मूत्रदाह - निदान आणि उपचार

प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संतोष शेणई 
Monday, 25 June 2018

मूत्रदाहाचे निदान करण्यासाठी मूत्रपरीक्षण ही सर्वांत महत्त्वाची तपासणी आहे. यासाठी नेहमीची तपासणी आणि वेगळी, म्हणजे युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी असे प्रकार आहेत.

मूत्रदाहाचे निदान करण्यासाठी मूत्रपरीक्षण ही सर्वांत महत्त्वाची तपासणी आहे. यासाठी नेहमीची तपासणी आणि वेगळी, म्हणजे युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी असे प्रकार आहेत.

वेगवेगळ्या कारणाने होणारा मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार आहे, हे आपण या आधी पाहिले. मूत्रसंस्थानातील नाजूक आवरणास सूज येते व तयार झालेला पू लघवीत उतरतो. अशा वेळी लघवी गढूळ होणे, वारंवार होणे,जळजळ होणे यांसारखी लक्षणे दिसतात. याबरोबरच ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या होणे इत्यादी त्रास होतो. आग होऊन लघवीला वारंवार जावे लागत असेल, तर मूत्रमार्गदाह झाला अशी शंका घ्यावी. लघवी गढूळ असणे हे याचे प्रमुख चिन्ह आहे. यासाठी एका (पांढऱ्या काचेच्या) स्वच्छ बाटलीत लघवी घेऊन थोडेसे हलवून पाहिल्यावर गढूळपणा कळतो. याशिवाय वारंवार मूत्रदाह होत असल्यास जंतुदोषाचे कारण कळण्यासाठी आणखी तपासण्या करणे आवश्‍यक ठरते. यात मुख्य म्हणजे पोटाचे क्ष-किरणचित्र किंवा सोनोग्राफी आवश्‍यक असते. 

मूत्रदाहावर वैद्यकीय सल्ला घेणे हे सर्वांत योग्य ठरेल. पण डॉक्‍टरांकडे पोचेपर्यंत काही गोष्टी करता येतील. आयुर्वेदात ‘मूत्रकृच्छ्र’ म्हणून वर्णिलेला आजार व मूत्रदाह हे लक्षणाने सारखेच आहेत. ‘मूत्र’ म्हणजे लघवी आणि ‘कृच्छ्र’ म्हणजे अवघड. ज्या आजारात लघवी कष्टाने होते, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होते, तसेच लघवी थोडी थोडी व  वारंवार लागते, लघवी झाल्यावरही समाधान होत नाही आदी लक्षणे आढळतात, त्या आजाराला ‘मूत्रकृच्छ्र’ असे म्हणतात. म्हणून मूत्रदाहाचा त्रास सुरू झाल्यास आयुर्वेदाने ‘मूत्रकृच्छ्र’साठी सांगितलेले उपचार तातडीने सुरू करायला हरकत नाही.

तांदळाच्या धुवणाचा उपाय सांगण्यात आला आहे. कच्चे तांदूळ भिजत घातलेले पाणी म्हणजे तांदळाचे धुवण. लघवीला जळजळ होत असली किंवा लघवी अडखळत होत असली, वेदना होत असल्या तर तांदळाच्या धुवणात खडीसाखर, चिमूटभर वेलची, चिमूटभर धणे-जिरे टाकून घेण्याने लगेच बरे वाटते.विशेषतः स्त्रियांना उन्हाळी लागलेली असल्यास आयुर्वेदशास्त्रानुसार हा उत्तम उपाय मानला जातो. 

उसाचा रस, द्राक्षांचा रस किंवा मनुका कोळून काढलेले पाणी मूत्रदाह कमी करणारे ठरते. मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांनी या उपचाराआधी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. 

आवळा हासुद्धा मूत्रसंस्थेसाठी हितकर असतो. ताज्या आवळ्यांचा रस काढून किंवा आवळकाठीचा काढा तयार करून त्यात गूळ मिसळून पिण्याने थकवा दूर होतो, शरीर-मन तृप्त होते व मूत्र दाह दूर होतो.

नारळाचे दूध आणि शहाळ्याचे पाणी यांचे मिश्रण घेण्यानेही मोकळी लघवी होण्यास साह्य होते.

कोहळ्याच्या रसात जवखार व साखर मिसळून पिण्याने मूत्रप्रवृत्ती विनासायास आणि मोकळेपणाने होते.

वेलचीचे दाणे कुटून तयार केलेले अगदी बारीक चूर्ण सातशे मिलिग्रॅम गोमूत्र, सुरा (एक प्रकारचे आयुर्वेदिक मद्य) किंवा केळीच्या मुळाच्या रसाबरोबर घेण्याने मूत्रकृच्छ्र दूर होते. 

याबरोबरच पळसाची पाने वाफवून त्यांचा लेप ओटीपोटावर करावा, आहारात साध्या मिठाऐवजी सैंधव वापरावे, या काळात मसालेदार व चमचमीत पदार्थ खाणे टाळावे, तसेच, कोमट पाण्यात बसून कटिस्वेद घ्यावा. हे हितकर ठरेल. काही वेळा एवढ्या उपायांनी आजार बरा होतो. मात्र आजार फार मुरलेला नसावा. आजार मुरलेला असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत. मूत्रदाहाचा त्रास असेल तर फळांचा रस एका मोठ्या ग्लासपेक्षा अधिक पिऊ नये. फळांमुळे लघवी आम्लयुक्त होते आणि अशा प्रकारच्या मूत्रात जंतूंची वाढ अधिक वेगाने होते. अर्थात हे तातडीचे उपाय आहेत. मात्र आजार बरा झाला आहे असे वाटले तरीही वैद्यकीय सल्ला घ्यावाच. कारण मूत्रदाह हा एखाद्या गंभीर आजाराची सुरूवातही असू शकते. त्यामुळे मूत्रदाह बरा झाला, तरी तो उद्भवण्याचे मूळ कारण तसेच उरलेले असते. त्याचे निदान होणे अधिक महत्त्वाचे असते. 

मूत्रदाहाचे निदान करण्यासाठी मूत्रपरीक्षण ही सर्वांत महत्त्वाची तपासणी आहे. यासाठी नेहमीची तपासणी आणि वेगळी, म्हणजे युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी असे प्रकार आहेत. या तपासणीमध्ये मूत्रातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजले जाते. सर्वसाधारण पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण एक ते चार, तर स्त्रियांमध्ये तीन ते सहा इतके असते. यापेक्षा या पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढल्यास जंतुसंसर्गाचे निदान होण्यास मदत होते. दाहाच्या तीव्रतेनुसार हे प्रमाण अधिकाधिक वाढत जाते. या तपासणीमध्ये दोन त्रुटी संभवतात.

मूत्रदाह वरचेवर होत असेल, तपासणीआधी काही प्रतिजैविके (अँटिबायोटिक्‍स) घेतली असतील किंवा मूत्रदाह हा जुन्या स्वरूपाचा असेल, तर पांढऱ्या पेशींची संख्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा वाढेलच असे नाही. या व्यतिरिक्त इतरही कारणांमुळे पांढऱ्या पेशींची संख्या वाढू शकते. अशा वेळेस मूत्रदाहाचे निदान चुकीचे ठरू शकते. अशावेळी युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी चाचणी ही अधिक विश्वासार्ह आहे. अर्थात, या तपासणीआधी कमीत कमी अठ्ठेचाळीस तास कोणतीही प्रतिजैविके रुग्णाने घेता कामा नयेत. 

युरिन कल्चर या तपासणीसाठी काही काळजी घेणे आवश्‍यक आहे. मूत्र गोळा करण्यासाठी निर्जंतुक केलेली बाटलीच वापरावी लागते. ती घरी निर्जंतुक करता येत नाही. ती दवाखान्यातून आणावी लागते. दुसरी महत्त्वाची काळजी म्हणजे मूत्र विसर्जनाआधी बाह्य मूत्रमार्ग हा साबण आणि पाण्याने स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. यानंतर सुरुवातीची काही लघवी सोडून नंतरचे मूत्र गोळा करावे. बाटली व्यवस्थित बंद करून ताबडतोब लॅबरोटेरीत पाठवून द्यावी. तसे करणे शक्‍य नसेल, तर बाटली फ्रिजमध्ये ठेवावी आणि चौवीस तासांच्या आत कल्चर टेस्टसाठी पाठवावी. काही वेळा मूत्रमार्गात छोटीशी निर्जंतुक केलेली नळी किंवा कॅथेटर घालून लघवी गोळा केली जाते. अगदी लहान मुलांमध्ये सिरिंजच्या साहाय्यानें मूत्रमार्गातून लघवी तपासण्यासाठी घेतली जाते.कल्चर तपासणी ही मूत्रदाहाचे निदान करणारी सर्वांत विश्वसनीय तपासणी मानली जाते. या तपासणीचा निष्कर्ष तयार होण्यास साधारणपणे अठ्ठेचाळीस तास लागतात. या तपासणीत मूत्र इन्क्‍युबेटरमध्ये अठ्ठेचाळीस तास उबवले जाते. यात मूत्रदाह झाला आहे किंवा नाही, हे समजतेच, पण त्याबरोबरच कोणत्या जीवाणूंमुळे झाला आहे, त्यासाठी कोणती प्रतिजैविके परिणामकारक ठरतील, हेही समजते. आता कल्चरच्या अत्याधुनिक पद्धती उपलब्ध आहेत. त्याद्वारे अचूकपणे निदान करता येते. मूत्रदाह झाल्यानंतर मूत्र परीक्षणाबरोबर मूत्रमार्गाची अल्ट्रा सोनोग्राफी करून घ्यावी. सोनोग्राफीच्या तपासात सर्वसाधारण मूत्ररचनेच्या मार्गात काही बिघाड झाला आहे का, हे समजते. उदा. प्रोस्टेट ग्रंथीची अनैसर्गिक वाढ होऊन मूत्र तुंबुन राहणे, मूतखडा अडकून अवरोध होणे, अशी महत्त्वाची माहिती समजते. याचबरोबर क्ष-किरणांद्वारे तपास, स्कॅन, दुर्बिणीचे तपास अशा चाचण्या डॉक्‍टरी सल्ल्यानुसार कराव्यात. याबरोबरच रक्ताची तपासणीही करून घ्यावी. अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील वारंवार मूत्रदाह होतो.एकदा जंतूसंसर्गाचे निदान झाल्यानंतर युरिन कल्चर तपासणीनुसार प्रतिजैविके दिली जातात. मूत्रदाहाच्या तीव्रतेनुसार व जंतूसंसर्गानुसार प्रतिजैविकांचे सेवन करणे आवश्‍यक असते. कोणत्याही स्वरूपाचा उपद्रव नसल्यास तीन दिवसांचा औषधोपचार पुरेसा होतो. इतर काही उपद्रव असल्यास दहा दिवस किंवा आणखीही काळ प्रतिजैविके सुरू ठेवली जातात. कल्चरचा रिपोर्ट मिळण्यास दोन दिवसांचा अवधी लागत असल्यामुळे खूप त्रास होत असल्यास, दाहाचे स्वरूप गंभीर असल्यास मूत्र परीक्षणास दिल्यानंतर परीक्षणाचा अहवाल येईतोवर वाट न पाहता तातडीने विस्तारित स्वरूपाची प्रतिजैविके सुरू केली जातात.

काही स्त्रियांना मूत्रमार्गाचा जंतुदोष वारंवार होतो. अशा स्त्रियांनी शरीरसंबंधाच्या आधी व नंतर लघवी करणे हितकर असते. तसेच पाणी वापरून स्वच्छता करावी. यामुळे जंतुदोष होण्याची शक्‍यता कमी होते. याचबरोबर तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची एक गोळी शरीरसंबंधानंतर घेणे उपयुक्त ठरेल. जास्त पाणी पिण्यामुळे जंतुदोष लवकर बरा होतो, हे लक्षात ठेवावे. नुसती लघवीस जळजळ असल्यास बहुधा एवढया उपचाराने आराम पडतो. मात्र पुरेसे उपचार घेणे आवश्‍यक असते. अर्धवट उपचार झाले तर जंतुलागण शिल्लक राहते. यामुळे मूत्रपिंडालाच धोका पोचू शकतो.

वारंवार त्रास होणाऱ्यांनी योनीच्या आसपास सूज आहे का, शिस्नाला सूज किंवा भेगा पडल्या आहेत का तपासावे. जर तसे असेल तर ‘बालानायटिस‘ हा विकार असू शकतो. मधुमेह असेल तर या विकाराची शक्‍यता वाढते. त्यासंबंधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मूत्रदाह वरचेवर होणे टळेल. खूप ताप असेल,पोटात कळ येणे,उलटया होणे,पोटात मूत्रपिंडाच्या जागी दाबल्यावर दुखरेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे,रक्तदाब वाढणे,इत्यादी लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाकडे जावे.

मूत्रमार्गाचा किरकोळ जंतुदोष-(लघवीस जळजळ) वारंवार होत असल्यास तज्ज्ञाकडे जाणे आवश्‍यक आहे. कारण दोषाचे मूळ कारण शोधणे आवश्‍यक असते.

कोणत्याही आजारपणात स्व-उपचारात प्रतिजैविकांचा उपयोग करणे हे सर्वथा अहितकारक आहे. आपल्याकडे पुरेशी काळजी न घेता, कोणतीही खातरजमा न करता स्व-उपचार करणे ही सहज कृती असते. पण यात साध्या साध्या कारणासाठीही आपण तीव्र प्रतिजैविके सेवन करतो. त्याची वारंवारिताही अधिक असते. त्याचा दुष्परिणाम होतो व त्यातून गंभीर स्वरूपाच्या आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याखेरीज कोणत्याही प्रकारची प्रतिजैविके न घेणेच हितकारक असते.

मूत्रदाह वारंवार होतो, त्यावेळी एका डॉक्‍टरच्या औषधांनी गुण पडत नाही, असे म्हणून रुग्ण डॉक्‍टर बदलतात. नव्या डॉक्‍टरला आधीच्या आजाराची माहिती दिली जात नाही. त्यामुळे आजार मुरत जातो. म्हणून डॉक्‍टर बदलण्यापेक्षा अन्य तपासण्या करून घेणे उपयुक्त असते. अशा जुनाट दाहामागे काही गंभीर कारणही असू शकते. उदाहरणार्थ, क्षयासारखा आजार असू शकतो. 

काही जणांना अपचनाचा त्रास होतो. कोठा नीट साफ होत नाही. त्यावर वेळीच इलाज केले पाहिजेत. कोठा साफ असेल तर जीवाणूंमुळे होणारा गंभीर स्वरूपाचा संसर्ग टळण्याची शक्‍यता अधिक असते. उदाहरणार्थ- मोठ्या आतड्यात ई-कोली हा जीवाणू उपयुक्त असतो. पण तेथून तो बाहेर पडला की त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. अशा जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे ‘सेप्टीसेमिया’ होण्याचा धोका वाढतो. यात श्वेतपेशी वाढतात. लघवीचे प्रमाण घटते. उलट्या होतात. वान्छा जाते. त्वचेवर रक्तबिंदू दिसू लागतात. संसर्ग करणारे जीवाणू प्रतिजैविकांना दाद देत नाहीत, त्यामुळे गांभीर्य आणखी वाढते. अशा रुग्णाला रुग्णालयात ‘इम्युनिटी बेसल थेरपी’ सुरू करावी लागते.

काही रुग्णांना औषधांनी गुण येत नाही, तेव्हा त्याचे कारण शोधले पाहिजे. अवरोध हे मूत्रदाहामागचे मुख्य कारण असू शकते. विविध कारणांनी अवरोध होऊ शकतो. मूतखडा होणे, शुक्रग्रंथींची (प्रोस्टेट) वाढ, मूत्रसंस्थानातील रचनेत बिघाड निर्माण झालेला असणे अशा वेगवेगळ्या कारणांनी मूत्रवहनामध्ये अवरोध येतो. अशा वेळी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडून अवरोधाचे कारण दूर करावे लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidney stone treatment