आवेग

health
health

ढेकर येऊन गेला की मोकळे व हलके वाटते हा सर्वांचाच अनुभव असतो. मात्र संकोचापायी ढेकर अडवून ठेवण्याची पाळी आली तर त्यामुळे फार अस्वस्थ व्हायला होते. चारचौघांत जांभई आली तर ती दाबण्याऐवजी तोंडावर हातरुमाल घेणे चांगले होय.

निसर्गाच्या विरुद्ध आचरण हे नेहमीच त्रासदायक असते. शरीरात रात्रंदिवस ज्या विविध प्रक्रिया चालू असतात त्यांचा परिणाम म्हणून जे आवेग उत्पन्न होत असतात, ते अडवून धरण्याने अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनशैलीची पहिली गुरुकिल्ली म्हणजे आवेगांना धरून न ठेवणे व ते जबरदस्तीने उत्पन्न न करणे. 

ढेकर
असाच एक नैसर्गिक आवेग म्हणजे ढेकर. ढेकर येऊन गेला की मोकळे व हलके वाटते हा सर्वांचाच अनुभव असतो. मात्र संकोचापायी ढेकर अडवून ठेवण्याची पाळी आली तर त्यामुळे फार अस्वस्थ व्हायला होते. ढेकर दबवल्याने काय त्रास होतात हे चरकसंहितेत पुढीलप्रमाणे सांगितले आहे,
हिक्कः श्वासोऽरुचि कम्पो विबन्धो हृदयो रसोः ।
उद्गारनिग्रहात्‌ तत्र हिक्कायास्तुल्यमौषधम्‌ ।

उचकी, दमा, तोंडाला चव नसणे, कंप, छातीमध्ये जखडल्यासारखे वाटणे हे त्रास ढेकर अडवून ठेवल्याने होतात. यावर उचकी रोगावर जे उपचार करायचे असतात ते करावेत. उदा.,
  डाळिंबाचा रस व मध समभाग एकत्र करून वरचेवर चाटणे.
  अख्खी वेलची तव्यावर किंवा कढईमध्ये पूर्ण जाळून राख करणे आणि ती मधात कालवून थोडी थोडी चाटणे. 
  अहळीव पाण्यात भिजवून काही वेळाने ते उलले की वरचे पाणी गाळून घेऊन त्यात मध मिसळून वरचेवर पिणे. 
  उडदाच्या डाळीचा धूर घेण्यानेही उचकी लागण्याचे प्रमाण कमी होते असा अनुभव आहे. 

जांभई
जांभई हासुद्धा एक नैसर्गिक आवेग असतो. चारचौघांत जांभई आली तर ती दाबण्याऐवजी तोंडावर हातरुमाल घेणे चांगले होय. जांभई धरून ठेवण्याची सवय असली तर त्यातून पुढील त्रास उद्भवू शकतात,
विनामाक्षेपसंकोचाः सुप्तिः कम्पः प्रवेपनम्‌ ।
जृम्भाया निग्रहात्तत्र सर्वं वातघ्नमौषधम्‌ ।।

जांभई अडवून धरली तर शरीर एका बाजूला झुकते, झटके येतात, अंग-प्रत्यंगांचा संकोच होतो, बधिरपणा जाणवतो आणि शरीरात तसेच हातापायांमध्ये कंप होऊ लागतो. यावर वातनाशक उपचार करावे लागतात. सामान्य वातनाशक उपचार थोडक्‍यात याप्रमाणे होत,
  स्नेहन - बाहेरून तेल लावणे व खाण्यासाठी तूप वापरणे
  स्वेदन - आयुर्वेदिक पद्धतीने बाष्पस्नान किंवा शेक करणे
  चवीला गोड, आंबट, खारट, स्निग्ध व उष्ण वीर्य असलेले पदार्थ खाणे
  वातशामक द्रव्यांनी बनवलेल्या काढ्याने स्नान करणे
  वातशामक द्रव्यांपासून तयार केलेल्या आसव-अरिष्टांचे सेवन करणे
  वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाचा बस्ती (एनिमा) घेणे, यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेले तेल वापरणे
  ताजा, गरम व पचायला हलका पण स्निग्ध असा आहार योजणे, शक्‍यतो गरम पाणी पिणे. 

भूक
भूक हा यापुढचा नैसर्गिक आवेग होय. वेळच्या वेळी जेवणे हे महत्त्वाचे असते. भूक नसताना जेवणे आणि भूक लागूनही न जेवणे हे दोन्ही रोगाला कारण ठरणारे असते. भुकेचा निग्रह करण्याने काय होते हे आयुर्वेदात असे सांगितले आहे, 
कार्श्‍यदौर्बल्यवैवर्ण्यम्‌ र्अेऽरुचिः भ्रमः ।
क्षुद्वेग निग्रहात्‌ तत्र स्निग्धोष्णं लघु भोजनम्‌ ।।

वजन घटल्याने मनुष्य कृश होतो, अशक्‍तता येते, शरीराची कांती बिघडते, अंग दुखू लागते, तोंडाची चव जाते, चक्कर येते.
उपवास करणे तसेच ‘डाएट’च्या नावाखाली मोजकेच खाणे, वजन वाढण्याच्या अनाठायी भीतीपोटी निःसत्त्व, कोरडे अन्न खाणे या गोष्टीसुद्धा भुकेचा आवेग धरून ठेवण्यातच मोडतात.  
या तक्रारींवर उपचार म्हणजे पचण्यास हलके, गरम (ताजे) आणि पुरेशी स्निग्धता असलेले जेवण जेवणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com