इंटरनॅशनल फॅमिली डे

इंटरनॅशनल फॅमिली डे

एका बाजूने कुटुंबसंस्था मोडीत काढण्याच्या योजना सर्व देश, त्यातल्या त्यात प्रगत राष्ट्रे, राबवत असताना कुटुंब दिवस जागतिक स्तरावर साजरा करायचा हा कुठला प्रकार? हा ढोंगीपणाच झाला. पूर्वी एखाद्या कुटुंबात खापर पणजोबांपासून पतवंडांपर्यंत अनेक पिढ्या एकत्र राहात. मोठे कुटुंब एकत्र राहण्यासाठी विशिष्ट मानसिकता लागते, संस्कार लागतात, संस्कृती लागते, वडीलधाऱ्यांसाठी आदर असावा लागतो. या सर्व गोष्टी एखाद्या कुटुंबात असणे आज अवघड वाटत असले तरी ते अशक्‍य नाही. संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थित चालले तर जीवन तणावरहित होऊन शांततेत व समाधानात जगणे सोपे होते, हे ध्यानी घ्यावे.

पंधरा मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस’ म्हणजे ‘इंटरनॅशनल फॅमिली डे’ या नावाने साजरा केला जातो. कुटुंबसंस्थेचे महत्त्व वाढावे, यासाठी आज सर्व जगात प्रयत्न केला जात आहे, याच्यापेक्षा मोठा ढोंगीपणा दुसरा नसावा, असे मला वाटते. एका बाजूने कुटुंबसंस्था मोडीत काढण्याच्या योजना सर्व देश, त्यातल्या त्यात प्रगत राष्ट्रे, राबवत असताना कुटुंब दिवस जागतिक स्तरावर साजरा करायचा, हा कुठला प्रकार? 

पूर्वी एखाद्या कुटुंबात खापर पणजोबांपासून पतवंडांपर्यंत अनेक पिढ्या एकत्र राहात असल्या तर त्या कुटुंबात वीस-पंचवीस व्यक्‍ती सहज असत. एवढे मोठे कुटुंब एकत्र राहण्यासाठी विशिष्ट मानसिकता लागते, संस्कार लागतात, संस्कृती लागते, वडीधाऱ्यांसाठी आदर असावा लागतो. या सर्व गोष्टी एखाद्या कुटुंबात असणे आज अवघड वाटत असले तरी ते अशक्‍य नाही. कुटुंबात आजी-आजोबा, त्यांची चार मुले, या मुलांमुळे घरात आलेल्या सुना-जावई, नातवंडे, अशा प्रकारे दहा-पंधरा माणसांपर्यंतचे कुटुंब आनंदात राहू शकणे अवघड नसावे. अगदीच काही नाही तर

आई-वडील व त्यांची एक मुलगी, एक मुलगा, जावई, सून, मुलाची एक-दोन मुले असा परिवार असणे अवघड नाही, मुलगी लग्नानंतर दुसऱ्या घरात राहात असल्यामुळे तिची मुले व यजमान हे सर्व अधून मधून हे सर्व या कुटुंबाशी जोडली जातात. एवढे कुटुंब तर एकत्र नीट राहायला काही हरकत नसावी. 

जितक्‍या अधिक माणसांचे स्वयंपाकघर एक असते, तेवढा स्वयंपाकघरावरचा दरडोई खर्च कमी होतो, कारण वस्तू जितकी कमी प्रमाणात घ्यावी तितकी ती महाग पडते. शिवाय स्वयंपाकात विविधता अनुभवायला मिळते, सगळ्यांच्या मदतीने प्रेमाने शिजविलेले अन्न सेवन करता येते. चार माणसे जेवणार असली व प्रत्येकासाठी दोन बटाटे भाजीसाठी घ्यायचे ठरविले तर आठ बटाट्यांऐवजी दहा बटाटे घ्यावे लागतात; पण त्याजागी दहा माणसे जेवणार असली तर प्रत्येकी दोन व वरचे दोन असे मिळून बावीस बटाटे घ्यावे लागतात. जास्ती माणसांचा स्वयंपाक बनविताना खर्च कमी येतो तो असा. मोठ्या कुटुंबात उरलेल्या अन्नाच्या व्यवस्थापनाची फार मोठी काळजी घ्यावी लागत नाही. घरात समोरच्या उठा-बसायच्या खोलीत सगळ्यांना मिळून एक टीव्ही पुरतो. तसेच मोठ्या कुटुंबात बाथरूम, शौचालय वगैरे जागाही त्यामानाने कमी लागतात. गरम होत असताना खोलीत एक माणूस असला तरी एक पंखा लावावा लागतो आणि चार माणसे बसली तरी एक पंखा पुरतो. त्यामुळे अधिक माणसे असतील तेव्हा खर्च आपसूक कमी होतो. पैसा व खर्च हा एकमेव मुद्दा नसला तरी आपल्या कमाईत सुखासमाधानाने राहता येण्यासाठी बऱ्याच वेळा पैसा महत्त्वाचा ठरतो. 

या उलट जेव्हा कुटुंब मोडते व दोन-दोन माणसांचे एक कुटुंब होते किंवा माणूस एकटा राहू लागतो, तेव्हा घरातील बादलीपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन वगैरे सर्व गोष्टी प्रत्येक घरात असाव्या लागतात. या गोष्टी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाव्यात म्हणून एकट्या-दुकट्याने एका फ्लॅटमध्ये राहावे अशा कल्पना तरुणांच्या डोक्‍यात भरवल्या गेल्या आहेत की काय, अशी शंका येते. या कल्पना तरुणाच्या डोक्‍यात इतक्‍या ठासून भरवल्या गेल्या, की या कल्पना त्यांच्या स्वतःच्याच आहेत असे भासावे. तरुणांच्या अहंकाराला फूंक मारून, कुटुंब तोडण्याचा प्रयत्न व्यापारी संस्था करतात की काय, असाही संशय घ्यायला वाव आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठे कुटुंब असणे चांगले. नोकरी-कामानिमित्त दूर देशी राहावे लागले तर वेगळे राहणे ओघानेच येते व त्या वेळी नाइलाज असतो. 

मुळात मनुष्य हा समुदायप्रिय आहे. प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे. फक्‍त स्त्री व पुरुष एकत्र येऊन नैसर्गिक उर्मी भागली तरी त्याचे समाधान होईनासे झाले असावे. आजूबाजूला चार लोक असले तर आपण अधिक समाधानी असतो असे त्याच्या लक्षात आले असावे. मग मोठ्या टोळ्या तयार झाल्या असाव्या. त्यातून पुढे गावे वसवली गेली असावीत. असे करता करता समाजाची स्थापना झाली असावी. वेगवेगळ्या संस्कृतीप्रमाणे वेगवेगळे समाज आपापली कामे करत राहिले. जेथे समाज वसवला गेला. तेथील भौगोलिक परिस्थितीला तोंड देत असताना त्या त्या समाजाची वागण्याची वेगळी पद्धत तयार झाली. समाजात राहात असताना सुखाने जीवन जगणे सोपे होत असे, व्यक्‍तीवरचा मानसिक ताण कमी होत असे. एकूणच एकत्र राहिल्याने, एकमेकांना भेटल्याने आलेल्या संकटाचा सामना एकत्र राहून केला जात असे, जणू संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब होत असे. उदा. अतिवृष्टीमुळे राहण्याच्या जागेत पाणी आले तर कुटुंबातील सर्वांनी मिळून पाणी काढून टाकणे, घर साफ करणे सोपे होते, तेच एकटा माणूस असला तर हेच काम करायला खूप वेळ लागणार हे निश्‍चित. 

मनुष्य हा संभाषणप्रिय, संवादप्रिय आहे. म्हणून कुटुंबात चार-सहा माणसे असली तर माणूस एकमेकांशी संवाद, संभाषण करू शकतो, त्याच्या मनावरील ताण कमी होतात. संस्कृती टिकवायला कुटुंबाची गरज असते आणि कुटुंबामुळे संस्कृती टिकते. संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थित चालले तर जीवन तणावरहित होऊन शांततेत व समाधानात जगणे सोपे होते. 

सध्या आजार वाढत आहेत, मनाच्या असंतुलनामुळे, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे नवीन नवीन रोग झालेले आढळत आहेत. या दृष्टीनेही कुटुंबसंस्था अस्तित्वात असणे गरजेचे आहे.  

कुटुंबसंस्थेचे महत्त्व समजून घेऊन पुन्हा एकदा कुटुंबसंस्था अस्तित्वात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले तर ‘इंटरनॅशनल फॅमिली डे’ हा दिवस साजरा केल्याचे सार्थकी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com