पावसाळ्यात सांभाळायची त्रिसूत्री

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 6 July 2018

पावसाळ्यातील बदलांमुळे शरीर संवेदनशील, नाजूक झालेले असते आणि म्हणून या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे अपरिहार्य असते. आयुर्वेदाने आहार, आचरण आणि उपचार ही त्रिसूत्री कायम सांभाळलेली आहे. या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पावसाळ्यात आपण आरोग्य सांभाळू शकतो.

वरवर पाहता, गैरसोयीचा भासला तरी पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू आहे. पावसाळ्यात निसर्गसौंदर्यसुद्धा अधिकच खुललेले असते. हवेतील थंडावा मनाला व शरीराला सुखावणारा असतो. खूप पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र या पावसाळ्याचा आनंद घ्यायचा असला तर तब्येतीला थोडे जपावे लागते. इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांत शरीरात, वातावरणाचा, पर्यावरणात खूप बदल होत असतात. हे बदल मुख्यत्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील, शरीराची सर्व कार्ये ज्या त्रिदोषांकरवी होत असतात, त्यापैकी वातदोषाचा प्रकोप होत असतो, तर पित्तदोष साठत जातो.

शरीर ज्यांच्यापासून बनलेले आहे, त्या धातूंची शक्‍ती कमी होते, सर्वच धातू शिथिल होतात. 

बाह्य वातावरणात पाण्याचे प्रमाण वाढल्याने मूत्रप्रवृत्ती वारंवार होऊ लागते.
अग्नी मंदावतो, त्यामुळे भूक, पचनशक्‍ती मंदावते. 
हवेतील दमटपणामुळे वातावरणात जंतूंचे प्रमाण वाढते तसेच धातू शिथिल झाल्यामुळे प्रतिकारशक्‍ती कमी होते. 

या सर्व बदलांच्या एकत्रीकरणामुळे शरीर संवेदनशील, नाजूक झालेले असते आणि म्हणून या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे अपरिहार्य असते. आयुर्वेदाने आहार, आचरण आणि उपचारही त्रिसूत्री कायम सांभाळलेली आहे, आपणही या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पावसाळ्यात आरोग्य कसे सांभाळावे, याची माहिती करून घेऊया.

आहार
भजेत्साधारणं सर्वं उष्मणस्तेजनं च यत्‌ ।
अशा अन्नाचे सेवन करावे की जे वात-पित्त-कफ या तिघांचे संतुलन करेल, उष्ण असेल व अग्नीला प्रदीप्त करण्यास सक्षम असेल.

पावसाळ्यात अशीही भूक कमीच लागते. त्यामुळे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात चार घास कमी खाणे चांगले असते. विशेषतः संध्याकाळी लवकर जेवावे आणि अगदी हलके अन्न खावे. संध्याकाळी नुसती मुगाची खिचडी, कढी-भात किंवा द्रवाहार म्हणजे सूप घेता येते. सकाळी नाश्‍त्याला साळीच्या लाह्या व दूध, मेतकूट भात, तांदळाची उकड यांसारखे पचण्यास सोपे व दुपारी बारा-साडेबारापर्यंत नक्की भूक लागेल असे पदार्थ घेता येतात.

दुपारचे जेवणही गरम असण्याकडे लक्ष हवे. पोळीऐवजी ज्वारी-बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, फुलका यांच्यावर भर देणे चांगले. दुपारच्या जेवणानंतर जिरे, काळे मीठ, आले टाकून वाटीभर ताजे ताक पिणे उत्तम. दही मात्र टाळणेच चांगले. 

पावसाळ्यात हवा दमट होते तसेच पाण्यातही बदल होतो. पावसाळ्यात पाण्याचा विपाक ‘आंबट’ होतो असे आयुर्वेदात सांगितलेले असल्याने तसेच पावसाळ्यात पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यताही सर्वाधिक असल्याने पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. वास्तविक प्यायचे पाणी उकळून घेणे कायमच चांगले असते, पण पावसाळ्यात पिण्यासाठी निश्‍चितपणे उकळलेले पाणीच वापरायला हवे. पाणी वीस मिनिटे उकळलेले असावे. पाण्याचा आंबट विपाक कमी करण्याच्या दृष्टीने पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ यांसारखी मधुर विपाकाची द्रव्ये किंवा तयार ‘जलसंतुलन’ टाकले तर ते खऱ्या अर्थाने शुद्ध होते आणि पचायलाही सोपे होते. 

पावसाळ्यात वातप्रकोप होतो त्यामुळे शरीरात कोरडेपणा वाढविणारे पाव, चुरमुरे, मैद्यापासून बनविलेले पदार्थ वगैरे टाळणे आवश्‍यक असते. तसेच पचण्यास जड व वात वाढविणारे चवळी, वाटाणा, पावटा, चणा, ढोबळी मिरची, गवार, वांगे वगैरे गोष्टी पावसाळ्यात अपथ्यकर होय. अंडी, मांसाहारसुद्धा पावसाळ्यात वर्ज्य करणेच चांगले. पावसाळ्यामध्ये रोजच्या आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे खालील सारिणीवरून सहज लक्षात येईल. 

धान्ये ः तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू. सर्व धान्ये आधी भाजून घेतली असल्यास उत्तम. 

डाळी-कडधान्ये ः मूग, तूर, मटकी, कुळीथ

भाज्या ः दुधी, तोंडली, परवर, दोडकी, घोसाळी, कार्ले, कोहळा, गाजर, तांबडा भोपळा, भेंडी, पडवळ, चांगल्या पाण्यावर पोसलेल्या पालेभाज्या.

फळे ः सफरचंद, अंजीर, पपई, नारळ, गोड मोसंबी-संत्री.

मसाल्याचे पदार्थ ः आले, हिंग, दालचिनी, धणे, जिरे, मिरे, बडीशेप, लवंग, लिंबू, पुदिना, कोथिंबीर

इतर ः साळीच्या लाह्या, खडीसाखर, मध, सैंधव मीठ

दूध व दुधाचे पदार्थ ः दूध, ताजे व गोड ताक, घरचे साजूक तूप

गोड पदार्थ ः खीर, शिरा, केशरभात, मुगाचा लाडू

आचरण  
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने अन्न नासण्याची, बुरशी वगैरे येण्याची शक्‍यता अधिक असते. त्या दृष्टीने अधिक खबरदारी घ्यायला हवी. बाहेरील अन्न, जे बनविताना स्वच्छतेची काळजी घेतलेली असेलच याची खात्री नसेल; असे अन्न, शिळे अन्न टाळणेच चांगले. 

आहाराची याप्रमाणे काळजी घेणे आपल्या हातात असते, सोपे असते. मात्र हवेमुळे होणारे बदल सांभाळणे त्यामानाने अवघड असते. या दृष्टीने फार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, खेळती हवा नसणाऱ्या ठिकाणी न राहणे, ओल आलेल्या ठिकाणी न राहणे, तसेच घरातील हवा शुद्ध राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ विशिष्ट द्रव्यांचा उदा. ऊद, गुग्गुळ, ओवा, कडुनिंब, अगरू, चंदन, कोष्टकोळिंजन, विडंग वगैरे द्रव्यांचा किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर’ धूप करणे चांगले असते. 

वाढलेला वात, कमी झालेली शरीरशक्‍ती यांच्या अनुषंगाने पावसाळ्यात प्रवास फार होणार नाही, रात्रीची जागरणे होणार नाहीत, दमछाक करणाऱ्या व्यायामांची सुरवात होणार नाही याकडे लक्ष देणे चांगले. त्याऐवजी योगासने, लोम-विलोम, प्राणायाम, भस्रिका यांसारखे सोपे, न दमविणारे पण पंचवायूंना संतुलित करणारे व्यायाम करणे अधिक श्रेयस्कर होत. 

कधी काही कारणाने पावसात भिजणे झाले, तर लवकरात लवकर अंग कोरडे करून ऊबदार कपडे घालणे, महत्त्वाचे म्हणजे डोके व केस व्यवस्थित पुसून कोरडे करणे गरजेचे होय. यानंतर ओवा, शोपा, वावडिंगाची धुरी घेता आली तर फारच उत्तम. याने सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्‍शनला प्रतिबंध होऊ शकतो.

उपचार
पावसळ्यामध्ये खोकला होण्याची किंवा दमा असणाऱ्यांना दम्याचा ॲटॅक येण्याची अधिक शक्‍यता असते. अशा व्यक्‍तींनी पावसाळा सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागताच सितोपलादी चूर्ण, ‘प्राणसॅन योग (वैद्यांच्या सल्ल्याने)’, ब्राँकोसॅन सिरप वगैरे औषधे सुरू करणे चांगले. यामुळे प्रतिकारशक्‍ती चांगली राहते, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. छाती व पाठीला अगोदर तेल लावून ओव्याच्या पुरचुंडीने किंवा रुईच्या पानांनी शेकल्यास त्यानेही छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला आणि दम कमी व्हायला मदत मिळते. 

सर्दी, ताप, खोकला होऊ नये, घशामध्ये जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी सितोपलादी चूर्ण उपयोगी असते, तसेच घरच्या घरी बनवता येणारा काढा-उकाळा (हर्बल टी) सुद्धा गुणकारी असतो. कपभर पाण्यात गवती चहाचे एक-दीड इंचाचे तुकडे, दोन-तीन तुळशीची पाने, दोन-तीन पुदिन्याची पाने, थोडेसे किसलेले आले, अर्धा चमचा बडीशेप व चवीप्रमाणे साखर घालून एक उकळी आणावी, नंतर गॅस बंद करून दोन-तीन  मिनिटे झाकून ठेवावे, नंतर गाळून घेऊन घोट घोट प्यावे. असा चहा दिवसभरात केव्हाही घेता येतो. यामुळे सर्दी-ताप-घसादुखी वगैरे पावसाळ्यातील त्रासांना प्रतिबंध होतो, पचन सुधारते, पोट साफ होण्यास, लघवी साफ होण्यास मदत मिळते. 

पावसाळ्यामध्ये वातदोषाला संतुलित ठेवण्याच्या दृष्टीनेही कायम प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी अभ्यंग, बाष्पस्वेदन, बस्ती हे उपचार उत्तम होत. घरच्या घरी सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी अंगावर अभ्यंग तेल जिरवणे, दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानाच्या वेळी साबणाऐवजी उटणे वापरणे, सांधे-पाठ-कंबर वगैरे ठिकाणी वेदना होत असल्यास रुईच्या पानांनी किंवा निर्गुडीच्या पानांनी शेकणे, रोज सकाळी सुंठ-गूळ-तूप यांची सुपारीच्या आकाराची गोळी खाणे, गरम पाणी पिणे वगैरे उपायांची योजना करता येते. 

अशा प्रकारे पावसाळ्यात आयुर्वेदाची ही त्रिसूत्री सांभाळली तर पावसाचा आनंद घेता येईल आणि आरोग्याही व्यवस्थित राहील.

काय कराल?
अंग कोरडे ठेवा. उबदार कपडे घाला.
शिळे अन्न टाळा. अन्न गरम करून घ्या.
ताक प्या, दही टाळा.
जागरणे करू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manage health in the rainy season