esakal | वंध्यत्वाबाबतच्या पुरुषाच्या तपासण्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Infertility Testing for Men

वंध्यत्वाबाबतच्या पुरुषाच्या तपासण्या 

sakal_logo
By
डॉ. हरीश सरोदे

लग्न झाल्यावर दोन-तीन वर्षे होऊनही आणि गर्भ निरोधनाची कोणतीही साधने न वापरता गर्भधारणा होत नसेल तर त्या जोडप्याच्या तज्ज्ञ डॉक्टराच्या सल्ला मसलतीनंतर तपासण्या केल्या जातात. पती अथवा पत्नी अथवा दोघांमध्ये त्यासंबंधी दोष असू शकतो आणि त्यासाठी दोघांचीही तपासणी होणे आवश्यक असते. यामध्ये पुरुषाची तपासणी ही तुलनात्मक दृष्ट्या सोपी आणि अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे प्रथम जाणून घेऊ पुरुषासाठी असलेल्या वंध्यत्व चाचणीसंदर्भात. 
 

पुरुषांसाठी करावयाची अत्यंत महत्वाची तपासणी असते ती म्हणजे वीर्य तपासणी (Semen examination).  ही तपासणी करण्यासाठी पाळावयाच्या गोष्टी : 

- ही तपासणी करण्याआधी किमान तीन ते पाच दिवस पती-पत्नीमध्ये शरीरसंबंध टाळलेला असला पाहिजे. ज्यायोगे शुक्रजंतू साधारणपणे योग्य अशा संख्येत मिळण्याची आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासण्याची शक्यता निर्माण होते .  
- या तपासणीचा वीर्यनमुना हा प्रयोगशाळेतून घेतलेल्या विशिष्ट बाटलीमध्ये गोळा करावा. ही बाटली रुंद तोंडाची असून त्यामध्ये वीर्य खाली अथवा इतरत्र सांडण्याची शक्यता कमी असते. 
- नमुना घरी घेतलेला असल्यास अर्ध्या तासाच्या आत तो प्रयोगशाळेत पोहोचणे आवश्यक . 
- नमुना गोळा करण्यासाठी हस्तमैथुन पद्धत वापरली जाते, तसेच नमुना थेट त्या विशिष्ट बाटलीत गोळा करावा लागतो. निरोधा(कंडोम) चा वापर टाळायचा असतो, कारण त्यात शुक्रजंतूंचा नाश होईल अशी द्रव्ये असतात .  
- नमुना गोळा केल्याची वेळ महत्वाची असून ती नमूद केली जाते .  
वीर्याचा नमुना प्रयोगशाळेत प्राप्त झाल्यावर तो शरीराच्या तापमानाप्रमाणे सुमारे ३७ अंश सेल्सिअसला ठेवला जातो. त्यानंतर त्याची सखोल तपासणी केली जाते. या तपासणीचे सर्वसाधारणपणे तीन भाग असतात.  
१) फिजिकल तपासणी : यामध्ये रुग्णाचे नाव, नमुना कधी घेतला याची वेळ, शरीरसंबंध टाळलेल्या दिवसांची संख्या, वीर्याचा रंग, ते पातळ होण्यासाठी लागणारा कालावधी याची नोंद होते. 
२) रासायनिक तपासणी : या अंतर्गत वीर्याची पीएच आणि त्यातील फ्रुक्टोजची तपासणी केली जाते. 
३) सूक्ष्मदर्शीय तपासणी : हा यातील अतिशय महत्वाचा भाग असतो, ज्यामध्ये शुक्रजंतूंची संख्या, एकूण नमुन्यातील संख्या, शुक्रजंतू किती वेगवान आहेत त्याचे एकूण संख्येशी गुणोत्तर आणि वेगाचे वर्गीकरण केले जाते.  
याशिवाय व्हिटॅलिटी टेस्ट आणि हायपो ऑस्मॉटिक  टेस्ट या तपासण्या होतात . विविध रसायनांच्या आधारे आणि विशिष्ट मोजमापाचे उपकरण वापरून त्यांना प्रमाणित केले जाते. या व्यतिरिक्त वीर्यनमुन्याची स्लाईड बनवून ती स्टेन केली जाते. या सर्वातून आपल्याला शुक्रजंतूंच्या प्रवाहात काही गुंता आढळतो आहे काय, असल्यास कोणत्या प्रकारचा तसेच इतर काही रक्तपेशी, पांढऱ्या पेशी, इतर संसर्ग, अपरिपक्व शुक्रजंतू , त्यांचे प्रमाण याबाबत माहिती मिळते.  
सामान्य वीर्यतपासणीचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे असतात. 
- एक ते दोन मिली वीर्य पातळ होण्यासाठी लागणारा वेळ - ३० मिनिटापर्यंत  
- पीएच म्हणजे अल्कलीधर्मी ८ ते ११ पर्यंत संख्या आणि पंधरा ते ऐंशी मिली फ्रुक्टोज. 
  व्हिटॅलिटी टेस्ट आणि हायपो ऑस्मॉटिक टेस्ट - पन्नास टक्के. 
अर्थातच हे सर्व निष्कर्ष काटेकोरपणे येण्यासाठी आणि अचूक अहवालासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट असलेल्या प्रयोगशाळेत ही चाचणी करणे हितावह असते. सदर तपासणीसाठी अलीकडे सीमेन ॲऩालायझर  हे उपकरण उपलब्ध असून त्यामुळे या अचूकतेत भर पडू शकते.  
वीर्यतपासणीबद्दल काही नोंदी : (१) शुक्रजंतू कमी असणे अथवा पुरेसे गतिमान नसणे हे वंध्यत्वाचे कारण असू शकते तथापि त्यावर औषधोपचार उपलब्ध असतात. (२) काही रुग्णांमध्ये शुक्रजंतूंची संख्या शून्य येते. अशावेळी परत दोनदा वेगवेगळ्या वेळांना आणि योग्य अंतर राखून खातरजमा केली जाते. त्यावरदेखील औषधोपचार केला जातो. (३) शुक्रजंतू कमी असणे अथवा अजिबात नसणे म्हणजे नपुंसकता नव्हे . अशा व्यक्तीचे कामजीवन पूर्ण निरोगी असू शकते. (४) सामान्य अहवाल नसल्यास युरॉलॉजिस्टचा सल्ला आणि डॉपलर तपासणी सुचवली जाते. ज्याद्वारे शुक्रजंतूच्या वाहतुकीत कुठे अडथळा आहे अथवा मार्गात कोणती गाठ आहे या गोष्टींची नोंद केली जाते. अन्यथा इतर काही रक्ततपासण्या केल्या जाऊ शकतात. 
वीर्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आणि बाकी लक्षणावरून काही रक्ततपासण्या सांगितल्या जाऊ शकतात . त्यामध्ये टेस्टेस्टेरॉन, एफएसएच, एलएच या तपासण्यांचा अंतर्भाव केला जातो. या सर्व हार्मोन्सच्या तपासण्या असून त्यांच्या निष्कर्षानुसार औषधयोजना करणे गरजेचे असते.