गोकुळाष्टमी

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 23 August 2019

श्रीकृष्णांच्या काळात दूध चांगलेच मिळत असावे. सध्या मात्र दूध शुद्ध, प्रक्रियाविरहित व मुख्य म्हणजे भारतीय वंशाच्या गायीचे किंवा म्हशीचे मिळविणे गरजेचे आहे.

श्रीकृष्णांच्या काळात दूध चांगलेच मिळत असावे. सध्या मात्र दूध शुद्ध, प्रक्रियाविरहित व मुख्य म्हणजे भारतीय वंशाच्या गायीचे किंवा म्हशीचे मिळविणे गरजेचे आहे. अशा चांगल्या दुधाला भारतीय परंपरेचे (विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंनी युक्‍त) विरजण लावले की त्यापासून दही तयार होते. हे दही घुसळून त्यातील लोणी वेगळे करता येते. घरातील बालगोपाळांसाठी हे लोणी उत्तम असते. ताजे लोणी चवीला गोड, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्‍ती सुधारणारे असते. गाईमुळे होऊ शकणारे फायदे बघितले व अनुभवले की गाईला `गोमाता'' का म्हणतात, गोदान हे श्रेष्ठदान का आहे हे समजू शकते, तसेच गोमातेचे भरण पोषण करणाऱ्या गोकुळात भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे का झाले हेही ध्यानात येऊ शकते. 

संपूर्ण भारतात आजची गोकुळाष्टमी मोठ्या हौसेने साजरी केली जाते. श्रीकृष्णांचा जन्म जरी मथुरेत राजगृही झाला असला तरी त्यांचे बालपण गोकुळात गेले. गोपाळकाला असो किंवा मित्र-सवंगड्यांसोबत खाल्लेले लोणी-दही असो, श्रीकृष्णांनी स्वतःच्या जीवनातील असा एक आदर्श मांडलेला आहे की जो आजही आपल्याला लागू पडतो. गोकुळात स्वतः श्रीकृष्ण त्यांचे मोठे बंधू व इतर सवंगड्यांसह गाईंना चरायला नेत  असत. गाईचे दूध, दही, लोणी हे आवडीने सेवन करत असत. गाईचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व श्रीकृष्णांच्या जीवनातून समजून घेण्यासारखे आहे.

पञ्चगव्याने आरोग्यलाभ
आयुर्वेदात गाईपासून तयार होणाऱ्या दूध, दही, तूप, गोमूत्र व गोमय या पाच द्रव्यांना मिळून "पञ्चगव्य'' अशी संज्ञा दिली आहे.
गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पिस्तथैव च ।
समं योजितमेकत्र पञ्चगव्यमिति स्मृतम्‌ ।
एतद्‌ देहशुुद्धिकरं कफघ्नं च ।

आयुर्वेदात सांगितले आहे, की पंचगव्य शरीरशुद्धी करते, तसेच कफदोष संतुलित करते. पंचगव्याचा वापर पूजेसाठी केला जातो, पूजेच्या निमित्ताने तीर्थाच्या रूपात पंचगव्य प्राशन करण्याच्या प्रथेमुळे सरतेशेवटी आरोग्याचाच लाभ होतो.

आयुर्वेदात पंचगव्यगघृत नावाचे औषधी तूप बनवले जाते, हे तूप कावीळ, पांडुरोग, अपस्मार, ताप, सूज, मानसिक विकार, दमा वगैरे विकारातही औषध म्हणून वापरले जाते. अष्टांगसंग्रहात तर पंचगव्य घृत मोठमोठ्या मानसिक विकारांवरही उपयुक्त असते असे सांगितले आहे. रोजच्या रोज या पाच गोष्टी वापरता आल्या नाहीत तरी गाईचे दूध, ताक, लोणी, तूप यांचा आहारात समावेश करणे सहज शक्‍य आहे.

श्रीकृष्णांच्या काळात दूध चांगलेच मिळत असावे. सध्या मात्र दूध शुद्ध, प्रक्रियाविरहित व मुख्य म्हणजे भारतीय वंशाच्या गायीचे किंवा म्हशीचे मिळविणे गरजेचे आहे. अशा चांगल्या दुधाला भारतीय परंपरेचे (विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंनी युक्‍त) विरजण लावले की त्यापासून दही तयार होते. हे दही घुसळून त्यातील लोणी वेगळे करता येते. घरातील बालगोपाळांसाठी हे लोणी उत्तम असते. ताजे लोणी चवीला गोड, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्‍ती सुधारणारे असते. लहान मुलांना रोज एक-दोन  चमचे लोणी देण्याने ताकद वाढते, शारीरिक विकास व्यवस्थित होतो आणि आकलनशक्‍ती वाढते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे

अमृतासम दूध
दूध चवीला अतिशय गोड, स्निग्ध गुणाचे व वात-पित्तशामक असते. थोड्या प्रमाणात सारक प्रवृत्तीचे असते. सद्यःशुक्रकर म्हणजे शुक्रधातूची ताबडतोब वृद्धी करणारे असते, सर्वांना अनुकूल असते, जीवनशक्‍ती वाढविणारे असते, बलवर्धक, मेधावर्धक तसेच आयुष्यवर्धक, रसायन-वाजीकर असे असते. या खेरीज दूध ओजवर्धक असते, विविध मानसिक रोगात अत्यंत हितकर असते. वारंवार गर्भस्राव होण्याऱ्या स्त्रियांसाठी उत्तम असते, लहान मुले व वयस्कर मंडळींनीही नियमित दूध घेणे उत्तम असते. 

गाईचे दूध धारोष्ण असताना प्राशन केल्यास अमृताप्रमाणे व त्रिदोषनाशक असते. परंतु थंड झाले की मग मात्र तापविल्याशिवाय पिण्यासाठी वापरता येत नाही. म्हशीचे दूध काढल्यानंतर थंड झाल्यावर लगेच प्यायले तर ठीक पण जरा वेळ गेल्यास मात्र तापवून मगच प्यावे. 
शृतोष्णं कफवातघ्नं शृतशीतस्तु पित्तनुत्‌ ।
...भावप्रकाश

उकळी आणलेले दूध गरम असताना घेतले तर कफ व वातदोषाचे शमन करते तर उकळी आणलेले पण नंतर गार (म्हणजे सामान्य तापमानाचे) केलेले दूध पित्तशामक असते. 

काही व्यक्‍तींना दूध पचत नाही, दूध घेतल्यानंतर पोटात जडपणा, गॅसेस वगैरे जाणवतात, क्वचित जुलाब होतात. अशा वेळेला दूध हलके करण्यासाठी या पद्धतीने संस्कारित करायला सांगितले आहे, 
अर्द्धोदकं क्षीरशिष्टमामाल्लघुतरं पयः ।
....भावप्रकाश

दुधात अर्धे पाणी टाकावे व पाणी उडून जाईपर्यंत मंद आचेवर उकळावे. हे उरलेले दूध पचायला हलके असते. उकळवताना यातच सुंठीचा छोटा तुकडा, वावडिंगाचे चार-पाच दाणे टाकले तर अधिकच चांगला उपयोग होतो. 

दूध केव्हा प्यावे हेही आयुर्वेदशास्त्र याप्रमाणे सांगते, 
वृष्यं बृंहणमग्निदीपनकरं पूर्वाह्णकाले पयः ।
...भावप्रकाश

दिवसाच्या पूर्वकालात म्हणजे सकाळी दूध पिण्याने शुक्रधातूची शक्‍ती वाढते, एकंदर शक्‍ती वाढते व अग्नी प्रदीप्त होतो. बऱ्याच लोकांना रात्री झोपताना दूध पिण्याची सवय व आवड असते. मात्र आयुर्वेदात या संबंधी असे सांगितले आहे,
वदन्ति पेयं निशि केवलं पयो भोज्यं न तेनेह सहौदनादिकम्‌ ।
भवत्यजीर्णं न शयीत्‌ ।।
...भावप्रकाश

रात्री दूध घ्यायचे असेल तर नुसते दूधच घ्यावे, भोजन करू नये. अगोदर जेवण करून मग रात्री झोपताना दूध प्राशन केले तर त्यामुळे अपचन होते व रात्री झोप येत नाही. प्रत्यक्षातही असे दिसते की जेवून खाऊन झोपण्यापूर्वी दूध पिणाऱ्यांचे वजन अवाजवी प्रमाणात वाढते, अपचनाचा त्रास होतो. 

अदमुरे दही नको
दूध थोडेसे कोमट करून त्याला विरजण लावले की साधारण आठ-दहा तासांनी त्याचे दही बनते. बऱ्याच घरात तीन-चार तासांचे अदमुरे दही बनविण्याची पद्धत असते. परंतु या प्रकारचे व्यवस्थित न जमलेले दही आयुर्वेदात पचण्यास जड व तिन्ही दोषांचा प्रकोप करणारे सांगितले आहे. त्यामुळे नीट जमलेले, ताजे तसेच गोड दहीच चांगले होय. 

दही शीतल गुणधर्माचे असते असा गैरसमज बऱ्याच व्यक्‍तींमध्ये आढळतो. दही स्पर्शाला थंड असले तरी वीर्याने उष्ण असते. दही नियमित सेवन केल्यास दमा, पित्त, रक्‍तविकार, सूज, मेद व कफदोष वाढवू शकते. याखेरीज दही शरीर स्निग्ध करण्यासाठी, रुची निर्माण करण्यासाठी, शरीर पुष्टीसाठी, शुक्र तसेच मेदधातू वाढविण्यासाठी, वातदोष शमविण्यासाठी उपयुक्‍तही असते, पण दह्याचे नियमित सेवन करू नये. त्यातही विशेष म्हणजे रात्री दही खाऊ नये. उष्ण ऋतूत म्हणजे शरद, वसंत व ग्रीष्मात दही खाऊ नये. एरवी कधीतरी दही खायचे असल्यास साखर किंवा गूळ टाकून खावे. 

ताक पथ्यकर
याच दह्यात पाणी टाकून घुसळून लोणी काढलेले ताक मात्र अतिशय पथ्यकर व अनेक रोगांवर औषधाप्रमाणे काम करणारे असते. ग्रहणीरोग, मूळव्याध, शोथरोग, जठररोग वगैरे रोगात ताक औषधाप्रमाणे वापरले जाते. वातरोगात सुंठ व सैंधव टाकलेले ताक प्यावे, पित्तरोगात साखर टाकलेले ताक प्यावे तर कफरोगात सुंठ, मिरी, पिंपळी टाकलेले ताक प्यावे असे भावप्रकाशात सांगितलेले आहे. दुपारच्या जेवणानंतर रोज वाटीभर ताजे व गोड ताक पिणे उत्तम असते.

ताक घुसळताना जे लोणी बाजूला निघते त्याला आयुर्वेदात नवनीत असे म्हणतात. याप्रकारे घरी बनविलेले ताजे लोणीच खाण्यास योग्य असते. महिनोन्‌ महिने टिकणारे लोणी आयुर्वेदाला अभिप्रेत नाही. 
नवनीतं हितं गव्यं वृष्यं वर्णबलाग्निकृत्‌ ।
तद्‌ हितं बालके वृद्धे विशेषादमृतं शिशोः ।।
...भावप्रकाश

गाईचे लोणी हितकर, शुक्रवर्धक, वर्ण्य, बल्य, अग्निप्रदीपक वगैरे अनेक गुणांनी युक्‍त असते. असे लोणी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हितकर असते, लहान मुलांना तर विशेषत्वाने अमृतसमान असते. 

आहारात रोज चमचाभर लोणी-साखरेचा समावेश करणे आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषतः, लहान मुलांनी, गर्भवती स्त्रियांनी, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी व वय वाढले तरी शक्‍ती व उत्साह टिकून राहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी रोज लोणी खाणे उत्तम असते. 

खाईन तर तुपाशी...
ताकापासून बनविलेले लोणी मंद आचेवर कढवल्याने जे तूप बनते ते आयुर्वेदिक साजूक तूप होय. आरोग्यासाठी उत्तमोत्तम द्रव्यात अशा तुपाचा पहिला क्रमांक लागावा. कारण यामुळे शरीराला आवश्‍यक तेवढी स्निग्धता मिळते, शरीरातील विषद्रव्यांचा निचरा होतो, वाढत्या वयानुसार होणारी शरीर-मनाची झीज कमीत कमी होते, वार्धक्‍याकडे होणारी वाटचाल कमीत कमी वेगाने होते. 

गाईचे दूध जसे सर्वोत्तम समजले जाते तसेच गाईचे तूपही सर्वोत्तम असते. परंतु आयुर्वेदिक पद्धतीने बनवले असल्यास म्हशीचे तूपही खायला हरकत नाही. आयुर्वेदीय तूप आहारासमवेत म्हणजे वरण-भातावर, पोळी-भाकरीला लावून, आमटीमध्ये वगैरे तर घेता येतेच, पण स्वयंपाक बनविताना तेलाला उत्तम पर्याय म्हणूनही वापरता येते. अर्थात ज्यांना तळलेले पदार्थ चालत नाहीत त्यांना तुपात तळलेलेही चालत नाहीच. परंतु वजन कमी करण्यासाठी, शरीरातील, रक्‍तवाहिन्यांतील मेद कमी होण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी तेल बंद करणे वा कमी करणे हितावह असेल, त्या वेळी तूप हा उत्तम पर्याय असतो. तान्ह्या बाळापासून ते वृद्ध व्यक्‍तींपर्यंत सर्वांनी तूप घेणे एकंदर आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषतः वाढत्या वयानुसार शरीरातील नैसर्गिक वंगण कमी होण्याची, शरीरातील चैतन्य कमी होण्याची, रोगप्रतिकारक्षमता घटण्याची प्रवृत्ती असते, हे टाळण्यासाठी तुपासारखा दुसरा अप्रतिम पदार्थ मिळणार नाही.

शिवाय तुपाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या द्रव्यांसह संस्कारित केले जाईल त्या द्रव्यांचे गुण स्वीकारते व शरीरावर त्याप्रकारे काम करते. म्हणूनच तूप हजारो रोग बरे करू शकते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.  निरोगी अवस्थेतही वयाच्या पन्नाशीनंतर स्मरणशक्‍ती नीट राहण्यासाठी ब्राह्मी घृत घेणे, डोळे नीट राहण्यासाठी त्रिफळा घृत घेणे, गर्भाशयादी अवयवांचे आरोग्य नीट राहण्यासाठी अशोकादि घृत घेणे चांगले असते. 

या प्रकारे आहारद्रव्य किंवा औषधद्रव्य म्हणून तूप सेवन तर करता येतेच पण नाकात तूप टाकणे, पायाला तूप लावून पादाभ्यंग करणे, नवजात बालकाची टाळू तुपाने भरणे, तुपाने नेत्रतर्पण करणे, जखम भरून येण्यासाठी जुने तूप जखमेवर लावणे वगैरे प्रयोगही करता येतात व ते साधे वाटले तरी विलक्षण प्रभावी असतात. 

औषधी गोमूत्र
गोमूत्र हे सुद्धा एक श्रेष्ठ औषध आहे. 
गव्यं समधुरं किञ्चित्‌ दोषघ्नं क्रिमिकुष्ठनुत्‌ ।
कण्डुं च शमयेत्‌ पीतं सम्यग्दोषोदरे हितम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
गाईचे मूत्र कडू, तिखट व किंचित गोड चवीचे असते. दोषांचे शमन करते, कृमी (जंत, सूक्ष्म जीवजंतू, अनिष्ट शक्‍ती) यांना नष्ट करते, त्वचारोगांवर उपयोगी असते, विशेषतः कंड येत असल्यास कमी करते, दोषजन्य उदररोगाचा (म्हणजे पोटात पाणी जमणे, यकृत, प्लीहा वगैरे अवयव आकाराने वाढणे) बरे करते. 

आयुर्वेदात आठ प्राण्यांच्या मूत्राचे गुणधर्म दिलेले असले तरी त्यात गोमूत्र हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. प्रत्यक्षातही विविध यकृत विकारांवर, वृक्करोगांवर, मानसिक रोगांवर गोमूत्र नियमित घेण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. यकृत, वृक्क वगैरे महत्त्वाचे अवयव कार्यक्षम राहण्यासाठी निरोगी अवस्थेतही दोन-चार चमचे गोमूत्र घेणे चांगले असते. फक्‍त ते सात वेळा सुती कापडातून गाळून घेतलेले व समभाग पाणी मिसळलेले असावे. 

गोमूत्र व गोमयाप्रमाणेच गाईच्या पित्ताशयातील खडे, गाईचे केस, गाईचे दात देखील औषधात वापरले जातात. यकृताच्या व मूत्रपिंडाच्या रोगांनी अगदी शेवटच्या स्थितीत असलेले रुग्ण गोमूत्र दिल्यानंतर बरे झाल्याचे अनुभव आहेत. गोमूत्र पाण्यात मिसळून झाडांवर शिडकाव केल्यास कीड मरते. शेण-गोमूत्र यांचे खत हे तर शेतीसाठी उपयोगी असलेले नैसर्गिक द्रव्य समजले जाते. हे नैसर्गिक शेणखत दिल्याने झाडांना उत्तम पाने, फळे, फुले येतात. रासायनिक खतांचा दुष्परिणाम कसा होतो व त्यामुळे कसे निरनिराळे रोग उत्पन्न होतात हे कळल्यावर सेंद्रिय शेतीकडे वळत असताना किंवा परदेशात सर्वांना बायो-उत्पादने लोकप्रिय झालेली असताना शेणखताचे महत्त्व नजिकच्या भविष्यकाळात अतिशय वाढणार आहे. शेणापासून गॅस बनविण्याने शेतकऱ्याची आर्थिक धारणाच बदलते.

याप्रकारे गाईमुळे होऊ शकणारे फायदे बघितले व अनुभवले की गाईला ‘गोमाता'' का म्हणतात, गोदान हे श्रेष्ठदान का आहे हे समजू शकते, तसेच गोमातेचे भरण पोषण करणाऱ्या गोकुळात भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे का झाले हेही ध्यानात येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna Janmashtami article