#FamilyDoctor मूतखड्याची समस्या आणि आधुनिक उपचार

ureteroscopy
ureteroscopy

मूतखडा लहान असेल तर तो औषधांनी लघवीवाटे वाहून जाऊ शकतो. मात्र मोठा खडा काढून टाकण्यासाठी अन्य उपचारांची गरज असते. आता अगदी अपवादात्मक स्थिती सोडली तर ओटीपोट कापण्याची गरज नसते. आधुनिक उपचार पद्धती फार परिणामकारक रीतीने मूतखड्यांवर इलाज करू शकते. 

बऱ्याचदा रुग्णांचा मूतखड्यासाठी घरगुती उपचारांवरच भर असतो. खडा लहान असेल, अडचणीच्या जागी नसेल तर तो घरगुती उपचारांनी निघून जाऊ शकतो. तसे घडले तर ठीकच. पण ते खात्रीचे नसते. अशावेळी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, ते म्हणजे खडा होण्यामागचे कारण काय होते?

मूत्रसंस्थेमध्ये खडा नेमका कोणत्या भागात तयार झाला होता? घरगुती उपचारांनी ख़डा खरेच वाहून गेला आहे की केवळ दुखणे थांबले आहे? खड्यामुळे मूत्रसंस्थेत आत कुठे इजा तर झालेली नाही ना? रुग्णांनी केवळ घरगुती उपचार करून थांबता कामा नये; त्रास होत नसला तरीही संबंधित तज्ज्ञाकडून खातरजमा करून घ्यायला हवी. कारण काही वेळा खड्यांनी औषधांना दाद दिलेली नसते, ते तसेच आत राहतात, मात्र औषधांमुळे दुखणे थांबलेले असते. दुखणे थांबल्याने रुग्णाने सुटकेचा श्वास सोडलेला असतो.

पण प्रत्यक्षात सुटका झालेली नसतेच. त्रास न देता आत राहिलेला खडा अधिक धोकादायक असतो. त्याच्यावर पुटे चढून तो वाढत जातो. तो अधिकाधिक कठीणही होतो. मग सोप्या उपचार पद्धतींऐवजी अवघड शस्त्रक्रियेची गरज भासते. 

सांगणे एवढेच की, रुग्णाला होणारा त्रास थांबवण्यासाठी तात्कालिक उपाय म्हणून घरगुती उपचार करायला हरकत नाही, पण त्यावर पूर्णतः विसंबून राहता कामा नये. पाच मिलीमीटरपेक्षा खडा लहान असेल तर आधुनिक वैद्यकशास्त्राने तयार केलेली औषधे देऊनच खडा पाडण्याचे प्रयत्न डॉक्‍टर करतात. या औषधांमुळे छोटे खडे (पाच मिलीमीटरपेक्षा लहान) थोडीशी झीज होऊन वाहून जाण्यास मदत होऊ शकते, पण पूर्ण मूतखडा मिठासारखा विरघळला असे कोणत्याही औषधाने घडत नसते. मूत्रवाहक नलिकांचा व्यास चार मिलीमीटर एवढाच असल्याने तेवढ्या आकाराचे, जास्तीत जास्त पाच मिलीमीटर आकाराचे खडे कसेबसे वाहून जाऊ शकतात. म्हणून शक्‍य तितक्‍या लवकर तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणे व योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे.

पूर्वी मूतखडा म्हटला की, पोटावर भली मोठी शिवणकाम केलेली शस्त्रक्रियेची खूण नजरेसमोर यायची. एखादी बरगडी तोडावी लागलेली असायची. आता वैद्यकीय ज्ञानाने व तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीमुळे उपचारपद्धती सोपी झाली आहे. मुख्य म्हणजे नव्याण्णव टक्के मूतखडे हे कुठलीही चिरफाड किंवा मोठी शस्त्रक्रिया न करता अत्यंत सोप्या पद्धतीने काढता येतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून शास्त्रोक्त पद्धतीने व वेळीच उपचार करून मूतखड्याची समस्या सोडवता येते. खडयाची जागा, आकार, संख्या, मूत्रपिंडावरचे दुष्परिणाम, इत्यादी गोष्टींवरून उपचाराचे स्वरूप ठरवता येते. यावर चार प्रमुख पद्धतींनी उपचार करता येतो.पाच मिलीमीटरपेक्षा लहान खडयासाठी शक्‍यतो शस्त्रक्रिया लागत नाही. अर्थात खडयांचा आकार,जागा,दुष्परिणामइत्यादी लक्षात घेऊन काही वेळा शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. म्हणजे असे की, खडा लहान असला, पण खोबणीत अडकावा तसा अडकून पडला असेल, तर काही वेळा शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. अर्थात ते त्या परिस्थितीवर अवलंबून असते. मोठया खडयांसाठी किंवा जास्त खडयांसाठी शस्त्रक्रिया हाच योग्य मार्ग आहे. 

संख्येने कमी किंवा लहान खडयांसाठी आता आधुनिक तंत्रे उपयुक्त आहेत. सहा ते दहा मिलीमीटरपर्यंतच्या मूतखड्यांना उपचारांची आवश्‍यकता लागू शकते. उपचार करायचा किंवा नाही व करायचा झाल्यास कोणत्या प्रकारचा करायचा, हे त्याचा आकार व मूत्रसंस्थेतील त्याची जागा यावर अवलंबून असते. लहान आकारातील खड्यांना गोळ्या, औषधीची उपचार पद्धती लागू पडते व ते शरीरातून बाहेर पडू शकतात; पण जर खड्यांची रुंदी लांबीपेक्षा जास्त असेल,म्हणजे जर तो उभा नसून गोल असेल व कधी-कधी अडथळा करत असेल, तर अशा मुतखड्याला अन्य उपचार पद्धतीने काढणे योग्य आहे. 

लिथोट्रिप्सी पद्धती
आधीभौतिक विद्युत लिथोट्रिप्सी ही पद्धती पहिल्यांदा १९८० मध्ये वापरली गेली आणि तेव्हापासून यशस्वी रितीने तिचा वापर केला जात आहे. लिथोट्रिप्सी म्हणजे रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनीकंपनाने ‘शॉक‘ देऊन त्याचा चुरा करणे. हा चुरा लघवीवाटे 

बाहेर पडतो. विद्युत प्रवाहाने सूक्ष्म ध्वनीलहरींची कंपने सोडण्यात येतात. ती कंपने खड्यांचे चूर्ण करतात. ही पद्धत लहान खड्यांसाठी अधिकतः उपयोगात आणली जाते. यात पासष्ट ते सत्तर टक्‍क्‍यांच्या आसपास यश मिळते. थोडे मोठे खडे असतील तर जास्त वेळा उपचार घ्यावा लागतो. मूत्रपिंडातील किंवा गाविनीच्या वरच्या भागातील बरेच खडे हे लिथोट्रिप्सी पद्धतीने काढले जातात. साधारणतः मूतखडा  दहा ते पंधरा सेंटीमीटरपेक्षा लहान असल्यास हे तंत्र वापरता येते. खडयाची जागा निश्‍चित केल्यावर यंत्रद्वारा विद्युतप्रवाहाने सूक्ष्म ध्वनिलहरी खड्यांच्या दिशेने सोडल्या जातात. या ध्वनिलहरींच्या कंपनाने खडे जागच्या जागी फोडले जातात. खडयांचा चुरा लघवीबरोबर खाली येतो. त्यामुळे उपचारांनंतर रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते. परिणामी लघवीद्वारा सहजतः खड्याचा चुरा वाहून जायला मदत होते. 

या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा भूलही द्यावी लागत नाही. काही वेळा वेदनाशामक औषध दिले जाते. यामध्ये शरीरातील कोणत्याही अवयवावर आघात केले जात नाहीत. जखम नाही. त्यामुळे कोणत्याही वेदना नाहीत की जखम नसल्याने पुढे जंतुसंसर्गाचा धोका नाही. एरव्ही कोणत्याही शस्त्रक्रियेत लहान मुले, वृद्ध माणसे, मधुमेही, हृदरोगी, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण यांची खूप जोखीम घ्यावी लागते. या उपचार पद्धतीत ही जोखीम नसते. या उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयात थांबावे लागत नाही.

या उपचार पद्धतीला काही मर्यादाही आहे. या पद्धतीने उपचार करीत असताना खडा फुटल्यावर काही बारीक अंश राहण्याची शक्‍यता असते. हे तुकडे गाविनीतून बाहेर पडताना गाविनीत अडकून राहण्याची शक्‍यता असते. अशा वेळेस दुर्बिणीने तुकडे बाहेर काढून टाकावे लागतात. याला वैद्यकीय भाषेत ‘स्टिनस्ट्रासे’ असे म्हणतात. काही वेळा खडा लहान असला तरी त्याच्या काठिण्यामुळे या पद्धतीच्या उपचाराने तो फुटत नाही. काही रुग्णांमध्ये तुकडे वाहून जाण्यासाठी अंतर्गत नळी किंवा स्टेन वापरण्याची गरज असते. हे उपचार काही रुग्णांमध्ये एकापेक्षा अधिक वेळा करावे लागतात.   

परक्‍युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी
दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून खडा शरीरातून बाहेर काढणे, याला पीसीएनएल म्हणजेच परक्‍युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी असे म्हणतात. दुर्बिणीद्वारे खडा काढण्याची ही उपचार पद्धती मूत्रपिंडातील व वरच्या मूत्रवाहिनीतील विविध प्रकारच्या मोठ्या खड्यांसाठी जास्त योग्य आहे.यात रुग्णाच्या पाठीतून किंवा बाजूने बारीक छिद्राद्वारे (साधारण एक सेंटीमीटर) नेफ्रोस्कोप हे दुर्बीण (नव्या तंत्रज्ञानानुसार आत फिरू शकणारा कॅमेरा) व चिमट्यासारखे यंत्र मूत्रसंस्थेत नेले जाते. खड्यांचा आकार, 

त्यांची संख्या, त्यांची नेमकी जागा याविषयी आधीच तपासणी करून घेऊन माहिती घेतलेली असते. त्रिमितीमध्ये ही माहिती उपलब्ध होत असल्याने खड्यापर्यंत जाण्याचा ‘नकाशा‘ आधीच तयार झालेला असतो. त्याचा फायदा शस्त्रक्रिया करताना शल्यकर्म चिकित्सकाला (सर्जनला) होतो. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेवेळी दुर्बिणीतून व क्ष-किरण यंत्राच्या साहाय्याने डोळ्यांनी किंवा बाजूला छोट्या पडद्यावर बघून खडा काढण्यात येतो.  

मोठे खडे आधीच माहीत असल्याने नव्या तंत्रज्ञानानुसार, अल्ट्रासोनिक, इलेक्‍ट्रोहाइड्रॉलिक किंवा लेसर यांचा उपयोग करून खडे फोडले जातात. मग पीसीएनएल उपचार पद्धतीद्वारे खड्याचे सर्व कण लगेच बाहेर काढले जातात. या मुतखड्यांसाठी दुर्बिणीद्वारे बाहेर काढणे हा सगळ्यात योग्य उपाय आहे. दुर्बिणीद्वारे खडे काढण्याच्या पद्धतीने मोठा खडा बाहेर काढता येऊ शकतो. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया बिनटाक्‍याची असते. अंगावर फक्त एक बारीक व्रण राहतो. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदनांचे प्रमाण खूपच कमी असते व रुग्ण दोन-चार दिवसात घरी जाऊ शकतो. तसेच चिरफाड व टाके नसल्याने या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या दैनंदिन कामे करण्यावर फारसा परिणाम होत नाही. काही वेळा खडा मोठा असला तर मात्र एकापेक्षा अधिक छिद्रे घ्यावी लागतात. 

या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकवेळी भूल देण्याची गरज असते. अर्थात त्याआधी सहा तास खाणे-पिणे बंद करावे लागते. तसेच, रक्त पातळ करणारी (उदाहरणार्थ, एस्पिरिन, वॉरफेरिन, क्‍लॉपिडोग्रेल) औषधे आणि नॉन-स्टेरॉइडल अँटी-इफ्लॅमेटरीज शस्त्रक्रियेआधी एक आठवडा थांबवावी लागतात. याखेरीजची अन्य औषधे घेण्यास हरकत नसते. दरम्यानच्या काळात किडनी फंक्‍शन स्टडीज, पूर्ण रक्त गणना आणि क्‍लॉटिंग प्रोफाइल आदी चाचण्या घेतल्या जातात. तसेच, मूत्रामधे जंतुसंसर्ग नसल्याची खात्री करून घेण्यासाठी मिड-स्ट्रीम युरीन (एमएसयु) ही मूत्रचाचणीही आवश्‍यक असते. 

शस्त्रक्रियेवेळी घेतलेल्या छिद्रातून तात्पुरता कॅथेटर आत टाकलेला असतो. या कॅथेटरमधून मूत्र व थोडाफार होणारा रक्तस्त्राव बाहेर टाकला जातो. रुग्णालयातून निघण्याआधीच हा कॅथेटर काढला जातो. कधीकधी मूत्राशयामध्ये मूत्र व्यवस्थित काढून टाकण्यासाठी स्टेंट ठेवण्याची आवश्‍यकता असू शकते. 

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा तपासण्या करून सर्व खडे नीट काढले गेले असल्याची खात्री करून घेतली जाते. जंतूसंसर्ग टाळण्यासाठी साधारण काही दिवस अँटीबायोटिक्‍स देण्यात येतात. पण घरी सोडल्यानंतर रुग्णाला ताप, थंडी किंवा मूत्रमार्गात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्‍टरांना तातडीने संपर्क साधणे आवश्‍यक असते.शस्त्रक्रियेनंतर साधारण सहा आठवड्यांनी पुन्हा एकदा तपासणी केली जाते. 

पूर्णतः पूर्वकाळजी घेऊन व पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या शस्त्रक्रियेत कमीत कमी जोखीम असते. अचानक वेगळी परिस्थिती निर्माण झाली तरच जोखीम असते. उदाहरणार्थ, यकृत, प्लीहा, फुफ्फुस, श्‍वासपटल, आतडी यासारख्या अवयवांना इजा होऊ शकते. शस्त्रक्रियेदरम्यान अनपेक्षित गुंतागुंत उद्भवली तर जोखीम वाढते. किंवा अनपेक्षित अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचीही जोखीम असते. अलीकडे या उपचार पद्धतीत छोटी छिद्रे घेतली जातात. या उपचार पद्धतीने खडा पूर्णतः काढला जातो. 

युरेटेरोस्कोपी 
मूत्रवाहिनीत असलेले खडे  युरेटेरोस्कोपीने काढता येतात. यासाठी लघवीच्या मार्गातून खडयापर्यंत युरेटेरोस्कोप नेला जातो. नवीन तंत्राने खडा जागच्या जागी फोडला जातो. त्यासाठी युरेटेरोस्कोपी म्हणजे मूत्रवाहिनीतील दुर्बीण वापरली जाते. ही बारीक प्रकारची दुर्बीण मूत्रमार्गातून मूत्राशयात नेतात, मग तेथून मूत्रवाहिनीत घालतात. नंतर मूतखड्याचे तुकडे करून ते बाहेर काढले जातात. नव्या तंत्रज्ञानानुसार लेसरचा उपयोग करूनही खडे फोडले जातात व त्यांचा बारीक चुरा केला जातो. बऱ्याच वेळा खड्याचा चुरा पूर्णतः वाहून जाईपर्यंत काही दिवस स्टेंट घालण्याची गरज असू शकते.  

चिरफाड न करता छोटे छिद्र घेऊन शस्त्रक्रिया करण्याची उपचार पद्धती चांगलीच विकसित झाली आहे. पूर्वी या शस्त्रक्रियांमध्ये छिद्रातून छोटी हत्यारे आत घालून खडे फोडले जात होते. ते तसे त्रासाचे, कौशल्याचे काम होते. आता याबाबतीतही क्रांती झाली आहे. साधारणपणे दीड सेंटीमीटरपेक्षा लहान खडे लघवीच्या मार्गातून लवचिक दुर्बिणीद्वारे (फ्लेक्‍झिबल युरेटेरोस्कोप) लेसरचा उपयोग करून जाळून नष्ट करता येतात. त्याहून मोठे, पण अडीच सेंटीमीटरपर्यंत आकाराचे खडे पाठीतून छोटे छिद्र घेऊन  लेसरने जाळता येतात आणि खड्यांचे सर्व कण त्याच छिद्रातून पूर्णपणे बाहेर काढता येतात. साधारण दोन मिलीमीटर जाडी असणारी ही दुर्बीण असते. विशेषतः गाविणी (युरेटर) मधील जवळजवळ सर्व खडे हे लघवीच्या 

मार्गातून दुर्बिणीद्वारे लेसरने फोडता येतात. साध्या पद्धतीने खडे तोडताना खड्याचा तुकडा मूत्रपिंडाकडे सरकण्याचा धोका असायचा. लेसर तंत्रज्ञानामुळे ही समस्या खूपच कमी झाली आहे. कारण या पद्धतीत खड्याचा भुगा होतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

लेसर ही एक प्रकारची प्रकाशज्योत आहे. दुर्बिणीद्वारे एका तंतूमधून ही ऊर्जा खड्यापर्यंत पोहोचवली जाते. या ऊर्जेमुळे खडे अक्षरशः जाळले जातात आणि त्याची धूळ होऊन जाते. लेसर तंत्रज्ञान, अतिशय सूक्ष्म आकाराच्या व लवचिक दुर्बिणींमुळे अतिशय सुलभ, कमीत कमी त्रासाचे व अत्यंत परिणामकारक आहे. 

काही वेळा खडा फारच मोठा असेल तर लॅप्रोस्कोपीचाही उपयोग केला जातो. आमच्या रुग्णालयात तेरा सेंटीमीटर लांब व १९६ ग्रॅम वजनाचा एक खडा याच पद्धतीने काढण्यात आला आहे.

पारंपरिक शस्त्रक्रिया
आता फार क्वचित, अगदी अपवादात्मक स्थितीत पारंपरिक पद्धतीची चिरफाड करणारी शस्त्रक्रिया करावी लागते. मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी उदरपोकळी उघडून खडे काढले जातात. मूतखड्याबरोबर जर मूत्रमार्गात काही अडथळा असेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा अडथळा असेल तरच पोट कापून शस्त्रक्रिया करावी लागते. पोट कापून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा रुग्णाला नक्कीच जास्त त्रास होतो. यामध्ये टाके असतात, जखम बरेच दिवस दुखू शकते. काहीवेळा जखमेत जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला लवकरात लवकर कामावर जाणेसुद्धा अशक्‍य असते.

मूतखडा आहे हे समजल्यावर त्यावर लगेच उपचार करणे महत्त्वाचे आहे. मोठ्या मूतखड्यांने निर्माण केलेल्या अडथळ्याचा मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंडाला सूज येणे, जंतुसंसर्ग व पू होणे आणि नंतर हळूहळू मूत्रपिंडाची शक्ती कमी होऊन ती पूर्णपणे निकामी होणे, असे घडू शकते. या सर्व कारणांमुळे मूत्रपिंडाला आलेली सूज जास्त दिवस ठेवणे चांगले नसते. त्यावर लागलीच उपचार करून घेणे गरजेचे असते. मूतख़डा जास्त दिवस अडकून राहिला तर तेथे घर्षण होते, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. अशावेळी कर्करोग होण्याचा धोका वाढतो. म्हणून त्रास होत नाही या कारणाने मूतखड्यासंबंधी गाफील राहता कामा नये.

प्रतिबंधात्मक उपाय 
आपण पाहिलेच आहे की, सगळ्याच मूतखड्यांना शस्त्रक्रिया करून काढावे लागते असे नाही. जे खडे पाच मिलीमीटरपेक्षा लहान व मूत्रपिंडामध्ये कोपऱ्यात असतात,  ते औषधांनी थोडे लहान होऊन लघवीवाटे शरीरातून बाहेर पडू शकतात. अशा खड्यांवर अन्य काही उपचार न करता त्यावर लक्ष ठेवणे योग्य ठरते. खडे बाहेर काढण्यासाठी उपचार घेतल्यानंतरही त्याचे सर्व तुकडे बाहेर पडले आहेत, याची खातरजमा करून घ्यायची असते. तसेच पुन्हा खडे होऊ नयेत यासाठीही काळजी घ्यायची असते. त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा खडा झाला होता, याची तपासणी करून घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना आखता येते. (अधिक माहितीसाठी, याच सदरातील ‘मूतखडा ः चिकित्सा व उपचार’ , फॅमिली डॉक्‍टर, ३१ ऑगस्ट २०१८ हा लेख पाहा.)

भरपूर पाणी पिणे आणि इतरही द्रव पदार्थांचे सेवन करणे हा सर्वात सोपा व उत्तम उपाय असतो. नेहमीपेक्षा पातळ व भरपूर लघवी होत असेल तर खडा होण्याची शक्‍यता कमी असते, तसेच तो झालाच तर शरीराबाहेर ढकलला जातो. विशेषतः जे सतत पंख्याखाली असतात किंवा वातानुकुलित वातावरणात असतात, त्यांच्या शरीरातील पाणी पटकन शोषले जाते. त्यांनी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. 

मूतखडा लहान असेल तर काही औषधांनी तो निघून जाऊ शकतो. पण खडे होण्याची शरीराची प्रवृत्ती बनू नये याचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी खड्याची तपासणी करून घेऊन त्यानुसार उपचार घ्यावेत.

एखाद्या आजारात रुग्णाला बिछान्यावर बराच काळ पडून राहावे लागत असेल तर त्याने एकाच स्थितीमध्ये झोपून राहू नये. आलटूनपालटून या कुशीवरून त्या कुशीवर झोपावे आणि शरीराची हालचाल करावी. 

मूतखडा होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी जवाचे पाणी (बार्ली वॉटर), उसाचा रस, काकवी यांचे सेवन करावे. कुळिथाचे (हालगा) सूप किंवा पिठले आहारात असावे. ॲसिडिटीवरील औषधांमुळे कॅल्शियम साठून मूतखडा होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे ही औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने जपून वापरावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com