सतत एकाच जागी बसता? शरीराची होते हानी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

कार्यालयामध्ये सतत एकाच जागी, एकाच खुर्चीवर तासनतास बसणे शरीरासाठी नुकसानकारक आहे.

अलिकडे खांदेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी वाढल्याची तक्रार चाळिशीतच ऐकू येते. त्याचे कारण सतत एकाच जागी बसून राहण्यात दडलेले आहे. कार्यालयामध्ये सतत एकाच जागी, एकाच खुर्चीवर तासनतास बसणे शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक व विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही पाहणे, संगणकावर काम करणे, स्मार्टफोन पाहात राहणे हे देखील शरीराला हानी पोहोचवत असते. नुकतेच केले गेलेले संशोधन याबाबत आश्चर्यचकित करणारी तथ्ये आपल्यासमोर ठेवते.

अमेरिकेतील मेयो येथील एका रुग्णालयात याबाबत संशोधन करण्यात आले. या संशोधनातून शारीरिक असक्रियता धूम्रपानाइतकीच घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. या

संशोधनानुसार, खांदे, पाठ, कंबरदुखीच्या समस्येपासून ते अगदी टाइप-2 मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी चालण्या-फिरण्याची, व्यायाम करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. दिवसभर बसण्याची किंवा पडून राहण्याची सवय स्मरणशक्तीसाठीही घातक असल्याची शक्यता या संशोधनातून वर्तवण्यात आली आहे. संशोधनादरम्यान, अधिकतर युवक जवळपास आठ तासांपर्यंत खुर्चीवर बसत असल्याचे, तसेच टिव्ही किंवा मोबाईल पाहण्यासाठी एकाच जागेवर तीन तास बसून असल्याचे समोर आले.

शारीरिक स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी, दररोज जवळपास दहा हजार पावले चालणे आवश्यक आहे. आठवड्यातून सहा दिवस कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणेही गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन संशोधकांनी कार्यालयामध्ये एकाच जागी बसण्याबाबत काही उपाय सुचवले आहेत.

कार्यालयात पाण्याची बाटली भरुन न ठेवता, तहान लागल्यास जागेवरुन उठून पाणी प्यावे. 
कार्यालयात शक्य असल्यास आपल्या जागेवरच किंवा दुसऱ्या ठिकाणी शरीराला अधूनमधून ताण द्यावा.
नाश्ता किंवा जेवणासाठी शक्यतो कॅन्टिनमध्ये जावे. जागेवरच खाऊ नये.
शक्य असल्यास लिफ्टच्याऐवजी पायऱ्यांचा वापर करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is harmful for the body to sit in one chair in one place