मनमंदिराची द्वारे

मनमंदिराची द्वारे

सर्व मंडळी ‘दुःख नको’ असे तोंडाने म्हणत असली, तरी बहुतेक मंडळी दुःखाला आमंत्रण मात्र देत असतात. स्वतःच्या प्रकृतीला न मानवणारे, केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी किंवा ‘मी रोज बारा हिरव्या मिरच्या खातो’ वगैरे बढाया मारण्यासाठी चुकीचे पदार्थ खाण्यावर भर देतात. हे सर्व आत गेलेले पदार्थ शरीराला नंतर किती उपयोगी पडतात, ते शरीरात कशा प्रकारे सात्म्य होतात किंवा ते शरीरात असलेल्या चांगल्या पेशींना स्वतःच्या नादी लावून कसे बिघडवतात यावर कुठलेही नियंत्रण नसते. सिग्नलच्या दिव्यात ‘थांबा’ या संकेतासाठी लाल दिव्याचा उपयोग केला जातो, पण मनुष्याला लाल रंगाच्या लवंगी मिरचीचा मोह मात्र सोडता येत नाही.

शरीर हे आत्मा-मन यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या सर्वच द्वारांवर लक्ष ठेवणे आवश्‍यक असते, ज्या द्वारांमधून गोष्टींचा वा वस्तूंचा आत प्रवेश होतो अशा द्वारांवर विशेष लक्ष देणे आवश्‍यक असते. द्वार नीट बंद होणे किंवा त्याने कुरकूर न करणे यासाठी बिजागऱ्यांमध्ये तेल टाकणे हा झाला भौतिक उपचार; परंतु त्या द्वाराचा जो मुख्य उद्देश त्यावर लक्ष देणे हा सुद्धा द्वाराचे आरोग्य सांभाळण्याचा उपचार समजायला हवा. मध्यंतरी एका मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचा योग आला. चित्रपटाची सुरवात चुकू नये या हिशेबाने बहुतेक मंडळी मागे-पुढे येत असल्यामुळे आत जातांना गर्दीचा त्रास झाला नाही. परंतु चित्रपट सुटल्यानंतर सर्व मंडळी एकदम बाहेर येत असताना एक मोठी रांग दिसली. मनात विचार आला, ‘रात्र झाली आहे, तेव्हा आता ही रांग कसली असेल? लोक रांगेत उभे पाहून काय करत असावेत?’ बाहेर पडताना प्रत्येकाला दरवाजाच्या विशिष्ट रचनेतून (त्रिकोणी दांडा) जावे लागत होते असे लक्षात आले. याचे कारण काय असावे असे मनात आले. चौकशी करताना असे समजले की जेवढे लोक मॉलमध्ये आत आले तेवढे बाहेर गेले की नाही यावर लक्ष ठेवावे लागते. चोऱ्या होऊ नयेत, अपघात वगैरे होऊ नयेत म्हणू तेथे अशी काळजी घेणे आवश्‍यक असते व तसे करणे शक्‍यही असते.

जो मनुष्य बाहेरील अशा छोट्या छोट्या गोष्टींबाबत काळजी घेतो तोच मनुष्य स्वतःच्या शरीराची, आरोग्याची, संरक्षणाची एवढी काळजी घेतो का? इंद्रियांनी आत घेतलेल्या वस्तू व माहितीचे काय झाले हा विचार करायला हवा. 

वस्तू स्वीकारण्यासाठी तोंड हा एकमेव मार्ग आहे असे मनुष्याला वाटते. म्हणून तोंडाचा जास्तीत जास्त वापर करून भरमसाट खात सुटणे याचा त्याला मोठा अभिमान वाटतो. साधारणतः कारखान्याची द्वारे सकाळी उघडतात, शिफ्ट संपली की कामगार बाहेर जातात व कारखान्याची द्वारे बंद होतात. पण शरीराचे महत्त्वाचे द्वार, म्हणजे तोंड हे कधी उघडावे याला काही नियम नसतो. या द्वारावाटे अन्न बाहेर जावे अशी योजना नसली तरी पोटात अति धक्काबुक्की झाली व ॲसिड तोंडावर फेकेपर्यंत वेळ आली तर आत गेलेले अन्न उलटीच्या रूपाने तोंडावाटे बाहेर पडते. अन्न आत जाण्याच्या वेळा ठरवून घेऊन त्यानुसार हे द्वार वापरण्यात आले तर आरोग्य टिकवता येते. कान व नाक यांच्यांवर आपले फारसे नियंत्रण नसते, पण यांची उणीव भरून काढण्यासाठी तोंडात वाटेल ते पदार्थ कोंबणे आपल्या हातात असते. पण ते सर्व बाहेर गेले की नाही यावर नियंत्रण नसते. सर्व मंडळी ‘दुःख नको’ असे तोंडाने म्हणत असली तरी बहुतेक मंडळी दुःखाला आमंत्रण मात्र देत असतात. स्वतःच्या प्रकृतीला न मानवणारे, केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी किंवा ‘मी रोज बारा हिरव्या मिरच्या खातो’ वगैरे बढाया मारण्यासाठी चुकीचे पदार्थ खाण्यावर भर देतात. हे सर्व आत गेलेले पदार्थ शरीराला नंतर किती उपयोगी पडतात, ते शरीरात कशा प्रकारे सात्म्य होतात किंवा ते शरीरात असलेल्या चांगल्या पेशींना स्वतःच्या नादी लावून कसे बिघडवतात यावर कुठलेही नियंत्रण नसते.

डोळे, कान ही सुद्धा मनुष्याच्या शरीराच्या आत जाण्यासाठी असलेली द्वारेच आहेत. फक्‍त त्यातून जाणाऱ्या गोष्टी तरंगरूपात असतात. म्हणजे डोळ्यांद्वारा प्रकाशतरंगरूपाने माहिती आत जाते, कानांद्वारा ध्वनितरंगरूपाने माहिती आत जाते. एक महत्त्वाचे द्वार आहे आपले नाक. नाकपुडीतून आत गेलेली हवा एका किंवा दोन्ही नाकपुड्यांतून बाहेर जावीच लागते. हे महत्त्वाचे अशासाठी की यातून आत जाणाऱ्या हवेबरोबर मनुष्याच्या जिवंतपणासाठी आवश्‍यक असणारा ‘प्राण’ आत जात असतो. मनुष्य रागावला की आत येणाऱ्या-जाणाऱ्या हवेची गर्दी (प्रमाण) वाढते; तर मनुष्य शांत असला की संथपणे एका नाकपुडीतून श्वास आत जातो व दुसऱ्या नाकपुडीने बाहेर येतो. बहुतेकांना या गोष्टीचे आश्‍चर्य वाटेल, पण डाव्या वा उजव्या नाकपुडीतून श्वास-उच्छ्वासाचे आवर्तन आलटून-पालटून चालू असते. कुठल्यातरी एका नाकपुडीतून श्वास-उच्छ्वास चालू असला, तरी दुसरी नाकपुडी संपूर्णतः बंद नसल्याने तिच्यातूनही काही प्रमाणात श्वास-उच्छ्वास चालू असतो. हवेवर आरूढ होऊन शरीरात प्रवेश करणाऱ्या प्राणावर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्याला जागरूक राहणे आवश्‍यक असते. जे या प्राणावर लक्ष ठेवतात, नियंत्रण ठेवतात त्यांना अधिक प्राणशक्‍ती मिळते व त्यांचे आयुष्य सुखकर होते. हाच प्राणायाम. 

डोळ्यांच्या बाबतीत काय बघावे व काय बघू नये यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा बघितलेल्या दृश्‍याचा आपल्याला काही उपयोग आहे का, ते स्मृतीत ठेवण्याचे काही कारण आहे का, त्यापासून उत्पन्न होणाऱ्या भावनांचा शरीराला काही फायदा आहे का हे पाहणे आवश्‍यक असते. सिग्नलच्या दिव्यात ‘थांबा’ या संकेतासाठी लाल दिव्याचा उपयोग केला जातो किंवा आगगाडी थांबविण्यासाठी लाल झेंड्याचा उपयोग केला जातो. लाल रंग चटकन नजरेत येतो त्यामुळे मनुष्य पटकन थांबतो. पण या मनुष्याला लाल रंगाच्या लवंगी मिरचीचा मोह मात्र सोडता येत नाही. आपला संबंध असो-नसो, चकाकणाऱ्या सर्व वस्तू डोळ्यात भरतात. मग मनुष्याला या वस्तूंच्या सवयी लागू शकतात. रात्री स्वस्थ झोपणे अपेक्षित असताना रात्री बिछान्यावर पडल्यावर दिवसा पाहिलेल्या अनेक दृश्‍यांच्या स्मृती वेगळीच रूपे धारण करतात व अचकट-विचकट स्वप्नांच्या रूपाने प्रकट होतात व झोपेचे खोबरे होते. 

डोळे निदान मिटता तरी येतात, पण बिचाऱ्या कानांना मिटताही येत नाही, ते बिचारे परस्वाधीन असतात. कानांच्या द्वारातून कोणीही यावे व पैल तरून जावे अशा प्रकारे ध्वनीचा धुडगूस चालू असतो. गाड्यांचे कर्कशपणे वाजविलेले भोंगे, घरात चालू असलेली दारांची वा इतर आदळआपट, सत्यनारायण पूजा, उरुस वा लग्नसमारंभाच्या निमित्ताने कर्कशपणे लावलेली गाणी अशा अनेक कारणांमुळे कानांवर असहनीय असे ध्वनीचे आघात होत असतात. यातील एखाद-दुसरी गाण्याची ओळ (अर्थहीन असल्या तरी) आवडीची वाटली तरी त्यामुळे कान या ऐकण्याच्या संस्थेचे नुकसानच होते. लग्नकार्यात, मिरवणुकी, गणपती, नवरात्र, दीपावलीसारख्या उत्सवात तर ध्वनीचा उच्छाद सुरू होतो. खेडेगावात तर आठ फूट बाय आठच्या फुटाच्या छोट्या मंदिरात लावलेल्या दोन कर्ण्यांनी आजूबाजूच्या आठ-आठ मैलांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या कानांचे पडदे फाटण्याचे काम बारा महिने सुरू असते.  

अवेळीच कानाने कमी ऐकू येऊ लागले तर त्या कानांचा उपयोग काय? ही नेहमी उघडी राहणारी द्वारे उपयोगाची न राहता लवकर कुचकामाची होणे म्हणजे ती वाया जाण्यासारखेच आहे.  

यानंतरचे महत्त्वाचे द्वारे म्हणजे त्वचा. त्वचेमार्फत येणाऱ्या वेगवेगळ्या स्पंदनांमार्फत शरीरात वेगवेगळ्या घडामोडी होत राहतात व त्यातून शरीराला आवश्‍यक असणारी वेगवेगळी प्रथिने तयार होत असतात, तसेच संप्रेरकांना आवश्‍यक ती उत्तेजना मिळत असते, असे वैज्ञानिक म्हणतात. त्वचेसाठी आपल्याकडे काही संरक्षण नाही. बाहेर असणारे प्रदूषण, अनैतिक, दुराचारी, तामसिक विचारांचे तरंग यांना त्वचेला तोंड द्यावे लागते. स्वस्तातील वेगवेगळ्या प्रकारचे कपडेसुद्धा त्वचेला आजारी करतात. प्रदूषणाचा मूळ परिणाम फुप्फुसांवर झाला तर त्याचा त्वचेवर परिणाम होतो. फुप्फुसांना झालेला त्रास बरा करण्यासाठी औषध दिले तर त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचेवर झालेल्या रोगाला औषध द्यायला जावे तर श्वासाचा त्रास सुरू होतो, असे दुष्टचक्र सुरू होते.

आता शेवटचे अत्यंत महत्त्वाचे द्वार, ज्यात बाहेरून प्रवेश होतो असे वाटते, पण खरे पाहता बाहेरून प्रवेश झालेला नसतो, तर त्यात स्वतः तयार केलेल्या काल्पनिक विचारांचा प्रवेश होते. हे द्वार म्हणजे मनाचे द्वार. बाहेर काही गडबड ऐकू आली की ती कसली आहे यावर काही अवलंबून नसते. एखादा ठरवतो की बाहेर दंगा होतो आहे तो पाहायला जाऊ, बाहेर चाललेले दृश्‍य पाहून त्याच्या मनावर विचित्र परिणाम होतो. यात कुठलीही माहिती आत येत नसते, परंतु स्वतःच विचार करून राग, लोभ, प्रीती वगैरे भाव निर्माण झाल्यामुळे शरीराचे नुकसान होत असते. 

अशा प्रकारे शरीराची ही द्वारे. यांच्यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.  म्हणून श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवंतांनी सांगितलेले आहे,

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च । 
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ ।। ८-१२ ।।


ज्याला शांती हवी आहे, त्याला योगधारणा आवश्‍यक आहे, म्हणजे एकरूपता किंवा एकाग्रता साधून जीवनाचे आरोग्य सांभाळायचे आहे त्याला इंद्रियांवर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. मनावर व स्वतःवर लक्ष ठेवून या सर्व द्वारांचे योग्य नियंत्रण केले तर जीवन अत्यंत सुखकर होऊ शकते, असा अनुभव अनेकांनी लिहून ठेवलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com