#FamilyDoctor कावीळ इच्छालयाचा आजार

#FamilyDoctor कावीळ इच्छालयाचा आजार

रोग कोणताही असो, वेळेवर निदान होणे आणि त्यानंतर योग्य उपचार घेणे या दोन्ही गोष्टी आवश्‍यक असतात. काही रोग यामुळे पूर्ण बरे होऊ शकतात. मात्र दुर्लक्ष झाले तर तर जिवावर बेतू शकते. असाच एक रोग म्हणजे कावीळ. कर्करोग किंवा हृद्रोगाप्रमाणे भीतीचे वलय या रोगाभोवती नसले तरी काविळीवर फार नेटाने आणि न कंटाळता पथ्य-औषधे सांभाळावी लागतात. 

‘कामान्‌ लाति इति कामला’ म्हणजे ज्या रोगात सर्व इच्छांचा लय होतो, काहीही करावेसे वाटत नाही तो रोग म्हणजे कामला अर्थात कावीळ होय. कावीळ हा विकार प्राचीन असावा. वेदात तसेच इतरही प्राचीन संस्कृत सूक्‍तांमध्ये ’कामले’ चे संदर्भ सापडतात व त्यासाठी सूर्योपासनेसारखे उपायही सुचवलेले आढळतात. आयुर्वेद शास्त्रानुसार कावीळ ही रक्‍तवहस्रोतसातील बिघाडामुळे होणारी व्याधी आहे. रक्‍तवहस्रोतस म्हणजे रक्‍तधातू तयार होण्यापासून ते रक्‍ताचे अभिसरण संपूर्ण शरीरात होऊन रक्‍त मांसधातूत परिवर्तन होण्यापर्यंतच्या सर्व क्रिया ज्यात घडतात ते स्रोतस होय. या स्रोतसाची मूळ स्थाने आहेत यकृत व प्लीहा (स्प्लीन). अशा प्रकारे आयुर्वेदानुसारही काविळीचा संबंध यकृताशी आहे. आणि म्हणून कावीळ हा अवघड विकार आहे. जितक्‍या लवकर कावीळ झाल्याचे लक्षात येईल, जितक्‍या लवकर काविळीवर योग्य उपचार सुरू होतील आणि जितक्‍या कसोशीने रुग्ण खाण्या-पिण्याचे व वागण्याचे निर्बंध पाळेल, तितक्‍या चांगल्या प्रकारे कावीळ बरी होऊ शकते. याउलट काविळीकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा यकृतावर कायमचा दुष्परिणाम होऊन भरून न येणारे नुकसान होऊ शकते.

आयुर्वेदिक ग्रंथात काविळीचे मुख्यतः दोन प्रकार वर्णन केलेले आढळतात.

१. बहुपित्ताकामला - पित्त वाढवणाऱ्या आहार-आचरणामुळे उत्पन्न होणारी ही कावीळ असून यात रोगाची सुरुवात पचनसंस्थेत होते व हळूहळू प्रकुपित झालेले पित्त रक्‍तधातू व मांसधातूपर्यंत पोचते. 

आहारापासून रस, रक्‍तादी धातू जेव्हा तयार होत असतात तेव्हा रसधातूला रंग येऊन त्याचे रक्‍तात परिवर्तन करण्याचे काम ’रंजक पित्त’ करत असते व रंजक पित्त यकृतात राहात असल्याने ही क्रिया यकृतामध्ये होत असते. रक्‍ताचा मल आहे ’पित्त‘. निरोगी अवस्थेत रक्‍ताबरोबर तयार झालेले हे ’मलरूपी पित्त‘ आतड्यातून मलामार्फत (विष्ठेमार्फत) योग्य तेवढ्या प्रमाणात बाहेर पडते म्हणूनच मळाला प्राकृत असा पिवळा रंग असतो. मात्र पित्तकर आहार, आचरणाने जेव्हा यकृताकरवी अधिक प्रमाणात पित्त तयार होते तेव्हा ते प्रथम पचनसंस्थेत व नंतर हळूूहळू संपूर्ण शरीरात पसरते व ‘बहुपित्ता कामला’ तयार करते.

चरकाचार्य या बहुपित्ताकामलेची लक्षणे अशी सांगतात -

हारिद्रनेत्रः सुभृशं हारिद्रत्वङ्‌नखाननः ।
रक्‍तपीतशकृन्मूत्रो भेकवर्णो हतेन्द्रियः ।।
दाहविपाकदौर्बल्य सदनारुचिकर्षितः ।
......चरक चिकित्सास्थान

या प्रकारात सुरुवातीला तोंड येणे, उलटी होणे, पोटात व छातीत आग होणे, तोंडाची चव नाहीशी होणे, भूक लागेनाशी होणे, गळून गेल्यासारखे वाटणे, त्वचा निस्तेज होणे अशी लक्षणे दिसतात. याकडे वेळीच लक्ष दिले नाही किंवा योग्य उपचार झाले नाहीत तर डोळे पिवळे होतात. नखे व त्वचा पिवळसर होते व सर्व इंद्रिये मलूल होतात, वजन कमी होते. याखेरीज या प्रकारच्या काविळीमध्ये हाता-पायाच्या तळव्यांची आग होणे, लघवी करताना जळजळ होणे, अंगाला खाज येणे, असह्य तहान लागणे वगैरे लक्षणे दिसतात.

२. रुद्धपथा कामला - हा काविळीचा दुसरा प्रकार होय. यात पित्ताचे प्रमाण वाढलेले नसते. मात्र नावाप्रमाणेच पित्ताचा मार्ग रुद्ध झाल्यामुळे (अडवला गेल्यामुळे) पित्त पचनसंस्थेत येऊ शकत नाही, उलट संपूर्ण शरीरात पसरते व काविळीची लक्षणे उत्पन्न होतात.

रुक्षशीतगुरुस्वादुव्यायामैर्वेगनिग्रहैः ।
कफसंमूर्च्छितो वायुः स्थानात्‌ पित्तं क्षिपेत्‌ बली ।।
हरिद्रनेत्रमूत्रत्वक्‌ श्वेतवर्चस्तदा नरः ।।
.....चरक चिकित्सास्थान

 

अतिशय रुक्ष, थंड, पचायला जड व गोड पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने, स्वशक्‍तीपेक्षा अधिक प्रमाणात व्यायाम केल्याने, तसेच मल-मूत्रादी वेग अडवून ठेवल्यामुळे असंतुलित झालेले वात व कफदोष पित्ताचा नेहमीचा मार्ग अडवून ठेवतात. त्यामुळे पित्त नेहमीप्रमाणे पचनसंस्थेत येऊ शकत नाही, तर रक्‍तामध्ये शोषले जाऊन रक्‍ताकरवी संपूर्ण शरीरात पसरते. या प्रकारात डोळे, मूत्र व त्वचेचा रंग पिवळा होतो. मात्र मळाचा (विष्ठेचा) रंग पित्त पचनसंस्थेत पोचू न शकल्याने पांढरा असतो. या प्रकारात पोटात गुडगुडणे, मलावष्टंभ, छातीत जडपणा वाटणे, तोंडाला चव नसणे, अग्नी मंद होणे, बरगड्यात दुखणे, अशक्‍तता वाटणे, वारंवार उचकी लागणे, दम लागणे, ताप येणे वगैरेही लक्षणे दिसतात.

या प्रकारच्या काविळीमध्ये मुख्यतः वात आणि कफ दोषामुळे अवरोध होतो असे सांगितलेले असले, तरी कधीकधी बाकीही काही कारणांमुळे अवरोध होऊन कावीळ होऊ शकते. उदा. यकृतात गाठ होणे, गळू होणे, पित्ताशयात खडे झाल्याने पित्ताचा मार्ग अवरुद्ध होणे वगैरे. अशा वेळी त्या त्या कारणानुरूप काविळीवरील उपचार बदलत जातात.

याशिवाय अतिमद्यपानाने यकृताची काम करण्याची क्षमता संपुष्टात आल्यानेही कावीळ होऊ शकते. ही कावीळ बरी होणे अवघड असते. खराब, अस्वच्छ अन्न खाण्याने किंवा पाणी पिण्यानेही त्रिदोष प्रकुपित होऊन कावीळ होऊ शकते. अशी कावीळ वेगाने शरीर व्यापणारी असते. त्यामुळे त्वरित उपचार होणे गरजेचे असते.

अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर एकाएकी भूक लागेनाशी झाली, अन्नावरची वासना उडाली, काही खाल्ले तरी मळमळ व उलट्या होऊ लागल्या, ताप येऊ लागला, बद्धकोष्ठता किंवा द्रवमलप्रवृत्ती होऊ लागली, मलप्रवृत्तीचा रंग गडद पिवळसर किंवा पांढरट होऊ लागला, डोळे, त्वचा पिवळसर किंवा पांढरट दिसू लागली तर काविळीची शक्‍यता असू शकते असे समजावे व त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बरोबरीने पुढील उपचार सुरू करावेत. 
काविळीची शंका आल्यास पाणी उकळून प्यावे. ‘पाण्याचा काढा’ करून पिणे सर्वांत चांगले, पण कमीत कमी दहा-पंधरा मिनिटे उकळलेले पाणी प्यावे.
लंघन करावे. अगदीच खावेसे वाटले तर साळीच्या लाह्या खाव्यात.
संपूर्ण विश्रांती घ्यावी.

बहुपित्त कावीळ आणि रुद्धपथा कावीळ हे दोन प्रकार अनुक्रमे पित्त व कफ-वात दोषांमुळे होत असल्याने त्यांच्यावर उपचार ही या दोषांना अनुरूपच करावे लागतात. बहुपित्ता काविळीमध्ये पित्त कमी करण्यासाठी ‘विरेचन’ प्रक्रिया सर्वोत्तम होय. या ठिकाणी पित्तशामक द्रव्यांनी सिद्ध तुपाच्या साहाय्याने रुग्णाचे यथोचित स्नेहन करून हलके विरेचन म्हणजे त्रिफळा, आरग्वध, निशोत्तर, मनुका वगैरे द्रव्यांनी विरेचन द्यावे. नंतरही पित्त कमी होण्यासाठी कामदुधा, प्रवाळपंचामृत, मौक्‍तिकभस्माचा वापर केला जातो. 

रुद्धपथा काविळीमध्ये अवरोध दूर करण्यासाठी कफ-वातशामक उपचार आवर्जून करावे लागतात. या प्रकारात ताम्रकल्प विशेष उपयोगी असतात. सुंठ, मिरी, पिंपळीपासून तयार केलेले त्रिकटूचे चूर्ण तसेच आरोग्यवर्धिनीसारखी औषधे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी लागतात.

अशा प्रकारे मूळ प्रकाराचा विचार करून उपचार ठरवावे लागत असले तरी एकंदर पित्त कमी करणे, यकृताची ताकद वाढवणे व पचनशक्‍ती पूर्ववत करणे या तीन गोष्टी काविळीमध्ये आवर्जून कराव्या लागतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या काविळीवर पुढील काही उपचार करता येतात.

सूर्योदयाच्या वेळेस एरंडाची ताजी पाने तोडावीत. ती स्वच्छ धुवून, पुसून घेऊन, वाटून त्याचा पाव कप रस काढावा व तो कपभर  दुधात टाकून सकाळी अनशापोटी घ्यावा. यानंतर दिवसभर फक्‍त दूध-भात, उकळलेले कोमट पाणी प्यावे. हा उपचार तीन दिवस करायचा असतो. 
सात दिवसासाठी बाळहिरड्याचे चमचाभर चूर्ण मधासह मिसळून घेणे.
ताजे गोमूत्र सात वेळा सुती कापडातून गाळून घेऊन त्यात समभाग पाणी मिसळून सकाळ-संध्याकाळ पाच-दहा चमचे घेणे.
सुरुवातीला जोवर भूक लागत नाही, तोवर नुसत्या साळीच्या लाह्या, दूध-भात अशा गोष्टी खाव्यात. हळूहळू जसजशी भूक लागत जाईल, तसतसा मुगाचे कढण व भात, मुगाची खिचडी, ज्वारीची भाकरी, दुधीची भाजी असा आहार हळूहळू वाढवत नेणे 
पुनर्नवासव, कुमारी आसव, रोहितकारिष्ट वगैरे आसवे घेणे.
जेवणानंतर चिमूटभर जिरे, धणे, हिंग, सैंधव टाकून ताजे ताक घेणे.
सुरुवातीला संपूर्ण विश्रांती घेणेच चांगले, पण नंतरही अति श्रम टाळणे, व्यायामाचा अतिरेक न करणे, मानसिक ताण न घेणे आवश्‍यक होय. 
दिवसा झोपणे, रात्री जागणे, उन्हात जाणे, मैथुन वगैरे गोष्टी पूर्ण टाळणेही आवश्‍यक. 
अशा प्रकारे लक्षणांकडे लक्ष ठेवून काविळीचे नेमके निदान झाले, वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषधे सुरू केली, मुख्य म्हणजे आहार-आचरणात संयम साधला तर काविळीसारखा अवघड विकारातून पूर्ण बरे होता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com