अंतरात ठेवाव्यात आणि कमी लागणाऱ्या वस्तू त्यापेक्षा लांब ठेवाव्यात. यामुळे सारखे वाकावे किवा वळावे लागत नाही आणि कमरेवर जोर येत नाही.

 पण या सर्व सूचनांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराची देखभाल. नियमित व्यायाम आणि योग्य आहार. 

आम्ही नियमितपणे बऱ्याच आय.टी. कंपन्यांमध्ये आरोग्य तपासण्या करतो. बऱ्याच ठिकाणी अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार, धूम्रपान, सॉफ्ट ड्रिंक्सचा मुक्त वापर दिसतो. आणि त्याच बरोबर व्यायामाचा अभावसुद्धा असतो. यामुळे २२-२५ वयामध्ये मणक्यांच्या हाडांची झीज दिसते. जणूकाय ६०-६५ वयाची व्यक्ती असावी इतकी झीज क्ष किरणांच्या फिल्मवर दिसते. यासाठी जीवनशैली आणि आहार यात सुधारणा आवश्यक आहे. आणि त्याबरोबर योग्य व्यायामसुद्धा आवश्यक आहे. प्रथम सतत संगणकासमोर बसणे टाळावे. दर तास दोन तासांनी उठून फेऱ्या माराव्यात. त्याच बरोबर मणक्याला मागील बाजूस ताणावे जेणेकरून आकुंचन पावलेल्या स्नायूंना ताण आणि चालना मिळेल.    

कामाच्या सुरुवातीला कमरेचे आणि मानेचे व्यायाम करावेत. यात मणक्याला (कमरेला आणि मानेला) हळुवारपणे पुढे, मागे आणि उजवी – डावीकडे वळवावे. याबरोबरच कमरेला आणि मानेला आधार देणाऱ्या स्नायूंचे (कोर स्नायू) व्यायाम करावे. तसेच हात-पायातील नसांचे ताण देण्याचे (न्यूरल टिश्यू स्ट्रेच) व्यायाम करावेत ज्यामुळे नसांना चालना मिळते आणि हाता-पायात मुंग्या येत नाहीत.मनगट आणि बोटांच्या हालचाली व व्यायाम देखील करावेत. हे सर्व व्यायाम तुमच्या फिजिओथेरपीस्टच्या देखरेखीत केल्यास भविष्यात त्रास उद्भवण्याची शक्यता उरत नाही. तसेच कामाचा ताण आणि नैराश्य यामुळेदेखील शारीरिक तक्रारी तयार होतात. म्हणून नेहमी आनंदी आणि उत्साही राहावे. सर्व प्रकारे कामाचे नियम पाळावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com