मकरसंक्रांती - लक्ष आरोग्यावर 

Makarsankrantee Focus on Health
Makarsankrantee Focus on Health

संक्रांतीचा महोत्सव हा एक प्रकारे आयुर्वेदाचाच महोत्सव आहे. आपल्याला हवे आहे आरोग्य व त्यासाठी हवी सूर्यकृपा. मकरसंक्रांतीला सूर्योपासना खास करून सांगितलेली आहे. केवळ संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर त्याआधी व नंतरही सूर्योपासना चालवली तर खरा लाभ मिळण्यासारखे आहे. 
 

‘आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌’ याविषयी आपण ऐकलेले आहे. आरोग्यासाठी हवा प्रकाश, तेज, शक्‍ती. सूर्यप्रकाश आपल्याला प्रत्यक्ष दिसतो, परंतु त्याच सूर्यप्रकाशामुळे जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते, कचरा खाली राहतो, वाफ वर जाते, पाणी शुद्ध होऊन पावसाच्या रूपाने आपल्याला परत मिळते. याच पाण्यावर वाढते अन्नसंपदा व जंगले. सूर्यप्रकाशामुळेच झाडे मोठी होतात, पीक-पाणी येते, एवढेच नाही तर गुलाबाचा सुवास हाही सूर्यप्रकाशाचाच असतो. असा हा सूर्य रजेवर जातानासुद्धा आपला एक प्रतिनिधी म्हणून प्रकाशाची सोय करून जातो. ही सोय म्हणजे चंद्राच्या माध्यमातून आलेला सूर्यप्रकाश. अर्थात चंद्राच्या कला असतात. अमावास्येचा चंद्र जवळजवळ नसतोच. म्हणजेच अमावास्येला चंद्र रात्री आकाशात दिसत नाही. अमावास्येला चंद्र दिवसा आकाशात असल्याने त्याच्या प्रकाशाचा आपल्याला उपयोग नसतो. प्रतिपदेला छोटी चंद्रकोर दिसते, द्वितीयेला त्याहून मोठी चंद्रकोर दिसते. अशा प्रकारे वाढत वाढत पौर्णिमेला संपूर्ण चंद्र दिसतो आणि पुढे अमावास्येपर्यंत चंद्राच्या कला कमी कमी होत जातात. 

सूर्याचा प्रकाश असे आपण म्हणतो; परंतु हा प्रकाश नुसता प्रकाश नसतो, प्रकाशाबरोबर वेगवेगळ्या शक्‍तींच्या तरंगलांबीप्रमाणे आपल्याला शक्‍ती मिळत असते. दुसरे म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता किंवा योग्यता एवढी मोठी, की सूर्य कुठेही उगवलेला असला तरी भिंतीच्या एखाद्या छिद्रातून खोलीत आलेला सूर्यप्रकाश परावर्तित होऊन संपूर्ण खोलीत प्रकाश पसरतो. घराच्या पश्चिमेच्या खिडकीतून सकाळी सूर्याची प्रत्यक्ष किरणे येत नाहीत; पण तरीही सूर्य उगवला, की पश्चिमेकडच्या खोलीतही प्रकाश येतोच. या प्रकाशाला, या शक्‍तीला दुसरा कुठलाही पर्याय नाही. 

वर्षातून एकदा सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, त्या वेळी त्याची शक्‍ती आपल्यापर्यंत येताना कमी होते. ही कमी झालेली शक्‍ती आपल्यालाही जाणवते. या काळात उन्हातील उष्णता कमी झालेली आढळते, थंडीचा कडाका जाणवतो. शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण केवळ सूर्यप्रकाशावर अवलंबून राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. 

ग्रहणाच्या वेळी, मग ते सूर्यग्रहण असो, चंद्रग्रहण असो, त्या वेळी सूर्याची शक्‍ती आपल्याला कमी प्रमाणात मिळते. साधारण वर्षात सात ग्रहणे होतात. शिवाय, ग्रहणाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शक्‍तीचे तरंग बदलतात. त्यामुळे वेगळेच वातावरण तयार होते, त्यामुळे ग्रहणाला महत्त्व दिलेले दिसते. 
आपल्याला हवे आहे आरोग्य व त्यासाठी हवी सूर्यकृपा. मकरसंक्रांतीला सूर्योपासना खास करून सांगितलेली आहे. केवळ संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर त्याआधी व नंतरही सूर्योपासना चालवली तर खरा लाभ मिळण्यासारखे आहे. अचानक कुणापुढे जाऊन उभे राहिले तर आपल्याला मदत मिळेलच असे नसते. तेव्हा डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरू करून मार्चच्या मध्यापर्यंत सूर्योपासना निश्चितपणे करावी. सूर्योपासनेची महती ओळखण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी एका बुटकुल्यात (छोट्या मातीच्या भांड्यात) दूध घेऊन ते भांडे अग्नीवर ठेवले जाते. सूर्य अग्निशक्‍ती देतो म्हणून हे दूध त्यास अर्पण केले जाते, असा एक रिवाज सुरू झालेला दिसतो. 

संक्रांतीला शक्‍ती वाढण्यासाठी तीळ व गूळ यांची योजना केलेली दिसते. तिळाचे महत्त्व मोठे आहे. तीळ आयुर्वेदाने सर्वोत्तम मानलेले आहेत. तिळाच्या तेलाला पर्याय नाही. तिळाचे तेल खाण्यासाठी उष्ण पडते म्हणून खाण्यासाठी सौम्य गुणांचे शेंगदाणा तेल वापरले जाते. परंतु बाह्य स्नेहनासाठी सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाची सर इतर कोणत्याही तेलाला नाही. नारायण तेल, महानारायण तेल, बला तेल, चंदनबलालाक्षादि तेल असे मसाजसाठी वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध केलेल्या तीळ तेलाचे अनेक पाठ आयुर्वेदात सांगितले आहेत. या सुमारास भारतभर तिळाचे लाडू, रेवडी, तिळगुळाची पापडी असे पदार्थ खाण्याची पद्धत आहे. हे पाहिले, की आपल्या पूर्वजांची थोरवी गावी तेवढी थोडीच आहे असे म्हणावेसे वाटते. संक्रांतीनिमित्ताने हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिलांना घरी बोलावले जाते. पुरुष मंडळीही लहानथोरांना तिळगूळ देतात. एकमेकांना तिळगूळ देऊन ‘गोड बोला’ असे सांगितले जाते. गोड बोलणे म्हणजे दुसऱ्याची प्रशंसा करणे, इतरांना मैत्रीचे व सहवासाचे आमंत्रण देणे. 

दुपारच्या वेळी आकाशातील सूर्याकडे पाहणे तसे अवघडच असते, नुसते आकाशाकडेही पाहणे अवघड असते. परंतु मकरसंक्रांतीच्या वेळी आकाशध्यान करता येते. म्हणून या सुमारास पतंग उडविण्याची पद्धत आहे. याला खेळाचे स्वरूप यावे, आनंद वाटावा म्हणून एकमेकांचे पतंग कापणे, कापले गेलेले पतंग पकडणे वगैरे खेळ केले जातात. बहुतेक पतंग झाडांत अडकतात, ते काढण्यात काही अर्थ नसतो, कारण काढण्याच्या प्रयत्नात ते हमखास फाटतात. आकाशध्यानाचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक मंडळी या सुमारास पहाटेपासून पतंग उडवतात व आनंद लुटतात. 
संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे, कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्याचा या थंडीच्या दिवसांत उपयोग होतो. परदेशात काळ्या गाड्या अधिक दिसतात ते यामुळेच. आपल्याकडे उष्ण हवामान असल्याने पांढऱ्या रंगाच्या गाडीत थंडाव्यासाठी एसी जास्त चालवावा लागत नाही असा अनुभव आहे. 

एका तिळावर साखरेच्या पाकाची अनेक पुटे चढवून काटेदार हलवा तयार केला जातो. हलवा करणे हे काम खूप अवघड आहे, ते यंत्राने करता येत नाही, त्यामानाने तिळाचे लाडू, चिक्की, पापडी वगैरे प्रकार करायला सोपे असतात. मकरसंक्रांत सर्व बाजूंनी आपल्याला प्रफुल्लित करते, एक मोठा सण तयार होतो. एखाद्याला नुसता हलवा, तिळगूळ देऊन गोड बोला असे सांगताना याचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणून काही भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे तिळगूळ, हलवा वगैरे बरोबर एखादी भेटवस्तू दिली, की देणाऱ्याची ऊब व प्रेम लक्षात येते. 

तिळाचे तेल, तीळ या गोष्टी औषधीकरणातही वापरले जातात. संक्रांतीचा महोत्सव हा एक प्रकारे आयुर्वेदाचाच महोत्सव आहे. ‘आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌’ हे लक्षात ठेवून हा केलेला वर्षातील एक विधी होय.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com