आवेग-शिंक (डॉ. श्री बालाजी तांबे)

डॉ. श्री बालाजी तांबे
Tuesday, 26 December 2017

सहसा शिंक इतकी एकाएकी येते की ती धरून ठेवणे अशक्‍यप्राय असते. शिंक येणार असा अंदाज आला तरी ती रोखू नका. कोणताही आवेग रोखण्याने त्रासच वाढतो.

सहसा शिंक इतकी एकाएकी येते की ती धरून ठेवणे अशक्‍यप्राय असते. शिंक येणार असा अंदाज आला तरी ती रोखू नका. कोणताही आवेग रोखण्याने त्रासच वाढतो.

‘निदानं परिवर्जनम्‌’ म्हणजे ज्या कारणामुळे रोग झाला असेल ते कारण टाळणे ही उपायांची पहिली पायरी समजली जाते. आयुर्वेदात निरनिराळ्या रोगांची माहिती दिली, त्यातही सर्वप्रथम रोग कोणकोणत्या कारणांमुळे होतो हे सांगितलेले आहे. यात बहुतेक सगळ्या रोगांच्या कारणात असतेच असे कारण म्हणजे वेगधारण. निसर्गधर्माला धरून शरीरात जे आवेग उत्पन्न होतात, ते लागलीच विसर्जित केले जायला हवेत. कामापायी, संकोचापायी, गैरसोयीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने दर वेगधारण झाले, तर त्यातून अनेक प्रकारचे रोग उद्‌भवू शकतात. आपण शिंक आवरून धरली तर काय त्रास होतात याची आज माहिती घेऊया. 

सहसा शिंक इतकी एकाएकी येते की ती धरून ठेवणे अशक्‍यप्राय असते, तरही शिंक आवरण्याचा प्रयत्न केला आणि असे वारंवार घडले तर त्यातून पुढील समस्या उद्‌भवू शकतात. 

मन्यास्तम्भः शिरःशूलमर्दितार्धावभेदकौ ।
इन्द्रियाणां च दौर्बल्यं क्षवथोः स्यात्‌ विधारणम्‌ ।।

 

जखडणे, डोके दुखणे, अर्धा चेहरा वाकडा होणे, अर्धे डोके दुखणे, इंद्रियांचा शक्‍ती कमकुवत होणे.

शिंक येते आहे असे वाटले पण आली नाही, तर अस्वस्थ व्हायला होते आणि शिंक येऊन गेली की बरे वाटते, हा अनुभव सर्वांचा असतो. यामागे सुद्धा वातदोषच कारणीभूत असतो. 

शिंक दाबल्यामुळे बिघडलेल्या वातावर उपचार पुढीलप्रमाणे करायचे असतात, 

तत्रेर्ध्वजत्रुकेऽभ्य स्वेदो धूमः सनातनः ।
हितं वातघ्नमाद्यं च घृतं चौत्तरभक्‍तिकम्‌ ।।

 

कॉलरबोनच्या (जत्रु) वरच्या भागात वातघ्न तेलांनी अभ्यंग करणे, स्वेदन करणे, धूम्रपान (औषधी) करणे, नस्य करणे आणि जेवणानंतर घृतपान करणे. 

वातघ्न अभ्यंग ः मान, गळा व डोके या सर्व ठिकाणी वातनाशक द्रव्यांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करण्याने शिंकेच्या अवरोधाचे दुष्परिणाम कमी होतात. दशमूळ, अश्वगंधा, शतावरी, देवदारू वगैरे वातशामक द्रव्यांनी संस्कारित तिळ तेल यासाठी वापरता येते. या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी कानात वातघ्न तेल टाकणे, शिरोभ्यंग करणे हे सुद्धा अध्याहृत असते. 

धूम्रपान ः औषधी धूम्रपान करताना मुख्यत्वे आत घेतलेला औषधी धूम मुखावाटेच बाहेर काढायचा असतो. वाताचे शमन करण्यासाठी गुग्गुळ, धूप, मेण, देवदार वगैरे द्रव्यांचा वापर केला जातो. तीन वेळा मुखाने आणि तीन वेळा नाकाने धूप घेऊन धूम्रपान करायचे असते. योग्य प्रकारे हे औषधी धूम्रपान केले की कंठ, शिर, छाती या ठिकाणी हलकेपणा येतो, कफदोष सुटा होतो, इंद्रियांची शुद्धी होते. 

नस्य ः वातशामक द्रव्यांनी संस्कारित कोमट करून तेल किंवा तुपाचे थेंब नाकात टाकणे. हा उपचार वैद्यांच्या देखरेखीखाली करता येतो किंवा घरच्या घरीसुद्धा करता येतो. घरच्या घरी नस्य करायचे असेल तर पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल किंवा नस्यसॅन घृताचे तीन-चार थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकता येतात 

स्वेदन ः मान, कपाळ, कान वगैरे ठिकाणी शेक करणे हा पुढचा उपचार होय. यासाठी सुद्धा वातघ्न औषधांचा उपयोग करायचा असतो. उदा. मानेवर, कपाळावर निर्गुडीच्या वाफवलेल्या पानांचा शेक करता येतो. कानामध्ये तेल टाकण्यापूर्वी ते गरम करता येते. डोक्‍यावर फारसे स्वेदन करून चालत नाही. मात्र अगोदर तेल लावून वरून कोमट पाण्याची पिशवी घेणे किंवा हलका वाफारा घेणे किंवा डोक्‍याला लोकरी उबदार वस्त्र गुंडाळणे या उपायांनी स्वेदन करता येते. 

जेवणानंतर घृतपान ः दुपारच्या, तसेच रात्रीच्या जेवणानंतर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप किंवा वैद्यांच्या सल्ल्याने दशमूळ सिद्ध घृत, आमलक्‍यादि घृत याप्रमाणे औषधांनी सिद्ध घृतही घेता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi features Health Ayurveda Dr Balaji Tambe