मुले सारखी आजारी पडतात? (डॉ. राहुल नागपाल)

डॉ. राहुल नागपाल
Tuesday, 26 December 2017

लहान मुले सतत आजारी असतात, असा कित्येकांचा अनुभव असतो. पण हे आजारपण सर्दी-ताप, कधी उलट्या, कधी जुलाब अशा प्रकारचे असते. काही मुले मात्र हाडांच्या कमजोरीमुळे आजारी असतात. त्या मुलांना कदाचित ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.

लहान मुले सतत आजारी असतात, असा कित्येकांचा अनुभव असतो. पण हे आजारपण सर्दी-ताप, कधी उलट्या, कधी जुलाब अशा प्रकारचे असते. काही मुले मात्र हाडांच्या कमजोरीमुळे आजारी असतात. त्या मुलांना कदाचित ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.

आपण शाळेत असताना कधीतरी शिकलेले असतो की, ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांना अस्थिविकार (विशेषतः मुडदुस) होण्याची शक्‍यता असते. पण आपल्याला मुले होतात, तोपर्यंत हे शाळेत पाठ केलेले वाक्‍य विसरलेले असतो. जर आपले मूल सतत आजारी पडत असेल तर हे विसरलेले वाक्‍य पुन्हा आठवायला हवे. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर हाडांची रचना कमजोर होते आणि त्याचा परिणाम म्हणून मुलांची वाढ खुंटते, हाडे मोडण्याची शक्‍यता वाढते. एक लक्षात घ्या की, केवळ हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम व फॉस्फरसची पातळी योग्य राखण्यापुरते ‘ड’ जीवनसत्वाचे कार्य मर्यादित नाही, तर ते यासह आणखीही अनेक महत्त्वाच्या भूमिकाही बजावते. मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची पातळी कमी झाल्यास त्यांना हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबासारख्या कार्डिओव्हस्क्‍युलर आजारांचा धोका अधिक असतो. ऑर्थोस्टॅटिक इन्टॉलरन्सचा म्हणजे उभे राहताना जाणवणारी कमकुवतपणाची लक्षणे दिसतात, त्याचा संबंधही ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावाशी आहे. मूल बसलेले असताना किंवा झोपलेले असताना उठून उभे राहते, तेव्हा शरीराचा तोल राखला जाण्यासाठी अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये रक्त प्रवाहित होणे आवश्‍यक असते. असे झाले तर त्यांचा रक्तदाब आणि पर्यायाने मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर विपरित परिणाम होत नाही. असे घडत असेल तर त्या परिस्थितीला ‘ऑर्थोस्टॅटिक इन्टॉलरन्स एक’ असे म्हटले जाते. मुलांमधील कार्डिओव्हस्क्‍युलर कार्ये सुरू राहण्यात ‘ड’ जीवनसत्वाचा वाटा असतो. त्यामुळे या जीवनसत्वाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्यास मुलाने केलेल्या हालचालींबरोबर त्यांच्या हृदयाची गती आणि नाडीची गती बदलते.

‘ड’ जीवनसत्वाची कमतरता असल्यास आणखी एक आजार उद्भवण्याचा धोका वाढतो, तो आजार म्हणजे कावासाकी. ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव असलेल्या विकसित देशांमधील मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. या आजारात ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. ही सूज रोखणाऱ्या प्रतिक्रिया ‘ड - दोन’ जीवनसत्व निर्माण करू शकते. त्यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येणे, तसेच या आजाराच्या अन्य लक्षणांचा प्रतिबंध होतो.

दीर्घकाळ मूत्रपिंडाचे विकार असलेल्या मुलांमध्येही ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता आढळते व त्यामुळे त्यांच्या हाडांच्या वाढीचा वेग कमी होतो. ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे फुप्फुसांच्या उतींचे नुकसान होते आणि फुप्फुसांच्या अनेक प्रादुर्भावांचा धोका मुलांमध्ये वाढतो. ‘ड-तीन’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अस्थम्याचा एक विकार लहान मुलांमध्ये आढळतो.

‘ड’ जीवनसत्वाची पूरके
‘ड’ जीवनसत्वाचा अभाव हा मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा प्रकार आहे आणि तो पुढे अनेक विकारांना आमंत्रण देऊ शकतो, हे आपण पाहिले. मुलांच्या योग्य व आरोग्यपूर्ण वाढीसाठी ‘ड’ जीवनसत्वाचे पुरेसे अस्तित्व आवश्‍यक असते. मुलांना ‘ड’ जीवनसत्वाची पूरके नियमितपणे दिल्यास ती ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या विकारांपासून, तसेच तत्सम लक्षणांपासून दूर राहतात. त्यामुळे मुलांमध्ये काही सकारात्मक बदल शक्‍य आहेत. सूर्याच्या कोवळ्या उन्हातून ‘ड’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात मिळते, हे आपण शाळेत शिकलेले असतोच. डॉक्‍टरांनी दिलेल्या पूरकांबरोबरच सूर्यकिरण अंगावर घेण्याचा उपाय योग्य ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi features Health