हिवतापाला रोखेल नवे औषध

Malaria
Malaria

हिवतापाला रोखेल, असे प्रभावी औषध सापडत नव्हते. नेचे हे हिवतापावर गुणकारी ठरत होते, पण त्याहून प्रभावी औषध हवे होते. आता नवे औषध सापडले आहे. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आता अधिक जोमाने पावले पडू शकतील. पावसाळ्यात महाराष्ट्र-गोव्यात हिवतापाची साथ येते हे लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवी.

नव्याने संशोधन करण्यात आलेल्या हिवतापावरील औषधाचे मानवी शरीरावरील परीक्षणांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या नव्या औषधामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक पेशींमध्ये झपाट्याने वाढ होताना आढळली आहे, तसेच रक्तामधील परोपजीवी जंतूंचे प्रमाण चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी या औषधाची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सुधारित औषधाच्या चाचण्याही यशस्वी झालेल्या दिसत आहेत. 

हिवतापाची ओळख जुनीच
भारतात अनादी काळापासून हिवतापाचा त्रास होत आला आहे. चरक आणि सुश्रुत यांनी आपल्या ग्रंथात हिवतापाचे सविस्तर वर्णन केले आहे व त्याचा डासांच्या चावण्याशी संबंध असावा, असेही सूचित केले आहे. लक्ष्मणाची युद्धभूमीवर शुद्धी हरपली ती मेंदूच्या हिवतापाने असावी, असा एक तर्क मांडला जातो. हिवताप भारतात किती आधीपासून परिचित आहे, हे सांगण्यासाठी हा दाखला पुरेसा असावा. हिवतापाचे निर्मूलन करण्याचे १९५३ पासून जोरदार प्रयत्न झाले. पहिल्या दशकातच हिवतापाच्या रोग्यांचे प्रमाण प्रतिवर्षी साडेसात कोटींवरून वीस लाखांपर्यंत घटले. पण हिवतापाचे निर्मूलन झाले असे वाटत असतानाच पुन्हा हिवताप दिसू लागला. १९७६ मध्ये पुन्हा हिवताप वेगाने पसरला. त्यावर वेळीच उपाययोजना करीत १९९५ पर्यंत पन्नास हजारपर्यंत हे रुग्णांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले. पण गेल्या दहा वर्षात पुन्हा हिवताप त्रासदायक होत आहे. 

हिवताप हा आजार प्लाझ्मोडियम जातीच्या सूक्ष्म जंतूंमुळे होतो. मानवाला पीडित करणाऱ्या प्लाझ्मोडियमच्या चार जाती आहेत. त्यापैकी दोन म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्‍स आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम हे जंतू प्रमुख आहेत. हिवतापाचा प्रसार ॲनॉफेलिस जातीच्या डासांच्या मादीकडून केला जातो. या डासाच्या मादीला पुनरुत्पादनासाठी आवश्‍यक प्रथिने फळातील रसांमधून व मानवी रक्तामधून मिळतात. त्यामुळे ही मादी माणसाचे रक्त शोषण करते. ॲनॉफेलिस डासाची मादी चावल्यावर साधारणतः आठ ते चौदा दिवसांत ताप येतो. हे डास सहसा स्वच्छ पाण्यात वाढतात.  

भारतात कोठे?
संपूर्ण भारतात वर्षभरात साथीच्या रूपात आढळणारा हा आजार आहे. अपवाद, समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचावरील प्रदेश. देशातील अठरा राज्यांमध्ये या आजाराचे जास्त प्राबल्य दिसून येते. त्यापैकी ईशान्येकडील सात राज्यांचा समावेश होतो. त्या सोबतच ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, कर्नाटकाचा प्रामुख्याने समावेश होतो. या आजाराचा प्रसार हा त्या ठिकाणच्या भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार असतो. कारण आर्थिक मागासलेल्या भागात आरोग्याबद्दल प्राथमिक सोयींचा अभाव आणि आरोग्याबद्दलच्या जनजागृतीचा अभाव, जास्त पर्जन्यमान, घनदाट वनराजीयुक्त भौगोलिक परिस्थितीत डासांचे प्रमाण जास्त असते.

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये हिवतापाचे प्रमाण खूपच जास्त असते. कारण साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे आरोग्यासंबंधी प्राथमिक सेवा व जनजागृतीचा अभाव असतो. देशातील १५२ जिल्हे हे हिवतापासाठी अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात.

हिवतापाची लक्षणे
हिवतापाच्या दोन प्रमुख प्रकारांपैकी सर्वाधिक रोगी प्लाझ्मोडियम वायवॅक्‍स जंतूंपासूनचे असतात. त्यांचे प्रमाण साठ ते सत्तर टक्के इतके असते. तर प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमचे रोगी सुमारे तीस ते पस्तीस टक्के असतात. प्लाझ्मोडियम ओवेल व प्लाझ्मोडियमचे रोगी क्वचितच आढळतात. वायवॅक्‍स मलेरियाच्या तुलनेने फॅल्सिपॅरम मलेरिया अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो. वायवॅक्‍स प्रकारच्या हिवतापात अचानक थंडी वाजून हुडहुडी भरते. मग ताप येतो, अंग दुखते. ताप दोन-चार तास टिकतो आणि घाम येऊन पूर्ण उतरतो. याबरोबर डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, थकवा हा त्रास होतो. ताप सहसा दिवसाआड येतो. काही रुग्णांना मात्र रोज ताप येतो.

फॅल्सिपॅरम प्रकार जास्त घातक आहे. त्यात ताप जास्त असतो. मेंदूपर्यंत आजार पोचला तर उलट्या, वागण्या बोलण्यात फरक, झोपाळूपणा, झटके, बेशुद्धी अशी लक्षणे दिसतात. हा प्रकार जरी घातक असला तरी लवकर निदान आणि उपचार करून सुरक्षित राहता येते. हा आजार वनवासी भागात जास्त आहे. पुढील काही ठळक लक्षणे दिसली तर वैद्यकीय मदत लगेच घेतली पाहिजे. 

  तीव्र ताप व डोकेदुखी
  मेंदूच्या व्यवहारात बदल
  मानसिक संतुलनात बिघाड
  अर्धवट बेशुद्ध अवस्थेपासून ते पूर्ण बेशुद्ध अवस्था
  वात येऊन झटके येणे
  काही अवयवांत आकडी येणे
  मूत्रपिंडाची कार्यप्रवणता कमी होणे
  रक्तनमुना तपासणीमध्ये फॅल्सिपॅरमच्या रिंग आणि गॅमेटोसाईट्‌सचे अधिक प्रमाण असणे

काही वेळा रुग्णास इतर आजारांबरोबर हिवताप असू शकतो, ही बाब सदैव लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. म्हणून रुग्णाच्या रक्ताचा नमुना घेऊन त्याची तपासणी करणे जरुरीचे असते. 

तपासण्या व उपचार
हिवतापासाठी रक्त तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. रक्त नमुना काच पट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शक तपासणी ही सर्वांत भरवशाची आणि स्वस्त आहे. रॅपिड डायग्नोस्टिक किट वापरायला सोपे असते आणि तीन मिनिटात परिणाम कळू शकतो. रुग्णाला जेवढ्या लवकर उपचार होतील तेवढा लवकर आराम पडतो आणि रोगाचा प्रसारही टळतो. पूर्ण उपचारासाठी डॉक्‍टरांची मदत घ्यावी. फॉल्सी प्रकारचा हिवताप नसल्यास रुग्णालयात भरती होण्याची सहसा गरज नसते. व्हायवॅक्‍स प्रकारच्या हिवतापाचा उपचार घरी राहून घेता येतो.

यात इंजेक्‍शन, सलाईन याची मुळीच गरज नसते. घरच्या घरी चहा, कॉफी, नारळपाणी असे द्रवपदार्थ घेत राहा. हिवतापाच्या उपचारासाठी क्‍लोरोक्वीन हे प्रभावी औषध आहे. मळमळ टाळण्यासाठी या गोळ्या पोळी, बिस्कीट किंवा केळ्याबरोबर घ्याव्यात. या आजारात भरपूर पाणी, द्रवपदार्थ प्यावेत. क्‍लोरोक्वीनबरोबर पॅरासिटामॉलची एक किंवा दोन गोळ्या घ्याव्यात.

फॉल्सीपेरम प्रकारचा हिवताप असेल तर ॲट्रेमिसीनीन किंवा क्विनाईनचे औषध लागते. हे उपचार संपल्यावरही समूळ उपचारही घ्यावे लागतात. आता पावसाळ्यात डासांची वाढ जास्त होईल. खिडक्‍यांना मच्छर प्रतिबंधक जाळ्या लावून घ्या. झोपताना अंगाला डासरोधक मलम लावून घ्या किंवा शक्‍यतो मच्छरदाणीचा वापर करा. डास-मच्छर प्रजनन थांबवण्यासाठी पावसाळी खड्डे व डबकी माती-मुरमाने भरून घ्या. बांधकामात साठलेले पाणी निचरा करून टाका. तळ्यांमध्ये गप्पी किंवा गंबूशिया मासे सोडा. हे मासे डासांच्या अळ्या खाऊन जगतात. याबरोबरच पाणी साठलेले डबे, टायर, फुटक्‍या बादल्या यांचा निचरा करा. महत्त्वाचे म्हणजे आजार तीव्र स्वरूप धारण करणार नाही, याची खबरदारी घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी रोग्याच्या रक्ताच्या नमुन्याची नियमितपणे तपासणी करावी व त्वरित उपचार सुरू करावा. म्हणजे मेंदूचा हिवताप होण्याची शक्‍यता राहणार नाही. औषधोपचार चालू असतानाही वेळोवेळी रक्ताचे नमुने घेऊन हिवतापाच्या परजीवी जंतूंचे रक्तातील प्रमाण कमी झाले किंवा नाही याचीही तपासणी करणे जरुरीचे आहे. बाहत्तर तासापर्यंत निश्‍चित औषधोपचारास आजार दाद देत नसेल तर त्यांना ‘रेझिस्टंट केस’ म्हणता येईल व अशा प्रत्येकाला इतर उपचार करून त्याची वेगळी नोद करणे जरुरी असते.

नवे औषध
निद्रिस्त स्वरूपाच्या आणि कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या प्लासोमोडियम वायवॅक्‍ससारख्या हिवतापावर नियंत्रण मिळवणे हे अतिशय कठीण असते. हिवतापापासून सुरक्षित राहण्यासाठी पहिल्यांदाच ‘व्हिवाक्‍स’ या औषधाचे मानवी शरीरावर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासनाच्या देखरेखीखाली वॉल्टर रिड इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चमधील संशोधक व ग्लास्को स्मित किल्ने यांच्या संयुक्त चमुने हे परीक्षण केले आहे. दोन वर्षांपूर्वी या औषधाची पहिली चाचणी झाली तेव्हा रुग्णाच्या रक्तात हिवतापाच्या परजीवी जंतूंचे प्रमाण ५९ टक्के आढळले होते. या वेळच्या परीक्षणात हे प्रमाण चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. संशोधकांनी तीस जणांवर या औषधांचे लसीकरण तीन वेळा केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना हिवतापबाधित डासांकडून दंश करण्यात आले होते.

या वेळी लसीकरण झालेल्या स्वयंसेवकांवर लसीकरणाचा प्रभाव निर्धारित आधारांवर झाला की नाही किंवा त्यांच्या रक्तात हिवतापाच्या अंशाचा प्रभाव कमी असल्याचे आणि परजीवींचा रक्तातील प्रसारासाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधी लागल्याचे दिसून आले. त्यामुळे ‘पी-व्हिवाक्‍स’ या औषधामुळे मानवी शरीरातील हिवतापाचा संसर्ग रोखण्यात यश मिळाल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे संशोधकांनी जाहीर केले आहे. यामुळे अजून सुधारित औषधांची निर्मिती शक्‍य आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com