श्रीकृष्णांचे आरोग्य मार्गदर्शन

Lord Shreekrishna
Lord Shreekrishna

 "सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति' अशी लक्षणे दिसायला लागली की नैराश्‍याचा झटका येतो. अशा वेळी शरीरातील इंद्रियांचा व मेरुदंडाचा संबंध तुटतो. असे झाले की "भ्रमतीव च मे मनः' होणे ओघानेच येते, म्हणजे रोगाकडे वा मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागणे, कायम सकारात्मक विचार करणे, प्रत्येक गोष्टीतील वाईट न शोधता चांगला भाग घेऊन सर्वांना घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. 

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। 
तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।। श्रीमद्‌भगवद्‌गीता 18-78।। 

जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान व जेथे गांडीवधनुष्यधारी अर्जुन आहे तेथे श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. 
आपल्याला 'श्री' म्हणजे जीवन जगण्याला लागणारी सर्व साधने (इन्फ्रास्ट्रक्‍टर) हवी आहेत. आपल्याला विजय हवा आहे म्हणजे आपली विचारसरणी नकारात्मक असू नये. आपल्याकडे वैभव असावे म्हणजे इतरांना मदत करण्यासाठी आवश्‍यक ती साधनसामग्री आपल्याकडे असावी. नीतिमत्ता असावी आणि या सर्व गोष्टी अचल म्हणजे कायमसाठी असाव्या. यांच्यामुळे जीवन सुखी होते. या सर्व गोष्टी तेव्हाच मिळतात, जेव्हा आपल्या शरीरात असलेला परमात्मा, चैतन्य-तेज यांचा व आपल्या मेरुदंडाचा समन्वय होतो. या समन्वयातून शरीर तयार झालेले असते व या समन्वयातून जीवन फुलत असते. या समन्वयासाठी जे ज्ञान, जी समज आवश्‍यक आहे ते मेंदूमार्फत कार्य करत असल्याने त्रिपुटी नीट जुळली तर मनुष्याचे जीवन सुखी होते. 
अन्न कसे असावे याबाबत भगवंत म्हणतात, 
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं श्रृणु ।।17-7।। 
भोजन सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारांचे प्रिय असते. प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट खाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच काहीच न खाणे, अति उपवास करणे हेही योग्य नाही. तसेच यज्ञ, तप व दान ही तीन प्रकारची कर्मे आहेत. ही कर्मेही नीट प्रकारे चालू ठेवणे आवश्‍यक असते. 
भगवंत पुढे म्हणतात, आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख व प्रीती वाढविणारे रसयुक्‍त व स्निग्ध अन्न सेवन करावे, नुसते चटपटीत व रुक्ष अन्न खाण्याचा उपयोग नाही. हृद्य म्हणजे मनाला प्रिय आहार सात्त्विक व्यक्‍तींना प्रिय असतो. 
तामसिक प्रवृत्तीच्या मनुष्याचे कर्म नीट चालत नाही, त्यामुळे तो सुखी व्हायला त्रास होतो. त्याने एकदम सात्त्विकतेचा आधार घ्यायचा का? तर नाही. दहा सिगारेट पिणाऱ्याने नऊ सिगारेट प्यायला सुरुवात केली की त्याच्या शरीरातील सिगारेट प्यायची इच्छा दहा टक्‍क्‍याने कमी झाली असे म्हणता येईल. हलके हलके 8...7...6...असे करता येते. अशाच प्रकारे तामसिक-राजसिक अन्नामध्ये थोडा थोडा बदल करून सात्त्विकतेकडे जाता येते. याप्रमाणे सर्व दोष सोडता येतात. यानंतर भगवंतांनी फार तिखट, आंबट, खारट, उष्ण, झणझणीत, रुक्ष, दाहकारक, शोक व रोग उत्पन्न करणारा आहार राजसिक आहे असे सांगितले. अर्धवट शिजलेला, रसहीन, दुर्गंध सुटलेला, शिळा, उष्टा, अपवित्र आहार तामसिक आहार असे सांगितले. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतेने आयुर्वेदाचे अप्रतिम असे मार्गदर्शन केलेले आहे. 
असे नुसते आहाराविषयी मार्गदर्शन पुरण्यासारखे नाही. जीवनावर वातावरणाचा परिणाम होतो, मंत्रांचा परिणाम होतो. महाभारतातील युद्धाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वातावरण बदलण्याच्या हेतूने सर्वांनी आपापले शंख वाजविले. याचे वर्णन करताना श्रीमद्‌भगवद्‌गीतेत म्हटले आहे, 
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदायरत्‌ ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ।।1-19।। 

शंखांच्या ध्ननीने आकाशाला व पृथ्वीला दणाणून सोडले, तसेच धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदये विदीर्ण केली. 
चुकीचे ध्वनी, कानाला तीक्ष्ण असणारे ध्वनी हृदयाला चांगले नसतात, मृत्यूला कारणीभूत होतात हे लक्षात घेण्याची आवश्‍यकता आहे. 
आरोग्य का बिघडते? अर्जुनाला नैराश्‍याने ग्रासले. जीवनात रस राहिला नाही की मनुष्याचे सर्व बिघडत जाते. चांगले कर्म करण्याची इच्छा, इतरांना मदत करण्याची इच्छा असली तर जीवन नीट चालू राहते, आरोग्य मिळते. याउलट मला काही करायचे नाही, मला मरायचे आहे अशी इच्छा असली आणि 'सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति' अशी लक्षणे दिसायला लागली की नैराश्‍याचा झटका येतो. आपले नातेवाईक समोर दिसल्यावर आनंद व्हायला हवा, हृदय उचंबळून यायला हवे; त्याऐवजी त्यांच्याशी माझे भांडण झालेले असल्याने त्यांच्याशी कसे वागावे असा प्रश्न पडत असेल तर गात्रे शिथिल होऊ लागतात, तोंडाला कोरड पडू लागते, शरीराला कंप सुटतो, अंगावर रोमांच सुटतात. युद्धाच्या वेळी अर्जुनाचे हेच झाले. त्यामुळे 
गाण्डीवं संस्रते हस्तात्‌ त्वक्‍चैव परिदह्यते । 
न च शक्‍नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ।।1-30।। 

अशी अर्जुनाची परिस्थिती झाली. अशा वेळी शरीरातील इंद्रियांचा व मेरुदंडाचा संबंध तुटतो. असे झाले की "भ्रमतीव च मे मनः' होणे ओघानेच येते म्हणजे रोगाकडे वा मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागणे, कायम सकारात्मक विचार करणे, प्रत्येक गोष्टीतील वाईट न शोधता चांगला भाग घेऊन सर्वांना घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com