गुडघ्याचा अस्थिसंधिवात

गुडघ्याचा अस्थिसंधिवात

गुडघ्याचा अस्थिसंधिवात म्हणजे काय? अस्थिसंधिवात हा सांधेदुखीचा अतिशय सर्वसाधारण प्रकार आहे. गुडघे हे असे सांधे आहेत ज्यांच्यावर कोणताही आजार अगदी सहज हल्ला करू शकतो. गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये हाडांच्या पेशी आवरणाला इजा पोचते आणि ते फाटते. यामुळे शरीरात काही तांत्रिक समस्याही उद्भवतात. तसेच सूज येणे, दाह वाढणे अशी लक्षणे दिसतात. गुडघ्याचा अस्थिसंधिवात मुख्यत: सांध्यांच्या कुर्चावर, तसेच त्याशेजारी असलेल्या हाडांच्या पेशी आवरणावर परिणाम करतो.

गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची लक्षणे काय आहेत, हे पाहू. याची लक्षणे ही रुग्ण अस्थिसंधिवाताच्या कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, त्याप्रमाणे त्या त्या अवस्थेमध्ये दिसून येतात. पूर्व, मध्य, मर्यादेच्या आत व असह्य म्हणजेच तीव्र या चार वाढत्या टप्प्यांमधून याचा प्रवास असतो. पहिल्या टप्प्यातील रुग्णाला मांडीच्या स्नायूला तसेच जास्त वेळासाठी चालल्यावर किंवा चढ चढल्यावर गुडघ्याला सौम्य वेदना होतात. दुसऱ्या टप्प्यातील रुग्णाच्या वेदना आराम केल्यावर कमी होतात व पुन्हा ताण आल्यावर वाढतात. या अवस्थेत रुग्णाला खूप वेळ चालल्यावर गुडघ्याच्या आतून कट्‌-कट्‌ असे काही आवाज आल्यासारखेसुद्धा जाणवते. तिसऱ्या टप्प्यामध्ये लक्षणे जरा तीव्र होत जातात. यात गुडघ्याच्या सांध्याभोवती वेदना आणि सूज येते. यामुळे रुग्णाच्या पायाला सौम्य व्यंग येतो. रुग्णाला काही वेळा चालताना अचानक अडकल्यासारखे वाटू लागते व त्यामुळे पायाच्या हालचालीवर मर्यादा येतात. चौथ्या म्हणजेच सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये रुग्णाला असह्य वेदनांमधून जावे लागते. घरातल्या घरात रोजच्या कामांसाठीसुद्धा त्याची हालचाल बंद होते. त्यामुळे व्यंग आलेल्या पायावर औषधे किंवा आराम करूनही काहीही फरक पडत नाही.
गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची कारणे काय आहेत? गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची कारणे अनेक आहेत. वय, लिंग, लठ्ठपणा, जुनी सांधेदुखी, आनुवंशिक घटक, जीवनशैली इत्यादी.

वय : वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या दशकात गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची सुरवात होते. वाढत्या वयानुसार कुर्चा आणि स्नायूंवर परिणाम होतो. ज्यामुळे स्नायूंना कमकुवतपणा येतो.

लिंग : स्त्रियांना गुडघ्याचा अस्थिसंधिवात होण्याची शक्‍यता पुरुषांपेक्षा दुप्पट असते. साधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर रजोनिवृत्तीच्या वेळी हे दुखणे सुरू होते.
लठ्ठपणा : हे गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. सांध्यांना शरीराचा भार पेलवत नाही. त्यामुळे सांध्यांवर ताण येतो.

जुनी सांधेदुखी : पूर्वी झालेल्या फ्रॅक्‍चर किंवा पायाच्या स्नायूंच्या एखाद्या आजारामुळे.
आनुवंशिक घटक : गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये आनुवांशिक घटक महत्त्वाचे कार्य करतात. जर तुमच्या आई-वडील किंवा भाऊ व बहिणीला गुडघ्याचा अस्थिसंधिवात असेल, तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्‍यता खूप जास्त असते.
वातावरणातील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची तीव्रता वाढते याचा जरी पुरावा नसला, तरी अनेक रुग्ण ऋतूंमधील वातावरणाप्रमाणे त्यांच्या वेदना कमी-जास्त होत असल्याचे सांगतात. 

जर एखाद्या घरातील वयस्कर व्यक्तीला गुडघ्याचा अस्थिसंधिवात असेल, तर घरातील इतर व्यक्तींना हा आजार होण्यापासून वाचवता येते का? किंवा घरातील इतर व्यक्तींना हा आजार होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतात? गुडघ्याचा अस्थिसंधिवात कायमचा बरा होऊ शकत नाही; परंतु अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या या रोगाची लागण होऊ नये म्हणून आपल्याला करता येतात. 
वजन नियंत्रणात ठेवणे : जेवढे शरीराचे वजन जास्त असेल तेवढा जास्त भार, सांध्यांवर विशेषतः गुडघ्यांवर येतो. संशोधनातून असे समोर आले आहे, की तुम्ही जेवढे लठ्ठ असाल तेवढा गुडघ्याचा अस्थिसंधिवात होण्याची शक्‍यता वाढते. एवढेच नाही तर कालानुरूप गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताचे प्रमाण तीव्र होत जाण्याचीही शक्‍यता वाढते. जेव्हा आपण चालतो, पळतो किंवा चढ तसेच पायऱ्या चढतो किंवा उतरतो त्या वेळी आपल्या वजनाच्या पाच ते दहा पट वजन सांध्यांवर येते. त्यामुळे सांध्यांवर ताण येतो आणि गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची शक्‍यता वाढते. आपण वजन थोडे जरी कमी केले तरी सांध्यांवर विशेषतः गुडघ्याच्या सांध्यांवर येणारा ताण खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. 

व्यायाम करणे : दोन प्रकारचे व्यायाम यामध्ये रुग्णांनी करणे गरजेचे असते.
ताकद वाढविण्यासाठी व्यायाम : या व्यायामामुळे स्नायूंची ताकद व ठेवण सुधारते. त्यामुळे गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची शक्‍यता कमी होते. गुडघ्याचा अस्थिसंधिवात हा मांडीच्या हाडांना कमकुवत बनवतो. त्यामुळे या स्नायूंच्या आरोग्यासाठी हा स्नायूंचा नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. 

ॲरोबिक व्यायाम : ॲरोबिक व्यायाम म्हणजे असे कोणतेही व्यायाम जे तुमच्या नाडीचा दर वाढवतात. साधारण ॲरोबिक व्यायामांमुळे माणसाला शांत झोप लागते. आरोग्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी त्यांची खूप मदत होते. 

गुडघ्याच्या अस्थिसंधिवातावर कोणते उपचार आहेत? प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रिया करावी लागते का? गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये सांध्यात आणि सांध्याच्या आजूबाजूला होणारे बदल हे विभागलेले असतात. त्यामुळे ओघाने शरीरातील इजा भरून काढण्याची प्रक्रियासुद्धा विभागून होते. बऱ्याच घटनांमध्ये इजा भरून काढण्यात यश मिळते. म्हणून सांधे फार वेदना देत नाहीत. जरी वेदना राहिल्या तरी त्या सौम्य असतात आणि येत जात राहतात; परंतु काही घटनांमध्ये, जर इजा भरून निघाली नाही किंवा गुडघे जास्तच खराब झाले तर त्यामुळे स्नायूंची अस्थिरता वाढते. त्यामुळे शरीरातील इतर भागांवर जास्त वजन पडते. या सगळ्याचा परिणाम म्हणून अस्थिसंधिवाताची लक्षणे अधिक तीव्र होत जातात. अशा घटनांमध्ये सुरवातीला औषधांनी वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो; पण वेदना तीव्र असतील आणि उपचारांना प्रतिसाद देत नसतील, तर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
नॉन स्टेरॉइडल अँटी इनफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयइडी): जर सांध्यांमधील दाहकतेमुळे सांध्यांच्या वेदना वाढत असतील किंवा सांध्यांना ताठपणा वाटत असेल, तर या औषधांचा छोटा कोर्स दिला जातो. बाकीच्या औषधांप्रमाणे एनएसएआयईडीजचेसुद्धा काही वेळा साइड इफेक्‍ट्‌स दिसून येतात; पण डॉक्‍टर ही औषधे देताना याबद्दलची काळजी घेतात. म्हणजे सगळ्यात कमी परिणाम करणारी औषधे कमी वेळासाठी दिली जातात. एनएसएआयईडीमुळे पचनाचे विकार उद्भवू शकतात (पोट खराब होणे, अपचन इत्यादी). म्हणून बहुतांश घटनांमध्ये डॉक्‍टरांकडून या औषधांबरोबर प्रोटॉन पंप इनहीबटर (पीपीआय) दिले जाते. यामुळे पोट खराब न होण्यासाठी मदत होते.

ट्रान्सक्‍युटेनियस इलेक्‍ट्रिकल नर्व्ह स्टीम्युलेशन (टीइएनएस) : काही लोकांना असे वाटते, की यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. याच्या परिणामांवर झालेल्या संशोधनातून निष्कर्ष वेगवेगळे आले आहे. टीईएनएस मशिन एक छोटे इलेक्‍ट्रिकल उपकरण आहे. याद्वारे नसांच्या शेवटी रुग्णांच्या त्वचेवर पॅड्‌सच्या माध्यमातून पल्सेस सोडले जातात. ज्यामुळे त्या ठराविक भागात संवेदना तयार होतात. हे उपकरण मोठ्या औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असते; परंतु फिजिओथेरपिस्ट तुम्हाला त्यांच्याकडील एखादे उपकरण तुम्हाला वापरून पाहायला देऊ शकतात. ज्यावरून तुम्ही हे यंत्र खरेदी करायचे की नाही हे ठरवू शकता. 

आपण खूप लोकांकडून ऐकतो, की त्यांनी गुडघ्यांसाठी इंजेक्‍शन घेतले आणि त्यांच्या वेदना कमी झाल्या. हे कितपत खरे असते? हे शक्‍य आहे. या उपचारांसाठी दोन प्रकारची इंजेक्‍शन्स उपलब्ध आहेत.

स्टेरॉइड इंजेक्‍शन्स : काही वेळेला इजा झालेल्या विशिष्ट भागाला हे इंजेक्‍शन थेट दिले जाते. याचा परिणाम आपल्याला कमीत कमी एका दिवसात दिसू लागतो. या इंजेक्‍शनमुळे वेदना काही आठवड्यांसाठी, तर काही वेळा काही महिन्यांसाठीपण कमी होऊ शकतात. काही रुग्णांना गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये असह्य वेदना होतात. त्यांनाच हे इंजेक्‍शन दिले जाते. कॅल्शियमची कमतरता भासल्यामुळे किंवा काही वेळेला गुडघ्याला सूज आल्यामुळे रुग्णांना असह्य वेदना होतात. काही रुग्णांना त्यांच्या घरातले लग्न, मोठी सुटी अशा वेळी त्रास होऊ नये म्हणून हे इंजेक्‍शन दिले जाते. हे इंजेक्‍शन घेताना एक गोष्ट लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे, की स्टेरॉइड इंजेक्‍शनसारखे किंवा नियमितपणे घेतले जात नाही. रुग्णाला हे इंजेक्‍शन इजा झालेल्या भागावर सारखे घ्यावे लागत असेल, तर रुग्णांनी लक्षात घ्यावे, की आता शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.  

हयालूरॉनिक ॲसिड इंजेक्‍शन्स : जेव्हा एखाद्या रुग्णावर स्टेरॉइड इंजेक्‍शन्सचा परिणाम होत नाही, तेव्हा डॉक्‍टर हयालूरॉनिक ॲसिड इंजेक्‍शन घेण्याचा सल्ला देतात. वेदनेच्या तीव्रतेनुसार रुग्णाला एक किंवा काही वेळा एकापेक्षा जास्त इंजेक्‍शनचा कोर्स करायला सांगितले जाते.

एका गुडघ्याचा अस्थिसंधिवात असलेल्या रुग्णाने त्याच्यासाठी महागाचे ब्रेस (आधारासाठी वापरण्यात येणारी एक वस्तू) तयार करून घेतले. त्याच्या वापराने तो आधीपेक्षा जास्त वेळ नीट चालू लागला. हे सगळ्याच रुग्णांना लागू होते का? जेनी ब्रेस सध्या बाजारात उपलब्ध आहे, ते रुग्णाला सौम्य वेदना असताना किंवा गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताच्या अगदी अलीकडच्या टप्प्याला वापरता येण्यासारखे आहे. ते रुग्णाला योग्य प्रकारे बसेल अशी सुविधा त्यात आहे. जेणेकरून ते आपल्या जागेवरून हलणार नाही. जर ते रुग्णाला दिलासा देणारे ठरले, तरच रुग्णाने त्याचा वापर करावा. गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये दिली जाणारी औषधे म्हणजे फक्त पेनकिलर्सच असतात का? अशी इतर काही औषधे आहेत का? ज्यांचा उपयोग केला जातो? पेनकिलर्सना विकल्प म्हणून बाकी औषधेही बाजारात आहेत. त्यांचा परिणाम हा व्यक्तीसापेक्ष आणि प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. 

दाहकता कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रीम्स व जेल्स : दिवसातून तीन ते चार वेळा रुग्ण हे क्रीम्स किंवा जेल्स इजा झालेल्या विशिष्ट भागावर लावू शकतो. ते त्वचेत मुरावायची गरज नसते. त्वचाच ते मुरवण्याचे काम करते. विशेषत: ज्यांना गुडघ्याचा अस्थिसंधिवात आहे, त्यांच्यासाठी हे परिणामकारक असतात. रुग्णांना गोळ्या घ्यायला त्रास होत असेल, तर हे क्रीम्स आणि जेल्स रुग्ण वापरून पाहू शकतात. 

ग्लुकोसमीन आणि कॉनड्रॉइटीन : खूप रुग्ण ग्लुकोसमीन आणि कॉनड्रॉइटीन गोळ्या वापरतात. ही संयुगे सामान्यपणे सांध्यांच्या कुर्चावर स्थित असतात. काही संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे, की इजा पोचलेल्या कुर्चाची झीज भरून काढण्यासाठी याचा वापर केला जातो. रुग्णाला ग्लुकोसमीन सल्फेटचा दिवसातून ठराविक डोस घेणे गरजेचे असते. शक्‍य असल्यास काही आठवड्यांसाठी घ्यावा म्हणजे त्याचा परिणाम आपल्याला कळू शकतो. ग्लुकोसमीन हायड्रोक्‍लोराइड हे अजिबात परिणामकारक नसते. त्यामुळे रुग्णांनी हे घेताना नेहमी ग्लुकोसमीन सल्फेटच घेत आहोत ना याची खात्री करावी. ग्लुकोसमीनमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण बदलू शकते. जर रुग्णाला मधुमेह असेल तर त्याने रक्तातील साखरेचे प्रमाण सारखे तपासून पहिले पाहिजे. ते वाढत असल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 
गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये शस्त्रक्रियेचे कोणकोणते उपाय सांगितले आहेत? जर रुग्णाला दैनंदिन आयुष्यात हालचाल करताना त्रास होत असेल आणि तीव्र वेदना होत असतील, तर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. 

दरवर्षी गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताच्या कित्येक हजार शस्त्रक्रिया यशस्वीपाने पार पडल्या जातात. औषधांचा काही उपयोग होत नसेल, तर शस्त्रक्रिया करणे फायदेशीर ठरते. शस्त्रक्रियेचे तंत्र दर वेळी बदलत असते. आता गुडघे बदलण्याच्या ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यांचे आयुर्मान अंदाजे वर्षांपेक्षा जास्त असते. 

संपूर्ण गुडघे बदण्याची शस्त्रक्रिया : शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यापूर्वी रुग्णाला औषधे देऊन वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु जर मोठ्या प्रमाणात इजा झाली असेल आणि वेदना असह्य असतील, तर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले जाते. संपूर्ण गुडघे बदण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दैनंदिन आयुष्यात हालचालींवर मर्यादा येतात. ही शस्त्रक्रिया वयोवृद्ध लोकांनाच करण्यास सांगितले जाते, ज्यांची जीवनशैली बैठी आहे. 

अंशिक गुडघे बदण्याची शस्त्रक्रिया : दोन प्रकारच्या रुग्णांना ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. एक म्हणजे ज्या रुग्णांना गुडघ्याचा अस्थिसंधिवात त्यांच्या शरीरातील सांध्यांवर विभागून झाला आहे. दुसरे म्हणजे तरुण वयात ज्या रुग्णांना गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची सुरवात होते असे रुग्ण. ज्यांच्या सांध्यांची इजा कमी प्रमाणात झालेली असते किंवा सुरवात असते असे रुग्ण. 

संपूर्ण गुडघे बदण्याच्या शस्त्रक्रियेपेक्षा अंशिक गुडघे बदण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. तसेच त्याला त्याचे दैनंदिन आयुष्य तुलनेने लवकर सुरू करता येते. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला कमी कालावधीसाठी हॉस्पिटमध्ये राहावे लागते. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचे रक्तही कमी प्रमाणात वाया जाते. असे नेहमीच ऐकण्यात येते, की गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण जमिनीवर बसू शकत नाही, पाय दुमडून बसू शकत नाही किंवा भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर करू शकत नाही. हे खरे आहे की? गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तीन महिने तरी जमिनीवर बसण्याची, पाय दुमडून बसण्याची किंवा भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर करण्याची संमती दिली जात नाही. एकदा का पेशींची झालेली इजा भरून निघाली, की मग या सर्व गोष्टी केल्या जाऊ शकतात. पळणे, वजने उचलणे, किक बॉक्‍सिंग, व्यायामसारख्या गोष्टी शस्त्रक्रियेनंतर करण्याची परवानगी दिली जात नाही. कारण, शस्त्रक्रियेमध्ये जे कृत्रिम भाग बसवले जातात ते लवकर कालबाह्य होतात. तसेच वरील व्यायाम केल्यामुळे हाडांना फ्रॅक्‍चर होण्याचाही धोका असतो. सांध्यांची मोठ्या प्रमाणात होणारी हालचाल सोडून रुग्ण बाकी सर्व गोष्टी करू शकतो. पोहणे, चालणे, सायकल चालवणे या गोष्टीसुद्धा मर्यादित हालचाल करून रुग्णाला करता येतात. 

गुडघ्याच्या अस्थिसंधिवात हा आजार सगळ्यांनाच होतो का? एखाद्या ठराविक रुग्णाला गुडघ्याचा अस्थिसंधिवात होईल, असे सांगणे अशक्‍य आहे. काही घटनांमध्ये हा आजार रुग्णाला एखाद्या वर्षात, तर काहींना दोन वर्षांतही उद्भवू शकतो. यात सांध्यांची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. काही वेळा यामुळे व्यंग येण्याचीही शक्‍यता असते. गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताची वाढ होणे ही एक अतिशय संथ प्रक्रिया आहे. यात वेदनाही संथपणे वाढत जातात. गुडघ्याचा तीव्र अस्थिसंधिवात कुर्चा अतिशय कमकुवत बनत जातो. एवढा की शेवटी तो हाडांच्या टोकांनाही झाकू शकत नाही. मग हाडे एकमेकांवर घासली जातात आणि त्यांची झीज सुरू होते. ज्यामुळे सांधे अस्थिर होतात. वाढत जाणाऱ्या गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताला रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे फार महत्त्वाचे ठरते. नियमित व्यायाम, सांध्यांना इजा होण्यापासून वाचवणे, तसेच वजन नियंत्रित ठेवणे हेसुद्धा उपयोगी ठरते. गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामुळे बाकीच्या सांध्यांवर ताण येतो. त्यामुळे त्या सांध्यांनाही अस्थिसंधिवात होण्याची शक्‍यता निर्माण होते. गुडघ्याचा अस्थिसंधिवात असलेल्या काही लोकांना इतर आजार होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताच्या उपचारांमध्ये कोणते आधुनिक उपचार समाविष्ट झाले आहेत, ते पाहू. आत्तापर्यंत झालेल्या संशोधनांनी सिद्ध केले आहे, की गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये वेदना कमी करण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे आणि दैनंदिन व्यायाम करणे याचा खूप परिणाम होतो. जगभरात गुडघ्याच्या अस्थिसंधिवातावर नवीन उपचारपद्धती शोधणे व त्याचे परीक्षण करणे चालू आहे. यामध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे फायदे अभ्यासले जात आहेत. तसेच गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताला कोणती गुणसूत्रे कारणीभूत आहेत, याचा जागतिक पातळीवर अभ्यास सुरू आहे. स्टेम सेल रिसर्चच्या चाचण्या सुरूच आहेत. ज्यामध्ये कुर्चा स्वतःहून आपल्या झीज झालेल्या पेशी पुन्हा तयार करेल. डॉक्‍टरांना गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताचे निदान लवकर करण्यात यश मिळेल, यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. स्विडीश शास्त्रज्ञांकडून गुडघ्याच्या अस्थिसंधिवाताचे निदान लवकर व्हावे, यासाठी DGEMRIC (delayed gadolinium enhanced MRI of cartilage) हे नवीन तंत्र विकसित करण्याचे आणि परीक्षण करण्याचे काम सुरू आहे. निदान करायला उशीर झाला आणि त्यामुळे रुग्णाची परिस्थिती आणखी खालावली असे होऊ नये, म्हणून निदानाच्या आधुनिक पद्धतीही संशोधक तपासात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com