गुडघा दुखावला! 

Injury to the ligaments of the knee
Injury to the ligaments of the knee

आपण उभे राहू शकतो, चालू शकतो ते गुडघ्यामुळे. गुडघा शाबूत ठेवण्याचे काम अस्थिबंध करतात. या अस्थिबंधाना जपावे लागते. त्याना काही दुखापत झाली तर त्यावर वेळीच इलाज करून घ्यायला हवेत. 
 

गुडघा हा मानवी शरीरातील एक अत्यंत महत्वाचा अवयव आणि सर्वात मोठा सांधा आहे. टीबिया (पायाच्या नडगीचे हाड), फिमर (मांडीचे हाड), तसेच पटेला (गुडघ्याची वाटी) या घटकांचा मिळून गुडघा तयार होतो. शरीराचा भर उचलणाऱ्या हालचालींमध्ये गुडघ्याचा सांधा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. चालणे, पळणे, उड्या मारणे अशा हालचालींमध्ये या सांध्यावर भार पडतो. गुंतागुंतीची रचना असणारा हा सांधा असल्याने याला इजा होण्याची शक्यता जास्त असते. अनेक अस्थिबंध (लिगामेंटस्) एकत्र येऊन सांध्याला आधार दिला जातो. 

गुडघ्याचे अस्थिबंध 
अस्थिबंध म्हणजे छोटा पट्टीसारखा भाग असतो. कडक जाळीदार तंतुसदृश पेशींनी हा बनतो. अस्थिबंध दोन हाडांना एकत्र जोडते. हाडांच्या अवतीभवतीसुद्धा त्याचे आवरण असते. दैनंदिन हालचाली करताना सांध्यांना बळकट बांधून ठेवण्याचे मुख्य काम अस्थिबंध करतात. 
गुडघ्याच्या सांध्यामध्ये चार प्रमुख अस्थिबंध असतात. 
एसीएल : एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट 
पीसीएल : पोस्टेरिअर कृशिएट लिगामेंट 
एमसीएल : मेडीयल कोलॅट्रल लिगामेंट 
एलसीएल : लॅटरल कोलॅट्रल लिगामेंट 


गुडघ्याच्या अस्थिबंधाच्या इजेची कारणे 
काही वेळेला दैनंदिन कामे करताना पायाच्या हालचालींच्या दिशेत अचानक बदल होतो. हे अस्थिबंधाला इजा होण्याचे प्रमुख कारण आहे. उडी मारल्यावर अयोग्य पद्धतीने खाली येणे, गुडघ्यावर थेट मार लागणे ही काही सामान्य कारणे आहेत. उदाहरणार्थ, रस्त्याच्या अपघातांमध्ये किंवा फुटबॉल खेळताना गुडघ्यावर थेट आघात होऊ शकतो. स्नायू अशक्त असतील किंवा शरीराच्या अवयवांत समन्वयाचा अभाव असेल तर गुडघ्याच्या अस्थिबंधाला इजा होण्याची शक्यता अधिक आहे. 

लक्षणे 
एखाद्या रुग्णाला गुडघ्याला इजा झाल्यास पुढील लक्षणे दिसून येतात, 
- अचानक आणि तीव्र वेदना होणे 
- आघात झाल्यावर विशिष्ट व मोठा आवाज होणे 
- आघात झाल्यावर पहिल्या २४ तासात सूज येणे 
- चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखे वाटणे 
- दैनंदिन कामांमध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या वेदना होणे 

अस्थिबंधाच्या इजेची तीव्रता 
गुडघ्याचे अस्थिबंध लचकले किंवा त्याला इजा झाली तर त्याची तीव्रता गुडघ्यावर किती ताण पडला आणि अस्थिबंध किती प्रमाणात चिरले गेले यावर अवलंबून असते. इजेच्या तीव्रतेचे काही विभागात वर्गीकरण केले आहे. 
सौम्य (माइल्ड) - श्रेणी १ : या अवस्थेमध्ये अस्थिबंधावर ताण येतो, पण इजा होत नाही. 
मध्यम (मॉडरेट) - श्रेणी २ : या स्थितीत अस्थिबंधाच्या काही भागाला इजा पोचते किंवा चीर पडते. 
गंभीर (सीव्हिअर) - श्रेणी ३ : या अवस्थेमध्ये संपूर्ण अस्थिबंधावर परिणाम होतो. अस्थिबंधाला चीर पडते. 

इजा भरून येण्यास लागणारा वेळ 
अस्थिबंधाला इजा कोठे झाली आहे आणि त्याची तीव्रता काय यावर इजा भरून येण्यास लागणारा वेळ अवलंबून असतो. 
सौम्य (माइल्ड) - श्रेणी १ : या विभागात मोडणाऱ्या जखमांना भरून यायला काही आठवड्यांचा कालावधी लागतो. वेदना निर्माण होतील अशा हालचाली टाळणे, बर्फाने शेक देणे, दाहकता कमी होणारी औषधे घेणे हे उपाय या प्रकारातील इजांसाठी करता येतात. 
मध्यम (मॉडरेट) - श्रेणी २ : या प्रकारातील इजा असल्यास भार उचलणाऱ्या उपकरणांचा वापर करावा. तसेच त्वरित उपचार घेतल्यास, गुडघ्याच्या सांध्याला आधार देणारे टेपिंग केल्याने इजा भरून येण्यास मदत होते. यामुळे वेदना कमी होतात. ओघाने भरून येत असलेल्या अस्थिबंधावर ताण येत नाही. यासाठी सहा आठवड्यांपर्यंत कालावधी जाऊ शकतो. 
गंभीर (सीव्हिअर) - श्रेणी ३ : या प्रकारातील इजा झाल्यास आधारासाठी, तसेच गुडघ्याच्या संरक्षणासाठी रुग्णाला ‘नी ब्रेस’चा वापर करावा लागतो. यामुळे सांध्यावर ताण येणे कमी होते. या प्रकारामधील इजा असल्यास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. 

दैनंदिन कामे पूर्ववत होण्यासाठी आणि वेदनांचा समूळ नाश होण्यासाठी या तीनही प्रकारात मोडणाऱ्या आघातांना फ़िजिओथेरपी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. 
गुडघ्याच्या इजांमधील अतिशय महत्वाचा प्रकार म्हणजे एसीएल अर्थात एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट होय. एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट म्हणजे काय? गुडघ्याच्या चार अस्थिबंधांपैकी हा एक अस्थिबंध आहे. गुडघ्याच्या सांध्याला आधार देणारा हा अस्थिबंध गुडघ्याचा मुख्य अस्थिबंध समजला जातो. हा अस्थिबंध नडगीची मांडीपर्यंत पुढच्या दिशेला होणारी अतिरिक्त हालचाल नियंत्रित करतो. तसेच सर्व बाजूंनी गुडघ्याला आधार देतो. या अस्थिबंधाला खेळतांना इजा होऊ शकते. जगभरात दरवर्षी साधारण दोन लाख रुग्णांना ही इजा होते. या अस्थिबंधाला इजा होण्याचे महिलांमधील प्रमाण वाढत आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे. 

एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटच्या इजेची कारणे 
खेळताना एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटची इजा होते तेव्हा साधारण ऐंशी टक्के वेळा इतर कोणताही स्पर्धक या इजांना कारणीभूत नसतो. उदाहरणार्थ, फुटबॉल खेळताना होणारी इजा. उडी मारताना अयोग्य पद्धतीने जमिनीवर येणे किंवा आदळणे, यामुळे एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटला चीर पडण्याची शक्यता असते. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्येही अशी इजा पोचते. 

कोणत्या क्रीडा प्रकारामुळे एसीएलला इजा होण्याची सर्वाधिक शक्यता असते? 
अनेक क्रीडा प्रकारांमध्ये एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट उत्तम अवस्थेत कार्यशील असणे गरजेचे आहे. अनेक खेळांमध्ये शिताफी, चातुर्य पणाला लावावे लागते. ज्यात यशस्वी होण्यासाठी एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट उत्तम असणे गरजेचे आहे. फुटबॉल, रब्बी, बास्केटबॉल, नेटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, हॉकी, जिम्मॅस्टिक अशा अनेक खेळांमध्ये खेळाडूला कसब पणाला लावावे लागते. रोजच्या कामांमध्ये एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट उत्तम अवस्थेत नसेल तर एकवेळ चालू शकते. परंतु खेळ आणि खेळाडूंच्या बाबतीत या अस्थिबंधाची कार्यक्षमता आवश्यक असतेच. म्हणून अनेक वेळा खेळाडूंना शस्त्रक्रिया करावी लागते. स्पर्धेमध्ये पूर्वीच्या पातळीपर्यंत टिकून राहण्यासाठी खेळाडू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात. अनेक खेळाडूंना एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटच्या इजेमुळे आपले सादरीकरण, गुणवत्ता यात नकारात्मक परिणाम आणि फरक दिसून येतो. 

एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटला इजा झाल्याची लक्षणे 
हालचाल करताना गुडघ्यातून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. तसेच चालताना तोल गेल्यासारखे भासते. एसीएलला इजा झाल्यास लक्षणीय सूज आणि वेदना जाणवतात. एसीएलला इजा झाल्याचा परिणाम सांध्याला सूज येणे, हालचाल करण्यास निर्बंध येणे, स्नायू अशक्त होणे, कार्य करण्याची क्षमता कमी होणे असे घडते. ओघाने एखाद्या तरुण खेळाडूचे ठराविक कालावधीचे नुकसान होते. 

एसीएलला इजा झाल्यास निदान करण्याच्या पद्धती 
वैद्यकीय पद्धतीने गुडघ्याचे परीक्षण केले जाते. त्यानंतर डॉक्टर किंवा फ़िजिओथेरपीस्ट रुग्णामध्ये एसीएलला इजा झाल्याची काही लक्षणे आढळतात का, याचे परीक्षण करतात. याच्या निदानासाठी विशिष्ट चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये एसीएलवर ताण दिला जातो. त्यातून एसीएलला दुखापत झाली आहे का किंवा चीर गेली आहे का हे लक्षात येते. 
काही रुग्णांना एसीएलला दुखापत झाल्यास निदानासाठी एमआरआय करण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे एसीएलच्या दुखापातीबरोबर आणखी काही हानी असल्यास त्याचेही निदान होते. अशा आणखी काही दुखापारी आहेत ज्या एसीएलला दुखापत झाल्यास ओघाने येतात. उदाहरणार्थ: 
एसीएलला इजा झाल्यास एक्स- रे करण्याचा सल्ला सर्व रुग्णांना दिला जातोच असे नाही. एक्स- रे काढल्यास एसीएलला दुखापत असेल त्याचे निदान होण्याची शक्यता कमी असते. 

अर्थ्रोस्कोपी: सांध्याला छोटीशी चीर देऊन छोटी प्रज्वलित नलिका (अर्थ्रोस्कोप) सांध्यात सोडला जातो. या नलिकेद्वारे सांध्याच्या आतील भागाची मिळणारी छायाचित्रे मोठ्या पडद्यावर पाहण्यात येतात. त्यामुळे सांध्याला कितपत दुखापत झाली आहे, याचे परीक्षण करता येते. 

उपचार 
या रुग्णांना इजा झाल्यावर काही दिवस अथवा काही आठवड्यांमध्येच बरे वाटू लागते. सूज कमी होत असल्याने रुग्णाला आपला गुडघा पूर्वस्थितीत आल्यासारखे वाटते. परंतु वैद्यकीय सल्ला अस्तीशय गरजेचा असतो. कारण दुखापातीकडे दुर्लक्ष केल्यास झालेल्या इजेची तीव्रता अधिक वाढू शकते. 
एसीएलला झालेली दुखापत शस्त्रक्रियेविना किंवा शस्त्रक्रिया करून बरी करता येते. हा निर्णय केवळ तुमचे अस्थिविकार तज्ज्ञ (ऑर्थोपेडीक डॉक्टर) घेऊ शकतात. 

एसीएल शस्त्रक्रिया 
एसीएलच्या सामान्य शस्त्रक्रियेला एसीएलची पुनर्रचना (एसीएल रिकन्सट्रक्शन) असे म्हणतात. एकदा एसीएलला इजा झाल्यावर त्याची दुरुस्ती करणे, क्वचितच शक्य आहे. त्यामुळे एसीएलची पुनर्रचना करावी लागते. इजा झालेल्या स्नायुबंधाच्या ठिकाणी पर्यायी स्नायुबंध बसवला जातो. ओघाने अस्थिबंधाची दुखापत पूर्वस्थितीत यायला मदत होते. 

शस्त्रक्रियेआधीच्या फ़िजिओथेरपीचे महत्व: 
एसीएलला दुखापत झाली आहे हे कळल्यानंतर ते शस्त्रक्रिया होईपर्यंतचा वेळ महत्वाचा असतो. या काळात रुग्णाला त्याच्या शरीर आणि गुडघ्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करण्याकरिता वेळ मिळतो. यामुळे दुखापतीची तीव्रता कमी करता येते. शस्त्रक्रिया आणि आधीचे व नंतरचे पुनर्वसन यासाठी शारिरीक आणि मानसिकरीत्या रुग्ण तयार होतो. 
यामुळे स्नायूंची गेलेली ताकद पुन्हा मिळवता येते. हालचाली सुधारतात तसेच सूज नियंत्रणात येते. एसीएलला दुखापत झाल्यावर लगेच यासाठीचे व्यायामप्रकार सुरु करता येतात. 
या पूर्वपुनर्वसनानंतर गुडघा पूर्वस्थितीत दिसायला लागतो. परंतु असे नसते. त्यामुळे गुडघ्यावर ताण येईल, अशा हालचाली करणे टाळावे. उड्या मारणे, पळणे अशा जास्त ताकद लागणाऱ्या हालचाली करू नयेत. पायाच्या हालचाल करण्याच्या दिशेत अचानक बदल होईल अशी दैनंदिन कामे टाळावीत. वरील गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास दुखापतीची तीव्रता गंभीर होण्याची शक्यता अधिक आहे. 
पूर्वपुनर्वसनामध्ये पायाला बळकटी देणे, अंत:स्थ संवेदना सुधारणे, तोल सुधारणे आणि कार्यात्मकता वाढवणे या गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला जातो. सुरूवातीला हे व्यायाम जमिनीवर करणे अवघड जाते. त्यामुळे आम्ही सल्ला देतो की हे व्यायाम पाण्यामध्ये केले जावेत. या उपचारांना अॅक्वा थेरपी असे म्हणतात. पाण्यातले व्यायामप्रकार तुलनेने कमी वेदनादायी असतात. पाण्यात करायला सहज व सोपे असतात. त्यामुळे रुग्णालाही हे व्यायाम करताना आपले मन रमवता येते. सामान्यपणे, पुनर्वसन सत्रांमध्ये बर्फाने शेकणे, गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग करून हालचाली करणे किंवा सतत उलट्या बाजूला हालचाल करणे, आधार आणि संरक्षणासाठी योग्य उपकरणांचा वापर, संवेदना निर्माण होण्यासाठी उपकरणांचा वापर आणि योग्य तसेच शास्त्रोक्त व्यायामप्रकार यांचा समावेश होतो. यामुळे तोल सुधारणे, अंत:स्थ संवेदना सुधारणे, दाहकता कमी करणे या गोष्टी ओघाने घडतात. संपूर्ण पुनर्वसन प्रक्रियेचे तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण केले जाते. तीव्र, रोगमुक्ती आणि कार्यात्मकता. 
तीव्र टप्प्यात दुखापत झाल्यावर लगेच तसेच शस्त्रक्रिया झाल्यावर होणाऱ्या पुनर्वसनाचा समावेश होतो. दाहकता कमी करणे, हालचाली सुधारणे तसेच चतु:शिरस्त स्नायूंना बळकटी देणे हे ध्येय ठेऊन त्याप्रमाणे रुग्णावर उपचार केले जातात. 

रोगमुक्तीचा टप्पा साधारण तीन ते सहा आठवड्यांचा असतो. यामध्ये शरीराच्या वरच्या भागातील स्नायूंना बळकटी देणे आणि कार्यात्मकता सुधारणे याकडे लक्ष केंद्रित केले जाते. 
कार्य पुन्हा क्षमतेने सुरू होण्याचा टप्पा दुखापतीनंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर साधारण सहा आठवड्यांनी सुरु होतो. रुग्णाला दुखापतीच्या किंवा शस्त्रक्रियेच्या पुनर्स्थितीत आणणे, हेच या टप्प्याचे ध्येय असते. या टप्प्यामध्ये पुन्हा दुखापत होण्याची संभाव्यता कमी करण्यासाठी कष्ट घेतले जातात. 

एसीएलला दुखापत झालेल्या रुग्णांची फ़िजिओथेरपी घेण्याचे उद्दिष्ट 
- दाहकता कमी करणे 
- वेदना कमी करणे 
- गुडघ्याच्या सांध्याच्या हालचाली सुधारणे 
- गुडघ्याच्या चतु:शिरस्त आणि गुडघ्याच्या मागील दोन स्नायूंना जोडणाऱ्या दोरीसारख्या दिसणाऱ्या स्नायूला बळकटी देणे 
- गुडघ्याच्या वाटीची स्थिती आणि जागा सुधारणे 
- शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी देणे 
- स्नायूंची लवचिकता सुधारणे 
- चपळता, तोल आणि अंत:स्थ संवेदना सुधारणे 
- चालताना, पळताना, लंगडी घालताना लागणारे कौशल्य आणि तोल सुधारणे 
- दुखापत पुन्हा उलटण्याची संभाव्यता कमी करणे 

शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन 
शस्त्रक्रियेनंतर एसीएलचे पुनर्वसन अतिशय गरजेचे आहे. परंतु बहुतांश घटनांमध्ये याकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. शस्त्रक्रिया झाली म्हणजे आता इतर कशाचीही गरज नाही, हे रुग्णांचे धोरण चुकीचे आहे. शस्त्रक्रियेनंतर जर योग्य आणि उत्तम परिणाम हवे असतील तर अनुभवी आणि प्रशिक्षित फ़िजिओथेरपीस्टचा सल्ला घ्यावा. 
शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन करताना संपूर्ण गुडघा पुनर्स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. गुडघ्याचे अस्थिबंध स्थिर करणे, स्नायूंची ताकद वाढवणे, सांध्याची हालचाल सुधारणे, या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये गुडघ्याचा तोल सुधारणे, अंत:स्थ संवेदना सुधारणे, चपळता परत आणणे यांचाही समावेश असतो. याकरता रुग्णाला विशेष वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाते. रुग्णाच्या गरजा, ध्येय लक्षात घेऊन त्यानुसार रुग्णाला लागू होईल अशी उपचार पद्धती ठरवली जाते. फ़िजिओथेरपीस्ट या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. तुम्हाला गुडघ्याला वेदना जाणवल्या किंवा लक्षणे आढळली तर त्वरित फ़िजिओथेरपीस्टचा सल्ला घ्यावा. 
डॉ. जायना शहा स्वत: एक फ़िजिओथेरपीस्ट आहेत. त्यांची एसीएल पुनर्रचना शस्त्रक्रिया २०१५ मध्ये झाली. त्यांनी सांगितले की, ‘‘माझी एसीएल पुनर्वसन प्रक्रिया अतिशय रटाळ आणि वेदनादायी होती. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या व्यायामात रस नव्हता. व्यायाम करताना वेदना होत असत. त्यामुळे टाळाटाळ केली जाई. पण माझ्या निष्काळजीपणामुळे गुडघा ताठर झाला. त्यानंतर माझा गुडघा पुनर्स्थितीत येण्यासाठी मला दोन वर्षांचा कालावधी लागला. या घटनेने माझे डोळे उघडले. यातून मला समजले की, आयुष्य ही एक हालचाल आहे आणि हालचाल हेच आयुष्य आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, पुनर्वसन प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर आपली हालचाल, अवयव आपल्याला सुस्थितीत पुन्हा मिळत नाही.’’ 

एसीएलला दुखापत होऊ नये यासाठी घ्यायची काळजी 
एसीएल पुनर्रचना शस्त्रक्रिया झालेल्या किंवा करायला लागणार असलेल्या रुग्णांना गुडघ्याचा तोल सुधारणे, अंत:स्थ संवेदना सुधारणे, चपळता परत आणणे यासाठी काही व्यायामप्रकार दिले जातात. सुरुवातीपासूनच हे व्यायामप्रकार दुखापत होऊ नये यासाठीही फायदेशीर असतात. यासाठी रुग्णांना पुढील गोष्टी अंमलात आणणे गरजेचे आहे. 
- नियमितपणे मांडीच्या स्नायूवर ताण देणारे आणि हे स्नायू बळकट करणारे व्यायामप्रकार करणे 
- जास्त ताकदीच्या व्यायाम सुरु करण्याआधी वॉर्म अप करणे 
- लवचिकता कायम ठेवणे 
- व्यायाम करताना तीव्रता हळूहळू वाढवणे. अचानक जास्त ताकदीचे व्यायाम करणे टाळावे 

पुन्हा खेळ सुरु करताना... 
शस्त्रक्रिया झाल्यानंतरही अनेक खेळाडूंना खेळ परत सुरु करताना ठराविक अडचणी येतात. एसीएलला दुखापत झाल्यास पुढील दोन गोष्टी खेळाडूने केल्या तर तो आपला खेळ परत सुरु करू शकतो. 
- एसीएल पुनर्रचना शस्त्रक्रिया 
- शस्त्रक्रियेनंतर परिणामकारक पुनर्वसन प्रक्रिया 
एसीएलला दुखापत झालेल्या रुग्णांसाठी विशेष पुनर्वसन सत्रांचे आयोजन करणे योग्य असते. रुग्णांच्या गरजेनुसार योग्य पद्धतीने रुग्णाची गरज आणि ध्येय ओळखून त्याद्वारे उपचार पद्धती ठरवावी. फ़िजिओथेरपी विभागामध्ये शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेसाठी अनुभवी व तज्ज्ञ फ़िजिओथेरपीस्टकडून उपचार केले जावेत. यामध्ये अॅक्वॅटिक थेरपी, जीममध्ये करता येईल असे व्यायामप्रकार, तसेच रुग्णाच्या गरजेनुसार तयार केलेली पुनर्वसन उपचार पद्धती यांचा समावेश हवा.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com